बळवंतराव हरी साकवळकर प्र० निर्मिकानें या आपल्या पृथ्वीवर जलचर, स्थलचर व खेंचर अशा प्रकारच्या जिवाच्या तीन जाती निर्माण केल्या आहेत; त्यांपैकी सर्वात श्रेष्ठ कोण आहे?
जोतीराव गोविंदराव फुले उ० त्यापैकी सर्व प्राणीमात्रात मानव प्राणी श्रेष्ठ केले आहेत व त्यामध्ये स्त्री आणि पुरुष असे दोन भेद आहेत.
बळवंतराव प्र० या उभयता स्त्रीपुरुषांमध्ये ज्यास्ती श्रेष्ठ कोण आहे?
जोतीराव उ० या उभयतांमध्ये ज्यास्ती श्रेष्ट स्त्री आहे.
बळवंतराव. प्र० या उभयता मानवामध्ये ज्यास्ती श्रेष्ठ स्त्रीच का?
जोतीराव उ० याचे कारण, निर्मीकाने निर्माण केलेल्या चमत्कारिक मोह उत्पन्न करणाऱ्या भवसागरात तरंगून मजा मारणारे क्षणिक उभयता मानवप्राणी आहेत. त्यांतून स्वभावेंकरून स्त्रीची जात भिडस्त असल्यामुळे ती प्रथम एका पुरुषास सलगी करण्यास सवड देते, आणि ती सलगी हा कामार्थी धूर्त पुरुष इतकी वाढवितो की, अखेरीस स्त्री स्वतः होऊन त्यास आपला मदतगार वाटेकरी सखा करिते, आणि तीच सृष्टीनियमांस अनुसरून आपल्यातील सर्व मुलांचे तर काय, परंतु आर्य भटातील नाडबंद ब्रह्मचारी शंकराचार्याच्या तोलाच्या मुलाचंसुद्धां आपल्या उदरी काकू केल्याशिवाय निमूटपणे नवमास रात्रंदिवस सतत ओझे वागविते तीच आपल्या सर्वास जन्म देणारी होय. आपले मलमूत्रादि काढून आपल्या सर्वाचे लालन व पालन करून आपल्या सर्वांचा परामर्ष करणारी होय. आपण सर्व पंगू लाचार असता सर्वकाळ आपली काळजी वाहते व तिनेच आपणा सर्वांस चालावयास व बोलावयास शिकविले; यावरून एकंदर आबालवृद्धात जगप्रसिद्ध म्हण पडली आहे की, "सर्वांचे उपकार फिटतील परंतु आपल्या जन्मदात्या मातोश्रीचे उपकार फिटणार नाहीत." यास्तव निःसंशय पुरुषापेक्षा स्त्री माझ्या मते श्रेष्ठ आहे.
बळवंतराव. प्र० याशिवाय स्त्रियामध्ये विशेष काय आहे?
जोतीराव उ०- सदरच्या कारणाशिवाय स्त्री आपल्या बहिणभावंडास आवडणारी असल्या कारणाने ती त्याचा निरापेक्षबुद्धीने पाठराखेपणा करते ह्याशिवाय स्त्री घरात असल्याखेरीज घर शोभत नाही, हे आपण जाणतच असाल याविषयीं ह्मण अशी आहे की, "न गृह गृहमित्याहुर्गृहिणी गृहमुच्यते"
बळवंतराव प्र० स्त्रिया पुरुषांवर जास्ती प्रीति करितात, याला काय प्रमाण?
जोतीराव 30- एखाद्या स्त्रीचा नवरा ज्या वेळेस मृत होतो, त्या वेळेस ती फार दुःखसागरात बुडून तिला फार सकटे सोसावी लागतात. मतोपर्यंत सारा काळ वैधव्यांत काढावा लागतो इतकेच नव्हे तर पूर्वी कित्येक सतीदेखील जात असत, परंतु पुरुषाला तिच्याविषयीं दुःख होऊन तो कधी "सता" गेलेला ऐकिला आहे काय? तो लागेल तितकी लग्ने करू शकतो तशी स्त्रियांची स्थिती नाही.
बळवंतराव प्र० स्त्रियांवर पुरुष कमी प्रीति करितात, याला काय प्रमाण ?
जोतीराव उ० घरामध्ये महापतिव्रता स्त्री असता अत्यंत लोभी पुरुष तिच्या उरावर दुसऱ्या लग्नाच्या दोनदोन, तीनतीन बायका करितात, त्याचप्रमाणे एकदर सर्व स्त्रिया एका पुरुषाबरोबर लग्न लाविल्यानंतर त्याच्या घरी नांदत असता दुसऱ्या एखाद्या गृहस्थाबरोबर लग्न लावून त्याचेच घरी त्यास आपल्या पतीचा "सवता" करून नांदत नाहीत.
बळवंतराव प्र० अशा तऱ्हेचे पुरुषांमध्ये अन्याय कशामुळे घडून येतात?
जोतीराव उ० स्त्रियाची जात फार अवला असल्यामुळे या लोभी व धाडस पुरुषानी मोठी कावेबाजी करून कोणत्याहि कामामध्ये स्त्रीजातीची संमत्ती घेतल्याशिवाय एकंदर सर्व पुरुषांनी आपलेच घोडे पुढे दपटले; त्यांस मानवी हक्क समजू देऊ नये, या इराद्याने त्यांस विद्या शिकविण्याचा प्रतिबंध केला, यामुळे एकंदर सर्व स्त्रियांवर अशा तऱ्हेचा जुलमी प्रसंग येऊन गुदरला
बळवंतराव. प्र० स्त्रियांची जात अबला ती कशावरुन?
जोतीराव उ०- आपणा सर्वाचें ती सतत रात्रंदिवस नऊ महिने उदरी ओझे वागवीत असता तिजला कोणत्याच लोभी पुरुषासारखे छक्केपजे करून धाडसपणा करिता येत नाही, यावरूनच स्त्रियांना अबला असे म्हणतात.
बळवंतराव प्र० असे करण्याचा परिणाम काय होतो?
जोतीराव ३० यावरून एकंदर सर्व जगांत प्रथम पुरुषीच्या अत्यंत लोभामुळे हेवा, द्वेष, कृत्रिम वगैरे नाना प्रकारचे दुर्गुण उत्पन्न होऊन सर्व प्रकारची पातकें उदयास आली.
बळवंतराव प्र० तर मग एकदर सर्व जगातील मानवप्राण्यांस आपल्या पापपुण्याचा झाडा द्यावा लागत नाही काय?
जोतीराव उ०- एकंदर सर्व जगातील मानवप्राणी आपल्या पापपुण्यानुरूप इह लोकींच प्रत्यक्ष झाडा देऊन आपल्या पुढील वाढणाऱ्या सर्व संततीरूप वृक्षास पाणी घालितात किंवा मारून टाकितात अशा प्रकारें त्यांच्यावर किंवा त्यांच्या संततीवर त्या पापाचा किंवा पुण्याचा परिणाम होतो, ह्यावरून ईश्वराने परलोक हा प्रत्यक्ष इहलोकीच निर्माण केला आहे.
बळवंतराव. प्र० तर याविषयी कृपा करून आपण काही पुरुषाच्या अत्यंत लोभाविषयी उदाहरणे दिल्यास माझी व इतर सज्जन लोकाची खात्री होईल.
जोतीराव उ०- कित्येक व्यसनी पुरुष स्वस्त्रीशी प्रतारणा करून जास्ती सुखी होण्याकरिता लोभानें तिच्या उरावर दोन-दोन, तीन-तीन लग्नाच्या बायका करितात, आणि त्याजबरोबर रात्रदिवस आपल्या मनःकामना तृप्त करण्याचे छंदांत पडतात. यामुळे पहिल्या स्त्रीच्या मनात हेवा उत्पन्न होऊन ती त्यांचा मनापासून द्वेष करू लागते. यास्तव प्रथम कुटुंबामध्ये कलह होण्यास पुरुषाचा लोभच मूळ कारण आहे. याखेरीज कित्येक व्यसनी पुरुष स्वस्त्रीशी दगेबाजी करून ज्यास्ती सुख होण्याकरिता लोभानें तिच्या उरावर अनेक लग्नाच्या बायका करितात, आणि त्याजबरोबर रात्रदिवस आपल्या मनःकामना तृप्त करण्याचे नादात पडल्यामुळे पुरुषामध्ये नाना प्रकारचे घाणेरडे रोग निर्माण होऊन ते एकंदर सर्व जगात पसरले आहेत. त्याचप्रमाणे कितीएक व्यसनी पुरुष मदोन्मत्त होऊन रजस्वला असलेल्या स्त्रियांबरोबर आपल्या मनकामना तृप्त करितात, यामुळेच त्या उभयता स्त्रीपुरुषास महाव्याधी उद्भवतात इतकेच नव्हे! परंतु त्याच्या संततीतसुद्धा तोच महारोग काही काळापर्यंत वास केल्याशिवाय रहात नाहीं.
बळवंतराव प्र०- आपण पूर्वी ह्मणालांत की, एकंदर सर्व स्त्रियांस मानवी हक्क समजूं देऊ नये, या इराद्याने लोभी पुरुषांनी त्यांस विद्या शिकविण्याचा प्रतिबंध केला यामुळे स्त्रियांवर अनेक जुलमी प्रसंग येऊन गुदरले, त्यापैकी नमुन्याकरिता एखादें उदाहरण द्याल तर बरें होईल?
जोतीराव उ०- साठसत्तर वर्षाच्या जरजर झालेल्या बोचऱ्या खल्लड जरठाशी आर्य भट्टानी पूर्वी लग्न लाविलेल्या स्त्रिया मरताच त्यांनी लावण्यवती अशा अज्ञानी मुलीबरोबर पुनः संबंध करून, त्या अबलांचे तारुण्यात माती कालवितात. परंतु बालपणी वैधव्य आलेल्या अज्ञानी मुलीने मात्र पुनः द्वितीय संबंध करू नये म्हणून कडेकोट प्रतिबंध करून प्रचारात आणिला आहे व याचे परिणाम खाली लिहिल्याप्रमाणे होतात:- पवित्रतेचा पोकळ आव घालणाऱ्या अतिनिर्लज्ज आर्य, आपल्यातील अबला व पंगू भावजया व सुना तारुण्याच्या भरीत आल्याबरोबर, त्यांचा रात्रंदिवस पाठलाग इतका करितात की त्यांची सहजच आडमार्गी पाऊले पडतात असे झाले म्हणजे त्यांस अब्रूकरिता नाइलाज होऊन गर्भपात करून बाळहत्या कराव्या लागतात यावरून धूर्त आर्य भट्ट जातीमध्ये किती गर्भपात व बाळहत्या होत असतील, याविषयी तुमच्याने खास अनुमान करून सांगवेल काय?
बळवंतराव प्र० या अघोर पापाचें अनुमान करून माझ्याने सांगवणार नाहीं परंतु ही पक्षपाती वहिवाट आर्य लोकांनी आजपावेतो आपल्या जातीमध्ये कशी चालू ठेवली? कारण ही नेहमी चालू ठेविल्याने धूर्त आर्यभट्ट जातीचा आपोआप निर्वश होऊन लयास जाईल; यास्तव ही दुष्ट चाल ते आपल्यातून का काढून टाकीत नाहीत?
जोतीराव उ०- ह्याचे कारण, स्त्री जातीस नीच मानण्याचा त्यांचा प्रघात पडल्यामुळे व त्यास अनेक धूर्त व कावेबाज ऋषींनी केलेल्या संहिता, स्मृत्या वगैरे बळकट आधार मिळाल्यामुळे त्यांनी आजपावेतो ही दुष्ट चाल चालू ठेविली आहे. यास्तव तुह्मीच विचार करा की, आर्य ब्राह्मणानी ही दुष्ट चाल प्रचारात आणल्यामुळे भोळसर अज्ञानी कुळवाडी, सोनार वगैरे जातीतील लोकानी त्याचा कित्ता घेतल्यामुळे, ते भट्टी प्रमाणेच आपल्या सुनाबाळांस त्याच प्रकारच्या संकटात पाडतात. या अन्यायावरून आण सर्वाच्या परमन्यायी व दयामूर्ती निर्माणकर्त्यास त्याच्या अधीर दृष्ट आचरणाचा संताप येत नसेल काय?
बळवंतराव. प्र० आर्यभट्टाच्या सुनावाळानी अशा तऱ्हेचे गर्भपात व बाळहत्या करून आर्याचा निर्वश होऊ नये म्हणून त्याच्या पवित्र मानलेल्या वेदात कोणत्याच ठिकाणी त्याविषयी विधिनिषेध केला नाही काय ?
जोतीराव उ०- आर्याच्या पवित्र वेदामध्ये स्त्रियांचा पुरुषाबरोबर द्वितीय संबंध घडू नये असे कोठे लिहिलेले मुळींच आढळत नाहीं यास्तव गर्भपात व बालहत्येविषयीं त्याच्यामध्ये विधिनिषेध कोठून असणार? परंतु वेदाच्या कारकीर्दीत एका आर्याचा बंधू मेल्याबरोबर तो आपल्या भाउजयीस पुनर्विवाहासंबंधी काहीच विधी न करितां त्याजला संतान होण्याच्या निमित्ताने त्याजबरोबर आपल्या स्वस्त्रीसारखी मजा मारीत असे. यावरून आताच्या धूर्त भट ब्राह्मणांसारखे त्यांच्यात गर्भपात व बाळहत्या होत नसतील असे अनुमान करिता येईल.