फेब्रुवारी १९१७ मध्ये गांधींकडून एक वर्षाची सुटी घेऊन विनोबा संस्कृत अभ्यासासाठी वाई येथे दाखल झाले. वाई येथे त्यांनी प्रथम पंडित नारायणशास्त्री यांची भेट घेऊन "वेदाभ्यास अस्पृश्यास शिकविण्याची आपलीतयारी आहे का?" अशा प्रश्न विचारला. पं. नारायणशास्त्रांनी होकार दिल्यानंतर पाठशाळेच्या नियमानुसार विनोबांचे संस्कृत अध्ययन सुरू झाले. याच काळात वाईच्या पाठशाळेत पुढे तर्कतीर्थ म्हणून प्रसिद्धी मिळालेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीही होते. त्यांनी विनोबांच्या त्या काळातील संस्कृत अभ्यास, व्रतपालन इत्यादी बाबत आठवणी सांगताना, 'योगशास्त्रात उत्तम मध्यम व मंद असे तीन अधिकारी असतात उत्तम अधिकारी सहा महिन्यातच तयार होतो" त्याचे प्रत्यतर विनोबांच्या ठिकाणी आले. सहा महिन्यातच शांकर प्रस्थानत्रयीवर विनोबांनी अधिकार मिळविला, असे गुरुवर्यांना आढळून आले.' असे म्हटले आहे. याशिवाय गीता, उपनिषद, पांतजलयोगसूत्र आणि मनुस्मृतीवरील चिकित्सक अभ्यासही सहा महिन्याच्या काळात विनोबांनी केला.
अध्ययनाची सुरुवात : विनोबांच्या अभ्यासाविषयी आपले मत देताना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी लिहितात, 'विनोबांच्या परिचयानंतर त्यांच्या वाणीचे वैभव लक्षात येते. अध्यात्मविद्या आणि विविध भाषा हे विनोबांच्या अभ्यासाचे विषय होते. वाईस येण्याच्या अगोदरच त्यांची ज्ञानेश्वरीची आठ पारायणे, गीतारहस्याचे पाच वेळा वाचन, तुकाराम गाथा, दासबोध, मोरोपंत इत्यादीचा अभ्यास झालेला होता. एकीकडे संस्कृतचा अभ्यास आणि त्याचवेळी विनोबांची पुणे, कऱ्हाड, सांगली, मिरज, इत्यादी ठिकाणी पायी प्रवासही करताना जनतेच्या आर्थिक, सामाजिक स्थितीचे अवलोकन करीत. गीतेवर अनेक भाषणेही दिली... आपल्या पन्नासाव्या भाषणात विनोबा म्हणाले, "गीतेपेक्षा श्रेष्ठ वाचनीय कोणताही ग्रंथ नाही, तरी परंतु मला असा एक श्रेष्ठ पुरुष सापडला, जो गीतेतील तत्त्वज्ञानाप्रमाणे भाषणेही देतो त्याप्रमाणे वागतो ते माझे गुरू साबरमती आश्रमात राहतात." या दरम्यान तर्कतीर्थ विनोबांच्या घरी बडोद्याला मुक्कामाला होते. विनोबांनी पुन्हा प्रपंच करावा अशी त्यांच्या आईवडीलांनी इच्छा व्यक्त केली तेव्हा तर्कतीर्थ म्हणाले, "ते आता अशक्य आहे, ती स्वयंसिद्ध प्रेरणा आहे, तिचा उलटा परिणाम होणार नाही, विकासच होणार. गांधींचा प्रभाव त्याचेवर पडला याचे कारण समानधार्मित्व होय."
बापूंना पत्र : विनोबांनी एक वर्षासाठी आश्रम सोडला असला तरी त्याच्या आश्रमातील आपल्या सहकाऱ्यांशी आणि बापूजींशी पत्र व्यवहार चालूच होता. आपले मित्र मोघे, धोत्रे, काळे यांना लिहीलेल्या एका पत्रात विनोबा म्हणतात, 'आपल्या आयुष्याचे धोरण, आयुष्य संपविण्याआधी ठरवले पाहिजे. आपल्या " कार्याकडे आपली दृष्टी असावी. तुमच्या आमच्यासारखे तरूण तपश्चर्या करु लागल्यास भारतमातेचा उद्धार लवकर होईल, भारतमातेच्या हाकेला प्रतिसाद द्या ही विनंती." या पत्रव्यवहाराबरोबरच १०-२-१९१८ रोजी विनोबांनी गांधींना लिहिलेले सविस्तरपत्र म्हणजे त्यांनी आपल्या एका वर्षाच्या सुट्टीत केलेल्या कार्याचा अहवालच आहे. या पत्रात विनोबा लिहीतात, परमपूज्य बापूजी,
वर्षापूर्वी स्वास्थाअभावी आश्रमातून सुट्टी घेऊन मी बाहेर आलो, दोन तीन महिन्यात आश्रमात परतेन असे त्यावेळी वाटत होते. मात्र जवळ जवळ एक वर्ष उलटले तरी मी आश्रमात परतू शकलो नाही. त्यामुळे मी आश्रमात परतेन किंवा नाही, मी जिवंत आहे वा नाही अशी शंकाही आपणास आली असेल. पण यात सारा दोष माझाच आहे. कारण मामा फडके यांना एक दोन पत्रे लिहिली, त्यात 'सत्याग्रह' सुरू करण्याविषयी काही ठरत असल्यास कळवावे, मी सर्व काही सोडून आश्रमात परतेन अन्यथा ज्यासाठी मी आश्रमाबाहेर राहत आहे ते पूर्ण झाल्यावरच आश्रमात येईन असे लिहिले होते. माझा जन्मच आश्रमासाठी आहे अशी माझी श्रद्धा आहे. तर पुन्हा प्रश्न असा पडतो मी वर्षभर आश्रमाबाहेर का राहिलो?
वयाच्या सहाव्या वर्षी मी ब्रह्मचर्य पाळून देशसेवा करण्याचे ठरवले आहे. हायस्कूलात मात्र गीतेची आवड निर्माण झाली. माझे गीतेवरील प्रेम अजूनही कायम आहे. त्यामुळेच मी वेदांत आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याचा निश्चय केला. वाईचे नारायणशास्त्री मराठे हे आजन्म ब्रह्मचारी नामांकित विद्वान असून वेदांत आणि इतर शास्त्रे शिकवितात. त्यांचेकडेच उपनिषदांचा अभ्यास करण्याच्या मोहामुळे मी वाईत अधिक राहिलो. संस्कृतच्या अभ्यासाशिवाय याकाळात मी आणखी काम केले हे आपणस कळवितो. याकाळात उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्र आणि शांकरभाष्य, मनुस्मृती, पांतजलयोगसूत्र यांचा अभ्यास केला. त्याशिवाय याज्ञवल्क्य स्मृती, विशेषिक सूत्र, न्यायसूत्र या. ग्रंथाचे वाचन केले. आणखी काही शिकावे अशा मोह नसून जे सहज वाचन होईल त्याचेच वाचन करण्याची इच्छा राहिली आहे. आश्रम सोडण्याचे दुसरे कारण प्रकृती सुधारणे. त्यासाठी दररोज १० ते १२ मैल पायी चालणे, आठ ते दहा शेर दळणे, तीनशे सूर्यनमस्कार अशा व्यायामामुळे माझी प्रकृती आता सुधारली आहे.
सुट्टीतील आहार व कार्यक्रमः दैनंदिन आहारात पहिल्या सहा महिन्यानंतर मीठ, मसाला बंद केला असून मीठ मसाला आजन्म न घेण्याचा मी निश्चय केला आहे. फक्त दूध घेत असून, दूध न घेण्यासाठी अनेक प्रयोग करूनही दूधाशिवाय जमत नाही हे सिद्ध झाले. तरी पण भविष्यात दूध सोडण्याबाबत शक्यता निर्माण झाल्यास तेही घेणे सोडण्याची माझी तयारी आहे. तसेच या काळात महिनाभर फक्त लिंबू पाणी घेत राहिलो, त्यामुळे अशक्तपणा जाणवला. आज मी खालीलप्रमाणे आहार घेत आहे. दूध साठ तोळे, दोन भाकरी (वीस तोळे ज्वारीची) केळी चार किंवा पाच, एक लिंबू उपलब्ध असल्यास. आश्रमातील भोजनांबाबत मी आपल्या सल्ल्यानुसार आहार घेईन. चवीसाठी म्हणून कोणताही पदार्थ घेण्याची इच्छा होत नाही. तरीपण वर नमूद केलेला माझा आहार बराच खर्चीक आहे. माझ्या आहारावरचा दररोजचा खर्च पुढीलप्रमाणे केळी आणि लिंबू एक आणा, ज्वारी अर्धाआणा, दूध सव्वा आणा, एकूण खर्च पाऊणे तीन आणे यातील फेरफाराबाबत मला आपले मार्गदर्शन हवे आहे. कृपया पत्राने कळवावे.
१) आतापर्यंत मी खालील प्रमाणे कार्य केले आहे. गीता वर्ग
चालवला. सहा विद्यर्थ्यांना फी न घेता अर्थासहीत गीता
शिकविली.
२) दोघांना नऊ उपनिषदे शिकविले.
३) चौघांना ज्ञानेश्वरीचे सहा अध्याय शिकवले.
४) हिंदी प्रचारासाठीविद्यार्थ्यांसाठी हिंदी वर्तमानपत्राचे वाचन
केले.
५) दोघांना इंग्रजी शिकवले.
६) ४०० मैल पायी प्रवास करून रायगड, सिंहगड इत्यादी किल्ले
पाहिले.
७) सत्याग्रहाश्रम तत्त्वाचा प्रसार करण्यासाठी विविध प्रयोग केले.
८)वाईत मित्रमंडळ नावाची संस्था स्थापन केली. संस्थेचे
वाचनालय सुरू केले. वाचनालयाच्या मदतीसाठी दळण दळून
देण्याचा वर्ग सुरू केला.
दळणाचे आलेल्या पैशातून दोन महिन्यात ४०० पुस्तके जमा
केली.
९) प्रवासात गीतेवर एकूण ५० प्रवचने दिली. आश्रमात परत येताना मुंबईपर्यंत पायी नंतर रेल्वेने येईन. माझ्यासोबत २५ वर्षाचा एक विद्यार्थीही असेल. मी उशारीरात उशीरा चैत्र प्रतिपदेपर्यंत आश्रमात पोहोचेन.
१०) बडोद्यातील १०-१५ मित्रांनी लोकसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तीन वर्षांपूर्वी आम्ही जी संस्था स्थापन केली होती, त्या संस्थेच्या वार्षिकोत्सवात मी सामील झालो होतो. त्यात हिंदी प्रचाराचा आपला विचार मांडला आणि त्यासाठी काम करण्यास ही संस्था व त्याचे सर्व सभासद तयार आहेत.
सुट्टीतील आचरण: शेवटी सत्याग्रह आश्रमाचा निवासी या नात्याने माझे आचरण काय आहे हे सांगणे आवश्यक वाटते.
१) अस्वाद या संबंधी वर लिहिलेले आहे.
२) अपरिग्रह लाकडी ताट, लाकडी वाटी, आश्रमातील एक तांब्या, धोतर,कांबळे आणि पुस्तके इतकाच परिग्रह, संचय आहे. बंडी, कोट, टोपी न वापरण्याचे व्रत घेतले असून अंगावर धोतरच पांघरीत असतो.
३) माझ्या मते सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्याचे पालन मी काटेकोरपणे केले..
या पेक्षा अधिक काय लिहू? स्वप्नातही ईश्वर माझ्याकडून आपली काय सेवा घेणार आहे! ती खात्रीपूर्वक सांगू शकेन की एक सोडून माझ्या स्वयंपाक, माझा अभ्यास आश्रम नियमानुसारच आहे. म्हणजे मी आश्रमाला आणि आश्रम हेच माझ्ये साध्य आहे.
सत्याग्रह किंवा दुसरी समस्या निर्माण झाल्यास मी लगेचच परतेन नसता वर लिहिलेल्या वेळी ही आवश्य येईन. आश्रमातील बदल काय? तेथे विद्यार्थी किती आहेत? राष्ट्रीय शिक्षणाची कोणती योजना आहे? आपणच मला पत्र लिहावे. असा आपणास पितृतुल्य समाजणाऱ्या विनोबाचा आग्रह आहे.
दोन चार दिवसात वाईहून मी इतरत्र जाईन.
विनोबांचा प्रणाम
ह्या पत्रानंतर मात्र बापू सद्गतीत झाले. 'हा तर भीम आहे भीम. गोरक्षाने ''मच्छिद्राला हरवले' शिष्याने गुरुचा पराभव केला-बापूचे चार शब्द या सविस्तर पत्राच्या उत्तरात बापूंनी विनोबाला कळवले.
"तुझ्यासाठी कोणते विशेषण वापरू हे सूचतच नाही. तुझे प्रेम आणि चारित्र्यामुळे मी तुझ्या मोहात गुंतत चाललो आहे. तुझी परीक्षा घेण्यास मी असमर्थ ठरलो आहे. तू स्वतःच करू घेतलेल्या परीक्षेला मी स्वीकारीत असून तू मान्य केलेले तुझे पितृत्व मी स्वीकारीत आहे. माझी कामना तू पूर्ण केली आहेस. माझ्या मते तोच खरा पिता जो आपल्याही पेक्षा चारित्रवान पूत्रास घडवतो आणि खरा पूत्र तोच जो पित्याचे कार्यास वृद्धींगत करतो. पिता सामवादी, दयामय, दृढ असल्यास मुलाने या गुणांचा अंगिकार करावा आणि हे सर्व काही तू करून दाखविले आहेस. अर्थात तु जे काही केले त्यासाठी मी काही प्रयत्न केले असे मला नाही वाटत. तू मला जे पितृपद दिले आहेस ते तुझी भेट म्हणून स्वीकारीली आहे. त्या योग्य बनण्याचा मी प्रयत्न करीन. पण जर मी हिरण्यकश्यपूप्रमाणे वागू लागल्यास तू प्रल्हाद बनून माझा सादर निरादर करावा.
आश्रमाबाहेर राहूनही तू आश्रमनियमाचे पालन केले ही गोष्ट खरी ठरली असून तुझ्या आश्रमात परतण्याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नव्हती. मामा फडक्यांनी पाठविलेले पत्र मामांनी मला वाचून दाखविले होते. ईश्वर तुला दीर्घायुष्य बहाल करो, भारताच्या उन्नतीसाठी तुझी सेवा घडो हीच माझी इच्छा.
तुझ्या दैनंदिन आहारात सध्या काही बदल करावयाची गरज नाही. दूध घेणे आता सोडू नको. गरज भासल्यास दूध घेणे थोडे वाढविल्यास हरकत नाही.. रेल्वे सत्याग्रहाची तूर्त आवश्यकता नसली तरी त्याच्या प्रचाराची मात्र गरज आहे. खेडा जिल्ह्यात सत्याग्रहाची गरज भासेल. सध्या मी रमता राम आहे एक दोन दिवसात दिल्लीस जाईन,
प्रत्यक्ष भेटीत सर्व विशेष, सर्वांना तुझ्या भेटीची उत्सुकता आहे. आश्रम सोडून वर्ष झाले त्याच दिवशी आरतीच्या वेळी उघड्या डोक्याने, अनवाणी जाताना ज्या वेषात होते त्या वेषातच विनोबा आश्रमात पुन्हा दाखल झाले. ते परतणार आहे हेही कुणाच्या लक्षात नव्हते. त्या दिवशी सोमवार म्हणजे गांधींच्या मौनाचा दिवस होता, त्यामुळे बापूंना त्रास देऊ नये असा विचार विनोबांनी केला आणि तडक स्वयंपाक घरात जाऊन भाजी चिरण्याचे काम सुरू केले.
दुसऱ्या दिवशी न्याहारीच्या वेळी विनोबांना पाहून गांधींजी खूष झाले. त्यांच्या वेळेच्या बंधनाच्या पालनाने प्रसन्न होत, आश्रमात त्यांचे स्वागत करीत म्हटले, "तुमची सत्य निष्ठा पुन्हा एकदा सिद्ध झाली," यावर विनोबा उद्गारले, "ही माझी गणितनिष्ठा आहे." त्यावर हसत बापूंनी उत्तर दिले, "गणितात कधी
सत्याचा अपलाप असू शकतो का?" सत्याग्रह आश्रमात विनोबा सतत सत्य आणि ब्रह्मांची अभिलाषा बाळगून स्वतःला शून्यवत मानीत. याच काळात विनोबांनी गांधींच्या मंगल प्रभातचे मराठीत
रुपांतर करून त्याच्या प्रस्तावनेत काही कवितेच्या काही ओळी लिहिल्या त्यातील शेवटच्या दोन ओळी होत्या-अद्वितीय चि एकत्व गुरुचे गौरवूनि जे विन्या शून्य विना -भूत फावला गणितापरी ।।
गुरुचे एकत्व अद्वितीयच आहे. ज्याच्या गौरवाने विन्या- विनोबा आणि शून्य गणिता समान सफल झाला आहे.