वेदमंत्र, जादूचे वजन, मूठ मारणे, देव्हारे घुमविणे, जप, चार वेद, ब्रम्हघोळ, नारदशाई, नवीन ग्रंथ, शूद्रांस ज्ञान देण्याची बंदी, भागवत व मनुसंहिता यांचा असंगतपणा, इत्यादिकाविषयी.
धो०- तुम्ही खुटीस नागर बराच लावला बरे! तुमच्या म्हणण्याप्रमाणे परशुराम मेला व त्याची मातीस माती मिळाली, असे का होईना परंतु
बाकीच्या सर्व क्षेत्रपतीच्या मनावर ब्राह्मणांच्या मंत्राचे वजन कसे बसले? हे कळू द्या..
जो कारण त्या काळी युद्धामध्यें ब्राम्हण लोक हर एक शस्त्रावर मंत्रविधि करून त्यास अस्त्रांची योग्यता आणिल्याशिवाय शत्रूवर त्यांचा उपयोग करीत नसत त्यानी जेव्हा अशा नाना तऱ्हेच्या चेष्टा करून बाणासुराच्या रयतेसहित त्याच्या राज्यकुळाची अशी राखरांगोळी केली: तेव्हा सहजच बाकी सर्व देवभोळ्या क्षेत्रपतींच्या मनावर ब्राम्हणांच्या विद्येची धास्ति बसली यास उदाहरण:- भृगु नामक ऋषीने जेव्हा विष्णूच्या छातीवर लाथ मारली, तेव्हा विष्णु (त्यांच्या म्हणण्याप्रमाणें आदिनारायण) ऋषीच्या पायांस श्रम झाले असतील याजकरिता चोळू लागला. आता यातील भावार्थ शुद्ध आपमतलबी आहे तो असा की ज्या अर्थी साक्षात् आदिनारायण जो विष्णु त्यानें ब्राम्हणाचे लायेस सहन करून त्याचे पाय दाबिले, त्या अर्थी आम्ही जे शूद्र (त्यांच्या म्हणण्याप्रमाणे क्षुद्र प्राणी) त्यांनी आपले, ब्राह्मण लाथाबुक्क्या देऊन, प्राण जरी घेऊ लागले, तरी हू चू करू नये.
घो०- तर मग आतांच्या हलकट लोकाजवळ जी काही जादूमंत्रविद्या आहे ती तरी त्यांनी कोठून घेतली असावी ?
जो०- हल्लीच्या लोकाजवळ जी काही मूठ मारण्याची, मोहिनी घालण्याची बंगाली जादूमंत्रविद्या आहे, ती केवळ वेदातील जादूमंत्रविद्येपासून त्यांनी घेतली नसावी असें कोणच्याने म्हणवणार नाहीं कारण, आता जरी तिच्यामध्ये अतिशय फेरफार होऊन बराच अपभ्रंश झाला आहे. तथापि तिच्यातील बहुतेक मंत्रात आणि यंत्रात ॐ नमो, ओं नमः ओं न्ही, ही नः वगैरे वेदमंत्रातील वाक्याचा बराच भरणा सांपडतो यावरून ब्राम्हणाच्या मूळ पूर्वजानी या देशात येऊन बंगाल्यात प्रथम वस्ती केल्यानंतर त्याची जादूमंत्रविद्या येथून चहूकडे पसरली गेल्यामुळे तिचे नाव बंगाली विद्या पडले असावे. इतकेच नव्हे, परंतु आर्याचे पूर्वज आताच्या आडाणी लोकांसारिखे देव्हारा घुमविणारेसुद्धा होते. कारण पूर्वी त्याजमध्ये देव्हारा घुमविणाऱ्या लोकांस ब्राम्हण म्हणत असत व ते सोमरस या नावाची दारू पिऊन तिच्या तारेमध्ये बडबड करून आम्हाबरोबर देव बोलतो म्हणून इतर अज्ञानी लोकास फसवीत होते, असे त्यांच्याच वेट' वरून सिद्ध होते व त्याच आधारावरून हल्ली अशा सुधारलेल्या काळात आताचे ब्राम्हण भट आपली पोट जाळण्याकरिता जप, अनुष्ठानें, जादूमंत्रविधि करून अज्ञानी माळया कुणब्यास गडे घालून फसवितात. तथापि त्या वाड्या दुर्देवी हतभाग्यास त्या ढोंगी गारुड्याचे कपट शोधून काढण्यास फुरसतच होत नाही. कारण, सर्व दिवसभर आपल्या शेती खपून आपल्या मुलाबाळांचे पोपण करून सरकारची पट्टी पूरी करिता करिता त्यांच्या नाकास नळ येतात.
धो०- तर मग ब्रम्ह्याच्या मुखापासून चार वेद स्वयंभू निघाले म्हणून कित्येक ब्राम्हण मोठी शेखी करून बोलतात, याला बाध येतो...
जो०- हे सर्व खोटे आहे. कारण त्यांचे बोलणे जर खरे मानावे तर ब्रम्हा मेल्यानंतर ब्राम्हणांतील कित्येक ब्रह्मऋषींनी अथवा देवऋषीनी केलेली सूक्ते ब्रम्ह्याच्या तोंडातून निघालेल्या वेदात कशी आढळतात? त्याचप्रमाणे चार वेदांची रचना एकाच कर्त्याने एकाच काळी केली हाणून सिद्ध होत नाही; असे कित्येक युरोपियन परोपकारी ग्रंथकारांनी सिद्ध करून दाखविले आहे.
धो०- भटांनी हा ब्रह्मघोळ केला तरी केव्हा?
जो०- ब्रह्मा मेल्यानंतर कित्येक ब्रम्हऋषीनी ब्रम्ह्याच्या लेखाचे तीन भेद म्हणजे वेद केले व पुढे त्या तीन वेदात अनेक ब्रम्हऋषीनी अनेक तऱ्हेचे फेरफार करून त्यास ज्या काही पूर्वीच्या भाकड दंतकथा माहित होत्या, त्याची त्यांनी त्याच मासल्याची कवने करून त्याचा एक नवीन चवथा वेद केला. इतक्यात परशुरामाने बाणासुराच्या रयतेस असे धुळीस मिळविल्यामुळे सहजच ब्राह्मणांच्या वेदमंत्रजादूचे वजन इतर सर्व क्षेत्रपतींच्या मनावर बसले, ही संधी पाहून नारदासारख्या बायकातील पावलीकम आठ भाऊजीने रामचंद्र आणि रावण, कृष्ण आणि कस व कौरव आणि पांडव या सर्व देवभोळ्या क्षेत्रपतीच्या घरोघर रात्रंदिवस खेट्या घालून त्यांच्या बायकापोरांसमोर कधी कधी आपल्या विण्याची तुणतुण तार वाजवून व कधी त्यांच्यापुढे थयथय नाचती टाळ्या पिटून त्यास वरकाती ज्ञान उपदेश करण्याचा भाव दाखवून आतून एकमेकास एकमेकाच्या लांड्यालवाड्या सांगून त्या सर्वांचे आपापसांत तंटे लावून एकंदर सर्व ब्राह्मण लोकांस निर्वेध केल्यामुळे ब्राह्मण ग्रंथकारांनी तेवढ्या काळात सर्व लोकांची नजर चुकवून, आपली सर्व वेदमंत्रजादू व तत्संबंधी भाकड दंतकथा होत्या तेवढ्याशी सरासरी मेळ घालून त्यांनी अनेक स्मृत्या, संहिता, शास्त्रे, पुराणे, वगैरे भारेचे भारे नवीन ग्रंथ घरातल्या घरात बनवून त्या सर्वांत शूद्रावर ब्राम्हण लोकाचे वर्चस्व स्थापून त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शिपाईगिरीच्या मार्गात काटी ठोकून मोठा धार्मिकपणाचा डौल घातला. हे सर्व ब्रम्हकपट पुढे कधीं शूद्रांच्या ध्यानांत येऊ नये या भयास्तव, अथवा त्या ग्रंथांत पाहिजेल तसे फेरफार करितां यावेत म्हणून त्यांनी शूद्र वगैरे पाताळी घातलेल्या लोकांस मुळींच कोणी ज्ञान देऊ नये, असे मनुसंहितेसरिख्या अपवित्र ग्रंथात फारच मजबूत लेख करून ठेविले आहेत.
घो०- भागवत त्याच वेळेस केले असावे काय?
जो०- भागवत त्याच वेळेस केलें असतें तर सर्वाच्या मागून झालेल्या अर्जुनाच्या जन्मेजय नावाच्या पण्तूची हकीकत त्यामध्ये कधीच आली नसती.
धो०- तुमचे म्हणणे रास्त आहे. कारण त्याच भागवतामध्ये अनेक पुरातन मनः कल्पित भाकड दंतकथा अशा आढळतात, की त्यापेक्षा इसाबनीति हजार वाट्याने बरी म्हणवेल. तिच्यामध्ये मुलांची मने भ्रष्ट होण्याजोगी एकसुद्धी गोष्ट आढळत नाही.
जो०- त्याचप्रमाणे मनुसंहिता ही भागवताचे मागून केली असावी म्हणून शाबीत करता येते.
धो०- काय? मनुसंहिता भागवताचे मागून केली असावी! असे कसे होईल?
जो०- कारण भागवतातील वशिष्ठाने, मी खून केला नाही, म्हणून सुदामन राजासमोर शपथ घेतल्याची उपमा मनूने आपल्या ग्रंथाच्या ८ व्या अध्यायाच्या ११० श्लोकात कशी घेतली? त्याचप्रमाणे, विश्वामित्राने विपत्तिकाळी कुत्र्याचे फरें खाल्ल्याविषयीं त्याच ग्रंथाच्या १० व्या अध्यायामध्ये १०८ श्लोकात कशी उपमा घेतली? याखेरीज त्याच पुस्तकांत अनेक विरुद्ध गोष्टी सापडतात.
१. कित्येक युरोपियन ग्रंथकारांची मते आहेत.