ब्रह्मराक्षसाचे पिंडेचा धिक्कार.
० या सर्व आपल्या सवादावरून असे सिद्ध होते की, एकदर सर्व भटानी आपल्या कृत्रिमी धर्माच्या अडून आपल्या भोळ्या सरकारच्या डोळ्यात माती टाकून आपण सर्व शूद्रादि अतिशूद्रास अमेरिकेतील दासापेक्षाही जास्ती पीडा देत आहेत. यास्तव आपण या भटाच्या कृत्रिमी धर्माचा धिक्कार करून आपल्या अज्ञानी बांधवास जागे का करीत नाहीत?
जो० मी कालच संध्याकाळी याविषयी एक पत्र तयार करून एका माझ्या नेहाच्या स्वाधीन करून त्यास अशी विनंती केली की, त्याने त्या
पत्रातील हस्वदीर्घादी सर्व चुक्या नीट करून, त्याची एक एक प्रत करून सर्व भट व ख्रिस्ति वर्तमानपत्रकर्त्यांच्या अभिप्रायाकरिता पाठवावी.
त्या पत्राची नक्कल येणेप्रमाणे- शुद्रांनी ब्रम्हराक्षसाच्या दास्यत्वापासून असे मुक्त व्हावे.
मूळ भटाच्या (हराणी) पूर्वजांनी या देशात मोठा बंडावा करून, येथील आमच्या मूळच्या क्षेत्रवासी पूर्वजास युद्धप्रसंगी जिंकिल्यामुळे, त्यास आपले दास केले. पुढे जसजसी सधी सापडत गेली, तसतसी भटांनी आपल्या सत्तेच्या मदानें अनेक तऱ्हेतऱ्हेचे मतलबी ग्रंथ करून त्या सर्वांचा एक मजबूत कोट बांधून त्यामध्ये त्या सर्व दासास वंशपरंपरे अटकावून तेथे त्यास नाना तऱ्हेच्या पीडा देऊन हा काळ पावेतो मोठ्या मौजा मारीत आहेत. इतक्यात जेव्हा इंग्रज बाहदराचे राज्य या देशांत आले तेव्हापासून बहुतेक कनवाळू युरोपियन व अमेरिकन सत्पुरुषास आमचे दुःख पाहवेना; तेव्हा त्यांनी आमच्या बंदिखात्यांत हमेशा येऊन आम्हांस असा उपदेश केला की, "अहो बाबानो, तुम्ही आम्हांसारखे मनुष्य आहात, तुमचा व आमचा उत्पन्न व पालन व पोषणकर्ता एकच आहे. आणि तुम्ही पण आम्हांसारखे सर्व अधिकारांस पात्र असता, या भटांच्या कृत्रिमी अधिकारास का मानिता?" वगैरे अशा नाना प्रकारच्या पवित्र सूचनावरून विचारांती मला माझे वास्तविक अधिकार समजल्याबरोबर मी त्या कैदखान्याच्या कृत्रिमी कोटाच्या मुख्य ब्रम्हकपाटदरवाज्याला लाथ मारून बाहेर पडून आपल्या उत्पन्नकर्त्याचा आभार मानला.
आता मी त्या परोपकारी युरोपियन उपदेशकाच्या अंगणात तंबू ठोकून थोडासा विसावा घेण्याच्या पूर्वी प्रथम अशी प्रतिज्ञा करितो की,- भटांच्या ज्या मुख्य ग्रंथांच्या आधारावरून आम्ही भटांचे दास आहोत, म्हणून त्यांच्या दुसऱ्या कित्येक ग्रंथात लेख आढळतात. त्या सर्व ग्रंथांचा व त्यांचा ज्या ज्या ग्रंथांशी संबंध असेल, त्या सर्व ग्रंथांचा धिक्कार करून ज्या ग्रंथावरून (मग तो कोणत्याहि देशांतील अथवा धर्मातील विचारी पुरुषाने केलेला का असेना) सर्वास सारखा उपभोग घेता येतो, तशा ग्रंथकर्त्यांचा मी आपल्या उत्पन्नकर्त्यांच्या संबंधानें धाकटा भाऊ समजून त्याप्रमाणे वर्तन करणार.
दुसरे असे की, जे लोक आपल्या एकतर्फी मताभिमानाच्या दांडगाव्याने कोणासही नीच मानण्याजोगे आचरण करू लागतात, त्या उभयतीस
तसे आचरण करण्याची सवड देऊन मी आपल्या उत्पन्नकत्यनि निर्माण केलेल्या पवित्र अधिकाराच्या नियमात बट्टा लावणार नाही तिसरे असे की, जे दास (क्षुद्र) फक्त आपल्या उत्पन्नकर्त्यास मानून नितीस अनुसरून स्वच्छ उद्योग करण्याचा निश्चय करून त्याप्रमाणे आचरण करीत आहेत, अशी त्याजविषयीं माझी खात्री झाल्याबरोबर मी त्यास केवळ आपल्या कुटुंबातील बांधवाप्रमाणे समजून त्याजबरोबर अन्नव्यवहार करीन, मग तो कोणत्याहि देशातील असो.
पुढे एखाद्या काळी माझ्या अज्ञानीनी गाजलेल्या शूद्र बांधवातून एखाद्यास भटांच्या दास्यत्वापासून मुक्त होण्याची इच्छा झाल्याबरोबर, त्याने मला एक वेळ तरी कृपा करून आपले नाव पत्रद्वारे लिहून कळविल्यास मला या कामी मोठी हिम्मत येऊन, मी त्याचा फार आभारी होईन
श्ता ५ डिसेंबर सन १८७२ इ
पुणे, जुनागज न० ५२७.