लग्न
गणपतराव दर्याजी थोरात, पेन्शनर प्र० - लग्न म्हणजे काय?
जोतीराव गोविदराव फुले. उ०- आपल्या सर्वाच्या निर्माणकर्त्याने जेवढे म्हणून प्राणीमात्र निर्माण केले आहेत, त्यातून मानव स्त्री-पुरुषास एक तऱ्हेची सारासार विचार करण्याची मात्र बुद्धि म्हणजे अक्कल दिली आहे व ते तिच्या योगाने एकदर सर्व मानव प्राण्यास काही अविचारी दांडग्या लोकास कलह करिता येउ नये, म्हणून सर्वानुमते असे ठरले असावे की, हरएक मानव पुरुष व स्त्री हे उभयता मरेतो पावेतो एकमेकांचे साथी व साहाकारी होऊन एकचित्ताने वर्तन करून त्यांनी सुखी व्हावे, म्हणून जी काही परस्पराशी कबुलायत करण्याची वहिवाट घातली आहे. त्यास लग्न म्हणतात.
गणपतराव. प्र०- मानव कन्यापुत्रानी कोणत्या गुणावरून एकमेकाशी लग्न लावावे याविषयी काही नियम असल्यास आम्हास कळवाल, तर बरे होईल.
जोतीराव उ०- मानव कन्यापुत्रांनी एकमेकाशी कोणत्या गुणांवरून एकमेकांबरोबर लग्न लावावें, याविषयी काही नियम नाहीत - कित्येक
कन्येची माता- पितरे आपली कन्या काही दिवस खाईल, पिईल, लेईल, नेसेल आणि मजा मारील, या आशेने तिची समती घेतल्याशिवाय तीस श्रीमताची सून करून देतात. कित्येक पुत्राची माता- पितरे आपला पुत्र काही दिवस खाईल, पिईल, लेईल, नेसेल आणि मजा मारील, या आशेने तिची संमती घेतल्याशिवाय त्यास राजेरजवाडे यांचा जावई करून देतात. कित्येक कन्या तरूण मुलाच्या कुस्वरुपाची परवा न करिती, त्याच्या फक्त शौर्यावर भाळून त्यास आपला पति करितात कित्येक पुत्र तरून मुलींच्या दुष्ट स्वभावाची परवा न करिता तिच्या फक्त देखणेपणावर भाळून तीस आपली पत्नी करितात. यावरून कन्या-पुत्रांनी आपल्या माता-पित्यासह वडील धाकुटे इष्टमित्रांचा सल्ला घेऊन त्यांनी स्वतः मागे पुढे पाहून सारासार विचार करावा आणि वधू अथवा वराच्या माता-पित्यांच्या गृही अथवा सत्यशोधक समाजगृहीत वधूवरांनी एकमेकांसमोर आसनावर बसून अथवा उभे राहून मानव पंचासमक्ष पुढे दिलेल्या आपआपल्या प्रतिज्ञादाखल मंगळाचा स्वतः अनुक्रमाने उच्चार करून लग्न लावल्याबरोबर आपल्या सर्वांच्या निर्मिकास परमानंद होणार आहे.
।। मंगलाष्टक ।।
(वर)
देवाचे नियमा प्रमाण धरूनि चाले तुझें कुळ गे ।। सत्याने अवघ्यांत श्रेष्ठ असशी तैसेचहि त्वत्सगे || अज्ञान्या समदृष्टीने शिकविशी, तूं ज्ञान त्या दाविशी ।। प्रीतीनें वरितों तुला अजि तुझी ऐकून किर्ती अशी ।। शुभमंगल सावधान ।। १ ।।
(वधु)
मानीशी जरी त्वा दिले अनुदिनी, कर्त्या समाधानसे ।। आम्ही सर्व स्त्रिया असे बहु पिडा, हे नेणशी तू कसे ।। स्वातंत्र्यानुभवाची ओळख आह्मां झाली नसे मानशीं ।। यासाठी अधिकार देशिल स्त्रियां, घे आण त्याची अशी ।। शुभमंगल सावधान । २ ॥
(वर)
स्थापाया अधिकार मी झटतसें, या बायकांचे सदा ।। खर्चाया न मनी मि भी किमपिही सर्वस्व माझे कदा ॥। मानीतों सकला स्त्रियांस बहिणी तू एकली मत्प्रिया ।। कर्त्यांचें भय मी मर्नात तुजला, ठेवीन पोसावया ।। शुभमंगल सावधान ।। ३ ।।
(वधु)
बंधूत्वमजला समस्त असती, त्वभ्दिन्न जे की नर ।। आज्ञाभंग तुझा करीन न कदा, मी सत्य कर्त्यावर || ठेवोनी अवघाचि भार झटू या लोका कराया हिता हाताला धरुनी तुला वरीतसे, सर्वापुढे मी अती शुभमंगल सावधान ।। ४ ।।
सत्यपालक स्त्री-पुरुषांचा आशीर्वाद
आभारा बहु मानिजे आपुलिया, माता-पित्यांचे सदा ।। मित्रांचे तुमच्या, तसेच असती जे इष्ट त्यांचे वदा ।। वृद्धा पंगु सहाय द्या मुलिमुला, विद्या तथा शीकवा ।। हर्षे वृष्टि करा फुलांचि अवघे, टाळी अता वाजवा ।। शुभमंगल सावधान ।।५॥
वर (शपथ)
आजपासून मी तुला माझी भार्या कबूल करून, मानव पंचासमक्ष मी अशी प्रतिज्ञा करता की, आजपासून मी मनीं कोणत्याहि प्रकारचा कुतर्क न धरून एक क्षणभर देखील तुझ्या बाहेर जाणार नाही; म्हणून आपल्या सर्वाच्या उत्पन्नकर्त्यासहित आपल्या कुळस्वामीस स्मरून प्रतिज्ञा करितो.
वधु (शपथ)
आजपासून मी तुला माझा भ्रतार कबूल करून, मानव पंचासमक्ष मी प्रतिज्ञा करिते ती अशी की, आजपासून मी मनी कोणत्याही प्रकारचा कुतर्क न धरून एक क्षणभर देखील तुझ्याबाहेर जाणार नाही; म्हणून आपल्या सर्वांच्या उत्पन्नकत्यांसहित आपल्या कुळस्वामीस स्मरून प्रतिज्ञा करते.
शेवटी वधू-वराने सर्व इष्टमित्राच्या भेटी घेतल्यानंतर वर-वधुने मोठ्या आनंदाने कोणत्याहि धर्माची अथवा देशाची आवडनिवड न करिता एकंदर सर्व मानवबंधूतील पोरक्या मुली मुलांस व अंध- पंगूस आपल्या शक्त्यानुसार दानधर्म करीत आपल्या घरी अथवा गावी जावे ...