यशवंत जोतीराव फुले. प्रश्न- मानवप्राणी एकंदर सर्व जगात कशाने सुखी होईल?
जोतीराव गोविंदराव फुले. उत्तर - सत्य वर्तन केल्याशिवाय मानवप्राणी जगात सुखी होणार नाही याविषयी प्रमाण देतो.
|| अखंड ||
।। सत्य सर्वांचे आदी घर ।। सर्व धर्माचे माहेर ।। धृ० ॥
।। जगामाजी सुख सारे । खास सत्याची ती पोरे ॥१॥
।। सत्य सुखाला आधार । बाकी सर्व अंधकार ।।
।। सत्याचा वा जोर ।। काढी भंडाचा तो नीर ॥ २ ॥
।। सत्य आहे ज्याचे मूळ करी धूतांची वा राळ ।।
।। बळ सत्याचे पाहुनी ।। बहुरुपी जळे मनीं ॥ ३ ॥
।। खरे सुख नटा नोव्हे ।। सत्य ईशा वज्रं पाहे ।।
।। जोती प्राथी सर्व लोका । व्यर्थ इभा पेटू नका ।। ४ ।। सत्य०।।
यशवंत प्र० यावरून देशस्थ आर्य रामदास भट्टजीबुवाचा श्लोक असा आहे की "जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूंच शोधनी पाहे." याविषयी तुमचे काय ह्मणणे आहे ?
जोतीराव उ०- देशस्थ आर्य रामदास भट्टजीबुवांनी या श्लोकावरून निर्मीकाने निर्माण केलेल्या पवित्र जगाविषयी व संसाराविषयी अज्ञानी शूद्रादि अतिशूद्रांचे मनात वीट भरवून तो सर्व व्यर्थ आहे. ह्मणून त्यांनी निरिच्छ व निरभ्रम होवून परित्याग केल्याबरोबर धूर्त आर्य भट्टांनी त्यावर झोड उडवावी यास्तव हा श्लोक बुद्धया केला असावा कारण आर्य रामदासास सत्य कशाला ह्मणावें, हें केवळ आपल्या जाती-मतलबासाठींच कळाले नव्हते, असे मला वाटतें. याविषयीं मी तुम्हांस एक प्रश्न करितो. त्याचें उत्तर देताना आर्य रामदासाचा श्लोक कितपत खरा आहे, याविषयी तुम्हास सहज निर्णय करिता येईल.
यशवंत प्र० असा तुमचा प्रश्न काय आहे, तो आम्हांस सांगाल तर बरे होईल.
जोतीराव 30-असे कोणते शुल्लक सार्वजनिक सत्य आहे की, त्याचे आचरण केल्याने मानवप्राणी दुःखी होतो?
यशवंत प्र० सत्यास स्मरून एकंदर सर्व सार्वजनिक सत्य, मग ते क्षुल्लक का असेना, पण त्याचे आचरण केल्याने कोणताहि मानव प्राणी दुःखी होणार नाही, असे शोधाती समजून आले; तथापि आर्य रामदासाने कोणच्या आधाराच्या जोरावर हा श्लोक कल्पिला असावा?
जोतीराव 3०-याला जोर मूढ शूद्रादि अतिशूद्रांचे अज्ञान, व त्यांचा मतलबीपणा व धूर्तपणा होय. याविषयीं धूर्त आर्य रामदासाने आपले ग्रंथांत जे काही लिहिले आहे, त्यावर निःपक्षपाताने विचार करावा, यास्तव ते पुढे देतो.
देव झाले उदंड । देवाचे माडिले भड ।।
भूता देवांचे थोतांड । एकची जाहले ।।
मुख्य देव तो कळेना कशास काहीच मिळेना ।।
एकास एक वळेना । अनावर ।।
ऐसा नासला विचार कोण पाहतो सारासार ।।
कैचा लहान कैचा थोर । कळेचिना ।।
शास्त्रांचा बाजार भरला । देवांचा गलबला झाला ।।
लोक कामनेच्या व्रताला झोंबोन पडती ।।
ऐसे अवधे नासले । सत्यासत्य हारपले ।।
अवघे जना एक झाले ।। चहुंकडे ।।
मतामतांचा गलबला ।। कोणी पुसेना कोणाला ।।
जो जे मती सापडला । तयासी तोची थोर ।।
असत्याचा अभिमान । तेणें पायीजे पतन ||
म्हणोनिया ज्ञाते जन । सत्य शोधिती ।।
यशवंत प्र० रामदास हा अस्सल आर्य ब्राह्मण कुळातील असता, त्याने आपल्यास रामशर्मा पद न जोडिता अतिशूद्र सुरदासाचे पद आपले नावास का जोडून घेतले? यातील इंगित काय असावें हें तुम्ही सांगू शकाल काय?
जोतीराव० उ०- शिवाजी हा शूद्र जातीमध्ये मोठा योद्धा असून, अक्षरशून्य असल्यामुळे व रामदास अठ्ठल धूर्त आर्य जातींतील साधु बनल्यामुळे, त्याने आपल्या नावास शर्मा असे पद जोडून न घेता, अतिशूद्र सुरदासासारखा आपल्यास रामदास ह्मणऊन घेऊ लागला. यातील मुख्य इंगित अज्ञानी शूद्र शूर शिवाजीस खूष करणे होय. तात्पर्य, निर्मीकाच्या नावावर धर्मसंबंधी दरवडे घातल्याने मात्र सुख होते, व बडखोरापासून अज्ञानी व पंगू मानवास सोडविल्यापासून अथवा निराश्रित अंध, पंगू व पोरक्या मुलीमुलास व इतर सर्व प्रकारच्या संकटात पडलेल्या मानव बांधवांस साह्य देण्यापासून, मात्र सुख होत नाही, ह्मणून ह्मणणे केवळ एकाद्या नास्तिकाने जग निर्माणकर्त्याचे अस्तित्व नष्ट करण्याप्रमाणे होय.