लक्ष्मण मानाजी पाटील, मगर प्र०- आपण सर्वाच्या निर्मीकाने एकंदर सर्व प्राणी मात्रास उत्पन्न करतेवेळी फक्त मानव स्त्री-पुरुषांस सारासार विचार करण्याची बुद्धि देऊन, त्यास अतिपवित्र केले आहे, असा जर तुमचा सिद्धांत आहे, तर या जगामध्ये काही मानव स्त्री-पुरुष दुष्टाचरणी कसे झाले?
जोतीराव उ०- एकंदर या सर्व पृथ्वीच्या पृष्ठभागांवरील काही मानव स्त्रीपुरुष आळशी झाल्यामुळे ते दुष्टाचरणी झाले...
लक्ष्मण प्र०-याविषयी आपण जर एखादे साक्षात् उदाहरण द्याल, तर एकदर सर्व मानव स्त्री-पुरुषावर आपले मोठे उपकार होतील.
जोतीराव उ०- प्रथम त्या आळशी मानव स्त्री-पुरुषांनी आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांस विचारल्यावांचून, त्यांच्या वस्तु जेव्हा चोरून नेऊ लागले; तेव्हा एकंदर सर्व मानव स्त्री-पुरुषास आप आपल्या शेतमळ्यातील वगैरे बाहेरची कामे करावयास जाण्याच्या पूर्वी प्रत्येक घरवाल्यास त्याच्या कुटुंबातील एखादा कामकरी घरी ठेवून, आपआपल्या घरांची रखवाली करण्याची अडचण पडू लागली व ही गैरसोय दूर करण्याकरिता काही मानव कारागीर एकदर सर्व जगातील मानवास हितावह होऊन, त्यांच्या उपयोगी पडण्याजोगत्या वस्तु तयार करण्याचे काम एके बाजूला सोडून, ते लाखो रुपयांच्या किंमतीची नाना तऱ्हेची कुलपे करण्याच्या कामी गुंतले. यामुळे एकदर सर्व जगातील मानव स्त्री-पुरुषाच्या वेळेच्या व द्रव्याच्या संबंधाने त्यांचे किती नुकसान झाले व हल्ली होत आहे, याविषयी माझ्याने अनुमान करूनसुद्धा सांगवत नाही.
लक्ष्मण प्र० असो- परंतु एकंदर सर्व मानव स्त्री-पुरुषांनी आपआपल्या घरातील सामानाच्या बचावासाठी कुलपे खरेदी करू लागल्यामुळे त्यांच्या घरातील सर्व वस्तु सुरक्षित राहून ते सुखी झाले असतील काय?
जोतीराव 30-अरे, हे सवयीने बनलेले अट्टल चोर मानव कारागिराच्या कुलपी अटकावाला कोठून भिणारा परंतु त्यापैकी ( स्त्रियांशिवाय) काही एक मानव पुरुष चोरांनी जिवावर उदार होऊन एके ठिकाणी जमून त्यांनी आपल्या तोंडाला काळे लावून त्याला चुन्याच्या पांढऱ्या ठिपक्यांनी साजरे करून, एका हातांत टेभे आणि दुसऱ्या हातात नागव्या तलवारी घेऊन रस्तोरस्ती सराटे पसरून लोकांस मारण्याकरिता दगडाचे जागोजाग लहान लहान ढीग करीत आणि एकदर सर्व गावकऱ्याची पर्वा न करिता त्यांच्यासमक्ष निर्लज्ज होऊन "हरहरमहादेव" अथवा "दीनदीन" म्हणण्याच्या नादीत सघन मानव स्त्रीपुरुषाच्या घरावर दरवडे घालून त्यांची जबरीने कुलपे मोडून त्यांची घरे लुटून नेऊ लागले?
लक्ष्मण प्र० यावरून गावकरी लोक पुढे काय करू लागले?
जोतीराव उ० गावांत दरवडे पडूं लागल्यामुळे कित्येक खेड्यापाड्यांसह एकंदर सर्व गावकऱ्यांनी आपआपल्या स्वतःच्या निर्वाहांची कामे एके बाजूला सोडून, एकंदर सर्व गावातील मानव स्त्री-पुरुषांनी एकत्र होऊन, त्यांनी आपल्या डोक्यावर कन्हत कुन्यत चिखलमातीच्या टोपल्या वाहून, एकदर सर्व गावाभोवताली गांवकूस बांधिले आणि त्याला जागोजाग मोठमोठाले दरवाजे लावून त्यांच्या संरक्षणाकरिता आपसातच वर्गणी जमा करून ते वेसकरांस वेतन देऊ लागले
लक्ष्मण प्र० यापुढे दरवडेखोर आपला परिणाम कोणत्या थरास लावितात, याविषयी आपल्यास विचारण्याचा त्रास जरी देत नाहीं, तरी तूर्त असे विचारतो की, मूळ मानव स्त्रीपुरुषात चोर कोणाच्या हयगयीने निपजले? जोतीराव उ०- कुटुंबातील मुख्य माता अथवा पिता गावातील मुख्य पाटलीण अथवा पाटील देशातील मुख्य देशमुखीण अथवा देशमुखः पृथ्वीवरील मुख्य महाराणी अथवा महाराजा, या सर्व मुख्य अधिकाऱ्यात सत्यपाळकपणाची मुळींच कळकळ नसल्यामुळे ते आपल्या
ताब्यात असलेल्या मुलीमुलावर चांगली चौकशी न ठेवितो त्यास उनाड होऊ देतात. आणि त्यास योग्य वेळी योग्य शिक्षण देण्याची हयगय
करितात. यामुळे एकदर सर्व जगात चोऱ्या वगैरे सर्व प्रकारच्या दुष्ट आचरणांचा फैलाव झाला व होतही आहे.
लक्ष्मण प्र० यास्तव या बलिस्थानावरील मुख्य महाराणी आईसाहेब सरकारांनी आपल्या ताब्यात असलेल्या प्रजेच्या कन्यापुत्रांस आळशी होऊ न देता, त्यास योग्य वेळी योग्य शिक्षण द्यावे. ते कोणते की, जेणेकरून एकदर सर्व बलिस्थानात चोरी वगैरे सर्व प्रकारच्या दृष्ट आचरणाचा फैलाव झाला आहे. त्यांचे निर्णश होईल.
जोतीराव 30-अरे बाबा, आपल्या राणीसाहेब या बलीस्थानातील एकंदर सर्व शेतकरी लोकापासून जेवढी म्हणून करपट्टी घेतात, तिचे नावसुद्धा मी येथे घेत नाही. परंतु मी तुला असे विचारतो की, या आपल्या कनवाळू महाराणी आईसाहेब बलीस्थानातील अज्ञानी शेतकरी लोकांपासून जेवढा म्हणून लोकलफंड सक्तीने वसूल करितात, तो सर्व शुद्रादी अतिशुद्ध शेतकऱ्यांच्या मुलांकरिता शाळा घालून त्या शाळेत त्यास शेतकीसह तत्संबंधी सर्व प्रकारच्या विद्या शिकविण्याच्या कामी येथील एकंदर सर्व कृत्रिमी, ढोंगी धर्मलंड आणि बंडखोर भटपाड्यासह पेशव्यांच्या जातीचे जे आपल्यासच श्रेष्ठ मानून इतर मानवास तुच्छ मानितात, अशांवर भरवसा न ठेविता फक्त युरोपियन कामगारांच्या द्वारे खर्च केल्याबरोबर त्या शाळांपासून शेतकऱ्यांत हल्लींपेक्षा ज्यास्ती चोर निपजतील, असे तुला वाटते काय?
लक्ष्मण प्र० खरोखर सरकाराने सदरीं लिहिलेल्या लोकांच्या, पंतोजीच्या जाग्यावर जर नेमणुका शेतकऱ्यांच्या शाळात केल्या नाहींत व ते निरंतर उद्योगी झाल्यामुळे त्यांच्यात जास्ती सद्गुणी निपजतील आणि ते आर्यभट्ट फडक्या चोरासारख्यांच्या नादी न लागतो, आपल्या सरकारास कोणत्याच प्रकारचा तोशीस न लावता ते मोठ्या उल्हासाने जास्ती करपट्टी देण्यास समर्थ होतील, असे मी प्रतिज्ञेने सांगतों, परंतु आपल्या सरकाराने बळिस्थानातील शेतकऱ्यांच्या शाळाशिवाय दुसऱ्या कोणत्या लोकाकरिता आणखी शाळा घालाव्यात?
जोतीराव उ०- आपल्या कनवाळू सरकाराने या बळिस्थानांतील शेतकऱ्यांच्या शाळांशिवाय घिसाडी, लोहार, बटई-सुतार-कढई-चाभार-सोनार तांबट- साळी-शिपी वगैरे कारगीरांच्या मुलांकरिता निरनिराळ्या शाळा घालून त्यामध्ये त्या सर्वांच्या कसवासंबंधी सर्व प्रकारच्या विद्या शिकविण्याच्या कामी थोडा थोडा खर्च केल्याबरोबर त्या सर्व शाळात शिकलेली कारगिरांची मुले फारच थोडी चोर निपजतील, असे मी खात्रीने सांगतो.
लक्ष्मण प्र० एकदर सर्व बलीस्थानातील कारागिराच्या मुलांसाठी शाळा घालण्याकरिता आपल्या सरकाराने रयतेच्या कोणत्या फंडातून खर्च करावा? कारण कारागीर लोक शेतकऱ्यासारखा सरकारास लोकलफंड देत नाहीत.
जोतीराव उ०- असे जर आमच्या सरकारचे म्हणणे आहे, तर त्यात त्याची थोडीसी गैरसमज आहे असे म्हटले पाहिजे; कारण त्यांनी पाहिजे असल्यास शेतकऱ्यांपासून वसूल केलेल्या करपट्टीच्या रॉयलफंडातून शेतकरी लोक आपल्या सरकारास जास्ती कर देण्यास सहज समर्थ होतील. यामुळे एकदर सर्व बळिस्थानातील क्षत्रियासह सरकारचा बोलबाला होऊन त्याची या जगात अगाध किर्ती होईल.
लक्ष्मण प्र० सरकाराने एकदर सर्व शेतकऱ्यासह कारागीर लोकांकरिता शाळा घातल्या आणि त्यांनी आपआपली मुलें धूर्त आर्य पुराणिकाच्या चिथावणीवरून त्या शाळेत शिकण्याकरिता जर पाठविली नाहींत, तर तेथे आपल्या सरकाराने काय उपाय करावा?
जोतीराव उ०- एकंदर सर्व अज्ञानी शेतकाऱ्यांसह कारागिरांनी आपआपली मुले त्यांच्या हट्टाने जर पाठविली नाहीत; तर सरकाराने असल्या हेड लोकाची मुलीमुले शाळेत शिकण्याविषयीं बेलाशक सक्तीचा कायदा करावा आणि सरकारी सत्यपाळकांकडून त्या सर्व लोकांस असा बोध करावा की, तुम्ही आपली मुले जर आपआपल्या शाळेत पाठविली नाहीत, तर ती मुले आळसामुळे उनाड होतील आणि आपली पोटे जाळण्याकरिता ती चोऱ्या करू लागतील यामुळे त्यास सक्तमजुरीची शिक्षा देऊन त्यांच्या पायात विड्या घालून त्यांच्या संरक्षणासाठी सरकारास खबरदारी ठेवावी लागेल. तशीच तुमची मुले आळसामुळे अट्टल चोर झाल्यावर शेजाऱ्याच्या घरांवर दरवडे घालून त्यांस जर जखमा करतील, तर सरकारास त्यास काळ्या पाण्याच्या सजा द्याव्या लागतील, आणि त्याप्रीत्यर्थ सर्व खर्च सरकारी पोत्यातून करावा लागेल. तशीच तुमची मुले आळसामुळे निसग बंडखोर होऊन प्रांतातील गाँव लुटताना तेथील काही घरे जाळून लोकांची खूनखराबी करतील, त्यांच्या चीजवस्तूंसह द्रव्याची नुकसानी करून त्यांच्या बायापोरांस तळतळायास लावतील आणि तेथील एकंदर सर्व व्यापारधंद्यांची अव्यवस्था जर करतील, तर सरकारास त्यातील कित्येक बंडखोरास तोफेच्या तोंडी देऊन बाकीच्यास फाशीच्या शिक्षा द्याव्या लागतील, व त्या सर्वाप्रीत्यर्थ सरकारास जेव्हा पोलीस ठेवण्याचा प्रसंग येईल, तेव्हा त्या सर्व खर्चाचा बोज्या तुम्हा सर्व शेतकऱ्यांसह कारागीरास सोसावा लागेल. इतकेच नव्हे परंतु, तुमची मुले चोर, दरवडेखोर आणि बडखोर झाल्यामुळे सरकार त्यास शिक्षा देऊन त्याची रस्तोरस्ती जेव्हा धिंड काढील, तेव्हा तुम्हा त्या बंडखोराच्या आईबापास लज्जेस्तव परागंदा होऊन आपली तोंडे काळी करावी लागतील, आणि तुमच्या निराश्रित अबला सुनाबाळांस शोकसमुद्रात गटंगळ्या खाव्या लागतील तुमच्या भाऊबंदांच्या मुखाला काळीमा लागून तुमच्या सोयधायऱ्याचा कोणी आदरसत्कार करणार नाहीत आणि तुमच्या इष्टमित्रांस लज्जा प्राप्त होऊन त्यास चारचौघात खाली मान घालाव्या लागतील. त्याचप्रमाणे तुम्ही आपली मुले आपल्या शाळेत जर पाठविली नाहीत, तर ती उनाड होऊन, वयांत आल्याबरोबर काळया कृष्णासारखे निर्लज्ज होऊन व्यभिचार करू लागल्यामुळे ते सर्व, स्वभावाने सदाचारी लोकाच्या तिरस्कारास पात्र होतील; आणि त्याच्यासाठी एकंदर सर्व लोकात तुंबळ हाणामाऱ्या, ठोकाठोक्या, खूनखराच्या होऊ लागतील व त्याचा बंदोबस्त ठेवण्याकरिता सरकारास शिवदी ठेवण्याचा जो काही खर्च पडेल, त्याचा बोजा तुम्हा शेतकऱ्यासह कारागिराच्या उरावर बसेल. त्याचप्रमाणे तुम्ही आपली मुले आपआपल्या शाळेत जर पाठविली नाहीत, तर ती मुले वयात आल्याबरोबर आपली पोटे जाळण्याकरिता धूर्त आर्यभटातील कृत्रिमी दलाल कुलकर्ण्याच्या नादी लागून गावातील निरपराधी सालस, भल्या गृहस्थांविरुद्ध खोट्या साक्षा देऊन त्याजवर खोटे कागद करतील आणि सरकाराविरुद्ध बनावट छापील कागद व बनावट नोटा करून अट्टल खोटे बोलणारे जेव्हा होतील, तेव्हा सरकारास त्यांचे इनसाफ करण्याकरिता पगारी न्यायाधीश नेमावे लागतील व त्या सर्वांचा खर्च शेतकऱ्यासह कारागिराच्या बोडक्यावर बसेल. साराश, एकंदर सर्व जगातील लोकानी आपआपल्या मुलीमुलास शाळेत घालवून त्यास सत्यज्ञानविद्या दिल्याबरोबर सहजच ते सर्व लोक सद्गुणी झाल्यामुळे कोणी कोणाच्या राष्ट्रावर स्वाऱ्या करणार नाहींत, आणि यामुळे एकंदर सर्व जगांत जागोजाग शेतकऱ्यासह कारागिरांच्या निढळाच्या घामाचे कोट्यवधि रुपये खर्ची घालून निरर्थक फौजफाटे ठेवण्याचा त्या सर्व सरकारांस प्रसंग येणार नाही, अशांविषयी बोध करा म्हणजे काम झाले.
लक्ष्मण प्र०-को हो तात्यासाहेब चोरापेक्षा जास्ती दोषी कोण आहेत?
जोतीराव 30-चौराच्या दोषांविषयीं मी तुला पूर्वी याच निबंधात कळविले आहे, परंतु या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे काही लोक आपल्या हितमतलबासाठी नास्तिक बनले आहेत, ज्यांनी आपण सर्वांच्या निर्माणकर्त्याची उचलबांगडी करून त्याच्याऐवजी त्यांनी पराजित केलेल्या अज्ञानी लोकांचे आपण स्वतः अब्रह्म अथवा भूदेव होऊन त्यांची निवड करून त्यांस तुच्छ मानितात, अशा धूर्त मतलबी लोकाच्या शाळेत शिकलेली विद्वान मुले अट्टल निर्दय चोर झाली आहेत...
लक्ष्मण प्र०- आता येथे या निर्दय विद्वान चोरांविषयी थोडे थोडे प्रतिपादन कराल, तर बरे होईल.
जोतीराव 30-अज्ञानी लाचार चोर पोटाकरिता चोऱ्या करितात; परंतु शाळेत शिकलेल्या नास्तिक चोरापैकी कित्येक सरकारापासून दरमहाचे दरमहा पगारासह गाडीघोड्याबद्दल भत्ते घेऊन सरकारचे चाकर होतात; आणि सरकारची चाकरी इमानेइतबारे न करिता अज्ञानी रयतेचा न्याय करितांना त्यांजपासून लाचलुचपत खाऊन आपल्या घरोघर तेच निर्लज्जपणे पोकळ सोवळे बनून लटकाच अस्तिकपणाचा डौल घालितात.
लक्ष्मण प्र०-अज्ञानी रयतेपासून लांच खाणाऱ्या निर्लज्ज सोवळ्या चाकरास तूर्त बीनभाड्याच्या घरात मौजा मारण्याकरिता सोडून द्या, परंतु त्याच्यातील कित्येक लोक सरकारी कामगारीस फसवून अज्ञानी लोकात डौल मिरविण्याकरिता सरकारापासून पगार घेतल्याशिवाय आनररी माजीस्त्रेाचे हुद्दे पतकरितात याविषयी तुमचे काय मत आहे?
जोतीराव. उ०-त्यांच्यापैकी कित्येकास कामापुरती विद्या नसून त्याला जगाचा बिलकूल अनुभव नसतो ज्याला माँट्रिक्युलेशन परिक्षा कशाला म्हणावे, हे त्यांस मुळीच माहीत नसते, असे अजाणते ठोंबे केवळ बड्या घराण्यातील सरदारांचे पुत्र असले, म्हणजे त्यास ऑनररी माजिस्त्रेटाचे हुद्दे देतात. अहो, यातील कित्येकास आपल्या घरातील प्रपंच व बायकापोरांची नीट व्यवस्था ठेवण्याचे ज्ञान नाही, तर त्यास अज्ञानी शूद्रबाधवांचा न्याय बरोबर कसा करिता येईल? जे आपण आपल्या जातीचा पोकळ श्रेष्ठपणाचा तोरा मिरविणारे असून, बाकीच्या एकंदर सर्व जातीच्या लोकास नीच मानणारे असतात, त्या सर्वांवरून त्यांनी नीच मानलेल्या एकंदर सर्व जातीच्या लोकांनी त्यांच्या न्यायाच्या नावाने को शिमगा करावा?
लक्ष्मण प्र० ह्याचप्रमाणे पगार घेतल्याशिवाय सर्व वृद्ध पेन्शनर विद्वान व कळचेटे कुळकर्ण्यासह, ट, फ, करणारे पाटील लोक लवाढीची कामे करितात, याविषयीं तुमचें काय मत आहे? जोतीराव उ०- पांजरपुरातील जनावराप्रमाणे सरकारी नोकरी करुन जीणे झालेले पेनशनी लायक लोकांसह कळचेटे कुळकर्णी, ट, फ.. करणाऱ्या टोव्या पाटलास खिशात घालून त्याची परवा न करितो जे एकंदर सर्व लोकांस नीच मानून आपल्या जातीच्या श्रेष्ठपणाचा ताठा मिरवितात, अशा जगमत्सरी लोकापासून अज्ञानी लोकांचा नीट इनसफ होऊन त्यांचे कल्याण होणे, फारच कठीण.
लक्ष्मण प्र०-त्याचप्रमाणे सरकारापासून काही वेतन घेतल्याशिवाय एकंदर सर्व तरुण अथवा वृद्ध विद्वान लोक म्युनिसिपालिटीचे सभासद झाल्यामुळे बाकीच्या एकंदर सर्व जातींच्या लोकाचे हित होते काय? याविषयीं तुमचें मत कसे काय आहे?
जोतीराव 30-अरे, या तुमच्या एकंदर सर्व म्युनिसिपालिट्यात धूर्त आर्यभटाच्या अमलात नीच मानलेला चाभार, कढई, मोची, म्हार, मांग वगैरे लोकांपैकी एक तरी सभासद आहे काय? असल्यास दाखीव?
लक्ष्मण, प्र०-आर्य भटानी कृत्रीमानें नीच मानलेल्या शूद्रापैकी एकहि अतिशूद्र म्युनिसिपालिटीत सभासद नाही, कारण त्यांच्यामध्ये म्युनिसिपालिटीत बसण्याजोगता विद्वान् कोणी अद्याप झालाच नाही.
जोतीराव उ० यावरून इंग्रज लोकातील पावणे दोन शहाण्या गवरनर जनरल लॉर्ड रिपन सरकारी अधिकाऱ्याने या आर्यभटानी नीच मानलेल्या अतिशूद्राविषयी चांगला पोक्त विचार केल्याशिवाय त्याने कोणत्या आधारावरून या बळिस्थानातील लोकास म्युनिसीपालिटीचा अधिकार दिला. कारण उदाहरणार्थ, या पुणे शहरातील म्युनिसीपालटीचा अधिकार सरकाराने आपल्याकडून काढून एकंदर सर्व जातीच्या लोकांकडे दिल्यामुळे युरोपियन कलेक्टरासारखे बड़े बड़े सरकारी कामगार या शहराकडे दुकूनसुद्धा पहात नाहींत व तेथील सभासदाच्या हयगयीमुळे हल्लीच्या या म्युनिसिपालिटीतील हेल्थ आफिसराची हलालखोरि धंद्याविषयी रयतेचे द्रव्य खर्च करण्याच्या कामी व गंज पेठेत जी अव्यवस्था केली आहे, ती समक्ष पाहिल्याबरोबर त्याच्याविषयी कोणाच्या मनाला किळस वाटणार नाही असा पुरुष विरळा सापडेल! | कारण भाड्याच्या तट्टीला त्यांच्या भाडोत्री यजमानाने त्यांस मार्गावर चालण्याकरिता किती जरी टुमण्या दिल्या, तरी हे शुद्धीवर येऊन मार्गावर नीट चालावयाचे नाहींत, यास्तव अतिशुद्र शेतकरी विद्वान् होऊन त्यांनी आपले आसूड अंगाभोवताली फिरवून त्यास यथास्थित फटकारे दिल्याविना हे पुरपुर करून गाळावयाचे नाहीत.
लक्ष्मण प्र. ० त्याचप्रमाणे खोटे कागद करून लबाड बोलणाऱ्यांपेक्षा जास्ती दोषी कोण आहेत?
जोतीराव उ०- खोटे कागद वगैरे करून लबाड बोलणाऱ्यापेक्षा जास्ती दोषी त्यास ह्मणावे की, जे आपण सर्वाच्या निर्मीकाच्या नावाने स्वतःच्या कल्पनेनें बनावट धर्मपुस्तके करून अज्ञानी शूद्र वगैऱ्यास लुटून आपल्या पोरालेकरांची पोटे जाळतात...
लक्ष्मण प्र०- त्याविषयी आह्मी काय खासा उपाय करावा, याविषयी आह्मा सर्वात कळवाल, तर बरे होईल.
जोतीराव उ० याला उपाय आर्यभटांनी नीच मानलेल्या सर्व शूद्रादि अतिशूद्रांसह भिल्ल कोळी वगैरे मानव बांधवांनी आपआपल्या कन्यापुत्रांस शाळेमध्ये पाठवून त्या सर्वास सत्यसान शिकविण्याचा आरंभ करावा, म्हणजे काही काळाने आपण सर्वाच्या मुली मुलांस सत्यज्ञान प्राप्त झाल्याबरोबर त्यातून शूद्र वगैऱ्यातील एखादा सत्पुरुष आपण सर्वांच्या समाधीवर पुष्पवृष्टि करून, आपण सर्वांच्या नावाने उल्हास करील, असे मी स्वसतोषाने भविष्य करितो.