यशवंत जोतीराव फुले प्र० तर आपल्या या सूर्यमंडळासह आपण वस्ती करणाऱ्या पृथ्वीचा निर्माणकर्त्ता कोण आहे?
जोतीराव फुले. उ०- पूर्व अथवा पश्चिम अथवा दक्षिण, अथवा उत्तर इत्यादि दहा दिशांपैकी एका तरी दिशेचा आपण शोध करू लागल्यास तिचा अंत लागेल काय?
यशवत उ०- दहा दिशांपैकी एकाहि दिशेचा आम्ही शोध करू लागल्यास आम्हास थांग लागणार नाही; कारण हजारो वर्षेसुद्धा आम्ही त्या दिशेचा शोध करू लागल्यास आम्हांस तिचा थांग लागणार नाहीं, कारण आम्ही मानवाचे आयुष्य ते किती? जोतीराव फुले प्र०-दहा दिशांपैकी एकाहि दिशेचा आपल्यास जर थाग लागत नाहीं, तर एकदर सर्व दिशांची पोकळी किती असावी बरे, याचे
तुम्हाला अनुमान तरी करिता येईल काय ?
यशवंत उ०- एकंदर सर्व पोकळीची लांबी, रुंदी, उंची व खोली याचा आम्हांस थांग लागणार नाहीं; ती अनंत आहे, अशी आमची खात्री झाली.
जोतीराव उ० या आपल्या अमर्याद विस्तीर्ण पोकळीमध्ये अनंत सूर्यमंडळांसह त्याच्या ग्रहोपग्रहांसहित आपल्या पृथ्वीवरील प्राणीमात्रांसह, पशु, पक्षी, वृक्ष इत्यादिकांस ज्याने निर्माण केले आहे, तो कर्ता कोठे व तो कसा आहे हे पाहण्याची आपण यत्किंचित् मानवप्राण्यांनी इच्छा करू नये; कारण आपल्या पृथ्वीच्या अतीसन्निध ग्रहावर काय काय आहे, हे पाहण्याची जाण्याचीसुद्धा आपणास शक्ति नाही. आता मी तुम्हास असें कळवितों की, पूर्वेकडे अथवा दुसऱ्या कोणत्याहि दिशेकडे विमानाच्या अथवा रेलवेच्या मार्गाने हजारो वर्षांच्या रस्त्यावर पलिकडे गेल्यावर तेथे एका महालामध्ये सर्वांचा निर्माणकर्ता अनेक विश्वातील प्राणीमात्रांच्या सुखदुःखाची व्यवस्था करीत बसला आहे, असे आपल्या दृष्टीस पडेल, अशी जर आपण कल्पना केली, तर तुम्ही स्वतः तेथे जाऊन आपल्या सर्वाच्या निर्मीकाचे दर्शन घेऊन पुनः ते शुभवर्तमान माझ्या मुलाबाळांस (कारण आम्ही अल्पायुषी आहोत म्हणून तोपर्यंत आम्ही जगणार नाही.) येथे परत सांगण्याकरिता तुमच्याने येववेल काय? अथवा आपल्या सर्वाच्या निर्मिकाने मजा पाहण्यासाठी आपण मानवास दर्शन घेण्यास जर बोळाविलें, तर आपल्या या पृथ्वीवर अनेक क्षणिक सार्वभौम राजे झाले, त्यांचे तेज तर काय, परंतु जनत सूर्याचं तेज एके ठिकाणी केल्याने, त्या आपल्या महापवित्र दैदिप्यमान व तेजोमय निर्मीकाच्या तेजापुढे आपल्याच्याने उभे राहून त्याचे दर्शन घेववेल काय? आपण कितीहि केले तरी सर्व कामात अपुर्ते, पंगू, ज्ञानहीन व सर्व दुर्गुणांत निपूण असून आपला घटकेचा भरवसा नाही.
यास्तव लाचार होऊन त्या आपल्या दयानिधी निर्माणकर्त्यास आपण उभयता येथूनच अनन्यभावे शरण जाऊन मोठ्या नम्रतेने साष्टांग प्रणिपात करू या.
यशवंत प्र०- अति दुर्घट तपश्चर्या केल्यामुळे कित्येक तपस्वी लोकास निर्माणकत्याने दर्शन दिली, म्हणून काही लोकांच्या ग्रंथात लेख
सापडतात, याविषयी तुमचे काय म्हणणे आहे?
जोतीराव उ०- कल्पित विष्णूच्या नाभीकमळापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवास निर्माणकर्त्याने जर दर्शन दिलें नाहीं, तर मानव प्राण्यांची काय कथा? कारण जगामध्ये काही धूर्त लोकांना अशा प्रकारच्या कल्पित कादंबऱ्या रचून मूढ जनावर आपले वजन पाडता आले; परंतु हल्लीच्या सत्ययुगात त्याचे कल्पित ब्रह्म कित्येक लोकांस कळू लागले आहे.