बळवंतराव हरी साकवळकर. प्र० निर्माणकर्त्याचे वारवार पोकळ नामस्मरण केल्याने त्यास संतोष होईल काय?
जोतीराव फुले उ०- आपण घरी असता मी आपल्या घरी तुमच्या नावाने एखाद्या धातूच्या अथवा दगडाच्या मूर्तीवर पुष्पे वाहून तुमचें नामस्मरण केल्यास तुम्हांस त्यापासून काही खरा फायदा होईल काय? त्याचप्रमाणे एका मातापित्यास सुमारे दहा मुले झाली व त्या उभयतानी परिश्रम करून आपला वृद्धापकाळ होत तोपर्यंत त्यांचे पालनपोषण केले व ती आता उभयता वृद्ध होऊन पंगू झाल्यावर त्यांपैकी थोरल्या मुलाने त्याच्या पाळणपोषणाकरिता काही खटपट न करिता "माझी माता, माझा पिता" असे पोकळ नामस्मरण करू लागल्यास मातापित्यासह त्याच्या भावंडास उपवासाने मरावे लागेल की नाही बरे? परंतु दुसऱ्या मुलाने मातापित्याचे नामस्मरण न करिता मोठ्या काळ कष्टांनी श्रम करून आपल्या मातापित्याचे व धाकट्या भावंडाचे पाळणपोषण केल्यास त्याचे आईबाप व बहिणभावडे सुखी होऊन आनंद पावतील किंवा नाही बरे? यावरून केवळ मातापित्याचे पोकळ नामस्मरण करणारा मुलगा किंवा अति मेहनत करून स्वकष्टाने त्याचे व बहिणभावंडाचे पोषण करणारा, या सर्वास आवडेल? तद्वत् आपल्या परिश्रमाने उदरनिर्वाह न करिता अथवा जगाच्या हितासाठी न झटता, केवळ आपले पोट जाळण्याप्रीत्यर्थ बहुरुप्यासारखे ढोंगी वैराग्याचे सोंग घेऊन सर्वकाळ भांग पिऊन तिच्या अमलांत अज्ञानी भोळ्या जनांचे मिष्टान्नांवर नित्य ताव देऊन लाल गाजरासारखे गलेलठ्ठ पडून, निरर्थक निर्मीकाचे नामस्मरण करितात, ते निश्चयेंकरून विचारवान् पुरुषाच्या उपहासास पात्र होतात.
बळवंतराव. प्र० तर मग निर्मीकाचे नावसुद्धा आपण मानवानी घेऊ नये काय?
जोतीराव उ०- आपण मानवानी कृतज्ञपूर्वक व मनःपूर्वक निर्मीकाचे नावसुद्धा घेऊ नये, म्हणून सिद्ध करणारास अथम व कृतघ्न म्हटले पाहिजे.
बळवंतराव प्र० तर मग मानवाने कृतज्ञपूर्वक निर्मिकाचे नाव कसे व कोणत्या वेळी घ्यावे, याविषयी विस्ताराने स्पष्टीकरण कराल, तर फार उत्तम होणार आहे.
जोतीराव 30 जो आपणास निर्माण करून सतत आपले पाळणपोषण करीत असतो व काळजी वहातो त्याच्या नावाचा घोष धर्ममिषाने, कोल्ह्यासारख्या नानाविध युक्त्या लढवून कोणत्या तरी मार्गाने अज्ञान्याच्या हातावर तुरी देऊन स्वकुवाचा निर्भयपणे निर्वाह करणाऱ्या धूर्त भट्ट मानवाने मौल्यवान नखरेदार पितांबर नेसून रजस्वला स्त्रीसारखे सोवळे होऊन, सुगंधी पदार्थाच्या योगाने घमघमाट ज्या ठिकाणी सुटला आहे, अशा पूजेच्या खोलीत नकट्या गुन्हेगारासारखे आपली नकटी नाके मुठीत धरून, बगळ्यासारखे एकचित्त होऊन, दिवाभितासारखें गच्च डोळे झाकून मोठ्या धार्मीकपणाचा आव घालून, त्याचे नांवाचा घोष जर केला, तर आपल्या सर्वांच्या परमन्यायी निर्मिकास या अट्टल धूर्त बहुरुपी गारुड्याचे नामस्मरण पाहून अत्यंत संताप होणार नाही काय? यास्तव निर्माकाचे नावाचें सदा सर्वकाळ भय बाळगून त्याच्या नावाची आठवण मनी दृढ धरून, त्याने निर्माण केलेल्या एकदर सर्व मानवाबरोबर छक्केपजे न करिता सरळ सात्वीक आचरण केल्याने निर्मीकाच्या पवित्र नावास सन्मान दिल्यासारखे होईल. परंतु केवळ निर्मीकाच्या नांवाचा सतत व्यर्थ नामघोष करून त्याचे मस्तक फिरविल्याने त्यास निःसंशय संतोष होणार नाही. सारांश आपल्याकरिता निर्मीकाने निर्माण केलेल्या वस्तूंचा, त्याच्या नावाने काही धर्मसंबंधित कल्पित छक्केपजे उत्पन्न केल्याशिवाय आपल्या सर्वांच्या श्रमाप्रमाणे उपभोग घेण्याची सुरवात केल्याबरोबर, एकदर सर्व जगातील मानवप्राण्यात कोणत्याहि तऱ्हेचे निरर्थक कलह उत्पन्न होणार नाहीत व आपण सर्व बहिणभावंडांसारखे वागू लागल्याबरोबर एकंदर सर्व मानवी प्राणी सुखी होऊन साक्षात् निर्मीकाचा अम्मल बसून त्याचे राज्य होणार आहे.