पाप
मानाजी बोलूजी पाटील. प्र०- पापाचरण करून एकंदर सर्व मानवी प्राणी दुःखात पडू नयेत, म्हणून मानवाच्या बचावासाठी आपल्या निर्मीकानें त्यास काही साधन दिले नाही काय ?
जोतीराव गोविंदराव फुले. 30- असे कसें होईल? कारण आपला निर्माणकर्ता सर्वज्ञ असून दयानिधी असल्यामुळे त्यानें आपण मानवास उत्पन्न करण्याच्या पूर्वीच त्यांच्या बचावाविषयी सर्व व्यवस्था करून ठेविली आहे; इतकेच नाही तर ती उत्तम प्रकारही करून ठेविली आहे...
मानाजी. प्र० तर मग काही पुरुषाचे ठिकाणी जास्ती स्त्रिया असाव्यात अशा प्रकारचा लोभ कसा उत्पन्न झाला? निर्मीकाने योजून ठेविलेल्या साधनांपासून त्यांनी आपला बचाव कसा करून घेतला नाही?
जोतीराव 30- " आपल्यावरून जग ओळखावे" ही जगप्रसिद्ध म्हण आपणास ठाऊक असलेच यास्तव लोभाने ज्याचे चित्त आकृष्ट झाले आहे अशा मनुष्यानीं ईश्वराने दिलेल्या सद्सद्विचाररूपी गुणांचा अव्हेर केल्यामुळे ते पुरुष पापी झाले, यास्तव त्यास अनेक प्रायश्चित्ते भोगावी लागतात.
मानाजी प्र०- आपण या प्रसंगी जे काही प्रतिपादन केलें, त्याविषयीं मी काहीच समजलों नाहीं, यास्तव त्याविषयी मला चांगला उलगडा करून सांगाल, तर फार बरे होईल.
जोतीराव 30- काही लोभी पुरुष आपल्यास ज्यास्ती सुख व्हावे अथवा आपल्या मनःकामना ज्यास्ती पूर्ण व्हाव्या, यासाठी एका घरात दोन-दोन तीन-तीन लग्नाच्या बायका करून नांदतात व त्याविषयी आपण, काही हेकड पुरुषांनी केलेल्या धर्मग्रंथांचा आधारहि दाखवितात. त्याचप्रमाणें जर काही स्त्रियांनी आपल्या मनःकामना तृप्त करण्याकरिता दोन-दोन, तीन-तीन लग्नाचे नवरे करून एका घरात नांदू लागल्यास आपणा सर्व पुरुषास याविषयी काही विधिनिषेध वाटणार नाही काय?
मानाजी प्र० स्त्रियांनी तसे जगाविरुद्ध घाणेरडे वर्तन केल्यास त्यास फार अघोर प्रायश्चित्त दिले पाहिजे.
जोतीराव 30 तुह्यास जर स्त्रियांचे तसे आचरण आवडणार नाही, तर आपणा सर्व पुरुषांचे त्याच मासल्याचे आचरण स्त्रियास तरी कसे आवडेल? कारण स्त्री आणि पुरुष एकसारखे एकंदर सर्व मानवी अधिकारांचा उपभोग घेण्यास पात्र असतो स्त्रियांस एक तऱ्हेचा नियम लागू करणें व लोभी धाडस पुरुषास दुसरा नियम लागू करणें हा निवळ पक्षपात होय. उदाहरण "स्त्रियांचे ते पुरुषाचें आणि पुरुषाचे ते हु हु त्याचप्रमाणे काही धाडसी पुरुषानी आपल्या जातीच्या स्वार्थासाठी बनावट मतलबी धर्मपुस्तकात स्त्रियाविषयी असे अपमतलबी लेख करून ठेविले आहेत.
मानाजी प्र० कृपा करून अशा तऱ्हेचे दुसरे विषय सर्वांच्या मनात चांगले बिंबावे ह्मणून काही सर्वोत्तम आणि सर्वमान्य उदाहरणे दिल्यास आपले सर्वावर मोठे उपकार होतील.
जोतीराव उ०- आर्यभट्ट ब्राह्मणांच्या धर्मातील राजद्रोही, फितुरी, व्यभिचारी, लाचखाऊ, बनावट कागद करणारे, तबलजी वगैरे लोकांस की होईना, शूद्रादि अतिशूद्रांनी नीच मानून त्यांचा स्पर्शंसुद्धा होऊ देऊ नये, म्हणून निश्चय करून तो प्रचारात आणल्यास एका तरी आर्य भट्टा गोड वाटेल काय?
मानाजी. उ०- तसे केल्याने एकाहि आर्य भट्टास आवडणार नाही.
जोतीराव प्र० त्याचप्रमाणे शूद्रादि अतिशूद्रांनी धर्ममिषाने एकदर सर्व आर्य भट्ट ब्राह्मणाच्या पगड्यासह त्याचे सर्वस्व हिरावून घेऊ
लागल्यास एकातरी अहब्रह्म सन्यासी झालेल्या ब्राह्मणास गोड वाटेल काय?
मानाजी ३० नाही तसे करणें त्या आर्य भट्ट सन्याशाससुद्धा गोड वाटणार नाही, तर मग संसारामध्ये निमग्न झालेल्या ब्राह्मणांस ते कोठून आवडणार?
जोतीराव प्र०- आर्यभट्टासारखे दुसऱ्या कल्पित शेषशायीच्या बेंबटातून निघालेल्या ब्रह्मदेवाने ताडपत्रावर लिहिलेल्या ग्रंथाधारावरून एकंदर सर्व शूद्रादि अतिशूद्रांनी आपल्या पायाचे स्वच्छ निर्मळ तीर्थ मानवद्वेष्ट्या भट्ट ब्राह्मणांस पाजून त्याजपासून सिधे व दक्षिणा घेऊ लागल्यास एका तरी आर्यभट्ट दासीपुत्रास बरे वाटेल काय?
मानाजी उ० तसे करणे एकाही आर्यभट्ट दासीपुत्रास आवडणार नाही.
जोतीराव प्र० शूद्रादि अतिशूद्रांनी धूर्त आर्य ब्राह्मणांसारखे, आपल्या मनास वाटेल तसे, ईश्वराच्या नावाने कल्पित नवीन ग्रंथ रचून त्या ग्रंथांतील एक शब्दसुद्धा एकाहि आर्यभट्ट ब्राह्मणास ऐकू न देता एकंदर सर्व शूद्रादि अतिशूद्रांनी आर्यभट्ट ब्राह्मणांस आपले पिढीजादा दास करून त्यांस आपली सेवाचाकरी करावयास जर काविले, तर एका गोळकभट्टास तरी ते आवडेल काय?
मानाजी उ० तसे करणे एकाही खर्ची गोळकभट्टास तें आवडणार नाहीं, तर मग ब्राह्मण म्हणविणाऱ्या खाशास कोठून?
जोतीराव प्र० एकंदर सर्व शूद्रादि अतिशुद्रांची सदरची ही वर्तणूक जर एखाद्या नीच ब्राह्मणाससुद्धा आवडणार नाही, तर तशाच प्रकारची मनुसंहितेतील शूद्रांविषयीं आर्यभट्ट ब्राह्मणांची नीच वर्तणूक शूद्रांतील साधूसंतास व राजेरजवाड्यांस कशी आवडेल? यालाच "आपल्यावरून जग ओळखणे" असे म्हणावे आर्यभट्ट ब्राह्मणांच्या ग्रंथामध्ये ब्राह्मणांचे शूद्रापासून घ्यावयाचे माप एक आणि ब्राह्मणानी शुद्रादि अतिशूद्रास द्यावयाचें माप एक या कारणावरून धूर्त विद्वान आर्यब्राह्मण आणि अक्षरशून्य शूद्रादि अतिशूद्र या उभयता मानव बंधूमध्ये सेह होऊन धर्म वगैरेसंबंधी एकी कशी होऊ शकेल? याखेरीज आर्यभट्टांनी शूद्रादि अतिशूद्रांस विद्या शिकण्याचे बंद केलें, व आपले वर्चस्व होण्याकरिता बुच्या स्वकपोलकल्पित भारतरामायणासारखे ग्रंथ रचले आणि बगळ्यापरी मोठा धार्मीकाचा आव घालून त्यातील भाकड दंतकचा रात्रदिवस अज्ञानी व भोळसर शूद्रादि अतिशूद्रास सांगून त्यांची मने पवित्र मुसलमान व क्रिश्चीयन राज्याविषयीं कुत्सित करून त्यांजकडून त्यांच्याशी मोठमोठ्या तुंबळ लढाया करवून आपण एकाद्या पिंडीतील लिंगापुढे स्वस्थ विनधीर लटकेच जप अनुष्ठान करू लागले. यामुळे या देशात शूद्रादि अतिशूद्रांसह मुसलमान व ख्रिस्ती लोकांचा अनेक वेळा खप झाल्यामुळे आज काळपर्यंत अतिशयित अघोर पापें घडून येत आहेत.