बळवंतराव हरी साकवळकर प्र०-पुण्य कशास म्हणावे?
जोतीराव गोविंदराव फुले. उ०- स्वतःस मात्र सुख होण्याकरिता एकदर सर्व मानव प्राण्यास कायीक व मानसिक पिडा दिली नाही, म्हणजे त्यासच पुण्य म्हणावें.
बळवंतराव प्र०-ते कसे? त्याविषयी आम्हांस उघड रीतीने समजावून दिल्यास बरे होईल.
ज्योतीराव प्रoस्वतः सुखभोगण्याकरिता दुसऱ्याने जर तुम्हांस पीडा देऊन तुम्हांजवळची एखादी वस्तु धर्ममिषाने फसवून अथवा जबरीनें
घेऊन तिचा उपभोग तो तुमच्या समक्ष करू लागला, तर तसे त्याचे आचरण तुह्मास आवडेल काय? बळवंतराव उ०- त्याचे ते करणे मला तर काय परंतु या जगातील कोणत्याहि मनुष्यास आवडणार नाही.
जोतीराव प्र० तर यावरून इतर मानवी प्राण्यांची एखादी वस्तु त्यास धर्ममिषाने फसवून अथवा जबरीने घेऊन तिचा उपभोग त्यांच्यासमक्ष
घेण्यास आपणास काही अधिकार पोहोचतो काय? बळवंतराव उ०- तसे करण्यास आपल्यास कोणत्याहि तऱ्हेचा अधिकार पोहोचत नाही. व याविषयी भूदेव आर्याच्या शास्त्रातसुद्धा असा
सिद्धांत आहे की, "परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्"
जोतीराव प्र० असा जर तुमच्या शास्त्राचा सिद्धांत आहे, तर तुमचे आर्यभट्टजी (भूदेव) आपल्या ग्रंथासह निवळ विटाळशी स्त्रीसारखे सोवळे होऊन ख्रिस्ती मुसलमानांसह शूद्रादि अतिशूद्रास नीच मागून त्यांचे सर्व प्रकारचे नुकसान करितात हे कसे?
बळवंतराव प्र० याविषयी आपण काही सार्वजनिक उदाहरणे दिल्यास जनाचे हित होणार आहे..
जोतीराव उ० पहिले आर्य लोक आपल्या स्वार्थासाठी ख्रिस्ती लोकांबरोबर त्याच्या टेबलावर उघड बसून मद्यमांसावर ताव मारितात; आणि घरी गेल्याबरोबर सोवळे होऊन त्यांच्या पवित्र ख्रिस्ती धर्माची निंदा करुन अज्ञानी जनांची त्याविषयी मनें कुत्सित करतात. दुसरें :- आतून तारुण्याच्या मदामुळे मस्तानी स्त्रीसारख्या वेश्येबरोबर स्वस्त्रीपेक्षाहि अधिक व्यवहार करून बाहेर पडल्याबरोबर अट्टल सोवळे बनून पवित्र मुसलमानी धर्माची निंदा करतात व त्यास आपल्या आडांतील पाण्याससुद्धा स्पर्श न करू देता इतर अज्ञानी जनांची मनें त्याजविषयी भ्रष्ट करून त्यांस मुसलमानांचा द्वेष करावयास शिकवितात. तिसरे अज्ञानी शूद्रादि अतिशूद्राच्या निढळाच्या घामाच्या पैशावर पर्वतीसारखी शुद्रातील राजेराजवाड्याचा स्पर्श न होऊ देता त्यांस पशूवत् नीच मानून, आपल्या श्रेष्ठ जातीचा तोरा मिरवितात.देवालये उपस्थित करून त्यांत आपण सोवळे होऊन यथेच्छ पक्वान्नांची झोड उडवितात परंतु कर देणाऱ्या भुभुक्षित शुद्रादि अतिशुद्रास ज्वारीबाजरीचा शिळा उरलेला घासभरसुद्धा अन्नाचा तुकडा देत नाहीत आणि घरी आल्यावर शिंदे, होळकर, गायकवाडासारख्या कुलीन शुद्रातील राजेराजवाड्याचा स्पर्श न होऊ देता त्यांस पशूवत् नीच मानून, आपल्या श्रेष्ठ जातीचा तोरा मिरवितात.