आकाशातील ग्रह
बळवंतराव हरी साकवळकर. प्र० आकाशातील ग्रह या आपल्या भूमंडळावरील मानव स्त्री-पुरुषास पीडा देतात, ह्मणून ग्रहशास्त्रवेत्ते मोठ्या डौलाने ह्मणतात, हे खरे आहे काय?
जोतीराव गोविंदराव फुले. उ० या सर्व विस्तीर्ण पोकळीत अनंत तारे आहेत, त्यापैकी आपल्या अति संनिधचे सूर्य आणि चंद्र हे उभयता या पृथ्वीवरील एकंदर सर्व जलचर भूचर आणि वनचरासह वनस्पतीचे प्राण जीवन आहेत, ह्मणून निर्विवाद आहे. व तसेच बाकी शनी वगैरे ग्रह एकट्या मानव स्त्रीपुरुषांस पीडा देतात हाणून सिद्ध करिता येत नाही. तसेच शनी वगैरे गृहांच्या क्रमणाच्या संबंधाने एखाद्या वेळी या आपल्या पृथ्वीवरील एकदर सर्व प्राणीमात्रास काही एक तऱ्हेचे हित अथवा अनहित होण्याचा जरी संभव आहे; तरी ते एकदर सर्व प्राण्यांपैकी फक्त मानव स्त्रीस अथवा पुरुषास पीडा देतात, ह्मणून सिद्ध करता येणार नाही कारण, शनीवरील एकंदर सर्व प्रदेश इतका विस्तीर्ण आहे की, त्याच्या निर्वाहाकरिता चार चंद्र आहेत व त्यास आपल्या सर्वांच्या निर्मिकाने नेमून दिलेले उद्योग एके बाजूला ठेऊन तो या भूमंडळावरील एखाद्या मानव व्यक्तीस पीडा देण्यास येतो आणि ती पीडा टाळण्याकरिता अज्ञानी लोकानी धूर्त आर्यभट जोशांस भक्कम दक्षिणा दिल्याने दूर होती. ही सर्व पोटबाबू आर्य जोशांची लबाडी आहे..
बळवंतराव. प्र०-त्याचप्रमाणे आकाशातील मेष व वृषभ ग्रह या भूमंडळावरील चतुष्पाद बैल व मेंढ्यांबरोबर टकरा घेण्याचे एकीकडेच ठेवून
येथील एखाद्या द्वीपद मानव स्त्रीपुरुषाच्या राशीला येऊन त्यांस पीडा देण्यास समर्थ होतात हे कसें?
जोतीराव उ०- अहो! त्यांच्या या भूमंडळावरील चतुष्पाद भाऊबंदास म्हणजे बैलास जन्म देणाऱ्या गार्यासह मेढ्यास अघोरी आर्यभट ब्राह्मण त्यास खाण्याच्या निमित्तानें यज्ञामध्ये त्यांचा बुक्यांनी वध करून त्याचे मास जरी ते गिधाडासारखे खात होते, तरी त्यांच्याने त्यावेळी आर्यभट ब्राह्मणाचे काही नुकसान करवले नाही; तथापि हल्लीच्या सत्ययुगात जर गाया मेंढ्यांस ईश्वरकृपेने वाचा फुटली असती, तर त्यांनी धूर्त आर्यातील ग्रंथकारांची नाके ठेचण्यास कधीही मागेपुढे घेतले नसते.
बळवंत प्र० तथापि आर्यातील ग्रहशास्त्रवेत्ते आकाशातील ताऱ्यांच्या संबंधाने मानव स्त्रीपुरुषाच्या जन्मवेळेवरून त्यांच्या नांवांची मूळाक्षरे काढितात आणि त्या मूळाक्षरावरून त्याच्या जन्मपत्रिका वर्तवितात आणि त्यामध्ये त्यास पुढे होणारे लाभाविषयी व त्यास पुढे येणाऱ्या संकटाविषयी भाकीत लिहून ठेवतात, याविषयीं येथे थोडासा उलगडा करून प्रतिपादन कराल, तर बरे होईल.
जोतीराव उ०- आकाशामध्ये सत्ताविस नक्षत्रे आहेत, त्यापैकी येथे मानव स्त्री-पुरुषांच्या मूळच्या नावाचा सिद्ध करण्याकरिता या प्रसंगी सत्ताविस नक्षत्रे आणि बारा राशींची नावे कामापुरती घेतो ती अशी नक्षत्रे अश्विनी, भरणी कृतिका, रोहिणी वगैरे आणि राशी- मेष, वृषभ वगैरे आता प्रत्येक दिवशी एक नक्षत्र असते. त्याचे वेळचे चार भाग करून त्या प्रत्येकांस पहिलें, दुसरे वगैरे चरणे ह्मणतात. प्रथम स्त्री अथवा पुरुष यांचा जन्म अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या चरणात झाला, तर त्याचे चु होते. दुसऱ्या चरणात झाला, तर त्याचे नाव चे होते. तिसऱ्या चरणात झाला, तर त्याचे नाव चो होते आणि चवच्या चरणात झाला, तर त्याचे नाव ला होते. भरणी नक्षत्राच्या पहिल्या चरणांत झाला, तर त्याचे नाव ली होते. दुसऱ्या चरणात झाला, तर त्याचें नांव लू होतें, तिसऱ्या चरणांत झाला, तर त्याचें नांव ले होते आणि चवथ्या चरणांत झाला, तर त्याचे नाव लो होते. कृतिका नक्षत्राच्या पहिल्या चरणांत झाला, तर त्याचे नाव आ होते. दुसऱ्या चरणांत झाला, तर त्याचे नाव इ. होते इत्यादि. यावरून मानव स्त्री-पुरुषांचा जन्म होताना त्यावेळी नक्षत्राचे कोणते चरण होते, म्हणून समजणारे लोक फारच विरळा. त्यातून नक्षत्राचे पहिले व दुसरे चरणाचा संधी होताना एक शतांश निमिषाची घालमेल झाल्याबरोबर चे याची चू अथवा चू-याची चे होण्याचा संभव आहे. त्याचप्रमाणे अश्विनीचीं चार भरणे, भरणीचीं चार चरणे आणि कृतीकाचे पहिले चरण. असे एकदर सर्व नऊ चरणे मिळून एक मेष रास होती. आता मेष व वृषभ राशीचा संधी होताना एक शताश निमिषाची त्याच्यामध्ये घालमेल झाल्याबरोबर, वृषभ राशीची मेष रास अथवा मेष राशीची वृषभ रास होण्याचा संभव आहे. त्या सर्वांवरून मानव स्त्री-पुरुषांचा जन्म होतेवेळी घंगाळाच्या पाण्यात वाटी टाकून घटका पाहाणारे फारच थोडे; परंतु वाव अथवा कासऱ्याने सूर्य अथवा एखादा रात्रीचा तारा मोजणारे बहुत सापडतील. यावरून आर्यातील ग्रहशास्त्रवेत्ते मुली मुलांच्या जन्मपत्रिका कोणत्या तऱ्हेने वर्तवितात, याविषयी आपणास खासा अनुभव असेलच याशिवाय आपण पेशवे सवाई माधवराव यांची जन्मपत्रिका वाचून पहा, म्हणजे आर्यजोशांची ठकबाजी तुमच्या सहज लक्षात येईल.
बळवंतराव प्र०-बरे सुचले कोहो ! मानव स्त्री-पुरुष बालकांनी आपल्या मातेच्या उदरी जन्म पावलेल्या वेळेविषयी आर्य गृहशास्त्रवेत्यांनी ठरविलेल्या मताप्रमाणे आपण प्रतिपादन केलें, हे आपण ठीक केलें. परंतु एकंदर सर्व मानव स्त्री पुरुष आपल्या मातेच्या उदरांत असता त्यांच्या सातव्या महिन्यांत का आठव्यात का नवव्या महिन्यात ते साक्षात् सजीव प्राणी होऊन त्यांचे जन्म पावण्याची मुख्य वेळ म्हणावी, या दोहोंपैकी कोणती मुख्य वेळ खरी आहे? याविषयीं नीट उलगडा करून सांगाल, तर बरे होईल...
जोतीराव उ० याविषयीं आर्यातील ग्रहशास्त्रवेत्यांनी या कामी केवळ आपली पोटे जाळण्याकरिता ज्योतिषशास्त्रांत हे मनःकल्पित थोतांड उभे केले आहे, कारण मानव स्त्रियांच्या उदरांत अथवा उदराबाहेर आलेल्या बाळकांची मुख्य जन्म काळाच्या दोन्ही वेळा नव्हेत परंतु स्त्री-पुरुष जेव्हां एकांत स्थळी रमतात, तेव्हां स्त्रीच्या उदरांत मानव पुरुष आपल्या स्वतः स्वयंभू अवताराचे बीजारोपण करितो. याविषयी आर्यातील गृहशास्त्रवेत्यांनी स्त्री-पुरुषांपासून त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नीकी बरोबर माहिती काढून जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्या सर्वास गमतीकरिता या प्रसंगी बरे ह्यटले असते.
बळवंतराव प्र० मानव पुरुष जेव्हा आपण स्वतः स्त्रीच्या उदरांत अवतार धारण करितो, तेव्हा तो आपल्यासारखा मानव पुरुष न जन्मता, तोच नेहमी अथवा पाळीपाळीने स्त्री अथवा पुरुष होऊन जन्म पावतो, याविषयी आपणा सर्वाच्या निर्मिकाने आपल्या हातांत कोणती किल्ली ठेवली आहे, तिचे आपण कृपा करून जर येथे थोडेसे प्रतिपादन कराल, तर आपले एकदर सर्व मानवप्राण्यावर मोठे उपकार होणार आहेत.
जोतीराव उ०- आपण सर्वाच्या निर्माणकर्त्याने निर्माण केलेल्या एकंदर सर्व प्राणीमात्रांसह मानव पुरुष, जेव्हां आपण स्वतः स्त्रीच्या उदरात अवतार धारण करितो, तेव्हा तो आपल्यासारिखा मानव पुरुष होऊन न जन्मता, तोच नेहमी अथवा पाळीपाळीने स्त्री अथवा पुरुष होऊन जन्मतो. याप्रीत्यर्थ आपल्या सर्वाच्या निर्मीकाने आपल्या हातात कोणती किल्ली ठेविली आहे, याविषयी प्रतिपादन करण्याचे हे स्थळ नव्हे व तसे केल्याने हा विषय येथे विनाकारण फुगून त्याचा माझ्या अज्ञानी शूद्रादि अतिशूद्र बांधवांसह इतर मानव वाचकांस वाचण्याचा कंटाळा येणार आहे. या भयास्तव आपणा सर्वांच्या निर्मीकाच्या सत्तेने दुसऱ्या एखाद्या प्रसंगी याचें पृथक, मला सविस्तर विवेचन करिता येईल.