।। मना त्वाचि रे पूर्वसचीत केलें । तयासारिखे भोगणे प्राप्त झालें ॥। ८ ।।
-रामदास.
गणपतराव दर्याजी थोरात प्र० देवाचे कोणते प्रतिशब्द आहेत?
जोतीराव गोविंदराव फुले. उ०- दैवास नशीब, प्रालब्ध, प्राक्तन, संचित, रती, सुकृत, लल्लाटरेषा, ब्रह्मलिखित, असे अनेक प्रतिशब्द आहेत. याविषयी उदाहरणे - एखाद्या आईबापाने आपल्या मुलास विद्या शिकण्याची गोडी नसती, त्यास दुराग्रहाने त्याच्या मनाविरुद्ध शाळेत चालून त्यास अभ्यास करावयास लाविलें; तथापि त्यास स्वभावतः विद्या शिकण्याची मुळीच गोडी नसल्यामुळे, तो अविद्वान् निपजल्याबरोबर त्याजविषयी सर्व लोक असे म्हणू लागतात की, विद्या शिकणे हे त्याच्या देवातच नव्हते. त्याचप्रमाणे एखाद्या आईबापाने मुलास विद्या शिकण्याची गोडी असता त्यास शाळेत पाठविण्याचा प्रयत्न जरी केला नाहीं, तथापि त्यानें आपण होऊन शाळेत जाऊन विद्या संपादन केल्याबरोबर त्याजविषयीं सर्व लोक असे म्हणू लागतात की, विद्या शिकणें हें त्याच्या देवांतच होते. एखाद्या कारागिराने शिल्पशास्त्र वगैरे विद्येमध्ये पुरती माहिती करून घेतल्याशिवाय आगगाडी करण्याची कल्पना करून ती तयार करू लागल्यामुळे त्याचा सर्व पैसा खर्ची पडून त्याची सर्वोपरी नुकसानी झाल्याबरोबर त्याजविषयीं सर्व लोक असे म्हणू लागतात की, आगगाडी तयार करून त्यामध्ये यश मिळवणे हे त्याच्या नशीबातच नव्हते. त्याचप्रमाणे एखाद्या कारागिराने शिल्पशास्त्र वगैरे विद्येमध्ये चांगली पूर्ण माहिती करून घेतल्यानंतर निर्विघ्नपणें आगगाडी तयार केल्याबरोबर त्याजविषयी सर्व लोक असे ह्मणू लागतात की, आगगाडी तयार करता येणे हे त्याच्या नशिबातच होते. एखाद्या व्यापाऱ्याने व्यापाराविषयी बिलकूल माहिती करून न घेता, त्यानें व्यापार करण्याचे काम सुरू करताच त्यामध्ये त्याची सर्वोपरी नुकसानी झाल्याबरोबर त्याजविषयी सर्व लोक असे ह्मणू लागतात की, व्यापारामध्ये यश मिळवणे हे त्याच्या प्रालब्धामध्येच नव्हते. त्याचप्रमाणे एखाद्या मनुष्याने व्यापारासंबंधी माहिती करून घेण्यासाठी एखाद्या वाकबगार व्यापाऱ्याच्या दुकानी उमेदवारी करून त्याविषयी चांगली माहिती करून घेताच तो व्यापार करू लागल्याबरोबर त्यास यश येऊ लागते. यामुळे त्याजविषयीं सर्व लोक त्यास असें ह्मणू लागतात की, व्यापारामध्ये यश मिळणे हे त्यांच्या प्रालब्धांतच होते त्याचप्रमाणे एखाद्या मुलाचे आईबाप स्वभावानें सद्गुणी असल्यामुळे त्यांची मुलहि त्यासारखी सद्गुणी निवडताच त्यास अखेरीस मोठमोठ्या हुद्याच्या जागा मिळून त्यांचा लौकीक झाल्याबरोबर, त्यांजविषयीं सर्व लोक असे ह्मणू लागतात की, मोठमोठ्या सरकारी हुद्याच्या जागा मिळून त्याचा लौकीक होणे हे त्यांच्या प्राक्तनांतच होते. एखाद्या राजानें लढाईसंबंधी सर्व सामग्र्या तयार केल्याशिवाय शत्रुबरोबर लढाई करताच त्याचा मोड झाल्याबरोबर त्याजविषयीं सर्व लोक असे हाणू लागतात की, युद्धामध्ये मोड होणे हे त्याचे संचितातच होते. त्याचप्रमाणे एखादा राजा धनुर्विद्येसंबंधी एकंदर सर्व सामग्र्या सिद्ध करून जेव्हा शत्रूचा मोड करितो, तेव्हा त्याजविषयी सर्व लोक असे ह्मणू लागतात की, युद्धामध्ये जय मिळवणे हे त्याचे संचितातच होते. एखादा अक्षरशून्य अज्ञानी ठोंब्या, ज्यास व्यापारधंद्याविषयी स्वतः अनुभव नसून तो अगोचरपणा करून सरकारी कामात मक्ता घेण्याचा धाडसपणा करितो त्याचा असा समज असतो की, "जयभर रतीपुढे तोवराभर अक्कल कोही कामाची नाही." अशा अज्ञानी धाडस मनुष्याने एखादा मोठा मक्ता घेतला आणि त्याने केवळ पोकळ देवावर भरवसा ठेवून त्यामध्ये जाणूनबुजून हयगय केल्यामुळे त्यास तोटा आल्याबरोबर त्याजविषयी सर्व लोक असे म्हणू लागतात की, त्याला मक्त्यामध्ये तोटा आला. येथे त्याच्या रतीने मागे घेतले. त्याचप्रमाणे सदरच्या अज्ञानी ठोल्याने एखादा मोठा मक्ता घेतल्यावर सरकारी कामगारांस लांच दिल्यामुळे अथवा छक्केपजे करून त्या कामांत काही कसर ठेवल्यामुळे त्यास एखाद्या वेळी मक्त्यामध्ये थोडासा नफा झाल्याबरोबर त्याजविषयी सर्व लोक असे म्हणू लागतात की, त्याच्या रतीने आपुले पाऊल पुढे सारले, म्हणूनच मक्त्यामध्ये त्यास नफा झाला. असो, एक सत्यशोधक समाजीवन एके वेळी वैशाखमासी भर उन्हात प्रवास करीत असतो, सुमारे बारा वाजता उन्हाच्या तापाने अतिशय व्याकूळ होऊन क्यौनालच्या शेजारी एका थंडगार वृक्षाचे गाढ छायेखाली ऊन टाळण्याकरिता विश्रांतीस बसतो, तो बाराची तोफ दणाणल्यामुळे क्यानालातील शेवाळ काढणाऱ्या बंदीवानास दोन प्रहरची सुटी मिळताच. ज्या झाडाच्या छायेखाली हा प्रवासी विवातीस बसला होता, त्या झाडाखाली काही शिपायी लोकानी एकंदर सर्व बंदीवानास भाकरी खाण्याकरिता आणून बसविले. नंतर भाकरी खाल्ल्यावर त्यापैकी काही बंदीवानांबरोबर प्रवाशाचे संभाषण झाले, ते मासल्याकरिता पुढे देतो
प्रवासी (पहिल्या कैद्यास प्रश्न करितो) तू कोण जातीचा आहेस?
२ ला बंदीवान उ०- महाराज, मी ब्राह्मण जातीचा आहे.
प्रवासी प्र० अरे, तू जातीचा गाईसारखा गरीब ब्राह्मण असतो तुझ्या पायात बिड्या पडण्याचे कारण काय?
१२ ला बंदीवान उ०- गाईसारखा गरीब मी ब्राह्मण जातीचा त्रिकाळ नानसंध्या करणारा आहे खरा; परंतु बिड्या पडणें हे माझ्या सुकृतीत होते.
याला मी काय करू?
प्रवासी. प्र० तुझ्या सुकृताप्रमाणे जर तुझ्या कपाळी विड्या पडल्या, तर तुम्ही धूर्त आर्याचे सुकृत मोठे चमत्कारिक आहे बुवा..
१ ला बंदीवान उ०- असे नव्हे, महाराज, मी हुबेहूब खोट्या नोटा करून कित्येक वेळा चावडीवर उघड दिवसा दरवडा घातल्याप्रमाणे सरकारच्या डोळ्यात माती टाकून मी आपला तळीराम गार केला. ही सर्व लबाडी जेव्हा सरकारच्या नजरेस आली तेव्हा त्यांनी ही शिक्षा यथायोग्य दिली आहे. सुकृत-विचाऱ्याकडे याचा काय बोल आहे? ही मी माझ्या दुष्कर्माची फळें भोगीत आहे..
प्रवाशी (दुसऱ्यास प्रश्न करितो तुझ्या पण गळ्यांत धूर्त आर्य ब्राह्मणासारखा पांढरा दोरा आहे. म्हणून तू ब्राह्मण असावास, वाटते.
२ रा. बंदीवान उ०- होय महाराज, माझी जात ब्राह्मणाचीच आहे.
प्रवासी प्र०- तुम्ही ब्राह्मण केवळ दया, क्षमा, शांतीचे माहेरघरच असता तुझ्या पायांत बिड्या रे का?
२ रा. बंदीवान उ० या जन्मी माझ्या पायांत केव्हा तरी बिड्या पडाव्यात, म्हणून माझ्या लल्लाटी होते, तेथे माझा उपाय नाहीं.
प्रवासी प्र० तुझ्या पायात बिड्या पडणे हे जर तुझ्या लल्लाटीच होते, तर सरकाराने तुला शिक्षा का दिली? ते वेळेस त्यांनी तुझ्या लल्लाटरेषेविषयी काही विचार केला नाही, हे कसे ?
२. रा. बंदीवान उ० तसे नव्हे, महाराज, मी विद्वान् केवळ सरकारच्या खर्चाने झालो असून सरकारी कामगार झालों, परंतु मी त्रिकाळ
नान-संध्या करून देवपूजा करण्याचे धाब्यावर ठेवून सर्व काळ दीन, अज्ञानी शूद्रादि अतिशुद्रावर जुलूम करून कित्येक वेळा लाच खाल्ले तेव्हा सरकारने मला ही योग्य शिक्षा दिली. वास्तविक विचार करता एथे कैचें लल्लाट आणि येथे कैचें फल्लाट आले आहे!
प्रवासी ( हासत हासत) म्हणाला, "की, अठरा वर्णाना ब्राह्मण गुरु म्हणविणारे पांढरा दोरेवाले तिसरे महाराज, " तुमची जात कोण आहे?
३ बंदिवान उ०- माझी पण जात ब्राह्मणाचीच आहे.
प्रवासी प्र० अरे, येथे ब्राह्मण कैद्याची तर सातच आली आहे. असो, तुझ्या पायात बिड्या रे का?
३ बंदिवान उ० या जन्मी माझ्या पायांत विड्या पडणे हे माझ्या कपाळी ब्रह्मलिखित होते, तेथे माझा निरुपाय, याला मी काय करावे?
प्रवासी प्र० जर तुझ्या कपाळी विड्या पडण्याचे ब्रह्मलिखित होते, तर सरकाराने तुला शिक्षा तरी का दिली?
३ रा बंदिवान उ०- तसे नव्हे, देशमुख, मी नाना पेशव्यासारखे या आपल्या धर्माविरुद्ध हिंसक सरकारावर बंड करून कित्येक अज्ञानी
रामोशी माळी वगैऱ्यांच्या प्राणास भवलों व अज्ञानी लोकांतील शांततेचा क्षय केल्यामुळे मला ही शिक्षा झाली. ब्रह्मालिखित होते म्हणून दोष देता येत नाही. ही मी माझ्या दुष्कर्माची फळे भोगीत आहे. प्रवासी प्र० को हो भटजी, तुम्ही जर हिंसक नाही, तर तुमचा नाना पेशवा रेसिडेंटसाहेबांच्या टेबलावर बसून माडीशी माड देऊन त्यांच्याबरोबर मद्यमांसावर कधी कधी झोड उडवीत नव्हता काय? आणि त्याचप्रमाणे तुमचे आर्याचे पूर्वज यज्ञांच्या व श्राद्धांच्या निमित्ताने
गायागुरे भाजून खात नव्हते काय? असे असून तूं इंग्रजांवर नाक चढवून काय बोलतोस?
३ रा बंदिवान उ०- आता आमची कामाची जुपी होण्याची वेळ जवळ आली आहे. नाही तर त्याविषयी तुम्हाला यथास्थित उत्तर दिले असते.
प्रवासी प्र० अरे, तू काळा दोरावाला कोण जातीचा आहेस?
४ या बंदीवान उ०- जोहार महाराज मी व्हय, मी तुमचा माविताच उष्ट खाणारा महार जातीचा आहे. लई दिवस झाल, मग वामन महाराजानी आमच्या गळ्यांत काळा दोरा घालून आम्हांस गावाबाहेर हाकून दिल...
प्रवासी प्र०- अरे, तू खरा निरुपद्रवी मार जातीचा असतो तुझ्या पायात रे बिड्या का?
४ था बंदिवान उ०- नव्ह, मायबाप, या जन्मी माझ्या पायात बेड्या पडण हे माझ्या देवांत होतं..
प्रवासी प्र०- तुझ्या देवात जर बिड़या होत्या, तर अविचारी सरकाराने तुला शिक्षा तरी का दिली?
४ था बंदिवान उ०- तस नव्हं देसमुक महाराज माझ्या बायकून लई लबाडी केल्यामुळे मी रागाच्या भिरकडीत तिला सहज चापट मारतांच तिचा जीव निघून गेला, यामुळे ही मला शिकशा झाली. याचा बोल दैवावर कायी नाहीं.
प्रवासी प्र० तुझ्या बायकीने अतिशय मूर्खपणा केला, तो कोणता?
४ था बंदिवान, उ०- एके दिशी कुचीत् ब्राह्मण मामलदाराच्या कचाट्यात घावल्यामूळ त्यान रातच्या बारा वाजतसतव्हर आनपान्याशिवाय मजपासून गावकीच काम घेतल आणि मंग मी घरी गेलों; तव्हा घरात बघतो, तो माझ्या बायकून चुलीपाशी +++ अक्षी घान केली आणि घराच्या एका कोपऱ्यात झोपी जाऊन डराडर घोरत पडली व्हती यावरून मी तिजला पुसलं की, तू घराबाहेर न जाता घरीतच की XXX ? ती काळोखी रात असल्यामुळ मला बाहेर XXX जान्याच लई भ्या वाटल आणि हाडळीच्या भयामुळे मी घरातच XXX, आस खरुखर उत्तर द्यायाच एके बाजूला ठेऊन माझ्या बायकून घाबरून उत्तर दिले की "चुलीपाशी XXX आणि देवात होते ते झाले." यावरून मी सर्व दिवस उपाशी असल्यामुळे रागाच्या भिरकडीत मी तिला एक चपराक मारताच कोंबडीसारखी खुडखुड करून तिचा परान निघून गेला. यावरून सरकाराने त्या गुन्ह्याबद्दल मजला जन्मठेप दिली. हय देव कैच आणि इथ फैव कैच !
गणपतराव. प्र० यास्तव दैव आहे, किंवा नाही याविषयी चांगला उलगडा करून सांगाल, तर फार बरे होईल?
जोतीराव उ०- देव हैं कल्पित धोरणाने मानलेले कर्म आहे, त्यास मुळीच कर्ता नसतो नशीब, प्रालब्ध आणि संचित या सर्वांचा कर्ता अनुमानाने आपण सर्वांचा निर्माणकर्ता मानिला आहे. रती, सुकृत ही पूर्वजन्मी आपण केलेल्या कर्माची फळें होत, अशी कल्पना आहे. लल्लाटरेषा व ब्रह्मलिखित है आमच्या पूर्व जन्मीचा पाप-पुण्यावरून जन्मास घालतेवेळी ब्रह्माजीने आपल्या कपाळावर सर्व लिहून ठेवलें असते. त्याचप्रमाणे ते सर्व घडून येते. या सर्वांवरून असे सिद्ध होते की, उद्योग आणि आळस याविषयी परिणामीचे अनुमान सर्व लोकांस कळत नाही; यास्तव ते त्यास अनुमानाने दैव ह्मणतात. देव हैं एक रामायण व भागवतातील भाकड दंतकथेसारखेच कल्पिले आहे, ते सर्व मिथ्या आहे, याविषयी रामदासांचे उदाहरणार्थ
अभंग
एक देव आहे खरा । माये नाथिला पसारा || २॥
हेचि विचारे जाणावें । ज्ञाता तयासी ह्मणावें ॥ २ ॥
रामदासाचें बोलणें । स्वप्रापरी जायी जिणे ।। ३ ॥
अभंग
जया ज्ञान हे नेणवे । पशु तयासी ह्मणावें ।। १ ।।
कोणे केले चराचर । कोण विश्वाचा आधार ॥ २ ॥
बह्मादिकाचा निर्माता | कोण आहे त्यापरता ।। ३ ॥
अनंत ब्रह्मांडाच्या माळा हे तो भगवताची लिळा ॥ ४ ॥ रामदासाचा विवेक सर्व कर्ता देव एक । ५ ।
अभंग
ज्ञानाविणें जे जे कळा । ते ते जाणावी अवकळा ॥ १ ॥
ऐसे भगवंत बोलीला । चित्त द्यावें त्याच्या बोला ॥ २ ॥
एक ज्ञानेची सार्थक सर्व कर्म निरर्थक ।। ३ ।।
दास म्हणे ज्ञानावीण । प्राणी जन्मला पाषाण ।। ४ ।।
अभंग
ज्याचे होते त्याणें नेलें । एथे तुझें काय गेले ।। १ ।।
वेगी होई सावधान । करी देवाचें भजन ।। २ ॥
गती नकळे होणाराची हे तो इच्छा भगवताची ।। ३ ।।
पूर्व सचिताचे फळ होती दुःखाचे कल्लोळ ।। ४ ।
पूर्वी केले जे संचित ।। तें तें भोगावे निश्चीत ।। ५ ।।
दास म्हणे पूर्व रेखा ।। प्राक्त न टळे ब्रह्मादिका ॥ ६ ॥
सदरच्या अभंगात अनंत ब्रह्मांडातील ब्रह्माजीस निर्माणकर्त्याची लिला व ज्ञानविषयीं अनंत ब्रह्मांडाचा निर्माणकर्ता भगवान बोलला, हे मानव आर्थ रामदासास ऐकू आले व त्याचप्रमाणे भगवताची इच्छा व आर्याजीचे ब्रह्मादिकांस टाळता न येणारे संचित या तिन्ही वाक्यातील खरे तथ्य रामदासास कळाले नव्हते, याविषयी मोठे आश्चर्य वाटते कारण लिलेविषयी ज्ञान, इच्छा आणि संचित ही परस्पराशी किती विरुद्ध आहेत, हे साधारण मनुष्याच्यासुद्धा मनात सहज येते.
आर्यभट ब्राह्मणांचे वेद आणि सार्वजनिक ईश्वरप्रणित सत्याची तुलना
गोविंदराव गणपतराव काळे, प्र०-महमदी लोक आपल्या धर्मातील मूसा, दावीद, सुलेमान वगैरे सत्पुरुषाचे ग्रंथासह हजरत महमद पैगंबराने केलेल्या पवित्र कुराणाची बाकीच्या इतर सर्व लोकांकरिता अक्षरशः भाषातरे करून ते जगजाहीर जरी करीत नाहीत, तरी त्याच्या धर्मातील पुस्तकें एकंदर सर्व मानवास ऐकण्यास अथवा वाचून पहाण्यास अथवा त्याप्रमाणे आचरण करण्यास कोणत्याच तऱ्हेचा ते प्रतिबंध करीत नाहीत, हे कसे ?
जोतीराव गोविंदराव फुले. उ० इतर सर्व लोकांनी कुराणाप्रमाणे वर्तन करू लागल्याबरोबर मुसलमान लोकांस अतिशय आनंद होतो. कारण ते असे समजतात की, कुराण है अति पवित्र असल्यामुळे एकंदर सर्व जगातील मानवप्राण्यांनी मात्र त्याचा उपभोग घेतल्याबरोबर त्यामध्ये मनुष्यपणा येणार आहे.
गोविंदराव. प्र०- त्याचप्रमाणे ख्रिस्ती लोक आपल्या धर्मातील मुख्य बायबल ख्रिस्तीयन लोकांसह एकंदर सर्व जगातील सर्व प्रकारच्या परधर्मी लोकांस प्रांजळ बुद्धीने वाचून पाहण्यासाठी बहुतेक निरनिराळ्या भाषामध्ये त्याचे तरजुमे करून सर्वामध्ये जगप्रसिद्ध करितात.
यावरून ते सार्वजनीक ईश्वरप्रणीत सत्याच्या नावाला काहीसे शोभण्यासारखे दिसते, असे मला वाटते.
जोतीराव उ-तुला त्याविषयी कसेहि वाटो. परंतु बायबलामध्ये कोणत्याच प्रकारची आवडनिवड नसती त्याचा सर्व मानव प्राण्यांना सारखा उपभोग घेता येतो, असे असून धूर्त आर्यभट्टाचे अज्ञानी शुद्र सेही आपल्या ग्रंथात असे लिहितात की "इंग्रज लोकाचे राज्य या देशांत झाले तेव्हा त्यांनी येथे इंग्रजी शाळा वगैरे स्थापून व पाद्रीकडून आपल्या ख्रिस्ती धर्माचा उपदेश करवून या देशातील लोकांत जो आस्तिकपणा वागत होता, त्याचा नाश केला; म्हणून इंग्रजी विद्या शिकलेले लोक आपली (आर्य धूर्त भट्टाची) शास्त्रे खोटी व अज्ञानभरीत आहेत, असे मानू लागले आहेत" याला कोणत्या प्रकारचा शहाणपणा म्हणावा?
गोविंदराव प्र० तसेच आर्यभट ब्राह्मणाचे वेद सार्वजनिक ईश्वरप्रणित सत्याच्या नावाला काहीसे शोभण्याजोगते आहेत काय?
जोतीराव उ० धूर्त आर्य ब्राह्मणांनी अंकित केलेल्या शुद्रादिअतिशुद्रास खेरीज करून आपल्या आर्यभट जातीशिवाय इतर परधर्मी इंग्लिश, फ्रेंच वगैरे म्लेछानी त्यास फक्त काही द्रव्याची लालूच दाखविल्याशिवाय त्यांनी आजपावेतो आपले मन मोकळे करून प्रसिद्धपणे त्यांच्या वेदाचा मुखडा तर कोणासहि दाखविला नाही; यावरुन आर्याचे मुख्य वेद सार्वजनिक ईश्वरप्रणित सत्याच्या नावाला बिलकूल शोभण्याजोगते नाहीत; आणि प्राचीन काळी धूर्त आर्य ब्राह्मण लोक ज्ञानसंपन्न, धर्मनिष्ठ, नीतिमान होते, म्हणून म्हणणाऱ्या वाचाळ शुद्रास कोणत्या तऱ्हेचा धर्मलड म्हणावा ?
गोविंदराव प्र० या जगातील एकदर सर्व धर्मातील लोकांबरोबर धूर्त आर्याची वर्तणूक कशी का असेना, परंतु आर्यानी पूर्वी धनुर्विद्येच्या बळाने व हल्ली पूर्वी आर्यातील धूर्त ऋषींनी आपल्या पक्षपाती ग्रंथांनी कपटाने कायम केलेल्या दासानुदास शूद्रादि अतिशूद्रास मुळीच वेद पाहू अथवा ऐकू देत नाहीत, यातील इंगित काय असावे बरें ?
जोतीराव उ०- त्यातील कृत्रिमी आर्याचे इंगित काय आहे, याविषयी तू धूर्त आर्यभटासच विचार, म्हणजे ते कदाचित् त्याविषयीं तुला कळवितील...
गोविंदराव प्र० धूर्त आर्यब्राह्मण तळहातावर मेखा सोसणारे पुरे घमलंड आहेत. ते आपल्या वेदातील इंगिताविषयीं दुसऱ्या कोणाला कधींच कळविणार नाहीत तेथे मज पामराची कोण कथा! यास्तव तुम्हीच कृपा करून त्याविषयी प्रतिपादन कराल, तर फार बरे होणार आहे. जोतीराव उ०- नको रे बाबा, नको! त्याचे इंगित तुला कळविण्याची अद्याप वेळ आली नाहीं, कारण, अज्ञानी शुद्रादी अतिशूद्र केवळ अक्षरशुन्य आहेत, यास्तव ते भर रस्त्यांत धूर्त आर्यभट्टाच्या धोतराला पीळ घालून त्यांजबरोबर त्याविषयी वाद घालू लागल्याबरोबर त्या अडमूठांची समजूत कोणी काढीत बसावी.
गोविंदराव. प्र०-ते कसे का असेना, तुम्ही या परम न्यायी इंग्रज सरकारच्या राज्यात ईश्वरास स्मरून सत्य जे असेल, ते जगापुढे आणा. त्याविषयी आता धूर्त आर्यभटाचे फारसे भय तुम्हाला बाळगण्याची जरूरी दिसत नाही.
जोतीराव 30-अरे बाबा, अट्टल धूर्त आर्यब्राह्मण नास्तिकानी पापपुण्याचा विधिनिषेध न मानिता, त्यांनी आपण सर्वांच्या निर्मिकाची उचलबांगडी करून त्याच्याऐवजी आपण स्वतः अहब्रह्म म्हणजे इतर सर्व अज्ञानी मानवाचे भूदेव होऊन, त्यापैकी निवळ शुद्रादी अतिशूद्र मूढजनास सर्वकाळ निर्लज्यपणे उघड नाना प्रकारच्या धर्मलडी ठकबाज्या करून त्यास भोंदाडून खातात, या त्यांच्या कृत्रिमी ठकबाज्यांविषयीं मी थोडेसे जगजाहीर केल्याबरोबर त्यांनी सर्व बलीस्थानभर मजविषयीं, कोल्हेभूक करून, अशी कडी उठविली आहे की, मी ब्राह्मणांसह त्यांच्या कल्पित ब्रह्माचा मोठा द्वेष्टा आहे. आणि त्यातून बहुतेक शुद्रादी अतिशूद्र निवळ अज्ञानी असल्यामुळे धूर्त भटांनी मोठी कावेबाजी करून, अज्ञानी शुद्रादी अतिशुद्रास, माझीच उलटी निंदा करावयास लाविले आहे; यास्तव धर्त आर्यभट्टाची कावेबाजी तूर्त बाहेर पाडण्याची संधी आली नाही.
गोविंदराव प्र० धूर्त आर्यभट्टानी बहुतेक शूद्रादी अतिशूद्र अज्ञानी असल्यामुळे त्यांनी त्यास जरी आपणावर दगड फेकावयास लाविलें, तरी आपण आपले पवित्र मानवी कर्तव्यकर्म करण्यास चुकू नये, हे आपले सत्यशोधक समाजीयनांचे ब्रीद असतो आपण असल्या सत्यशून्य, आर्यभट्ट ब्राह्मणांच्या वितंडवादास भ्यावे ते का? तर तुम्ही कबर बांधून या निर्दय आर्यभट्टाचे खल्लड वेद बाहेर काढून त्यांची सार्वजनिक ईश्वरप्रणीत सत्याशी तुलना करून जर दाखवाल, तर कोट्यावधी शूद्रादी अतिशूद्रांचे पाय थरीस लागणार आहेत.
जोतीराव 30- वेद रचल्यापासून धूर्त आर्यभट्टांनी आपले खल्लड वेद जर बिळांत लपवून ठेविले आहेत; तर त्यांस त्यांच्या बिळाच्या बाहेर काढून त्यांपैकीं ऋग्वेदाचें मात्र अशरशः आतांच्या आतां प्राकृत करून त्याची सार्वजनिक ईश्वरप्रणित सत्याशी तुलना मी कशी करावी?
गोविंदराव उ०- धूर्त आर्यभटांनी आरंभापासून आजपावेतो आपले वेद जर लपवून ठेविले आहेत, तर वारूसारखी त्याच्या पोटाखाली काय खोड आहे?
जोतीराव उ०- वेदाच्या पोटाखाली वारूसारखी टळटळीत मुख्य गोम आहे. ती अशी की, कंगाल आर्य लोकानी प्रथम जेव्हा इराणात आपले काळे करून धनुर्विद्येच्या बळावर आडहत्याराने लढणाऱ्या सधन क्षत्रियांच्या सुवर्णमय बळीस्थानात आले, तेव्हा त्यांचे या देशात मुख्य हाडवैरी नाना प्रकारचे लोक होते. त्यांस आर्य लोक द्वेषाने दस्यु, हल्ली आम्हा शूद्रांपैकी महामुनि गोसाव्यांत गिरी, पुरी, भारथी वगैर दशनामी लोक आहेत. या शब्दांचे मुळ दस्य असावे असे अनुमान होते (लुटारु मागाहून दास), महाअरी (ह्यार) क्षुद्र (शूद्र) असे म्हणू लागले, दस्यु लोकांपैकी कित्येक राज्य-धुरंधर, महाप्रतापी विख्यात होते, त्यांस यवन लोक हेव्याने दुष्मन व सेहभावाने दोस्त ह्मणत असत, (दुष्मन व दोस्त या शब्दांचे मूळ दस्यू असावे असे अनुमान होते) त्यांतील मुख्य लोकांची नांवे होती, ती येणेप्रमाणे ज्यांच्या शरीराचा बांधा उंच असून जे अति मजबूत, शरीराने अक्राळविक्राळ असत, त्यांस दराऱ्याने भित्रे भट राक्षस ह्मणत; ज्या लोकांचे चेहरेमोहरे तामशी असून भयकर दिसत, त्यास भ्याड आर्य अचव्याने उग्र ह्मणतः जे लोक नेहमी आर्याची चेष्टा करून त्यांस उपद्रव करीत असत, त्यास ते द्वेषबुद्धीने पिशाच् म्हणतः जे लोक आर्यास नेहमी उपद्रव देण्यामध्ये गम्मत मानीत असत, त्यांस आर्यलोक हेव्यानें तरफडून असुर म्हणत. याशिवाय यज्ञाच्या निमित्ताने घोडे, गाया भाजून खाणाऱ्या आर्याच्या विधीचा विध्वंस करून त्यांस सर्वोपरी त्रास देत असत, त्यास आर्यलोक अजास, यक्ष, शिग्रव, किकाट (कैकाडी) वगैरे म्हणत असत. आणि हे सर्व दस्यूमन (आर्याचे दुष्मन) काळ्या वर्णाचे होते आणि त्यापैकी जे सर्व काळ आर्यांच्या धर्माचा तिरस्कार करून त्यांचा सवापरी वीट मानीत, त्यांच्या सर्व अंगाची निर्दय आर्य लोक मोठ्या क्रूरतेने कातडी सोलून काढीत, त्याविषयी आयांनी पवित्र मानलेल्या त्यांच्या वेदात मजबूत आधार सापडतो. तो असा की, "त्वच कृष्णामरघवत्" अर्थ (त्यांनी काळ्या लोकांची कातडी फाडली.) याशिवाय ब्रिटीश, फ्रेंच, जर्मन आणि अमेरिकन लोकातील सत्पुरुषांच्या लेखात निर्दय आर्य भट्टब्राह्मणीच्या अनन्वितदुष्ट कर्माविषयीं मजबूत आधार सापडतात.
गोविंदराव प्र० अशी धूर्त आर्यभट्टाच्या वेदाच्या पोटाखाली, जर तट्टासारखी गोम आहे, तर आर्य लोकांनी त्या वेदरूपी वारूस रंगणात काढून त्यास हल्ली बाजार दाखवू नये, इतकेंच नव्हे; परंतु त्यांनी आपले वेदरूपी वारूस शूद्रादी अतिशूद्रांच्या दृष्टीससुद्धा कधीच पडू देऊ नये, असे माझे मत आहे. कारण तसे धूर्त आर्यभटानी केल्यास त्याजकडून आजपावेतो गाजलेले शूद्रादी अतिशुद्र त्यांची कोणत्या तऱ्हेची व किती फटफजिती करतील, याचे मला अनुमानसुद्धा करवत नाही; परंतु या तुमच्या लिहिण्यावरून कदाचित आर्य धूर्त भट्ट ब्राह्मणांनी आपल्या वेदांचे प्राकृत भाषांतर करून जगजाहीर केल्यास मग ते दोषमुक्त होतील ना?
जोतीराव उ० तसे त्यांनी केल्यास त्यास दोष कोणी देणार नाही. परंतु धूर्त आर्य ब्राह्मणांस आपल्या सोवळ्यात लपवून ठेविलेल्या वेदाचे प्राकृत करुन त्यास यांच्यानें मैदानात आजपावेतों आणवले नाहीं; आणि यामुळे त्यांच्यानें तसे करण्याचे धैर्य व्हावयाचे नाही. याचे पहिले कारण, आयच्या वेदांत क्रूर आर्य भट्ट ब्राह्मणांनी शुद्रादी अतिशूद्र, भिल्ल, खोड, राक्षस, पिशाच, वगैरे लोकास रसातळी घातल्याबद्दल आधार आहेत व दूसरे कारण, मागाहून आर्यापैकी मुकुंदराज, ज्ञानोबा, रामदास, मोरोपंत, वामन वगैरे साधूनी पोरीच्या घरकुंडात भातकुल्या करून वेदांत कल्पिलेल्या ब्रह्माची उतरंड रचिली आहे; ती ढासळून तिच्या खापरखुट्या होतील, या भयास्तव धूर्त आर्य भट्टब्राह्मण, आपण होऊन गुण्यागोविंदाने, वेदाचे भाषांतर करून कधीच मैदानात आणणार नाहीत, असे मी भविष्य करून सांगतो.
गोविंदराव प्र० - वेदांमध्ये शूद्रादि अतिशूद्र, भिल्ल, खोड, राक्षस, पिशाच वगैरे लोकांस रसातळी घातल्याबद्दल लेख आहेत, म्हणून आपण म्हणतो आणि एकंदर सर्व धूर्त आर्य भट ब्राह्मण मोठ्या शेखीने म्हणतात की, एकदर सर्व मानवी प्राण्याचें तारण होण्यासाठी ईश्वराने वेद निर्माण केले आहेत.
जोतीराव उ०- हे सर्व आर्य चूर्त ब्राह्मणांचे म्हणणे अजीबाद खोटे आहे. कारण, आपण सर्वाच्या निर्माणकत्याने जर एकंदर सर्व मानवी प्राण्याचे तारण होण्यासाठी वेद निर्माण केले असते, तर ते एकदर जगातील सर्व भाषामध्ये केले असते; आणखी त्याचप्रमाणे ते फक्त म घातलेल्या अवघड संस्कृत भाषेमध्येच करून या सर्व जगामध्ये एकट्या भटब्राह्मणांनीच मात्र त्याचा उपभोग घ्यावा, आणि इतर जगातील मानवानी आर्याच्या तोंडाकडे पहावे, असे झाले नसते; यावरून आप्पलपोट्या धाडस आर्याचे वेद आणि सार्वजनिक ईश्वरप्रणित सत्यातील, खरे कोणते व खोटे कोणते, हे निवडून काढण्यास आपल्यास मूळीच मार्ग नाही.
गोविंदराव. प्र० काही तात्यासाहेब एकदर सर्व आर्य भट्टांची खरोखर जर लाचारी आहे म्हणून म्हणावें, तर हल्लीचे कित्येक धूर्त आर्य ब्राह्मण राजद्रोही बंडखोर वासुदेव फडक्याविषयीं व मनःकल्पित रामायण, भागवत, सत्यनारायण वगैरेविषयी भारेचे भारे नवीन ग्रंथ छापून उदयास आणून, अज्ञानी शुद्रादि अतिशूद्रांची मनें भ्रष्ट करून कुत्सित करीत असता, त्याजला हा काळपावेतों वेदांचे भाषांतर करून जगापुढे आणण्याची मुळीच ऐपत झाली नाही, हे कसे?
जोतीराव उ० धूर्त आर्य ब्राह्मणांच्या लाचारीमुळे जर त्यास वेदांचे भाषांतर करण्याची ऐपत होत नाही, तर चवल कम पावणे आठ आर्य बाजीरावसाहेबानी आपल्या पवित्र पेशवाईच्या अमलात रात्रदिवस शेती खणून वाया गेलेल्या परजातीच्या शूदादि अतिशूद्र पंगू वृद्धास नचक्या कवडीचीसुद्धा मदत न करिता त्याने आपल्या स्वजातीच्या धूर्त आर्य धर्मलड भिक्षुकास मात्र लाखो रुपयांची रमण्यामध्ये दरवर्षी रुपये मोहोराची खिचडी करून वग्राळयाने दक्षिणा वाटली, हे कसे? अशा सधन व श्रीमत आर्य सोवळ्या बाजीरावास वेदाचे भाषांतर करण्यासाठी लाचारी होती, ह्मणून म्हणण्याचे शोभेल काय? त्याचप्रमाणे कित्येक भट भिक्षुक कथाडे ब्राह्मण आपल्या बनावट धर्माच्या मिषाने अज्ञानी शुद्रांतील हल्लींचे शिंदे, होळकर वगैरे सरकारांपासून लाखो रुपये उपटून खात असता, त्यांची वेदांचे भाषांतर करून प्रसिद्ध करण्याची जुरत होत नाही. याला कोणत्या प्रकारचा धूर्तपणा म्हणावा ?