यशवंत जोतीराव फुले. प्र०- मानवी प्राण्यात जातिभेद आहे किंवा नाही?
जोतीराव गोविंदराव फुले. उ०- मानवी प्राण्यात मूळ जातिभेद नाही,
यशवंत प्र० मानवी प्राण्यात मूळ जातिभेद कसा नाहीं?
जोतीराव उ०- पशुपक्षी वगैरे प्रत्येक प्राण्यांत जर जातिभेद नाहीं, तर मानवी प्राण्यांतच जातिभेद कोठून असणार?
यशवंत प्र० मानवी प्राण्यात मूळ जर जातिभेद नाही, तर याविषयी चांगला उलगडा करून सांगाल, तर बरे होईल.
जोतीराव प्र० पशु, पक्षी वगैरे अवयवामध्ये एकमेकापासून सर्व भिन्न भिन्न आहेत. त्याप्रमाणे द्विपाद मानवी प्राणी अवयवामध्ये चतुष्पाद वगैरे प्राण्यापासुन भिन्न आहेत, यास्तव आर्य ब्रह्माजीने फक्त आपल्या अवयवापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा चार जाति उत्पन्न केल्या आहेत, तर मानवतेवर गर्दभ, काक, जंबुक वगैरे प्राणीमात्रात ब्राह्मण कोणते आहेत, हे मला तुझी दाखवू शकाल काय?
यशवंत 30 जंबुक, काक वगैरे मानवतेवर प्राणीमात्रात ब्राह्मण कोणास ह्मणावें असे सिद्ध करिता येणार नाही. कारण आर्य ब्रह्मऋषींसारखेसुद्धा पूर्वी उघड रीतीनें मांसाहारी होते. यावरून पशूपक्ष्यांदिकात जातिभेद आहे. ह्मणून सिद्ध करिता येत नाही. फक्त मानव प्राण्यात ब्रह्माजीच्या अवयवापासून चार जाति मात्र झाल्या आहेत, म्हणून त्यांच्या ग्रंथांतरी आहे.
जोतीराव. प्र० तर मग पशुपक्षी, गर्दभ वगैरे सर्व प्रकारचे प्राणीमात्र चतुराननाच्या कोणत्या अवयवापासून झाले आहेत?
यशवंत उ०-हें सर्व आम्ही आर्यभट्टाच्या ग्रंथाचारावरून बोलतों,
जोतीराव प्र०-आर्यभट्टाचे ग्रंथ आपण स्वतः वाचून पाहून त्याविषयी तुह्मी पक्का शोध केला आहे काय?
यशवंत उ०- नाही. कारण आर्यभट्ट ब्राह्मण ते ग्रंथ आमच्या दृष्टीससुद्धा पडू देत नाहीत व आह्मी जर ते ग्रंथ ऐकण्याविषयी इच्छा दर्शविली. तर आर्यभट्ट ब्राह्मण ते ग्रंथ आह्मास ऐकसुद्धा देत नाहीत.
जोतीराव उ०- तर केवळ भट्ट ब्राह्मणांच्या ग्रंथाविषयी आपण पक्का शोध केल्यावांचून फक्त त्यांच्या तोंडाच्या थापांवरून जातीभेदाचे थोतांड आपण अंधासारिखें डोळे झोकून का मानिता? हा तुमचा शूद्रांचा शुद्ध वेडेपणा होय.
यशवंत प्र-ब्राह्मण ते ब्राह्मण आणि शुद्ध ते शुद्रः किती जरी आपण केले तरी शूद्रांचे ब्राह्मण कसे होऊ शकतील? त्याचप्रमाणे ब्राह्मणाचे शूद्र कसे होऊ शकतील?
जोतीराव उ० का, आर्यब्राह्मणांचे शूद्र जर होऊ शकत नाहीत, तर महामुनी ख्रिस्ताचार्यांच्या बंगल्यात हे भूदेव आर्यब्राह्मण अतिशूद्र मागमहार वगैरे लोकाच्या पक्तीस बसून मद्यपान का करितात व पाव बिस्कुट का खातात? याशिवाय ते म्लेच्छादि अतिशूद्राच्या मुलीबरोबर विवाह करून आपला संसार करीत नाहीत काय? यावरून "ब्राह्मणः सर्वत्र पूज्यः" ह्या वाक्याला प्रथम तुम्ही हरताळ लावा, म्हणजे झाले.
यशवंत प्र०-तर यावरून आपल्या या दुर्दैवी बलिस्थानात जगविरुद्ध धनगर माळी, कुळंबी वगैरे अनेक जाती आहेत, त्या सर्व खोट्या आहेत. काय?
जोतीराव उ०- हे सर्व ह्मणणे विचाराती खोटे ठरेल, असे मला वाटते. जसे कोणी एका पुरुषास तीन मुले आहेत व त्यांपैकी एक मुलाने मेंढरे राखण्यामध्ये आपला सर्व जन्म घालविला, दुसऱ्याने मळ्यामध्ये झाडांची लावणी करून त्यांस खुरपण्यामध्ये आपला सर्व काळ चालविला आणि तिसऱ्याने शेत नागरुन त्यामध्ये पेरणी, काढणी वगैरे तत्संबंधी कामे करण्यात आपले सर्व आयुष्य घालविलें, तर यावरून आपण त्याच्या (पहिल्या मुलाची धनगराची, दुसऱ्याची माळ्याची व तिसऱ्याची कुळव्याची) अशा प्रकारच्या तिघांच्या तीन जाती आहेत, असे ठरवाल काय?
यशवंत उ०- तसे कसे ठरविता येईल?
जोतीराव प्र० त्याजप्रमाणे एका आर्यभट्टास तीन मुले असून त्यापैकी एका मुलाने निर्वाहाकरिता तबलजीचा धंदा करण्यामध्ये आपला सर्व जन्म घालविला, दुसऱ्यानें निर्वाहाकरिता वैद्याचा ( डॉक्टरीचा) धंदा करून सर्व लोकास औषध देऊन, जातीचा विधिनिषेध न पाळिता, काही लोकाची प्रेते फाडण्यामध्ये आपला सर्व जन्म घालविला आणि तिसऱ्याने पोटासाठी घरोघर स्वैपाकी आचाऱ्याचा धंदा करण्यामध्ये आपला सर्व जन्म घालविला, तर यावरून आपण त्याच्या पहिल्या मुलाची मुखाची जात आहे, दुसऱ्याची वैदूची जात, व तिसऱ्याची आचाऱ्याची जात,
असे ठरवाल काय ?
यशवंत उ०- आपण म्हणतो त्याप्रमाणे ठरविता येणार नाही. परंतु या तुमच्या सिद्धांतावरून हालालखोरणीची तरी जात नीच आहे की नाही बरें? कारण ती सर्वकाळ अति अमंगळ धंदा करिते.
जोतीराव प्र० तर यावरून आपल्या उभयतांच्या बालपणी आपला गुमूत करण्याचें नीच काम आपल्या उभयतांच्या मातृश्रीने केलें, यास्तव
त्याजला हालालखोरणीसारखे नीच ठरविता येईल काय?
यशवंत 30- आपल्या उभयतांच्या मातुश्रींनी बालपणी आपला गुमृत काढल्यामुळे त्याजला नीच कोणाच्याने म्हणवेल? असा निर्दय कृतघ्न या पृथ्वीच्या पृष्ठभागावर मला तर कोणीही सापडणार नाहीं; परंतु मानव प्राण्यांत त्यांच्या गुणांवरून जातिभेद ठरविता येणार नाहीं काय? याविषयी तुमचे कसे काय मत आहे? जोतीराव 30 मानव प्राण्यात त्याच्या गुणावरून जातिभेद ठरविता येणार नाही. कारण मानवापैकी कित्येक आपल्या मुलास सुशिक्षण देतात व ती स्वभावेकरून कुशाग्रबुद्धिची असल्यामुळे, सद्गुणी व हुशार निवडून मोठमोठे हुद्दे चालिवण्यालायक होतात व काही लोक आपल्या
मुलास सुशिक्षण देण्याकरिता अतिशय परिश्रम जरी करितात तरी ती स्वभावेवरून जड बुद्धिची असल्यामुळे मूर्ख व दुर्गुणी निवडून ती
हरतऱ्हेचें नीच काम करण्यास प्रवृत्त होतात. यावरून सगुण व दुर्गुण हे काही पिढीजादा स्वभाव नाहीत. कारण सद्गुणी ब्रहस्पतिसारख्या
मानवांची मुलें स्वभावानें कधीं कधीं सद्गुणी निपजत नाहीत, त्याचप्रमाणे धूर्त आर्य भट्टांची मुलें नेहमी शंकराचार्याच्या तोलाची सगुणी
निजपत नाहीत ह्यावरुन अतिशुद्र चांभारांची मुले सद्गुणी निवडल्यास शंकराचार्यांच्या तोलाचे महामुनि होणार नाहीत, असे न्यायी
पुरुषाच्याने म्हणवणार नाही.
यशवंत प्र० तर यावरून या दुर्देवी बलिस्थानात जगविरुद्ध दुष्ट भेदाभेद होऊन ब्राह्मण व मांगमहार यांच्यामध्ये जाति कशा झाल्या, याविषयी आपणच चांगला उल्लेख केल्यास फार बरे होणार आहे..
जोतीराव उ०- एकदर सर्व बलिस्थानातील क्षत्रिय म्हणजे क्षेत्राचे मूळ मालक अस्तिक, पिशाच, राक्षस, अहिर, किकाटस, भिल्ल, कोळी, मांग, महार वगैरे लोक पूर्वी आडहत्याराने लढण्यामध्ये मोठे कुशल असून शूर व प्रतापी होते. त्याचप्रमाणे ते आनंदात मग्न असून सर्व सुखाचा योग्य उपभोग घेत होते. त्यातून बहुतेकांची राज्ये भरभराटीस येऊन त्यांच्या एकंदर सर्व देशांत सोन्याचा धूर निघत होता. इतक्यात इराणी लोकात म्हणजे आर्य लोकांत धनुष्याने बाण मारण्याची नवीन युक्ति निघताच तेथील काही भुभुक्षित असलेल्या धाडस, दंगेखोर, सुवर्णलोभी, इराणी ब्राह्मणांनी, इराणी क्षत्रियांनी व इराणी वैश्यांनी एकत्र होऊन या बलिस्थानास सुवर्णासाठी अनेक वेळा स्वाऱ्या करून येथील मूळच्या सुशील क्षेत्रस्थास अनेक वेळा त्रास दिला व अखेरीस त्यांनी त्यांपैकी कित्येक शूर लोकाच्या अंगाची कातडीसुद्धा सोलून काढिली याविषयी त्याच्या लपवून ठेविलेल्या वेदरूपी बखरीत आधार सापडतो. सारांश, इराण्यांनी येथील बहुतेक मूळच्या क्षेत्रवासी लोकांस पाताळांत म्हणजे अमेरिकेत धुडकावून लाविले व बाकीच्या उरलेल्या क्षेत्रस्थास धिक्काराने (क्षुद्र) शूद्रादि अतिशूद्र दस्यु (लुटारू) अशी हलकी व उपहासास्पद नावे दिली. त्यास नाना प्रकारचा त्रास देऊन आपले पिढीजादा दासानुदास केलें. अखेरीस त्या सर्व शूद्र जातीचा चवथा वर्ग करून इराणी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीनही वर्गात तो सामील केला व बलिस्थानातील मूळच्या क्षत्रियांस म्हणजे शूद्रादि अतिशुद्रांस आर्यानी विद्या देण्याचा प्रतिबंध केला. त्याचप्रमाणे आर्यातील कित्येक पूर्वीच्या धूर्त ऋषीनी शूद्रादि अतिशूद्रानी विद्या शिकू नये, म्हणून ग्रंथांतरी कडक नियम करून ठेविले व हल्ली दगड मातीच्या भिंतीवर स्वार होऊन रेड्यामुखी वेद बोलविणाऱ्या ज्ञानोबा व शिष्याच्या मुखाचा खलबत्ता करून त्याची परिक्षा पहाणाऱ्या रामदास वगैरे मतलबी आर्यभट्ट साधूसतानी पूर्वी केलेल्या धूर्त ऋषींच्या ग्रंथावर भारेचे भारे नवीन ग्रंथ करुन, त्यामध्ये शुद्रादि अतिशूद्रास दास केल्याविषयीचे पांचपेच मुद्दाम उघडकीस न आणितो त्यास नाना प्रकारच्या घातू दगडाच्या मुर्तीवर भाव ठेवावयास शिकवून त्यांस कल्पित ब्रह्मघोळ्यात ढकलून दिले. आणि त्याचप्रमाणे धूर्त आयांनी मागामहाराविषयीं दुष्टाईने कडेकोट व्यवस्था करून ती प्रचारात आणिली. यामुळे त्यांच्यामध्ये आजपर्यंत दुष्ट भेदाभेद जसाचा तसाच कायम राहिला. इतकेंही करून आर्याची तृप्ती न होता, त्यांनी आपल्या सर्वांच्या निर्मीकाची कुकूचकू करून, आपणच स्वतः भूदेव आणि अहंब्रह्म बनून इतर अज्ञानी शूद्रादि अतिशूद्रांस ब्रह्मानंदाच्या नादात वेड्यासारखे टाळ्या वाजवावयास लाविलें..
यशवंत प्र०- एकंदर सर्व अबालवृद्ध ब्राह्मणांची अशी समजूत आहे की. आर्य ब्राह्मण मात्र या बलिस्थानांत आहेत. कारण आर्य परशुरामाने जेव्हां बलिस्थानातील मूळच्या क्षत्रीयांस निःक्षत्रिय केले, तेव्हापासून त्यांचे एकंदर सर्व अधिकार नष्ट झाले व तिसरे म्हणून जे आर्य वैश्य होते, ते आपोआप मुळींच नाहीसे झाले. यावरून हल्ली या बलिस्थानात ब्राम्हण आणि शूद्र नावाला मात्र उरले आहेत, याविषयी तुमचे काय म्हणणे आहे?
जोतीराव 30- आर्य लोकांची ही समजूत खरी आहे. कारण इराणातून आलेल्या आर्य टोळ्यांपैकी काही आर्य पशूयज्ञ करण्याचे कामी चांगले वाकबगार असत; वा धर्मसंबंधीं बाकीचे सर्व विधी चालविणारास ब्राह्मण म्हणत काही आर्य शिपायांचा धंदा करीत असत त्यांस क्षत्रिय म्हणत. आणि काही आर्य गुरे मेंढरे पाळण्याचा धंदा करीत त्यास वैश्य म्हणत. त्याचप्रमाणे या बलिस्थानांतील एकंदर सर्व मूळच्या रहिवासी लोकास क्षेत्रीय म्हणत असत प्रथम आर्य ब्राह्मण, आर्य क्षेत्रीय आणि आर्य वैश्य अशा तीन प्रकारच्या लोकांनी एके ठिकाणी जमून वारंवार या बलिस्थानात स्वाऱ्या केल्या, तेव्हा येथील एकंदर सर्व बलिस्थानातील रहिवासी लोकांचे क्षेत्रावरील स्वामित्व नष्ट केले. नंतर हे तीनहि प्रकारचे इराणी लोक एक विचाराने आपणा सर्वास फक्त ब्राह्मण असे म्हणवून घेऊ लागले व बलिस्थानातील एकंदर सर्व पदच्युत केलेल्या क्षेत्रस्वास धि:काराने शुद्रादि अतिशूद्र म्हणू लागले. कारण इराणी लोक आपल्या शिपायास क्षत्रीय म्हणत परंतु बलिस्थानातील लोक एकदर सर्व प्रजेस क्षत्रिय म्हणत असत सारांश, क्षत्रिय शब्दाचे मूळ दोन अर्थ होत असल्यामुळे धूर्त आर्यास अशा तऱ्हेचा गोंधळ कल्पिता आला.
यशवंत प्र० यावरून आर्य धर्मातील गीतेत आर्य ब्राह्मणांचे स्वाभाविक गुणाचे केलेले वर्णन, केवळ अज्ञानी जनाच्या डोळ्यात माती टाकून त्यास फसविण्याकरिता ते भारूड रचिले असावे. उदाहरण:
शमोदमस्तपः शौच क्षांतिरार्जवमेव च ।।
ज्ञानविज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ।।
असे जर ह्मणावे तर विजयी धाडस धूर्त आर्यभट्ट ब्राह्मणांनी पराभव केलेल्या लाचार शूद्रादि अतिशूद्रांस हा काळापावेतों सर्व कामी हलके मानून, त्यांचा सर्व काळ तिरस्कार का करितात व त्यास एकदर सर्व मानवी हक्कांचा उपभोग घेण्याच्या कामी ते स्वतः आडकाठी का घालतात? यावरून भंड आर्य लोकाचे अंगी क्षमेचा गंधसुद्धा नाही असे सिद्ध होते. असो आपला सर्वाचा निर्माणकर्ता दयेचा सागर व परम न्यायी असता त्याला सर्वोपरी गाजलेल्या शूद्रादि अतिशूद्रांची कीव कशी आली नाहीं ?
जोतीराव उ०- आपल्या सर्वांच्या दयाघन निर्माणकर्त्याने कृपाळू होऊन धूर्त आर्य भट्टाच्या दासत्वापासून पंगू शूद्रादि अतिशूद्रास मुक्त करण्याकरिता आपण सर्वांचा निर्माणकर्ता एक मानून, जातिभेदाचा समूळ नाश करणारे मुसलमान लोकांस या देशात पाठविले; परंतु मुसलमान लोकांनी त्याचे हेतूस धाब्यावर बसवून आपण सर्व प्रकारचे मिष्टान्न खाणे, ख्याली-खुशाली, गाणेबजावणे वगैरे ऐषआरामात लपट झाले व ऐश्वर्याच्या भरात मदांध होऊन त्यांना दोन बोटे आकाश उरले होते. त्यामुळे आपल्या निर्माणकर्त्यास संताप होऊन त्याने या बालीस्थानातील मुसलमान लोकास तोंडघसी पाडून त्यांचे एकंदर सर्व वैभव नष्ट केलें.
यशवंत. प्र० या देशांतील एकंदर सर्व चैनी मुसलमानांचे वैभव नष्ट करून आपला सर्वाचा निर्माणकर्ता उगीच कसा बसला?
जोतीराव 30-तो उगीच बसला नाही, परंतु त्याने प्रत्यक्ष अतिरानटी दशेपासून इंग्लिश लोकास उदयास आणून शौर्यादि गुण त्याचे अंगी देऊन, त्यास पंगु शूद्रादि अतिशूद्रांस आर्यभट्टाच्या दासत्वापासून मुक्त करण्याकरता या देशांत मुद्दाम पाठविले आहे. त्यापैकी काही सज्जन इंग्रज लोक त्याच्या धर्मातील एका सत्पुरुषाच्या सद्बोधावरून शूद्रादि अतिशूद्रांस आर्य भट्टाच्या कृत्रिमी दासत्वापासून मुक्त करण्याचे कामी मनःपूर्वक सतत प्रयत्न करीत आहेत.
यशवंत. प्र० यावरून इंग्लिश लोक आपल्या धर्मातील ज्या सत्पुरुषाच्या सद्बोधाच्या साह्याने पगु शूद्रादि अतिशूद्रांची धूर्त आर्य भट्टाच्या दासत्वापासून सुटका करण्याकरिता झटत आहेत, त्या महासत्पुरुषाचे नाव काय आहे, व त्याविषयी आम्हांस थोडीशी माहिती कळवाल, तर फार बरे होईल.
जोतीराव उ०- त्याच्यातील महासत्पुरुषाचे नाव यशवंत आहे, व त्याचा सद्बोध येणेप्रमाणे- "तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीति करा व त्याचे बरे करा."
यशवंत प्र० या यशवंत महासत्पुरुषाच्या बोधास मान देऊन भंड धूर्त आर्यभट्टांनी शूद्रादि अतिशूद्रास दास करण्याबद्दलचे ग्रंथ एके बाजूला
न ठेविता, जगामध्यें व्यर्थ मृजोरी करू लागल्यास त्यापासून कोणता अनर्थ होईल, याविषयीं तुम्ही काय भविष्य करिता?
जोतीराव उ०- शूद्रादि अतिशुद्रास दास करण्यासंबंधी ग्रंथ जर आर्य धूर्त भट्टानी समूळ नाहीस केले नाहीत, तर ईश्वर परमन्यायी असून सर्व
समर्थ आहे. यास्तव तोच थोड्या दिवसात शूद्रादि अतिशूद्राच्या हातून परस्पर धूर्त आर्यभट्टाचा व त्यांच्या पाखंडी ग्रंथाचा धि:कार करवील,
असे मी भविष्य करितो.
यशवंत प्र० यावरून वेदाचे कर्ते कोणत्या तऱ्हेचे भले गृहस्थ असावेत, याविषयी व त्याच्या चांगुलपणाविषयीं मला थोडा वहीम येतो. यास्तव वेदाविषयीं आपल्यास काही माहिती असल्यास तिचा येथे उल्लेख केल्यास शूद्रादि अतिशूद्रांवर आपले महदुपकार होतील,
जोतीराव 30 बृहस्पति या नांवाचा महाविद्वान् शोधक सज्जन या देशात होता, त्याने वेदाविरुद्ध जे काही लिहिले आहे, त्यातून थोडेसे या प्रसंगी आपल्या माहितीकरिता देतो. ते असे:
"त्रयो वेदस्य कर्तारो भंड धूर्त निशाचरा:"
यशवंत प्र० तर या सर्व गोष्टीवरून हल्लीचे आर्य भट्ट ब्राह्मण इंग्रजीत मोठमोठे विद्वान झाले आहेत व ते मोठमोठ्या सरकारी जोखमीच्या हुद्याच्या जागेचा अधिकार चालविण्यास लायक झाले असून, त्याच्या पूर्वजानी पराजित केलेल्या दीन शूद्रादि अतिशूद्रांच्या जन्मांतराचे मातेरे करून त्यांच्यात जो सर्वस्व ब्रह्मघोळ करून टाकिला आहे. तो समूळ नाहींसा करण्याविषयीं प्रयत्न का करीत नाहीत ? अथवा सर्वाचा निर्माणकर्ता तळहातावर मेखा सोसणाऱ्या धूर्त आयांचे बरे होण्याकरिता, ह्याविषयीं त्यांच्या डोळ्यावरील पडदा काढून त्यांस दोषमुक्त करून त्याजला मार्गावर का आणीत नाहीत?
जोतीराव उ०- एकंदर सर्व सृष्टीक्रमावरून असे सिद्ध होते की, आर्याच्या ऋषीवर्य पूर्वजानी केलेल्या नीच कर्माची फळे जरी त्यास भोगावी लागली नाहीत, तरी त्यांच्या दुष्टकर्माच्या अनुमानाप्रमाणे त्यांच्या संतानांस तरी ती निःसंशय भोगावी लागतील. यावरून हल्लीचे विद्वान आर्य ब्राह्मण शुद्धीवर येऊन त्याविषयी त्यांचे कधीच डोळे उघडणार नाहीत ते आपल्यावरील पुढे येणारी आरिष्टे टाळण्याकरिता धर्म व राजकीय संबंधी अनेक प्रकारचे थोताडी समाज उपस्थित करून, त्यामध्ये अज्ञानी जनाच्या व सरकारच्या डोळ्यात माती टाकण्याकरिता नाना प्रकारच्या चुक्या लढवितील; परंतु त्या त्यांच्या कल्पित युक्त्या शेवटी फूस होतील, कारण आपणा सर्वांचा महापवित्र निर्माणकर्मा आर्य ब्राह्मणाच्या कल्पित काळ्या कृष्णासारखा दह्यादुधाच्या चोऱ्यामाऱ्या करून सोळा सहस्त्र एकशत अष्ट नारीसह गवळ्याच्या भकलेल्या राधेबरोबर लपट होऊन त्यांच्या उशापायथ्याशी लोळत पडणारा नव्हे.
१. त्वचं कृष्णामरंधयत्
पशुपक्ष्यादि वगैरे आणि मानवप्राणी याजमध्ये भेद
बळवंतराव हरी साकवळकर. प्र० निर्माणकर्त्यांनि पशुपक्ष्यादि वगैरे आणि मानवप्राणी याजमध्ये काही भेद केला आहे काय?
जोतीराव गोविंदराव फुले. उ०- निर्मीकाने पशुपक्ष्यादि वगैरे प्राण्यास एक स्वाभावीक खोड दिली आहे. ती जशीची तशीच नेहमी कायम राहून तिच्या योगाने त्यांच्याने आपल्यामध्ये तिळप्राय सुधारणा करून घेता येत नाहीं, परंतु निर्मीकाने मानव प्राण्यास सारासार विचार करण्याची बुद्धि दिली आहे, तिच्या योगाने कालेकरून ते आपल्यामध्ये ज्यास्ति ज्यास्ति सुधारणा करू शकतात.
बळवंत प्र० खोड आणि बुद्धि याविषयी आपण प्रतिपादन जरी केलें तरी मला त्याविषयी काही चांगला बोध झाला नाही. यास्तव त्याविषयी सविस्तर स्पष्टीकरण करून सांगाल, तर बरे होईल.
जोतीराव 30 हजारों वर्षांपूर्वी पाकोळी नांवाच्या पक्ष्यांनी बांधलेली कोठी व त्यांनी हल्ली नवीन बांधलेली कोठीं यामध्यें तिलप्राय सुधारणा झालेली दिसून येत नाहीं. यावरून निर्मीकाने पशुपक्ष्यादि इतर प्राण्यास मानवासारखी सारासार विचार करण्याची बुद्धि मुळीच दिली नाहीं. परंतु त्याचप्रमाणे हजारो वर्षांच्या पूर्वी झाडाच्या ढोलीत राहून निर्वाह करणारे व गुडघेमेटी येऊन हात टेंकून जनावरांसारखे पाणी पिणारे मानव प्राणी व हल्लीच्या सुधारलेल्या काळात मोठमोठ्या हवेल्यात वास करून लोडाशी टेकून रुप्याच्या पंचपात्रीने पाणी पिऊन मजा मारीत असलेले मानवप्राणी, या दोहोंची साम्यता होऊ शकेल काय? यावरून निर्मीकानें मानव प्राण्यांस जी काही अत्युत्तम सारासार विचार करण्याची बुद्धि दिली आहे. तिजपासून त्याला एकंदर सर्व कामी दिवसानुदिवस ज्यास्ती सुधारणा करिता येईल.
बळवंतराव प्र० यावरून पशुपक्षी इत्यादिकामध्ये काहीं विशेष सद्गुण मुळींच नाहींत काय ?
जोतीराव उ० तसे कसे होईल? पशुपक्ष्यादि प्राणी आपल्या पोटापुरती मात्र काळजी करितात; परंतु ते काही मानव प्राण्यासारखे स्वतः उद्योग केल्याशिवाय दुसऱ्यास नाडीत नाहीत व (एके वेळी) लढाईमध्ये अश्वत्थामा हत्ती अगर अश्वत्थामा (मनुष्य) मारला गेला, अशी कडी उठली. तेव्हा आपला मुलगा मारला गेला, असे द्रोणास वाटून तो सत्यवादी धर्मास विचारावयास आला, ते वेळेस कृष्णानें त्याजकडून खोटे बोलवून (त्याच्या गुरुस मारविलें. तेव्हा अशा प्रकारच्या सदा सत्यवादी पुरुषास पापीत ढकलणाऱ्या काळ्या कृष्णास देवबाप्पा मानून, अज्ञानी पंगू मानव बांधवांस त्याविषयीं नाना प्रकारचा भक्तीभाव दाखवून आपण स्वतः साधुसंतांची सोंगें घेतात व त्यास उघड दिवसा धर्ममिषाने राजरोस लुटून त्यांच्या श्रमावर ऐषआराम करून, त्यास धाय धाय करायास लावितात उदाहरण-पशुपक्ष्यामध्ये मानवातील आर्य ऋषींसारखी ईश्वराच्या नावाने धर्मपुस्तकें करून मोठा धार्मिकपणाचा डौल घालून ते आपल्या जातबांधवांस नाडून खातात काय? त्याच्यात खोटे इनसाफ खोटे कागद, खोट्या नोटी, खोट्या साक्षी देणारे थोडे तरी सापडतील काय? सारांश, पशुपक्ष्यादिकामध्ये मानवातील नाना पेशवा व वासुदेव फडक्यासारखे बंडखोर व चोर निवडत नाहीत. यावरून निर्मीकाने मानव प्राण्यांस सारासार विचार करण्याची बुद्धि देऊन त्यास सर्वामध्ये श्रेष्ठ केले असून त्यांनी त्या अमोल्य पवित्र बुद्धीचे काहीच सार्थक केले नाहीं. यास्तव बुद्धिहीन पशुपक्ष्यादि वगैरे प्राणी या लोभी मानवापेक्षा फार श्रेष्ठ आहेत असे मला वाटते.
यशवत प्र० लोभी रावणाविषयी गोष्ट या वेळीं एक बाजूला ठेवा. परंतु सात्वीक एकपनि, एकवचनी, असा रामचंद्राविषयीं एखादी असंभवनीय गोष्ट रामायणीत असल्यास सांगा पाहू
जोतीराव 30-एकपनि, एकवचनी, एकबाणी, रामचंद्रानें अहिमहिच्या स्त्रीस मर्कटद्वारे वचनानें विषयसुखाची थाप देऊन तिच्या पतीचा विश्वासाने घात करविला; परंतु रामचंद्राने आपले वचन पुरे करण्याच्या पूर्वी तिचा पलंग भ्रमराकडून कोरून पोकळ करविला. आणि त्या रांडमुंड भोळ्याबापुडीस दिलेले वचनाचा भंग करून घरी निघून गेला. त्याचप्रमाणे फळे पाला खाऊन शेपटे हालवून चेष्टा करणाऱ्या वानरांचे रामचंद्राने दळ कसे उभे केले? व त्यांपैकी मारुती नावाचा वानर याने सीतेबरोबर भाषण करून अठरा क्षीणी दळभारासह रावणाच्या बागेची रखवाली करणाऱ्या जबमाळी सरदाराचा वृद्धामध्ये मोड़ केला व त्याने आपले पुच्छ वर करून त्यास आपल्या पायाखाली तुडविलें हे समयास अनुसरून त्याने बरें केलें. परंतु हल्ली जंबुमाळी मानव सरदाराच्या हातात नागवी तरवार न देता खुर्पे देऊन जागोजाग मर्कटीच्या दगड धातूच्या मूर्ती करून त्यांवर तेल शेंदूर खरकटून त्यांची आराधना करितात व तसेच कुंभकर्णाचा आहार व निद्रा याविषयी इतिहासकयने बरीच मीठमिरची लावून पाल्हाळ केला आहे. परंतु रावणाचे अंगावर पडलेले, त्याचे उरास चेपणारे धनुष्य सहज हातात धारण करून युद्ध करणारा ब्रह्मराक्षस परशुराम काय काय खात होता, याविषयीं काहीच उल्लेख केला नाहीं, याविषयी इतिहासकर्त्याच्या कारस्थानीचा फार आचबा वाटतो. त्याचप्रमाणे इंद्रजीताचे शीर सुलोचनेच्याच हातावर येऊन कसे पडले? या सर्वावरून रामायणातील एकंदर सर्व इतिहास केवळ माकडचेष्टा असून एखाद्या भंगड मनुष्यानें हैं कल्पनेनें लिहिलें आहे म्हणून सहज सिद्ध करिता येईल यात नीतिचा लव आहे म्हणून आह्मास दाखविता येणार नाहीं.
यशवंत प्र०- आता भागवतातील एकंदर सर्व गोष्टी असंभवनीय आहेत; त्या सर्वांविषयी येथे थोडासा उल्लेख करून दाखवाल, तर बरे होईल.
जोतीराव उ०- भागवतातील एकदर सर्व गोष्टी असंभवनीय आहेत; त्यापैकी तुमच्या माहितीस्तव, नमुन्यासाठी काही गोष्टीचा येथे उल्लेख करून दाखवितो. अतिशय तामसी, गळ्यांत रुडमाळा धारण करणाऱ्या शिवाच्या प्रसादेकरून दुदुभी नावाच्या राक्षसाला मनुष्यांची शंभर, हत्तीची शंभर आणि घोड्याची शंभर अशी तीनशे मुखे असून त्यास हजार हात व दोन पाय मात्र होते. तर यावरून दुदभी नांवाच्या राक्षसाच्या शरीराचे रचनेविषयी विचार केला असता रावणाविषयी काहीच अचवा वाटत नाही. एके वेळी गोकुळात अतिशय पर्जन्यवृष्टि होऊ लागल्यामुळे एकंदर सर्व गोपाळासह गावचे लोक गर्भगळीत होऊन भयाभीत झाले व त्या सर्वास अद्भुत चमत्कार करून दाखविण्याकरिता अवतारी देवबापा कृष्णाजीने (मारुती माकडासारखा द्रोणागिरी) गोवर्धन पर्वत उचलून त्यात आपल्या हाताच्या करंगळीवर घेऊन सर्व लोकाचा बचाव केला. त्याचप्रमाणे यमुनेच्या डोहात बुडी मारून काळिया सर्पाचा पराभव केला, आणि आपण यशस्वी होऊन त्याचे पाठीवर उभा राहून मोठ्या शेखीने तोंडाने पुगी वाजवीत वाजवीत डोहाच्या बाहेर निघाला, या सर्व असंभवनीय गोष्टी कोणाच्याने खऱ्या ह्मणवतील?.
यशवंत प्र०-भागवतातील एकंदर सर्व गोष्टी आपल्या सर्वाच्या निर्मीकाच्या नावाला बट्टा जाणण्यासारख्या आहेत, त्या सर्वाविषयी इत्यंभूत वर्णन केल्यास सर्व लोकांचे डोळे उघडणार आहेत.
जोतीराव उ०- प्रथम दुदुभी नावाच्या राक्षसाच्या घरीं कृष्णाने (डेंगू वामनासारखें) ब्राह्मणाचे थेट सोग घेऊन त्याचा निर्दयपणे कपटाने वध केला, हे आपल्या सर्वांच्या परम दयाळू निर्मीकाच्या नावाला शोभेल काय? यावरून इतर मानवी धर्मातील लोकापेक्षा एकदर सर्व आर्याच्या धर्मातील ब्राह्मण लोक इतर अज्ञानी जनाबरोबर ठकबाज्या करण्याचा विधिनिषेध मानीत नाहीत. दुसरे असे की, कृष्णाजीने आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या घरातील दुध, दही व लोणी चोरून खाल्ले. आता हा चोरी करण्याचा धंदा आपल्या परम न्यायी निर्मीकाच्या नावाला शोभेल काय? यावरून इतर धर्मातील लोकांपेक्षा आर्यभट्ट ब्राह्मणास चोऱ्यामाऱ्या करून लाच खाण्याचा विधिनिषेध वाटत नाही तिसरे असे आहे की, त्यावेळच्या रुबीप्रमाणे गवळ्यांच्या स्त्रिया नग्न होऊन नदीत स्नान करीत असतो अति चावट कृष्णाजीने त्या सर्वांची, भामट्यासारखी, लुगडी व चोळ्या बगलेत मारून कदंब वृक्षावर बसून त्या सर्वाची निर्लज्जपणे मोठ्या हौसेने मजा पाहात बसला आता हा निर्लज्जपणा आपल्या परम पवित्र निर्मीकाच्या नावाला शोभेल काय? यावरून इतर धर्मातील लोकापेक्षा एकंदर सर्व आर्यभट्ट ब्राह्मणास स्त्रियांबरोबर उद्धटपणा करून त्यांची अमर्यादा करण्याचा विधिनिषेध वाटत नाही. चवथें असें की. कृष्णाजीस जरी सोळा सहस्त्र एकशत अष्ट नारी होत्या, तरी गवळ्याच्या राधा स्त्रीवर लपट होऊन तिचे मन भ्रष्ट केलें हें त्याचें व्यभिचाराचे कृत्य आपल्या परम नीतिमान् निर्मीकाच्या नावाला शोभेल काय? यावरून इतर धर्मातील लोकांपेक्षा एकंदर सर्व आर्यभट्ट ब्राह्मणांतील वेदवेत्ते शास्त्रीपंडीतास वैसवारांडांचे गाणे बजावणे ऐकण्याचा व व्यभिचाराचा बिलकुल विधिनिषेध वाटत नाहीं याशिवाय सर्व दुर्गुणसंपन्न अष्टपैलू देव अवतारी कृष्णाजीने अनेक वेळा लबाडीने नाना प्रकारच्या ठकबाजा करून लोकांच्या प्राणास भवला व आपल्या सख्या कंसमामा दैत्याचा वध केला, या सर्वांवरून सर्वोपरी काळ्या रंगाच्या कृष्णाजीने अर्जुनास गीतेमध्ये उपदेश केला आणि त्यास त्याने नीतिचा काय उजेड पाडला असेल तो असो जसे:-
"लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण
यशवंत. प्र०- कृष्णाजी जर देव जातीचा होता, तर त्याच्या सख्या मामाची दैत्याची अवलाद कशी झाली? या सर्वावरून माझ्या मते इसापनीति फार बरी दिसते. याविषयी तुमचे काय मत आहे?
जोतीराव 30- धूर्त आर्यभट्टाच्या बोलण्यात व लिहिण्यात काहीच धरबंद नाही ते आपल्या मतलबासाठी पाहिजेल ते करतील आणि वेळेस आपल्या सर्वांच्या निर्मीकाची सुद्धा कुकूच करून आपण स्वतः वेदांती अब्रह्म बनून खासे भूदेव होऊन बसण्यास चुकत नाहीत.. इसापनीतीत कोल्ह्याकुत्र्याविषयी कल्पित गोष्टी ऐकून मानव प्राणी सुनीतिमान होतो. परंतु रामायण व भगवतातील कल्पित माकडासहि दुभीसारख्या विचित्र प्राण्यांविषयी गोष्टी ऐकून मानवप्राणी कुनितीच्या ठिकाणीं रत मात्र होतात. आणि आपल्या अज्ञानी शूद्रादि अतिशूद्रांच्या मुलास सुशिक्षण देण्याकरिता शाळा बांधण्याच्या कामी खर्च न करिती, वाई, बनारस, प्रयाग, नाशिक वगैरे ठिकाणी राम-कृष्णांची देवालयें बाधण्यांत अतोनात खर्च करितात. याला कोणीतरी नीति ह्यणेल काय? शूद्रापासून व अतिशूद्रांपासून कराचा पैसा लोकहिताकडे खर्च करण्याच्या ऐवजी आपल्या कामाकडे व रामकृष्णांची देवालये बांधण्याकडे खर्च करीत असत. आता हा एवढा अनर्थ कशावरून हाणाल तर भागवत व रामायण यावरूनच होय, हें सूक्ष्म विचरांती सहज कळून येईल.
यशवंत. प्र० यावरून एकदर सर्व जगात नीतीचे आचरण करणारे कोणीच नाहीत काय?
जोतीराव उ०- असे कसें ह्मणतोस? महंमदी धर्मात नीतीनें आचरण करून आपल्या निर्मीकास संतोष देणारे बहुतेक आहेत.
यशवंत. प्र० एकंदर सर्व मुसलमान लोकानी तर कित्येक मूर्तीपूजक लोकाच्या जुलमानें सुंता करून त्यांस बाटीवले ह्मणूनच धूर्त आर्य भट्टाच्या हेवेखोर ग्रंथात लेख सापडतो, तो येणेप्रमाणे "न नीचो यवनात्परः" व मुसलमान लोकांचे कुराण समजू नये. ह्मणून त्यांनी एक शास्त्र मानून नियम करून टाकिला तो असा "न वदेद्यावनी भाषा कष्टे प्राणगते अपि "
जोतीराव 30- कृत्रिमी आर्य भूदेव नटाच्या अपमतलबी बनावट धर्माच्या पाशांत सोपडलेल्या बहुतेक अज्ञानी मूर्तीपूजकाचे कल्याण होण्यासाठी कित्येक धार्मीक जाहामर्द मुसलमानांनी आपल्या हातावर शिंरे घेऊन तलवारीच्या जोराने त्यांनी आपल्यासारख्या त्यांच्या सुता करून त्यास "बिसमिल्ला हिर रहिमान् निर्रहिम" असा महापवित्र कलमा पढवितात व त्यास आपल्या सर्वाच्या सरळ सत्य धर्ममार्गावर नेतात, कारण महंमदी लोकाच्या पवित्र कुराणांत एकंदर सर्व प्राणीमात्रांचा निर्माणकर्ता खुद्द खासा एक आहे आणि याच कारणामुळे त्यास ख़ुदा म्हणतात व त्या खदानें निर्माण केलेल्या मानवांस एकमेक भावंडांप्रमाणे मानितात. त्याचप्रमाणे एकदर सर्व मानवांस त्यांचे पवित्र कुराण वाचून पाहण्याची व त्याचप्रमाणे आचरण करण्याची मोकळीक आहे, तसेच ते सर्वास आपल्या बरोबरीचे हक्क देऊन त्याजबरोबर रोटी व बेटी व्यवहार सुरू करण्याची मोकळीक देतात, आणि अखेरीस त्या सर्वांस आपल्या सर्वांच्या खुद्द निर्मीकाचे आभार मानण्याकरिता महिझीतीत आपल्याबरोबर घेऊन बसतात,
यशवंत. प्र०- एकंदर सर्व मानवानी एकमेकास भावंडासारखे मानून त्याप्रमाणे आचरण करावे म्हणून त्यांच्या पवित्र कुराणांत जर लेख आहे. तर त्याचप्रमाणे आर्याचे अथर्व वेदांतसुद्धा तसल्या प्रकारचा श्लोक आहे, तो पुढे देतो.