यशवंत जोतीराव फुले. प्र०- मृत्यु ह्मणजे काय?
जोतीराव गोविंदराव फुले. उ०- एकदर सर्व प्राणीमात्राचे देहस्थित प्राण्यांचे जे गमन ते.
यशवंत प्र०- कित्येक मानव स्त्रीपुरुषांच्या तान्ह्या मुली-मुलास मरण येण्याच्या पुर्वी क्लेश होतात. ह्याचं कारण काय असावें, याविषयी थोडक्यात कृपा करून प्रतिपादन कराल, तर बरे होईल.
जोतीराव उ०- कित्येक तान्ह्या मुली-मुलाच्या मरणाच्या पुवा त्यास क्लेश होतात, ह्यांचे मूळ कारण त्याचे माता-पित्यानी काही कामी अपरमित वर्तन केल्यामुळे त्या उभयतांच्या शरिरात काही एक प्रकारचे रोग स्थायीक होतात, यामुळे त्यांची तान्ही बाळके मरण येण्याच्या पूर्वी क्लेशाने तडफडून आपले प्राण सोडितात.
यशवंत प्र०- तान्ह्या बाळकाविषयी पुरे परंतु कित्येक मानव तरुण अथवा वृद्ध स्त्री-पुरुषास मरणाच्या पूर्वी क्लेश होतात, याची कारणे काय असावीत?
जोतीराव उ० याची कारणे सांगतो ऐक-एका मानव स्त्रीने मानव पंचासमक्ष एखाद्या मानव पुरुषास आपला भ्रतार कबूल करून त्याजबरोबर जेव्हा ती सर्व कामी सर्व काळ प्रतारणा करिते, तेव्हा तिला मरणाच्या पुर्वी पश्चाताप झाल्यामुळे क्लेश होतात. त्याचप्रमाणे एकान पुरुषाने मानव पंचासमक्ष एखाद्या मानव स्त्रीस आपली भार्या कबूल करून तिजबरोबर जेव्हा सर्व कामी सर्वकाळ दगेबाजी करीतो, तेव्हा त्याला मरणाच्या पूर्वी पश्चाताप झाल्यामुळे क्लेश होतात. इतकेच नव्हे, परंतु, कित्येक मानव पुरुष आपल्या हितमतलबासाठी आपल्या शेजाऱ्यांबरोबर नाना प्रकारच्या ठकबाज्या करितात, आणि कित्येक जुलीयस सीझरासारखे आपल्यास राज्य प्राप्त व्हावे म्हणून आपल्या पदरच्या जौहामर्द शिपायाकरवी लक्षावधी आपल्या मानव शेजारी बाधवांचा वध करणाऱ्यास मरण येण्याच्या पूर्वी पश्चाताप झाल्यामुळे अतिशय क्लेश होतात. अरे! एका मनुष्याने एखाद्या क्षुल्लक अशा मानवाची अन्यायाने जर हत्या केली, तर आपल्यास किती क्लेश होतात? त्याचप्रमाणे जुलीयस सीझराने लक्षावधि प्राण्यांचा जर वध केला, तर त्याला त्याच्या मरणापूर्वी पश्चात्ताप झाल्यामुळे त्याला निःसषय क्लेश झाले असतील, त्याविषयीं येथें सिद्ध करण्याचे प्रयोजन दिसत नाही.
यशवंत प्र० की हो, जुलियस सीझर अपमृत्युने मरण पावला काय?
जोतीराव उ०- जुलीयस सीझर आपमृत्युने मुळींच मेला नाहीं. प्रथम तो लोकसत्तात्मक राज्याचा पूर्ण भक्त होता व त्या कामी त्यास थोडेसे सामर्थ्य येताच आपल्या रोम येथील लोकसत्तात्मक राज्यातील एकंदर सर्व मानव बांधवास गुलाम करून त्यांच्यावर आपण स्वतः राजा होण्याचा (त्याने) यत्न केला, परंतु हे ईश्वरास न साहून त्यानें निःपक्षपाती ब्रुटस, जो त्याचा जिवलग मित्र होता, त्याच्या मनात भरवून त्याजकडून भर दरबारात क्यासकाच्या हातून सीझराच्या पोटात नागवी खंजीर खुपसून त्यास जेव्हा घायाळ केले, तेव्हा त्यास आपला प्राण सोडण्याच्या पूर्वी किती क्लेश झाले असतील, याविषयीं तूंच विचार करून पहा, म्हणजे झाले.
यशवत प्र०-या पृथ्वीच्या पाठीवर जूलीयस सीझरापेक्षा जास्ती दुष्ट कोण होता?
जोतीराव उ०- जूलीयस सीझरापेक्षा जास्ती दृष्ट आर्यभटातील परशुराम होता व प्राचीन काळी आर्यांनी ज्या लोकास पराजित करून त्यास आपले पिढीजादा दासानुदास केले, असा निवळ अज्ञानी शूद्रादि अतिशुद्र पंगू लोकास फसविण्याकरिता निर्लज्ञ आर्य, हल्ली परशुरामास देवाचा अवतार ह्मणतात परंतु माणसाचा अवतार जो परशुराम त्याने या बळिस्थानातील क्षेत्राच्या मालकांपैकी कित्येक क्षत्रियांचा निकराने जेव्हा वध केला, तेव्हां त्यानें त्या जौहामदं क्षत्रियांच्या निराश्रित अबला गर्मीणी स्त्रियांचा 'लाडग्यासारखा पाठलाग करून त्यांस पुत्र प्रसवतांच त्यांचा निर्दयपणाने वध करून या लाचार क्षत्रिणीस दुःखसमुद्रात ढकलून दिले. वाहावा रे आर्यभटाची अवताराची कल्पना! या निर्दय दुष्ट परशुरामास सैतानाचा अवतारसुद्धा कोणी म्हणणार नाही. कारण मुसलमानांनी कल्पिलेले सैतान या परशुरामापेक्षा फार बरे नव्हे काय ?
यशवंत प्र० या पृथ्वीच्या पाठीवर आर्यातील देव परशुरामांपेक्षा ज्यास्ती अधम निष्पन्न कोण झाला ?
जोतीराव उ०- आयतील देव परशुरामापेक्षा जास्ती अधम कालच्या आर्यभट पांडयाच्या चपाती बडातील आर्यभट पेशवा होय. कारण, आर्यातील देव परशुरामानें या आपल्या बलिस्थानातील मूळच्या जाहामर्द क्षत्रियास त्यांच्या नूतन उपजलेल्या अर्भक पुत्रीचा मात्र वध केला, परंतु कानपूरच्या छावणीत आर्यभट्टातील निर्दय बडखोर पेशव्याने बायकापोरांच्या शहास गुंतलेल्या जाहामर्द इंग्लिश शिपायासमक्ष त्यांच्या भाबावलेल्या स्त्रियांसह त्यांच्या कडेवरच्या तान्ह्या कन्यापुत्रास हिसकावून दिवसा निर्दयपणाने वध करून अखेरीस पुरुष मंडळीवर गमतीगमतीने पाळीपाळीने प्रत्येकावर बंदुकपिस्तुलाचे ताशेरे झाडून त्या सर्वांचे हाल हाल करून प्राण घेतले; यावरून पेशव्यांच्या मनाला मरण्यापूर्वी पश्चाताप झाल्यामुळे क्लेश झाले नसतील, कारण आर्य लोक नेहमी अब्रह्म बनतात. त्यांच्या मनाला आपण सर्वाच्या निर्मिकाची भीडमर्यादा विलकुल वाटत नाहीं, यास्तव त्या लोकांस पापपुण्याचा विधिनिषेध मुळीच वाटत नाही आणि अशा असुराच्या जातीस भूदेव मानून त्याच्या पायाची तीर्थे पितात, अशा लोकास काय ह्मणावे बरे असो, परंतु असल्या तऱ्हेच्या व्यक्ति त्यांच्या माता-पित्यांनी जन्मताच जर नाहीशा केल्या असत्या, तर एकंदर सर्व जगातील लक्षावधी कुटुंबास अनिवार त्रास भोगावे लागले नसते आणि त्यास त्यांच्या मरणाच्या पूर्वी पश्चाताप झाल्यामुळे क्लेश भोगावे लागले नसते.
यशवत. प्र० असल्या तऱ्हेच्या व्यक्ति पृथ्वीच्या पाठीवर जर असल्या, तर त्या पुढे कदाचित एखादे वेळी वळवळ करणाऱ्या विषारी सर्पासारखे भयानक होतील, यास्तव आपण सर्वांनी त्याजविषयी नेहमी सावध राहिले पाहिजे. असो, परंतु कोणत्या कारणावरून मानव स्त्री अथवा पुरुष आपल्या मरणाच्या पूर्वी शांतपणे आनंदात आपले प्राण सोडितात?
जोतीराव उ०- मानव स्त्रीपुरुष आपली लग्ने झाल्यानंतर ते निर्मळ अंतःकरणाने सत्यास स्मरून एकमेकांशी जेव्हा सर्वकाळ सर्वकामी सत्य आचरणात आपले सर्व आयुष्य घालवितात. यास्तव मरण येण्याच्या पूर्वी ते शांतपणे आपले प्राण सोडितात. कित्येक मानव स्त्रीपुरुष आपल्या शेजाऱ्याचे बरे करण्यासाठी सर्व काळ प्रयत्न करितात म्हणून त्याच्या मरणापूर्वी त्यास कोणत्याच प्रकारचे क्लेश होत नाहीत... तथापि कित्येक अशक्त भित्र्या स्वभावाचे केवळ भाविक मानव स्त्रीपुरुषाच्या आजारीपणांत त्यांच्या इंद्रीयांचे व्यापार फारच मंद पडतात. यामुळे त्यापैकी कित्येक बावचळून असे म्हणतात, देवाचे दूत आले आणि कित्येक म्हणतात की, यमाचे दूत आले आणि कित्येक सॉक्रेटीस, येशू ख्रिस्त, महमद वगैरे महा सत्पुरुषासारखे, एकदर सर्व आपल्या मानव स्त्रीपुरुषाच्या संतानाने सत्य बर्तन करून त्यांनी आपले आयुष्य आनंदात घालवावें म्हणून जीवत असतो झटतात. यास्तव मरण येण्याच्या पूर्वी त्याच्या मुद्रेवर शांतपणें आनदाचा गांभीर्य प्रकाश पडतो. अशा "सत्पुरुषांस जगाच्या कल्याणा आणि सत्याची विभूती" असे म्हणावें आणि तेच मृत असून एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुषांच्या हृदयमंदिरात आठवणरुपी जागृत होऊन वास करितात, यास्तव प्रत्येक मानव स्त्रीपुरुषाने जीवत असतो सत्यास जीवीं धरून त्याप्रमाणे सत्य आचरण केल्याने त्याच्या वृत्तीत अत्यंत गांभीर्यपणा येऊन त्यास काळ समीप असल्यामुळे कल्पित परलोकाचें भय वाटत नाहीं यास्तव आपण शुद्धीवर असतां आपल्या कन्यापुत्रांसह कुटुंबांतील एकंदर सर्व तरुणास सत्याविषयी बोध करून एकंदर सर्व सोयरेघायरे इष्टमित्र वऱ्याचा निरोप घ्यावा आणि शांतपणे सत्यास स्मरून पुढे दिलेली प्रार्थना करावी...