पुराण सांगणे, बड़े वगैरे परिणाम, शूद्र संस्थानिक, कुळकर्णी, सरस्वतीची प्रार्थना, जप, अनुष्ठाने, देवस्थाने, दक्षिणा. मोठ्या आडनावाच्या सभा इत्यादिकाविषयी.
धो०- काय? या अधर्म भटगारुड्याच्या दंगेखोर मूळ पूर्वजांनी या देशात येऊन येथील आपल्या मूळ पूर्वजांचा मोड करून त्यास आपले दास केल्यानंतर त्यांनी आपल्या मनगटाचा प्रजापती करून आपला दंगेखोरीचा धर्म बराच गाजविला. त्यामध्ये त्यांनी मोठा पुरुषार्थ केला असे माझ्यानें म्हणवत नाही. परंतु जर कदाचित् आपल्या पूर्वजांनी भटाच्या पूर्वजांचा मोड केला असता तर त्या आपल्या पूर्वजांनी आपल्या मनगटाचे लिंग करून भटाच्या पूर्वजास आपले दास करण्यास कमी केलें असतें काय? असो, पुढे जेव्हा भटांनी त्या आपल्या पूर्वजांच्या दांडगाव्यास संधी साधून मध्येच ईश्वरदत्त धर्माचं रूपक देऊन त्या कृत्रीमी धर्माच्या आडून कित्येक भटांनी एकंदर सर्व अज्ञानी शूद्रांच्या मनात आमच्या दयाळू इंग्रज सरकारचा द्वेष भरविण्याची कल्पना काढिली, ती कोणती?
जो०- कित्येक भटांनी चव्हाठ्यातील मारुतीसारख्या महावीरांच्या देउळी रात्री बसून मोठा धार्मिकपणाचा डौल घालून वरकाती ज्ञान सांगण्याचा भाव दाखवून ओतून भागवतासारख्या ग्रंथातील खोट्यानाट्या गोष्टींची पुराणे अज्ञानी शूद्रांस सांगून त्यांची मने भ्रष्ट करून त्यांनी त्या बळीच्या मतानुयायी लोकांच्या वाऱ्यासदेखील उभे राहू नये म्हणून उपदेश करून उगीच तरी बसले? नाही पण त्यानी सधी साधल्याबरोबर त्याच ग्रंथातील भाकड दंतकथा सांगून एकदर सर्व अज्ञानी लोकाच्या मनात इंग्रजी राज्याचा द्वेष भरवून त्यांनी या देशांत मोठमोठाली बडे उपस्थित केली नाहीत काय?
धो०- होय, कारण आजपावेतो जी जी काही मोठमोठाली बडे झाली, त्यांमध्ये आतून किंवा बाहेरून मुख्य अग्रसर भटजी नाहीत असे बंडच सांपडत नाही, पहा उमाजी रामोशाच्या बेडीत काळ्या पाण्याची शिक्षा झालेला धोंडोपंत सापडतो त्याचप्रमाणे कालच्या थोरल्या चपाती गूढ खंडात परदेशी भटपांडे, कोकण्या नाना, तात्या टोप्या वगैरे अनेकदेशस्थ भटजी सांपडतात.
जो०- परंतु त्याचप्रमाणे शूद्र संस्थानिक शिंदे, होळकर हे नानाचे काही अशी चाकरीच्या संबंधाने नातेवाईक असता, त्यांनी त्या बंडखोराची काडीमात्र पर्वा न करिता तसल्या संकटकाळी आमच्या इंग्रज सरकारास किती मदत केली. हेही पहा! असो. तें मटानी उपस्थित केलेले वड मोडण्याकरिता आमच्या सरकारास कर्ज झाले असेल खरे, व ते कर्ज आढा होण्याच्या भरीस प्रथम पर्वतीसारिखी निरर्थक संस्थाने न घालता आमच्या सरकाराने नवीन कर कोणावर बसविला? अपराधी, निरपराधी रयतेची आवडनिवड न करिता एकंदर सर्व रयतेवर बसविला, हे बरें केले; परंतु तो कर या बापुड्या अज्ञानी शूद्रावर मुकरर करण्याचे काम आमच्या अति शहाण्या सरकाराने कोणाकडे सोपिलें ? शुद्र संस्थानिकांनी आपल्या जातीच्या नानास यथाकाळी मदत केली नाही, सबब आतल्या आत तरफडून त्यास शिमग्यातील संस्कारासहित आशिर्वाद देणाऱ्या त्रिकाळ सान करून शुद्ध होणाऱ्या, द्रव्य चुकलो, ब्रह्मनिष्ठ भटजी कुळकर्ण्याकडेस सोपिले. अरे, या कर्मनष्ट ग्रामराक्षसांकडे त्या मूळ ब्रह्मराक्षसाने सरकारी दप्तराचे काम सोपल्या दिवसापासून त्यांनी शूद्रांचा पिच्छाच सोडला नाहीं तथापि मध्ये एकदा मुसलमान राजांनी सर्व गावच्या पशुपक्षाचे गळे सुरीने कापून त्यांस हलाल करण्याचे काम आपल्या जातीच्या मुलान्याकडेस सोपिलें, या पटाईत भटजींनी लेखणीने शूद्रांचे गळे कापण्यात मुलान्यास मागें हटविलें, यास्तव सर्व लोकांनी सरकारची वाट न पाहता या ग्रामराक्षसांस "कलम- कसाई" अशी पदवी दिलेली अद्याप चालू असून आपले शहाणे सरकार, त्यांच्या इतर सर्व कामगारांसारख्या बदल्या न करिता त्याच्या फक्त संमती घेऊन अज्ञानी लोकावर कर मुकरर केल्याबद्दल नोटिशी तयार करून पुढे त्याच कुळकर्ण्यास सर्व लोकांच्या घरोघर जाऊन त्यांच्या भेटी घेऊन नोटिशी वाटण्याचे काम सोपते नंतर त्या नोटिशी पोहचवून भेट घेणाऱ्या कुळकर्ण्याच्या फक्त समती घेऊन सरकार त्यांपैकी कित्येक नोटिशी रद्द करून अज्ञानी लोकांचा कर बहाल करते याला म्हणावे तरी काय
धो० असे करण्यापासून कुळकर्ण्यास काही फायदा होत असेल काय?
जो०- त्यापासून कुळकर्ण्यास काही फायदा होतो किंवा नाही हे त्यांचे मन जाणे; परंतु त्यास जरी एकाद्या आडदांड खपाट्यापासून काही फायदा होत नसेल; तथापि ते त्यास असा नोटिशी देऊन त्यांची निदान आठ चार दिवसांची खोटी करून त्याची हेलपाट्याखाली चांगली खोड मोडून त्याजवर आपला चेक बसवून तसल्या कामत कवडीरेवडीला हात न लावता बाकीची सर्व कामे त्यांनी शुद्ध बगळ्याच्या परी लक्ष लावून इतक्या निष्ठेने केली की, एकंदर सर्व अक्षरशून्य आबालवृद्धांनी शंकराचार्यासारखी लक्ष्मीची अशी स्तुति केली की "हे आमच्या सरकारी सरस्वतीबाई, तूं आपल्या कायद्यावरून, अडवून लांच खाणारास व त्याचप्रमाणे लाचार झाल्यामुळे लाच देणारास सारखी शिक्षा देतेस यास्तव तू धन्य आहेस." तेव्हा तिने प्रसन्न होऊन काही कुळकरण्यांच्या घरांवर मात्र सतत कित्येक रात्री सुर्ती रुपयांची वृष्टी पाडली, म्हणून लोकात फार गवगवा उठला होता. मग हे खरे असल्यास त्याचा तपास काढून अशा पुण्यशील कुळकर्ण्यास पालख्या न मिळाल्यास भलत्या एकाद्या वारूवर बसवून त्यास रस्तोरस्ती मिरविण्याचे काम आपल्या सरकारचे होय.
धो०-अहो, भटांनी निर्माण केलेल्या चेष्टा मागेच चार बुद्धिमान गृहस्थांनी कैद करून त्या बळीराजाच्या सेनापतीच्या पाहऱ्यात दिल्या असून, त्या आतांशी त्या पहारेकऱ्याच्या नजरा चुकवून असा कलमकसायांस प्रसन्न होऊ लागल्या. म्हणूनच आताच्या कित्येक भटांनी शूद्राच्या श्रमरूप पट्टीद्रव्यापासून मोठमोठाले विद्वान होऊन त्याविषयी शूद्रांचे काडीमात्र उतराई न होता, त्यांनी दोन दिवस पाहिजेल तशा मनमौजा मारून अखेरीस मोठा स्नान संघेशीलपणाचा डौल घालून आपली वेदमंत्र - जादूविद्या खरी आहे, असे एकंदर सर्व अज्ञानी शूद्रांच्या मनावर वजन बसवून, त्यांनी आपल्या नादी लागावें म्हणून त्यांनीं शादावलाच्या मागण्या अथवा पुढच्या लिंगापुढे आम्ही आपसांत वर्गण्या करून
मजूर भटांकडून जप, अनुष्ठान करविल्यामुळे यंदा पाऊस फार पडला, व महामारीचा उपद्रव फार कमी झाला, असे त्यांनी शेवटल्या दिवशी गाड्यावर भाताचे बळी काढून सर्व प्रकारच्या अज्ञानी लोकास लोणकड्या थापा देऊन, मोठाल्या यात्रा भरवून त्यामध्ये प्रथम आपल्या जातीच्या ऐदी भटास मात्र यथासांग भोजने देऊन त्यातून उरलेले अन्न बाकी सर्व प्रकारच्या अज्ञानी शूद्रांच्या पंक्ती पाडून त्यांतून कोणास निस्ता मुठभर भातच, कोणास निस्तें वरणच आणि पुष्कळास निसत्या शिमग्याच्या पोळयाच वाढून त्या सर्वांस तृप्त केल्यानंतर त्यातून कित्येक भटांनी त्या अज्ञानी लोकांच्या मनावर आपल्या वेदमंत्र जादूचें वजन बसावे, म्हणून उपदेश करण्याचे झपाटे चालविले आहेत खरे; परंतु ते अशा प्रसंगी इंग्रज लोकास प्रसाद घेण्याकरिता आमंत्रण का करीत नाहीत?
जो०- अरे, अशा होल्याकोल्ह्यानी अशी चार भाताची शिते टाकून यू-यू करून जमविलेल्या भटांनी जरी पल्लोगणती रुद्र करून भी-भी केले तथापि त्याच्याने आपल्या इंग्रज बहादरास प्रसाद देववेल काय?
धो० पुरे करा, "तद्रुक टुमणी और तेजी इशारा बस है." यापेक्षा अधिक सूचना करण्याची गरज नाही. एकदा "दुधाने पोळलेली ताक फुकून खात असते" या म्हणीप्रमाणे.
जो०- बरें, तुझी मर्जी, तसे का होईना; परंतु आताचे सुधारलेले भट आपल्या जादुमंत्रविद्येस व तत्संबंधी जप अनुष्ठानास पाहिजेल तितकी कलई देऊन एकंदर सर्व गल्लीकुचीनी का भोकत फिरेनात त्यात कोणाचे काही कमी होत नाही; परंतु तसल्या लोकातील आपल्या धन्याच्या कुळास सातारच्या गडावर कैद करून ठेवणाऱ्या निमक हरामी बाजीसारख्या पाऊणे आठ भटराजांनी रात्रंदिवस शेती खपणाऱ्या अज्ञानी शूद्रांच्या श्रमाचा पैसा घेऊन दमवेऱ्यासारख्या पहिल्या प्रतीच्या जाहामर्द भटसरदारास सरजाम करून दिलेल्या सनदातील कारणे पाहून फर्स्ट सोर्ट टरक्काइसाहेबासारिख्या पवित्र इनाम कमिशनराच्या अंगासदेखील आनंदाचे शहारे उभे राहिले, मग तेथे इतरांचा काय पाड? त्यांनी पर्वतीसारखी अनेक संस्थाने स्थापून त्यामध्ये इतर सर्व जातींच्या आंधळ्या, पांगळ्या, रोडामुंडांची व त्यांच्या पोरक्या अज्ञानी अर्भकाची काडीमात्र परवा न करिता फक्त आपल्या जातीच्या धष्टपुष्ट आळशी भटास दररोज नाना तऱ्हेची मिष्टान्न भोजने घालण्याची वहिवाट घातली. त्याचप्रमाणे त्यांच्या मतलबी ग्रंथाचे अध्यायन करणाऱ्या भटोस यथासांग वार्षिक दक्षिणा देण्याची वहिवाट घातली ही सर्व त्यांनी उपस्थित केलेली कृत्रिमें हा काळपावेतो आपल्या सरकाराने तशीच कायम ठेविली आहेत. हा त्यांनी आपल्या शहाणपणाला आणि राजनीतीला मोठा बट्टा लावून घेतला, म्हणून म्हणण्यास काही हरकत आहे काय! वर लिहिलेल्या पोकळ खर्चापासून भटाखेरीज बाकीच्या सर्व लोकांस काडीमात्र फायदा न होती, हे फुकटचे खाऊन माजलेले हे कृतघ्न पोळ, उलटे आपल्या अज्ञानी शूद्र दात्यांस चेटकी धर्माच्या वापीने आपले पाय धुवून त्याचें पाणी मात्र त्यास पाजितात अरे, या कर्मनिष्ठ भटाच्या पूर्वजांनी त्यांच्या धर्मशास्त्रास आणि मनुसंहितेतील कित्येक वाक्यांस हरताळ लावून अशी नष्ट कर्मे कशी केली? आता तरी त्यांनी शुद्धीवर येऊन या कामी आपल्या भोळ्या सरकारचे काही न ऐकतो, पर्वती वगैरे संस्थानांवरच्या शूद्रांच्या घामाच्या पोळ्या कोणी भटांनी खाऊं नयेत, म्हणून एक मोठी लठ्ठ सार्वजनिक भटसभा स्थापून तिच्या साह्याने याविषयी बंदोबस्त केल्याबरोबर त्यांच्या ग्रंथाचे काही ना काही तरी पुनर्विवाह उत्तेजक मंडळीवर वजन पडेल; परंतु त्यांनी अशा मोठमोठ्या आडनावाच्या सभा काढून त्यांमध्ये आपल्या डोळ्यातील मुसळ काढण्याचे काम एकीकडेस ठेवून सरकारच्या डोळ्यातील कुसळ अज्ञानी जनास दाखवून ते काढण्याविषयी त्यांस भरीस घालू नये. "लगडी ती लगडी आणि गावखुरीही चरेना" याला म्हणावे तरी काय? त्यांनी आता आमच्या अज्ञानाने गाजलेल्या सर्व शूद्रास त्या बळीराजाच्या पवित्र आधारावरून त्यांच्या कृत्रिमी खोट्या दास्यत्वापासून मुक्त करणाऱ्या अमेरिकन, स्कॉच आणि इंग्लिश बांधवास कडकडून भेटेतोपर्यत मध्येच काही घादल करण्याच्या भरीस पडू नये. आता पुरे झाल्या त्यांच्या खटपटी; आता धिक्कार असो त्यांच्या चपातीतील आणि वरणभातातील गूढास