वतनदार भट कुळकर्णी, युरोपिअन लोकाचे वसाहतीची जरुरी, विद्याखात्याच्या तोंडावर काळोखाचा डाग, युरोपिअन कामगारांची अक्कल गुंग कशी होते, इत्यादिकाविषयी
घो०- असो, परंतु आपण पूर्वी म्हणाला की, बाकी एकदर सर्व खात्यांत भट पडले नाहीत असे एकसुद्धा सरकारी अथवा घरगुती खाते. सापडत नाही. तर या सर्वांमध्ये मुख्य भटजी कोण?
जो०- वतनदार भट कुळकर्णी होत ह्यांच्या कपटाविषयी बहुतेक दयाळू युरोपियन कलेक्टरास अज्ञानी शूद्राची दया येऊन त्यांनी सरकारास रिपोर्टमार्गे रिपोर्ट करून एकंदर सर्व कायद्यामध्ये कुळकर्ण्यास बंदोबदी खिळून, त्यास नानाप्रकारचे कोलदाडे घालून, त्यांच्या तोडास मजबूत मुस्की घातली आहेत. तथापि या कलमकसायाचे त्याच्या मतलबी धर्माच्या संबंधाने अज्ञानी शूद्रावर वजन असल्यामुळे हे सैतानासारिखे आपल्या धर्माच्या आडून उघड चावडीतील भर कचेरीत बसून त्या बळीच्या मतांची निंदा करून अज्ञानी शूद्रांची मने भ्रष्ट करीत नाहीत काय? असें जर नाहीं म्हणावें, तर शूद्रास मुळीच वाचता आणि लिहिता येत नाहीं, तर मग ते कशावरून अथवा कोणापासून त्या मतीचा इतका द्वेष करण्यास शिकले? याविषयी तुला काही दुसरी कारणे ठाऊक असल्यास कळू दे. इतकेच नव्हे. परंतु संधी पाहून त्याच चावडीत करून सरकारी कायद्यातील भलते एखादे कलम घेऊन त्यावर नाना तऱ्हेचे कारतूसी कुतर्क घेऊन शूद्रानी सरकारचा द्वेष करावा म्हणून त्यांस चोरून धडे देत नसतील काय ? व त्यापैकी एक काना अथवा मात्रा शूद्र आपल्या डोळस सरकारच्या कानांवर घालण्यास थरथर कापत नसतील काय? कारण एकंदर सर्व वरच्या कचेऱ्यातील भटकामगार त्यांचे जातवाले पडले. यास्तव आता तरी आपल्या सरकाराने शुद्धीवर येऊन प्रथम हरएक खेड्यांनी निदान एक एक तरी इंग्लिश अथवा स्कॉच गृहस्वास, त्यांच्या निर्वाहपुरती गतकुळी शेते इनाम देऊन, त्यावर उपदेशकांचे काम सोपून त्यांनी फक्त त्या त्या गांवच्या एकंदर सर्व कच्चा हकीकतीविषयी निदान वर्षातून एकतरी रिपोर्ट सरकारास करीत जावा, असा कायदा करून बंदोवस्त केल्यास पुढे एखाद्या काळी नानासारख्या भटास पुनः एखादें बड उपस्थित करण्याची जरूरी पडल्यास त्याने एखाद्या पिराच्या पुढच्या लिंगाची यात्रा जमवून तीत सारभाताच्या ऐवजी तयार केलेल्या गूढ चपात्या एकंदर सर्व गावोगावी नेमलेल्या वेळी एकदम पोहचवून तो प्रसाद अज्ञानी शूद्रोकडून आपल्या सरकारास पासले पाडून त्यांच्या मुखात घालण्याच्या कामी, हा वतनदार कुळकण्यांचा एकोपा बिलकूल उपयोगी पडणार नाही. आणि तसे केल्याशिवाय एकदर सर्व अज्ञानी शूद्राचे पाय थारीच लागणार नाहीत, इतकेच नव्हे, परंतु जेव्हा ते युरोपियन उपदेशक एकदर सर्व शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यांचे डोळे उघडतील, तेव्हा ते या ग्रामराक्षसांच्या वाऱ्यासदेखील उभे राहाणार नाहीत. दुसरे असे की, सरकारने पाटीलकीसहित कुळकर्ण्याचे कामाची परीक्षा घेऊन, ते काम एकाच जातीकडे सोपवू नये, म्हणजे पलटणीसारखा या कामी काही आयास न पद्धती एकदम बंदोबस्त होऊन सर्व लोकांस विद्या शिकण्याची गोडी सहजासहज लागेल. पाहिजे असल्यास आमच्या दयाळू सरकाराने विद्याखात्याकडील पोकळ खर्च एकदम बंद करून तो सर्व पैसा कलेक्टरखात्यात जमा करून दर एक युरोपियन कलेक्टराकडून जारविससाहेबासारिखा, पक्षपात न करता सर्व जातीच्या लोकातील हुशार मुलांतून काही मुले निवडून काढून त्यास फक्त जाडेभरडे अन्नवस्त्र पुरवून त्यांच्याकरिता दरएक कलेक्टराच्या बंगल्याशेजारी शाळा घालून त्याची पाटील, कुळकर्णी, आणि पंतोजीच्या कामात परीक्षा घेऊन त्यास ती कामे सोपू लागल्याबरोबर एकंदर सर्व कुळकरण्याच्या जुटास, बदमास नानासारिख्या भटाच्या उपयोगी न पडतां, ते अज्ञानी शूद्रांची वतने फसवून घेत असल्यास व त्या लोकांत नाना तऱ्हेचे तंटे उपस्थित करीत असल्यास त्यांस तसे करण्याची फुरसतच सापडणार नाहीं. आजपावेतों लक्षावधी रुपये विद्याखात्याकडे जरी खर्ची पडले. तथापि त्यापासून शूद्रांच्या समाजाच्या मानाप्रमाणे त्यांच्यात विद्वान लोकांचा भरणा वाढला नाही. इतकेच नव्हे, महार, मांग, आणि चाभार यापैकी कोणी एक-एक शिकलेला कामगार आढळत नाही. मग तेथे एम.ए. अथवा बि.ए. औषधास मिळण्याची मारामार अरेरे! या आपल्या सरकारच्या येवढ्या दिगंबर विद्याखात्याच्या गोऱ्या तोंडावर या काळ्या तोंडाच्या भटपंतोजींनी हा केवढा काळोखाचा डाग लाविला? अरे ही, "कडकारली" आमच्या सरकाराने इतकी तुपात तळून साखरेत घोळून मळली. तथापि त्यांनी आपला जातिस्वभाव न सोडिता ती अखेरीस कडूची कडूच राहिली.
धो० बरे, हे कुळकर्णी अज्ञानी शूद्रांची वतने कशी फसवून घेत असतील ?
जो०- ज्या शूद्रास मुळीच वाचिता आणि लिहिता येत नाही, अशांस कित्येक कुळकर्णी गाठून त्यांचे आपण सावकार होऊन त्यांजपासून जेव्हा गहाणखते वगैरे दस्तऐवज लिहून घेतात, त्यावेळी ते आपल्या जातीचे लेखक मिलाफी करून त्यात एक तऱ्हेच्या शर्ती लिहून आणि त्या अज्ञानी शूद्रास भलतेच काहीतरी वाचून दाखवून त्यांचे हात लेखणीस लावून खतें पुरी करून पुढे काही दिवसांनी या कपटाने लिहिलेल्या शर्तीप्रमाणे त्यांची वतने घशात टाकून ढेकर देत नसतील काय?
घो०-बरें, हे जात कलमकसाई, अज्ञानी शूद्रात कोणते प्रकारचे तटे उपस्थित करीत असतील?
जो०- शेते, बांध वगैरेसंबंधी-पोळा आणि शिराळशेट यांच्या डावीउजवी संबंधी आणि होळीची पोळी आधी लावण्यासंबंधी सर्व तंटे अज्ञानी शूद्रात उपस्थित करण्याच्या आरंभी भट कुळकर्णी नाहीत, असे काही तटे तू दाखवू शकशील काय?
घो० बरे, असे तंटे उपस्थित करण्यापासून या कसायांच्या पोत काय पडत असेल!
जो०- अरे, कित्येक घरंदाज अज्ञानी शूद्रांची घराणी हर्षेस पेटून एकमेकाशी लढत असता, आतून या कलमकसायासहित दुसऱ्या भटकामगारांची घरे शेकारता शेकारता धुळीस मिळाले नसतील काय? अरे, या कसायांच्या नारदशाईमुळे मुलकी फौजदारी आणि दिवाणी खात्यात आतोनात खर्च फुगून त्यातील बहुतेक कारकुन मामलेदारासहित चिटणिसांनी आपल्या ऐन "तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् या अस्सल बीजमंत्रास हरताळ लावून त्याबद्दल त्यांनी "चिरी मिरी देव, चिरी मिरी देव" या यवनी गायत्रीचा उपदेश त्या पवित्र भटमुल्लापासून घेतल्यामुळे भटवकीलांची दलाली वाढून ते मोठमोठ्या चारटीत बसून पोळासारिख्या डुरक्या फोडीत फिरतात का नाही? याखेरीज मुनसफ नवाबांचे सरंजाम किती वाढले आहेत, याची बेरीज दे. इतकाही बंदोवस्त असून गरीब लोकांस न्याय तरी स्वस्ता पडून वेळेस तरी मिळतो काय? यामुळे एकदर सर्व खेड्यापाड्यांनीसुद्धा एक जगप्रसिद्ध म्हण पडली आहे. ती अशी की, सर्व खात्यात ब्राह्मण कामगारांच्या हातावर अमुक तमुक केल्याशिवाय ते आपल्या गरिबाच्या कामास हातच लावीत नाहीत. "त्यांच्या डोमल्यावर घालायास काही तरी बरोबर घ्या, तेव्हां बाहेर निघा."
धो० असे होत असल्यास खेड्यातील शूद्रलोक युरोपियन कलेक्टरांच्या एकाती गाठी घेऊन त्यास आपली गाऱ्हाणी का सांगत नाहीत ?
जो०- अरे, ज्यास ओची गांड कशी फोडावी हैं मुळीच ठाऊक नाही तर तसल्या भेकड भाउल्यास अशा थोर कामगारासमोर उभे राहून त्यास आपली गान्हाणी आणि ती शिस्तवार सांगण्याची केवढी पंचाईत? तशांतून एकाद्या लंगोट्या बाहदराने छातीचा कोट करून एकाद्या बुटलेराच्या मदतीने युरोपियन कलेक्टरास एकांती गोठून त्याच्यासमोर उभे राहून "माझी दाद लागत नाही" इतके चार शब्द बोलल्याची या कलमकसायांस बातमी लागली की पुरे, मग त्या दुदैव्याचे नशीबच फुटले म्हणून समजले पाहिजे, कारण ते कलेक्टराच्या कचेरीतील आपल्या जातीच्या भटचिटणिसापासून तो रेव्हिन्यूच्या अथवा जज्जाच्या सर्व भटकामगारांपावेतो आतल्या आत त्या यवनी गायत्रीची वर्दी फिरवून लागलीच आर्थे कलमकसाई नाना तऱ्हेच्या दाखल्यासहित पुरावे घेऊन वादीचे साक्षीदार आणि आर्थे कसाई वादीविरुद्ध नाना तऱ्हेच्या दाखल्यासहित पुरावे घेऊन प्रतिवादीचे साक्षीदार होऊन, त्यांच्या तटात इतका गोंधळ करून टाकितात की, त्यांत सत्य काय आणि असत्य काय, हे निवडून काढण्याकरिता मोठमोठे विद्वान युरोपियन कलेक्टर आणि जज्ज आपली सर्व अक्कल खर्च करितात, तथापि त्यांस त्यांतील कधी कधी काडीमात्र गुह्य न कळता ते उलटे त्या गाऱ्हाणे केलेल्या लंगोट्यासच "तू मोठा तरकटी आहेस" असे अखेरीस सांगून त्याच्या हातात नारळाची आई देऊन त्यास शिमगा करण्याकरिता त्याचे घरी पाठवीत नसतील काय? शेवटी ह्या सर्व ह्या भटकामगारांच्या अशा कसबामुळे कित्येक लगोट्यांनी आपली या सरकारांत दादच लागत नाही. सबब आपले प्राणघात करून घेतले नसतील काय? कित्येकानी दरवडेखोरांचे धंदे करून आपल्या जिवास मुकले नसतील काय? कित्येकांनी आपल्या मनात अतिशय संताप करून घेतल्यामुळे वेडे झाले नसतील काय? आणि कित्येकांनी आपल्या दाढ्या वाढवून अर्धवेड्यासारखे होऊन रस्त्यात जो भेटेल त्यास आपली गाऱ्हाणी सांगत फिरत नसतील काय?