म. गांधी नंतर म. गांधींचा विचार जिवंत ठेवणारा, म. गांधींच्या विचारानुसार आचरण करणारा म. गांधीचा सच्चा अनुयायी म्हणून विनोबा भावे यांचा उल्लेख करता येईल. १७ ऑक्टोबर १९४० रोजी देशी विदेशी वर्तमानपत्रातून पहिल्या पानावर चौकटीतून एक बातमी झळकली होती. ब्रिटीश सरकारने भारतीयांच्या संमतीचा विचार न करता दुसऱ्या महायुद्धात भारताला सामील करून घेतले. अशावेळी जनतेच्या सहकार्यासाठी ब्रिटीशांतर्फे होणाऱ्या प्रयत्नांना असहकार्य करण्याचे राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवले. काँग्रेस नेत्यांनी केलेल्या गंभीर चर्चेअंती ब्रिटीश शासनाविरुद्ध सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाबाबत दिशा व कार्यपद्धती ठरवण्याबाबतचे सर्व अधिकार पक्षानी म. गांधींना प्रदान केल होते. म. गांधीजींनी नेहमीप्रमाणे सामुहिक सत्याग्रहाऐवजी व्यक्तीगत सत्याग्रहावर भर देण्याचे ठरवले. ब्रिटीश सरकारवर सत्याग्रहीच्या संख्यात्मक प्रभावाऐवजी व्यक्तीगत प्रभाव पाडून हेतू साध्य करण्याची नीति यावेळी म. गांधीनी ठरवली, या व्यक्तिगत सत्याग्रहात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबा भावे आणि दुसरा सत्याग्रही म्हणून पंडित नेहरू यांच्या नावाची घोषणा म. गांधीनी केली. वर्तमानपत्रातून आलेली बातमी ती हीच होती, आणि सर्वांनाच प्रश्न पडला. हे विनोबा भावे कोण आहेत? हे माहीत करून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली होती.
म. गांधीनी 'हरिजन' च्या अंकातून विनोबांची देशातील आणि जगातील कार्यकर्त्यांना ओळख व्हावी यासाठी 'हे विनोबा कोण आहेत?' या मथळ्याखाली स्वतःच विनोबांचा परिचय सर्वांना करून दिला. त्यात म. गांधी म्हणतात- 'हा' विनोबा कोण' असा प्रश्न सर्वानाच पडला असेल, यांनाच का म्हणून प्रथम सत्याग्रही निवडले असेही सर्वांना वाटत असणार. विनोबा एक अण्डर ग्रॅज्युएट आहेत. मी भारतात परतल्यावर विनोबांनी १९१६ मध्ये कॉलेज शिक्षण सोडले. विनोबा संस्कृतचे विद्वान असून साबरमती आश्रमाच्या संस्थापक सभासदापैकी ते एक आहेत. संस्कृतचे अध्ययन करून स्वतःला अधिक पात्र बनवण्याच्या दृष्टीने त्यांनी आश्रमातून एक वर्ष सुटी घेतली आणि वर्ष संपल्याबरोबर आश्रमात रुजू झाले. विनोबा त्या दिवशी आश्रमात परतणार आहे याचा तर मला विसर पडला होता. आश्रमातील स्वयंपाक करण्यापासून ते संडास साफ करण्यापर्यंत सर्व लहानातली लहान कामे त्यांनी केली आहेत. अद्भूत स्मरणशक्तीची त्यांना देणगी असून प्रकृतीविद्यार्थ्याची आहे. आपल्या आयुष्यातील अधिकाधीक वेळ त्यांनी- सुतकताईत खर्च केला असून सुतकताईत त्यांनी मिळविलेले नैपुण्य फारच थोड्यांनी मिळविले आहे. सुतकताई हा भारताचा प्रमुख उद्योग बनावा अशी त्यांची धारणा असून देशातील प्रत्येकाने सुतकताईचा स्वीकार करावा. यामुळे भारताचे दारिद्र्य दूर होऊन गावागावातून नवचैतन्य निर्माण केले जाऊ शकेल अशी त्यांना खात्री वाटते. विनोबा हाडाचे शिक्षक असून हस्तकलेच्या माध्यमातून शिक्षणाची योजना विकसीत करण्यात हिंदुस्थानी तालीमीसंघाच्या श्रीमती आशादेवी आर्यनायकम् यांना त्यांनी मदत केली आहे. सुतकताई हा मुलोद्योग मान्य करून सुतकताईवर त्यांनी एक पुस्तकही लिहिले असून त्यातील त्यांचा विचार अत्यंत मौलिक आणि नाविन्यपूर्ण आहे. सुतकताईच्या कार्यक्रमाची चेष्टा करणाऱ्याचा मनात या पुस्तकामुळे सुतकताई हे बुनियादी शिक्षणाचे माध्यम आहे असा विश्वास निर्माण होऊन सुतकताईला ग्रामोद्योगाचे स्थान मिळू शकेल. टकळीवर सूत कातण्याच्या पद्धतीत क्रांती करून टकळीच्या अकल्पीत शक्तीची ओळख त्यांनी सर्वांना करून दिली. याबाबत त्यांच्या इतके ज्ञान देशातील दुसऱ्या कुणाला असेल असे मला वाटत नाही. विनोबांचा आणखी परिचय करून देताना गांधीजीपुढे म्हणतात-
"स्पृशास्पृश्यता हा विचार त्यांनी आपल्या मनातून पूर्णत: काढून टाकला असून माझ्या इतकीच त्यांचीही जातीय ऐक्यावर उत्कट निष्ठा आहे. इस्लाम धर्माची खरी ओळख व्हावी म्हणून त्यांनी वर्षभर अरबी आणि मूळ कुराणाचा अभ्यास केला आहे. आपल्या भोवतालच्या मुस्लीम बांधवांशी संपूर्ण संबंधासाठी ह्या अभ्यासाची त्यांना आवश्यकता जाणवली आणि ती त्यांनी पूर्ण केली. "
विनोबांच्या कार्याचा परिचय करून देत म. गांधीजी पुढे लिहितात- त्यांच्या एका इशाऱ्यावर मोठ्यातला मोठा त्यागास सिद्ध होणारा मोठा शिष्यवर्ग त्यांच्यामागे असून त्या शिष्यवर्गात एका शिष्याने मनोहर दिवाण आपले सर्व 'आयुष्य कुष्ठरोग्याच्या सेवेसाठी अर्पण केले आहे. त्या शिष्यास वैद्यक किंवा
कोणतीही डॉक्टरी ज्ञानाची माहिती नसली तरी केवळ कुष्ठरोग्याच्या सेवेवर निष्ठेतून त्यांने या क्षेत्रात नैपुण्य मिळविले आहे. हा शिष्य आज अशा अनेक सेवा केंद्राचे संचालन करीत असून शेकडो कुष्ठरोगी रोगमुक्त केले आहे. त्यांनी अनेक वर्षे वर्धा येथील महिला आश्रमाचे संचालन केले आहे. दारिद्रीनारायणाची सेवा व त्यातील निष्ठेमुळे विनोबा वर्धायेथील खेड्यातून पवनार येथील आश्रमात दाखल झाले आहे. येथूनच त्यांनी आसपासच्या खेड्यांशी संपर्क ठेवला आहे. भारतीय स्वातंत्र्याबाबत विनोबाचा दृष्टीकोन वर्णन करताना म. गांधी सांगतात-
" विनोबा भारतीय स्वातंत्र्याला नितांत आवश्यक मानतात. भारतीय इतिहासाचा अत्यंत खोलवर जाऊन त्यांनी अभ्यास केला आहे. परंतु रचनात्मक कार्याशिवाय ग्रामीण जनतेला खरे स्वातंत्र्य मिळणार नाही. खादी हा रचनात्मक कार्याचा बिंदु आहे असे विनोबा मानतात. चरखा हा अहिंसात्मक कार्याची खूण असून संत्याग्रहाचा त्याच्या मागील एक अभिन्न घटक होता. यापूर्वी विनोबा राजकीय व्यासपीठावर कधीही दिसले नाही, कारण सत्याग्रहावर निष्ठा ठेवून शांतपणे रचनात्मक कार्य करीत राहणे राजकीय भाषणबाजी पेक्षा अधिक प्रभावी आहे. तसेच रचनात्मक कार्यात पूर्ण विश्वास असल्याखेरीज अहिंसात्मक प्रतिकार असंभव आहे असे त्यांना वाटते.
म. गांधीनी विनोबाचा इतका सविस्तर परिचय करून दिला असला तरी १९१६ सालीसुद्धा गांधीनी विनोबांच्या वडीलांना लिहिलेल्या पत्रातही विनोबांचा उल्लेख 'लहानशा वयात आत्म्याचे श्रेष्ठत्व आणि यम नियमाच्या पालनाची जाणीव असणारा तरुण ज्यासाठी मी (गांधीजी) अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे." या शब्दात केला होता.
म. गांधीनी खुद्द विनोबांचा इतका सविस्तर परिचय दिल्यामुळे सर्व भारतीयांना विनोबाचा परिचय झाला. पहिला सत्याग्रही या निवडीबद्दलही सर्वाचे समाधान झाले. विनोबांची ख्याती सगळीकडे पसरून त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली.