७ जून १९१६ रोजी म. गांधी आणि विनोबांची पहिली भेट झाली. विनोबा आश्रमात आल्याची बातमी म. गांधींपर्यंत पोहचली. आंघोळ करून भेटायला येऊ द्या असे सुचवित म. गांधी स्वयंपाक घरात शिरले. साबरमती-कोचरब आश्रमाचे जेष्ठ सभासद मामा फडके यांनी स्वतः विनोबांना म. गांधींकडे नेले. म. गांधी स्वयंपाकघरात भाजी चिरीत बसले होते. विनोबा म्हणाले, "भाजी चिरण्याचे साधे कामही राष्ट्रनेता करीत असलेला कधी ऐकले व पाहिले नव्हते. पण त्यांच्या पहिल्या दर्शनानेच मात्र श्रमाचा पाठ मिळाला. " विनोबा-म. गांधीची पहिले भेट आणि चर्चा भाजी चिरता चिरताच पार पडली. श्रमपाठाने प्रभावित झालेले विनोबा म्हणतात, "हिमालय आणि बंगालला जाणे ही माझी दोन स्वप्ने पूर्ण झाली नसली तरी ईशकृपेने मी. म. गांधी जवळ आलो, त्यातून मला हिमालयाची शांती प्राप्त झाली, त्याचबरोबर बंगालचे वैशिष्टय असणारी ज्वलंत देशभक्तीही प्राप्त झाली. अशाप्रकारे माझ्या दोन्ही अभिलाषा पूर्ण झाल्या.'
श्रमाची दीक्षा : पहिल्या भेटीतच म. गांधींनी विनोबाच्या हातात भाजी चिरण्यासाठी चाकू दिला. "काम करण्याची पहिली दीक्षा' अशा प्रकारे गांधींनी मला दिली असे विनोबा म्हणतात. भाजी चिरताना गांधीनी विनोबांची सर्व माहिती घेतली. ही कोणी सामान्य व्यक्ती नसून अध्यात्मिक विकासाची ओढ असणारी व्यक्ती अशी गांधींची धारणा झाली म्हणून गांधींनी विनोबांना सुचवले, "तुला येथील वास्तव्य आवडेल! आयुष्यात काहीसेवा त्याग करायचा असेल तर तू येथे रहा तुझ्या राहण्याने मला आनंदच होईल. पुढे त्यांनी सुचवले, "आत्मज्ञानी कधी आजारी पडत नाही. तू मात्र आजारी असल्यासारखा दिसतो, दुबळा दिसतो हे बरं नाही." यावर विनोबा म्हणतात, "हा बापूचा दुसरा पाठ जो मी आयुष्यभर लक्षात ठेवला!"
यापूर्वी विनोबांनी घरकाम केलेल नव्हते. अभ्यास हे त्याचे नेहमीच काम असे. आश्रमात आल्यानंतर मात्र अनेक प्रकारची कामे त्यांच्या अंगावर पडली. आश्रमातील आश्रमवासीयांसाठी आवश्यक स्वयंपाक, दळणे, पाणी भरणे, झाडणे, भांडी घासणे, निवडणे, बागकाम, संडास सफाई अशी कामे करावी लागू लागली. ही कामे करताना ती परिपूर्ण नीटनेटकी असावी याकडे विनोबांचा कटाक्ष असे त्यामुळे कस्तुरबाकडूनही विनोबांना समाधानकारक काम केल्याची पावती मिळाली.
या काळात गांधीनी कोचरब आश्रमातच वास्तव्याला होते. देशातील इतर
भागात कामाचा व्याप अजून वाढलेला नव्हता. त्यामुळे विनोबांना या काळात
गांधीजींचा भरपूर सहवास मिळे. आश्रमात सर्वजण गांधीजींना 'बापू' म्हणत.
सायंकाळच्या प्रार्थनेनंतर बापू आश्रमवासियांच्या प्रश्नांना उत्तरे देत. विनोबा बापूंचे
विचार ऐकत व त्यावर चिंतन करीत. पण आश्रमात येऊन सहा महिनेपर्यंत
पहिल्या भेटीशिवाय विनोबा आणि बापूचा फारसा संवाद झाला नव्हता. शेवटी
एक दिवस बापुंनी विनोबाला सायंकाळी आपल्या सोबत फिरायला नेले आणि
त्यानंतर आश्रमातील कर्मयोगाच्या पलीकडे जाऊन बापू व विनोबांची सतत
ज्ञानचर्चा
सुरू झाली. याबाबत विनोबा लिहितात, "बापूंनी माझी परीक्षा घेतली किंवा
नाही मला माहित नाही, परंतु माझ्या कुवतीप्रमाणे मी बापुंची पुरेपूर परीक्षा घेतली, या
परीक्षेत जर कमी पडले असते तर मी त्यांच्याजवळ टिकलो नसतो...' कोचरब आश्रमाशी विनोबा एकरूप झाले होते. आश्रमातील सर्वच कार्यक्रमात विनोबांचा सहभाग असे.
"
विनायकचा विनोबा- एके दिवशी पहाटे चार वाजता विनोबा गीता आणि उपनिषदांतील मंत्राचा पाठ करीत असलेले आश्रमवासियांनी ऐकले. विनोबा संस्कृत आणि धर्मशास्त्राचे पंडित असल्याची जाणीव आश्रमवासियांना झाली. यावरूनच जेष्ठ आश्रमवासी मामा फडके यांनी विनायकाचे नामकरण विनोबा असे केले. महाराष्ट्रातून महापुरुषाचा विशेषतः संतांचा आदरपूर्वक उल्लेख करताना अशाच पद्धतीने केला जातो. ज्ञानेश्वराचा ज्ञानोबा, तुकारामाचा तुकोबा, तसाच विनायकाचा विनोबा. यापुढे मामा फडके विनायकाला विनोबा म्हणू लागले अशा प्रकारे आश्रमातील विनायक आश्रमवासियांचा विनोबा झाला. सर्वांबरोबर बापुंनीही विनोबा या नामकरणाला मान्यता देऊन त्यांनीही त्यांना विनोबा म्हणायला सुरुवात केली. त्यांच्या वडीलांना बापुंनी लिहीलेल्या पत्रातही 'आपला पुत्र विनोबा माझ्या निकट आला आहे' असे संबोधले होते.
म. गांधी आणि विनोबा आश्रमात एक सोबतच दळण, मैलासफाई करीत,
तसेच उपनिषद आणि गीतेचे पठणही सोबतच करीत. सी. एफ. ॲण्डुज आश्रमात
आले असता बापूंनी विनोबांचा परिचय देताना सांगितले, "आश्रमात जी काही रत्ने
आहेत, त्यातला एक युवक एक आहे, हा आश्रमाकडून काही मिळविण्याऐवजी
आश्रमासाठी आशिर्वादकारच ठरला आहे." असे असले तरी विनोबांचे आश्रमातले
वागणे नम्र,
सर्वसामान्यासारखे होते. एका सहकाऱ्यांशी यासंबंधी मत व्यक्त
करताना माझे मलाच माहीत! देशासाठी शौर्याचे काम करण्याच्या माझ्या
आकांक्षेपासून बापूंनी मला मुक्त केले. माझ्या अंतरंगातील क्रोध आणि इतर
विकारांचा ज्वालामुखी बापूंनी त्वरीत शांत केला. त्यामुळे दिवसेंदिवस माझी
सर्वांगीण प्रगतीच होत आहे. "
मैला सफाईचा धडाः काही दिवसानंतर विनोबांचे धाकटे बंधू बाळकोबाही आश्रमात दाखल झाले. प्रारंभी विनोबाला हे आवडले नसले तरी नंतर विनोबांनी त्याला मान्यता दिली व दोघेही आश्रमातील दैनंदिन कार्यक्रमात सामील झाले. अशातच आश्रमाचा मैला साफ करणाऱ्याने सुट्टीवर जाताना आपल्या बारा वर्षाच्या मुलावर मैला सफाईचे काम सोपवले. मैल्याने भरलेली बादली त्या मुलास उचलल्याने उचलेना. त्यामुळे त्याला रडू कोसळले. बाळकोबांनी त्यावर दया दाखवत त्याच्या कामात मदत केली. विनोबाला हे समजले तेव्हा विनोबा बाळकोबांना म्हणाले, “तू त्या मुलाची मदत केली हेउत्तमच झाले. आता मी पण तुझ्या सोबत हे काम करीन.” यामुळे आश्रमात खळबळ निर्माण झाली. विनोबा आणि बाळकोबा सारखे ब्राह्मण आश्रमाचा मैला साफ करतील?" असा प्रश्न सर्वासमोर उभा राहिला. परंतु विनोबांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. बापूना बाहेरगावहून परतल्यानंतर ही घटना समजली तेव्हा बापूंनी म्हटले, "मैला सफाई हे एक श्रेष्ठ व धर्म कार्य आहे, यापुढे सर्व आश्रमवासियांचे हे दैनिक काम असेल, ज्यांना हे पसंत नसेल त्यांनी आश्रम सोडावा. परिणामी अनेक आश्रमवासियांनी आश्रम सोडला ज्यात बापूंची सर्वात मोठी बहीणही होती. याचवेळी विनोबांनी आणखी एक क्रांतीकारी पाऊल उचलले. त्यांनी आपले जानवे अग्नीला अर्पण केले.
कोचरब आश्रमातील विनोबांची लक्षणीय कामगिरी म्हणजे आश्रमाचे स्वावलंबन. सुरुवातीला आश्रमात कापड विणकामाला मीलचे सूत आणले जाई. काही वर्षांनी आश्रमात चरखा आला हात कताईचे काम सुरू झाले. हातकातईच्या सूताचे कापड जाडे भरडे असे. विनोबांनी यात प्रगती करून दाखवली. आपल्या गणिती स्वभावानुसार विनोबांनी आश्रमातील सुतकताई आणि कापड विणकामात शास्त्रीयता आणली. त्यामुळे कापडाचा दर्जाही सुधारला.
आश्चर्याची बाब म्हणजे विनोबांना चरखा चालवणे कृष्णदास गांधी यांनी शिकवले. फार मोजक्या दिवसात आश्रमात खादीशास्त्र निष्णात म्हणून विनोबा ओळखले जाऊ लागले.
कोचरब ते साबरमती : साधारणपणे दोन वर्षानंतर कोचरब आश्रमाचे स्थलांतर वर्तमान साबरमती आश्रमाचे ठिकाणी करण्यात आले. तेथेही विनोबांनी आपली सुतकताई, खादी विणकाम, मैला सफाईचे काम चालूच ठेवले. साबरमती आश्रमात काही दिवस विनोबांनी स्वयंपाकाचेही काम केले. त्यातच साबरमती नदीचे पाणी आणून त्यांनी आश्रमातील बागही हिरवी ठेवली. दररोज सतत पाच तास त्यांचा कार्यक्रम चाले, अतिश्रमाने कृश झालेल्या विनोबांच्या शरीराकडे बापूचे लक्ष गेल्यानंतर बापूंनी विनोबांना प्रश्न केला, "विनोबा, तुम्ही इतके श्रम कसे करू शकता?” विनोबांचे यावर उत्तर होते, "बापू, हे सर्व करण्याची शक्ती मला माझे शरीर नव्हे मनातून मिळते. "
आश्रमाच्या राष्ट्रीय शाळेचे गुजराथी शिक्षक रजेवर गेले असता बापूंनी
विनोबांना ते काम करण्यास सांगितले. आश्रमात आल्यानंतर विनोबांनी गुजराथी
भाषा शिकून घेतली होती. तरी पण विनोबांनी बापूंना सुचवले. गुजराथी शिक्षकाची
नेमणूक करावी. तेव्हा २४ जुलै १९१८ रोजी विनोबांना बापूंना कळवले,
"आदर्शाच्या दृष्टीने गुजराथी शिक्षकच असावा, परंतु जो पर्यंत असा शिक्षक
मिळत नाही तो पर्यंत आपणच ते काम करावे. चरीत्रहीन गुजराथी शिक्षकापेक्षा
चारित्रवान मराठी शिक्षकाला मी स्वीकारेन म्हणून चारित्रवान गुजराथी शिक्षक
उपलब्ध होईपर्यंत तुम्ही ते काम करावे."
काही काळासाठी विनोबांने आश्रमातील वसतीगृह प्रमुखाचेही काम केले. सुरुवातीला विद्यार्थ्यांना थोडी भीती होती. विनोबांना विद्यार्थ्यांना सकाळीच उठवत. नियमीत श्लोक आणि भजनाने विद्यार्थ्यांना प्रसन्नता वाटू लागली. एक आदर्श शिक्षक आणि आदर्श गृहपती अशी विनोबांची ओळख सर्वांना झाली. या विद्यार्थ्यांत एक विद्यार्थी होता. वल्लभदास जो पुढे सर्व सेवा संघाचा अध्यक्ष झाला. प्रभुदास गांधी आणि कृष्णदास गांधीचाही समावेश या वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांमध्ये होता. काकासाहेब कालेलकर या विद्यामंदीराचे प्राचार्य होते. कालातंराने त्यांची
नेमणूक गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून झाली.
वसतीगृहात विनोबाचे व्यायामशिक्षक म्हणूनही काम केले. ते दररोज विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार आदी व्यायाम शिकवीत, कबड्डी, खो खो सारख्या देशी खेळात सहभागी होत. खेळाच्या माध्यमातून संघभावना वाढून विद्यार्थी अहिंसात्मक वृत्तीकडे वळेल याकडे त्यांचा कटाक्ष असे. क्रिकेट सारख्या विदेशी खेळांना त्यांनी कधीच प्रोत्साहन दिले नाही. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना देशभक्त नागरिक आणि स्वातंत्र्यात सहभागी होणारा सैनिक बनवण्याकडे त्यांचा कल होता.
साबरमती आश्रमातील राष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज किमान तीन तास कठोर श्रम करावे लागत. शारीरिक श्रमाचा उत्पादकतेशी संबंध असावा असा त्यांचा कटाक्ष असे. विद्यार्थ्यांनी स्वावलंबनाचा स्वीकार करण्यासाठी श्रमाच्या महत्त्वाला ओळखले पाहिजे म्हणून ते सतत विद्यार्थ्यांना सूचवत 'शिक्षकाच्या मदतीशिवाय वाचायला शिका."
याच काळात विनोबांच्या वेषभूषेतही फरक पडत गेला. सुरुवातीला धोतर, सदरा, कोट, टोपी अंसा त्यांचा वेष असे. काशीला येताना त्यांनी कोट घालणे सोडले. गांधींच्या भेटीला येताना त्यांनी टोपी घातलेली नव्हती. आश्रमात सुतकताई खादीचे कामात प्रगती झाली तेव्हा त्यांनी धोतराची लांबी कमी करून फक्त ३५ इंच लांबी ठेवून सदरा अंगात न घातला फक्त खांद्यावर ठेवीत. कालांतराने सदरा त्यांनी टाकून दिला. धोतराचा सोगा खांद्यावर टाकू लागले. काही दिवसानंतर धोतराची लांबी फक्त २७ इंच केली. आणि एखादे साधे कापड अंगावर घेत. आणि हाच वेश त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवला.
साबरमती आश्रमात काही दिवसानंतर त्याचे बालमित्र रघुनाथ श्रीधर धोत्रे, गोपाळराव काळे, बाबा मोघे, आणि द्वारकानाथ हरकारे विनोबांना सामील झाले. जेव्हा जमनालाल बजाजानी साबरमती आश्रमाचा धर्तीवर वर्धा येथेही एक आश्रम असावा अशी इच्छा व्यक्त केली होती, तेव्हा विनोबासोबत हे सर्व मित्र त्यांच्या सोबत वर्ध्याला आले होते.
साबरमती आश्रमात विनोबांनी स्वतःला सतत कामात गुंतून घेतल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला होता. त्यांना विश्रांतीची नितांत गरज होती. बापूनीही त्यांना तसे सुचविले होते. तसेच काशीला ज्या हेतूसाठी विनोबा गेले ती संस्कृत शिक्षणाची इच्छाही त्यांच्या मनात प्रबळ झाली होती, यासाठी विनोबांनी म. गांधींकडे एक वर्षाच्या सुटीची मागणी केली आणि गांधींजीनी ती लगेच मंजूर केली.