मामलेदार, कलेक्टर, रेव्हिन्यु, जज्ज आणि इंजिनियरखात्यातील भट कामगार, इत्यादिकाविषयी
धो०-यावरून भट मामलेदार असल्यामुळे ते काही अज्ञानी शूद्रांचे नुकसान करितात काय?
जो०- आजपर्यंत जे भट मामलेदार झाले त्यापैकी कित्येक आपल्या वाईट आचरणामुळे सरकारचे गुन्हेगार ठरून सजेस प्राप्त झाले. ते आपले काम करीत असता इतके कुनीतीनें वागत व गरीबगुरीब लोकावर जुलूम करीत की, त्याचा एक ग्रंथ होईल. अरे, या पुण्यासारख्या शहरात भटमामलेदार, कुळकर्ण्यापासून आणलेली लायकी दाखविल्याशिवाय मोठमोठ्या सावकारांचीदेखील हमी कबूल करीत नाहीत; मग तेथे गरीबगुराबांची दाद कोतून लागणार! अरे, हे कुळकर्णी ते लायकी तिकीट देताना आपला देव्हारा घुमवित नसतील काय? त्याचप्रमाणे या शहरची म्युनिसिपालिटी, कोणी एकाद्या घरवाल्यास त्याच्या जुन्या शेतखान्याच्या जाग्यावर नवा शेतखाना, भट मामलेदाराच्या द्वारे त्या पेठेच्या कुळकर्ण्याचा अभिप्राय पाहिल्याशिवाय बांध देत नाही. अरे, त्या कुळकर्ण्याजवळ त्याच्या पेठेचा नकाशा असून, ज्यात एकंदर सर्व नवी खरेदी करणारांची नावे सामील करून साल दरसाल त्याची प्रत मामलेदाराच्या दप्तरी दाखल्याकरिता ठेवण्याची चाल नसून, कुळकर्ण्याचा त्या जाग्याविषयी अभिप्राय खरा तरी कशावरून समजावा? या सर्व कारणावरून असा संशय येतो की, भट मामलेदाराने आपल्या जातीच्या कलमकसायाचे काही तरी त्यात हीत व्हावे, म्हणून ही वहिवाट चालू ठेविली असावी. यावरून तूच विचार करून पहा की, अशा युरोपियन लोकांच्या वस्तिशेजारच्या पुणे शहरांत भटमामलेदार जर अशी झोटिंगबादशाई करून आपल्या जातीच्या कलमकसायांची पोळी पिकवितात, तर खेड्यापाड्यांत त्यांचा काय जुलूम असेल बरे? असें जर नाही म्हणावे तर आपण बहुतेक खेड्यापाड्यांतील अज्ञानी शूद्रांच्या झुंडी बगलेत दप्तरें मारून भटकामगारांच्या नावाने हकल्या मारून भटकत फिरताना पहातो, त्या सर्वच खोट्या असतील काय? त्यातून कोणी ह्मणतो, भट कुळकर्ण्याच्या खटपटीमुळे भटमामलेदाराने माझी अर्जी वेळेस घेतलीच नाही, सबब प्रतिवादीने माझे सर्व साक्षीदार फोड्न उलटा मजजवळूनच फैल जामीन घेवविला कोणी म्हणतो, भटमामलेदाराने माझी अर्जी घेऊन हा काळापावेतो दाबून ठेवून प्रतिवादीची मात्र अर्जी दुसरे दिवशी घेऊन, त्याच्याकडून माझ्या चालत्या वहिवाटीस खो घालून मला असे भिकारी केले. कोणी म्हणतो, भटमामलेदाराने मी बोलल्याप्रमाणे माझी जबानी लिहिलीच नाही आणि पुढे त्याच जबानीवरून माझ्या सर्व तंत्र्याचा असा गोंधळ करून टाकिला की. आता मला वेड लागण्याची वेळ आली आहे. कोणी म्हणतो, माझ्या प्रतिवादीने भटमामलेदाराच्या सूत्राने माझ्या चालत्या वहिवाटीस लाथ मारून त्याने माझे शेतात आपल्या पाभारी घातल्याबरोबर मी त्या भटमामलेदाराकडे जाऊन त्यास मोठ्या नम्रतेने जमिनीस हात लावून मुजरा केला व त्याच्याशी एक चकार शब्द न बोलता फक्त त्याच्या हातात माझी अर्जी देऊन मी तसाच चार पाँच पाउलें हटून आपले दोन्ही हात जोडून त्याच्यासमोर दीन वदन करून थरथर कापत उभा राहिलो, इतक्यात त्या यमाने माझ्याकडे खालवर पाहून लागलीच ती अर्जी माझ्या आगावर फेकून देऊन मी कोडताची बेअदबी केली अशा कारणावरून उलटा त्याने मलाच दढ केला. तो दंड मला देण्याची ऐपत नसल्यामुळे मला काही दिवस कैदेत रहावे लागले. इकडेस प्रतिवादीने माझे नांगरून डोंगरून वजीवलेले शेत पेरुन आपल्या ताब्यात घेतल्यामुळे म्या कलेक्टरसाहेबास दोनतीन अर्ज्या केल्या; परंतु त्या सर्व अर्ध्या तेथील भटचिटणिसाने कोणीकडेस दाबून टाकिल्या आहेत त्यांचा थांगच लागत नाही, याला करावे तरी काय? कोणी म्हणती, भटचिटणिसाने माझा अर्ज कलेक्टरास वाचून दाखवितेवेळी त्यातील मुख्य मारु कलम गाळून त्याजकडून भटमामलेदाराने केलेला निकाल कायम करविला कोणी म्हणतो. माझ्या अर्जावरून कलेक्टराने आपल्या मुख जबानीने लिहिण्यास सांगितलेल्या हुकुमाविरुद्ध तेथील भटचिटणिसाने मजकूर लिहून, वाचताना मात्र कलेक्टरास त्याच्या सांगण्याप्रमाणे अक्षरक्षः वाचून दाखवून निकालावर त्याची सही घेऊन, तो निकाल जेव्हा मला मामलेदाराच्या मार्फत मिळाला. तेव्हा मी आपल्या कपाळावर हात मारून म्हणालो की, हे ब्राम्हणकामगार आपला पण सिद्धीस नेल्याशिवाय उगीच बसत नाहीत कोणी म्हणतो, माझी जेव्हा कलेक्टरसाहेबांजवळ दाद लागेना, तेव्हां म्या रेव्हिन्युसाहेबाकडे दोन तीन अर्ज पाठविले; परंतु ते सर्व माझे अर्ज तेथील भटकामगारांनी खटपट करून त्या साहेबाकडून पुनः कलेक्टराच्याच अभिप्रायाकरिता परत पाठविले. नंतर कलेक्टराचे भट कामगारांनी माझे सर्व कागद उलटेपालटे करून कलेक्टरसाहेबास वाचून दाखवून मी मोठा तकरारी आहे म्हणून माझ्या अर्जाच्या पाठीवर त्याजकडून अभिप्राय देववून रेव्हिन्यसाहेबाची समजूत काढली. आता येथे करणाराने करावे तरी काय! कोणी म्हणतो, जज्जसाहेबाने मात्र माझा खटला सुरू होताच, त्याच्या शिरस्तेदाराने मध्ये कोठें तोड़ घातल्याबरोबर तो साहेब म्हणाला, "चूप, मध्ये बोलू नको." नंतर त्याने माझे कागद स्वतः वाचून पाहिले; परंतु त्या कागदाला तो काय करील बापुडा! कारण पूर्वीच्या एकंदर सर्व कलेक्टर कचेरीतील भटांनी, कुळकर्ण्याच्या सूचनेप्रमाणे माझ्या सर्व खटल्याचे स्वरूपच बदलून टाकिले होते कोणी म्हणतो, आजपावेतो एकंदर सर्व भट कामगारांच्या देवपुजेच्या खोलीतील ठरावाप्रमाणे त्याची घरे भरिता भरिता माझी घरे गेली, दारे गेली, शेते गेली, पोती गेली, आणि माझ्या घरातील सर्व चीजवस्ता जाऊन बायकोच्या अंगावर फुटका मणीसुद्धा राहिला नाही. शेवटी आम्ही सर्व तडाडा उपाशी मरू लागलो तेव्हा माझ्या धाकट्या भावडांनी वाऱ्याचा धंदा पत्करून ते सडकेच्या कामावर टोपली वाहण्यास जाऊ लागले. तेथेही सर्व भटजीसाहेब काडीच्या कामाला हात न लाविती, (फक्त दररोज सकाळी व संध्याकाळी एकदा फैलावर जाऊन हजिरी घेतल्याबरोबर भलत्या एखाद्या महाठी वर्तमानपत्रातील इंग्रज सरकारची अथवा त्यांच्या धर्माची निंदा केली असेल त्याचा गोषवारा जाता जाता बिगाऱ्यांस सांगून बिन्हाडी परत जातात व त्याबद्दल सरकारही त्यास बिगाऱ्यापेक्षा ज्यास्ती दुपटीच्यावर पगार देत असून एकाद्या बिगाऱ्याने पगार झाल्याबरोबर त्याची मुठ गार केली नाही की, लागलीच ते दुसऱ्या दिवसापासून आपल्या वरच्या साहेबास त्या बिगाऱ्याविषयी नाना तऱ्हेच्या चाहड्या सांगून त्यांचे खाडे मोडतात. इतकेच नव्हे, परंतु कोणी भटजी त्यास म्हणतो. अरे, तू सरकारी काम संभाळून पत्रावळीकरिता वडाची पाने व थोडेसे भेंड संध्याकाळी घरी येताना माझ्या बिन्हाड आणून टाक. कोणी म्हणतो, त्या आंब्याची फांदी तोडून रात्री माझ्या बिन्हाडी आणून टाक. कोणी म्हणतो, तिरगुळाची नजर चुकवून मला थोडीशी पाने आणून दे. कोणी म्हणतो, आज रात्री गावात मी त्या देवघेव करणाऱ्या बोडकीच्या घरी फराळास जाणार आहे. यास्तव तू आपली भाकर खाल्याबरोबर माझे बिऱ्हाडी येऊन माझ्या कुटुंबास सर्व रात्र सोबत देऊन तेथेच निजून रहा, परंतु दुसरे दिवशी फैलावर हजर रहाण्यास चुक नको, कारण उद्या संध्याकाळीच थोरले इंजिनियरसाहेब आपले काम पहाण्याकरिता येथे येणार आहेत म्हणून रावसाहेबांनी
• लिहून पाठविले आहे. असे नाना तऱ्हेचे भटांचे आतले त्रास मला माझे भाऊ घरी गेल्याबरोबर सांगून खळाखळा डोळ्यातून पाणी गाळतात. काय करू हो दादा, हे सर्व भटजी अठरा वर्णाचे गुरु पडले, यांनी कसेही आचरण केलें, तथापि शूद्राने त्याचा तोडानें उच्चार करू नये, असे आपली शास्त्रे बोंबलतात. माझा उपाय खुंटला नाही तर म्या कधीच इंग्रजी बोलावयास शिकून एकंदर सर्व ब्राह्मणांच्या ठकबाजा साहेबलोकास सांगून त्यांच्याकडून या गुलामांच्या खोडी मोडल्या असत्या याखेरीज एकंदर सर्व इंजिनियर खात्यातील भटकामगारांच्या लुच्चेगिया कंत्राटदार लोक हत्क्या सांगतात की, त्याचा एक स्वतंत्र ग्रंथच होईल, यास्तव तूर्त त्याविषयीं पुरे करितों, सारांश वर लिहिलेल्या गान्हाण्यांपैकी काहीं खरें असल्यास त्याजविषयीं बारीक शोध ठेवून त्याचा बंदोबस्त करणे हा आमच्या सरकारचा धर्म होय.
१. याजविषयी या पुस्तकाचे शेवटी इंजिनियरखात्यावर जो पवाडा लिहिला तो पहा
युरोपियन कामगारांचा निरुपाय, खोतांचे वर्चस्व, पेन्शन घेऊन निर्वेध झालेल्या युरोपियन कामगारांनी सरकारांत गांवोगावच्या हकीगती कळविण्याची जरुरी, धर्म आणि जात्याभिमान इत्यादिकाविषयी
धो०- असे जर अनर्थ एकंदर सर्व खात्यांत भटकामगारांचा भरणा असल्यामुळे घडून येत असतील, तर युरोपियन कलेक्टर काय करून असतात? ते या सर्व ब्राम्हणांच्या लुच्चेगिऱ्याविषयी सरकारास रिपोर्ट का करीत नाहीत?
जो०- अरे, या भटकामगारांच्या कसबामुळे त्यांच्या टेबलावर इतकें काम साचलें असतें की, त्यापैकी कित्येक जरूरीच्या कामाचा निकाल करून फक्त मराठी कागदावर सह्या करिता करिता त्याच्या नाकास नळ येतात. त्या बिचाऱ्यांनी या सर्व अनार्थीचा पक्का शोध काढून त्याविषयीं सरकारास रिपोर्ट तरी केव्हा करावे? इतकेही असून मी असे ऐकतों की, कोंकणातील बहुतेक दयाळू युरोपियन कलेक्टरानी अज्ञानी शूद्रांवरचे भट खोतांचे जुलूम नाहींसे करावेत, म्हणून त्यांनी अज्ञानी शूद्रांबद्दल स्वतः खोतभटजीचे प्रतिवादी होऊन ते सरकारात त्याविषयी खटपट सुरू करीत आहेत इतक्यात एकंदर सर्व भट खोतानी अमेरिकन स्लेव्ह होल्डरचा कित्ता घेऊन आपल्या मतलबी धर्माच्या साह्याने अज्ञानी शूद्रास सरकारच्या उलट उपदेश केल्यामुळे, बहुतेक अज्ञानी शुद्रांनी उलट्या युरोपियन कलेक्टरांवर कबरा बांधून सरकारास असे म्हणाले की, आम्हावर जो खोतभटजींचा अधिकार आहे तो तसाच राहू द्यावा, येथे मात्र खोतभटजीनी सैत नासारिखें अज्ञानी शूद्रांस हातात घेऊन आपल्या भोळ्या सरकारास अज्ञानी शूद्रांच्या मतरूप शहास गुंतवून, त्या परोपकारी युरोपियन कलेक्टरावर कशी प्यादेमात करण्याची वेळ आणली आहे. ती पहा..
घो०- असें जर अज्ञानी शूद्र भटांच्या उपदेशावरून आपले चहूंकडून नुकसान करून घेतात, तर यावरून पुढें एकाद्या काळी त्यांनी भटांचे ऐकून सरकारच्या टोपीवर धप्पा मारण्याकरिता आपले हात उचलल्याबरोबर त्यांचे केव्हढे नुकसान होणार आहे? कारण शूद्रास भटाच्या दास्यत्वापासून मुक्त होण्याची अशी संधी पुनः येणे फारच कठीण. यास्तव शूद्रांच्या हातून असे अनर्थ घडून येऊ नयेत, म्हणून तुम्हास काहीं उपाय सुचत असल्यास, अज्ञानी शूद्रांस सांगून तर फळच नाहीं, परंतु आपल्या दयाळू सरकारास एकदा तरी कळवून पहा. याउपर शूद्रांच्या कंबखतीने डेरेच दिले असल्यास त्याला तुम्ही तरी काय कराल?
जो०-याला उपाय आपल्या दयाळू सरकारने प्रथम भट समाजाच्या संख्याप्रमाणाने एकंदर सर्व खात्यांत भटकामगार नेमू नयेत, असे माझे मत नाहीं परंतु त्याच प्रमाणाने बाकी सर्व जातीचे कामगार नच मिळाल्यास सरकारने त्याऐवजी फक्त युरोपियन कामगार नेमावेत म्हणजे एकंदर सर्व भटकामगारास सरकारसहीत अज्ञानी शूद्राचे इतकें नुकसान करता येणार नाही. दुसरे असे की, सरकाराने फक्त ज्या ज्या (युरोपियन कलेक्टरास माहाराष्ट्र भाषा स्वच्छ बोलता येत असेल, त्या सर्वांस तहातभर पेनशनी देऊन त्यास येथेच सर्व खेड्यापाड्यातून अज्ञानी भेकड बाहुल्या शूद्रात मिसळून रहाते करून, त्यांजकडून एकंदर सर्व भटकुळकर्णी वगैरे कामगारांच्या कसबावर चांगली बारीक नजर ठेवावी आणि त्याजकडून हमेशा तेथील एकंदर सर्व कच्च्या हकीगतीवर रिपोर्ट मागवू लागल्याबरोबर त्यापासून एकदर सरकारी शाळाखात्यातील भटांच्या गुलाबी लबाड्या उघडकीस येऊन थोड्याच दिवसांत एकदर सर्व शाळाखात्यातील जी काही अव्यवस्था झाली आहे. तिचा बंदोबस्त होऊन एकंदर सर्व अज्ञानी गांजलेल्या शूद्रास खरे ज्ञान झाल्याबरोबर ते या भटांच्या कुतर्की अधिकाराचा धिकार करून आपल्या राणीसरकारचे उपकार कधी कधी विसरणार नाहीत अशी माझी प्रतिज्ञा आहे. कारण आम्ही शूद्रांच्या गळ्यांतील दास्यत्वाच्या पट्ट्याचा घट्टा जलदी कोणाच्याने घासून काढवणार नाही.
धो०-तर मग तुम्ही लहानपणी दांडपट्ट्याची आणि गोळी निशाण मारण्याची कसरत कशाकरिता करीत होता?
जो०- आपल्या दयाळू इंग्रजसरकारास पालथे घालण्याकरिता.
धो०- परंतु तुम्ही असली दुष्ट मसलत कौतून शिकला?
जो०-चार सुधारल्या भट विद्वानांपासून ते याचे कारण (परंतु घरात चुलीजवळ) असे देतात की, आपल्यातील बहुतेक जातींचे लोक आपल्या अनादिसिद्ध धर्माविषयीं अज्ञानी असल्यामुळे, आपले सर्व लोकातील एकी नाहीशी झाली व त्याच्या योगाने आपल्यामध्ये असे नाना प्रकारचे जातिभेद होऊन आपली अशी फुटाफुट झाल्यामुळे इंग्रजांच्या हाती आपले राज्य लागले व ते आता आपल्या अज्ञानी धर्मभोळ्या लोकातील बहुतेक लोकांचा देशाभिमान नाहीसा व्हावा म्हणून ते आपल्या मतलबी धर्माचा आधार त्यांस दाखवून त्यांस आपले गुरुबंधु करीत आहेत. यास्तव आपण सर्व जातीच्या लोकांची एकी झाल्याशिवाय या लोकांस आपल्या देशांतून एकदम हकून देण्याची आपल्यास ताकद येणार नाही. आणि तसे केल्याशिवाय आपण सर्व लोकास आपल्या अनादिसिद्ध धर्मात थोडासा फेरफार करून, आपली सर्वाची चागली एकी केल्याशिवाय आपल्यास अमेरिकन, फ्रेंच आणि रशियन लोकांची बरोबरी करिता येणार नाही, असे त्यांनी मला टॉम्स पेन वगैरे ग्रंथकारांच्या पुस्तकातील कित्येक वाक्यांच्या आधाराने सिद्ध करून दाखविले. यावरून मी तसले वेडेचार काही दिवस माझ्या लहाणपणी करीत होतो; परंतु पुढे मी जेव्हा त्याच ग्रंथावरून बारीक विचार करून पाहू लागलों, तेव्हा या सुधारल्या भटांच्या मतलबी मसलतींचा खरा अर्थ माझ्या ध्यानात आला. तो असा की, आम्ही सर्व शूद्र इंग्रज लोकाचे गुरुबंधु झाल्याबरोबर त्यांच्या एकदर पूर्वजाच्या कृत्रिमी ग्रथाचा धिक्कार करू आणि तेणेकरून त्याच्या जात्याभिमानाच्या तोंडात माती पडून त्यांच्यातील तूर्त प्रत्येक ऐदी लोकांस आम्हा शूद्रांच्या श्रमाच्या पोळ्या ऐत्या खावयास मिळणार नाहीत व ब्रम्ह्याच्या बापाच्याने सुद्धा असें म्हणवणार नाहीं की, शूद्रापेक्षा भट उंच. अरे, ज्या लोकांच्या मूळ पूर्वजातून देशाभिमान हा शब्द मुळींच ठाऊक नव्हता, मग त्या लोकांनी त्या शब्दाचा असा अर्थ केला म्हणोन त्याचे फारसे आश्चर्य मानू नये. कारण इंग्रज लोकानी मुळीच तो बळीराजा येण्यापूर्वी देशाभिमान ग्रीक लोकाच्या शाळेत शिकले; परंतु पुढे जेव्हा ते त्या बळीचे मतानुयायी झाले, तेव्हा त्याच्यामध्ये तो सद्गुण इतका वाढला की, त्याची बरोबरी दुसऱ्या कोणत्याही धर्मातील स्वदेशाभिमान्याच्याने करवत नाही. पाहिजे असल्यास त्यांनी आपल्यातून अमेरिकेतील बळीचे मतानुयायी जॉर्ज वासिंगटनची जोड द्यावी. कदाचित् त्यांच्याने अशा महापुरुषाची जोड देववतच नसल्यास त्यांनी फ्रान्सोतील बळीचे मतानुयायी लफेटेची तरी जोड द्यावी म्हणजे त्यांस कोणी कुतर्की म्हणणार नाहीत. अरे, या सुधारल्या विद्वानाच्या पूर्वजास स्वदेशाभिमान जर खरोखर ठाऊक असता, तर त्यांनी आपल्या पुस्तकांत आपल्या देशबंधू शुद्रास पशुपेक्षी नीच मानण्याजोगे लेख करून ठेविलेच नसते ते विष्ठा खाणाऱ्या पशूचा गोमूत्र पिऊन पवित्र होतात; परंतु ते शूद्राचे हातचें स्वच्छ कारंजाचें पाणी पिण्यास अपवित्र मानितात बरें, या सुधारल्या विद्वानांच्या पुर्वजांनी ग्रिशियन लोकांच्या पवित्र देशाभिमानाविरुद्ध उपस्थित केलेला अपवित्र देशाभिमान आपल्यास कोणाच्या प्रतापाने समजला? इंग्रज लोकांच्या, आणि तसल्या परोपकारी लोकांस म्हणजे आपल्यास भटांच्या दास्यत्वापासून मुक्त करणाऱ्या लोकांस, आपल्या देशांतून हाकून देण्याविषयी त्या विद्वानाची मसलत कोणाच्याने घेववेल? असा कोण मूर्ख आहे की, ज्याच्याने आपल्या तारण्यावर आपला हात उगारवेल? परंतु मी तुला सांगतो की, इंग्रज लोक आज आहेत. उद्या नाहीत ते आपल्या जन्मास परवतील म्हणोन कोणाच्याने खास करून सांगवत नाही यास्तव त्या लोकांचे राज्य या देशांत आहे. तोच आपण सर्व शूद्रांनी जलदी करून भटांच्या वडिलोपार्जित दास्यत्वापासून मुक्त व्हावे, यामध्ये मोठा शहाणपणा आहे. देवाजीने एकदा शुद्रांवर दया करून इंग्रज बहादराच्या हातून भटनानाचे बंड मोडविलें म्हणोन बरें झालें नाहीं तर त्या शादावलाच्या पुढल्या लिंगापुढे रुद्र करणाऱ्या सुधारल्या भटानी आजपावेतों कित्येक महारास एकेरी धोतर नेसल्यामुळे अथवा कीर्तनामध्ये संस्कृत श्लोकाच्या उच्चार केल्यामुळे काळे पाणी दाखविले असते.