नारसिंह, हिरण्यकश्यपु, प्रल्हाद, विप्र,
विरोचन इत्यादिकाविषयी.
धो०- वराह मेल्यावर द्विज लोकाचा कोण अधिकारी झाला?
जो०- नृसिंह,
धो० नृसिंह स्वभावाने कसा होता?
जो०- नृसिंहाचा स्वभाव लोभी, कृत्रिमी, फितूरी, कपटी, घातकी, निर्दय आणि कूर होता. तो शरीराने सदृढ असून अतिशय बलवान होता.
धी त्याने काय काय केले ?
जो०- प्रथम त्याने हिरण्यकश्यपूच्या वधाविषयी विचार चालविला व आपणास त्याला मारिल्याशिवाय त्याचे राज्य मिळायाचे नाही असे त्याचे मनात पक्केपणी समजले. हा त्याचा दृष्ट हेतु सिद्धीस जाण्याकरिता त्याने गुप्त रीतीनें बहुत दिवस प्रयत्न करून, एका आपल्या द्विज पंतोजीकडून हिरण्यकश्यपूच्या प्रल्हाद या नावाच्या मुलाच्या कोवळ्या मनावर आपल्या धर्माची मूलतत्त्वं वसविल्यावरून प्रल्हादाने आपल्या हरहर या नावाच्या कुळस्वामीची पूजा करण्याची वर्ज केली. नंतर हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचे भ्रष्ट झालेलें मन पुनः आपल्या कुळस्वामीची पूजा करण्याकडे वळवावे म्हणून नाना तऱ्हेचे उपाय केले; तथापि नृसिंह हा प्रल्हादास आतून मदत करीत असल्यामुळे हिरण्यकश्यपूचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. शेवटी नृसिंहाने त्या अज्ञानी मुलास अनेक थापा देऊन त्याचे मन इतके भ्रष्ट केले की, त्याने आपल्या पित्याचा वध करावा म्हणून त्याचे मन वळविले खरे, परंतु ते अघोर कर्म करण्यास त्या मुलाची छाती होईना सबब नृसिंहाने संधी पाहून ताबुतातील वाचीच्या सोंगासारिखे आपल्या सर्व आगास रंग देऊन तोंडात मोठमोठाले खोटे दांत धरून लांब लांब केसांची दादी लाविली आणि तो एक तऱ्हेचा भयंकर सिंह बनला. हे सर्व कृत्रिम छपविण्याकरिता नृसिंहाने भरजरीचे एक उंची लुगडे नेसून गरतीसारिखा आपल्या तोंडावर लांबलचक पदर घेऊन मोठ्या थाटानें चमकत उमकत त्या मुलाच्या मदतीने एके दिवशी त्याचे पित्याच्या विशाळ मंदिरात खांबांची गर्दी होती त्यात जाऊन लपून उभा राहिला. इतक्यात हिरण्यकश्यपूनें सर्व दिवसभर राज्यकारभार करून थकल्यामुळे संध्याकाळ झाल्याबरोबर आपल्या मंदिरात एकाती येऊन निर्भयपणाने स्वस्थ विसावा घेण्याच्या इराद्याने पलंगावर लोळत पडला न पडला, तोच नृसिंहाने जल्दी करून डोवरचा लुगड्याचा पदर कंबरेस गुडाळून त्या लपलेल्या खांबातून निघून हिरण्यकश्यपूच्या अंगावर एकदम जाऊन पडला. आणि त्याने आपल्या हातातील वाघनखांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याचा वध केल्याबरोबर नृसिंहाने तेथील सर्व द्विजासहित रात्रीचा दिवस करून आपल्या मुलुखात पळून गेला. इकडेस नृसिंहाने प्रल्हादास फसवून असें अघोर कर्म केलेले उघडकीस आल्यावरून क्षत्रियांनी आर्य लोकास मुळीच द्विज म्हणण्याचे सोडून त्यांस विप्रिय म्हणू लागले? व पुढे त्या विप्रिय शब्दापासून त्यांचे नांव विप्र पडले असावे पुढे क्षत्रियांनी नृसिंहास नारसिंह म्हणजे सिहाची बायको असे निद्य नाव दिले. शेवटी हिरण्यकश्यपूच्या पुत्रातून कित्येकांनी तर नारसिंहास धरून आणून त्यास यथास्थित शासन करावे म्हणून दीर्घ प्रयत्न केला. परंतु नारसिंहाने हिरण्यकश्यपूचे राज्य घेण्याची मुळीच आशा सोडून केवळ मुलुखास आणि जिवास सभाळून पुढे काही दुसरी गडबड केल्याशिवाय मरण पावला.
धोतर मग नारसिंहाच्या असा अघोर कर्मावरुन त्याच्या नावाने मागे पुढे कोणी त्याची छीः यू करू नये या भयास्तव विप्र इतिहासकर्त्यानी काही काळ लोटल्यानंतर संधी पाहून नारसिंहाविषयी तो खांबापासून जन्मला वगैरे नाना तऱ्हेच्या लबाड्या कल्पून इतिहासांत दाखल केल्या असाव्या, असे सिद्ध होते.
जो०-यांत काही संशय नाही. कारण तो जर खांबापासून जन्मला असेल असे म्हणावे, तर त्याची कोणी तरी दुसऱ्याने नाळ कापून त्याच्या तोडात दुधाचा बोळा दिल्याशिवाय तो कसा वाचला असेल. नंतर त्यास कोणी तरी दुसऱ्याने दाईचें अथवा वर दूध पाजल्याशिवाय तो लहानाचा मोठा कसा झाला असेल! कदाचित् तसेंहि घडून आले असेल म्हणावे, तर तेणेंकरून एकंदर जो सृष्टिक्रम चालत आला आहे, त्यास बाध येतो. या गप्पाच्या विप्र ग्रंथकारांनी नारसिंहास एकदम लाकडाच्या खांबातून बाहेर काढल्याबरोबर त्यास दुसरी कोणाची मदत न देती आपल्या आपण इतका शक्तिमान दाढी मिशांचा ठोंब्या केला की, ज्याने लागलीच हिरण्यकश्यपूस मांडीवर घेऊन त्याचे पोट नखाने फाडून त्याचा वध केला अरेरे!! जो पिता आपल्या समजुतीप्रमाणे पितृधर्म मनी आणून केवळ शुद्ध ममतेने आपल्या स्वपुत्राचे मन खऱ्या धर्माकडेस वळवावे म्हणून खटपट करीत होता, त्यास त्या सर्वसाक्ष आदिनारायणाच्या अवताराने असे देहान्त शासन करावे काया असे शासन अज्ञानी मनुष्याचा अवतारसुद्धी करणार नाही. तो आदिनारायणाचा अवतार असल्यामुळे त्याने त्या हिरण्यकश्यपूस दर्शन देताच मी आदिनारायण आहे अशी त्याची खात्री करून, पिता व पुत्र या उभयतांमध्ये सलोखा करून देण्याचे एकीकडेस टाकून त्याचा असा निर्दयपणाने वध केला, हें मोठे आश्वर्य होय. त्याच्याने जर त्या हिरण्यकश्यपूची उपदेश करून खात्री करवली नाहीं तरी तो सर्वांचे बुद्धीचा दाता कशाचा? यावरून असे सिद्ध होते की, नारसिंहामध्ये या आपल्या पुण्यातील एका शेणपुज्या रांडेइतकी अक्कल नव्हती; कारण की जिने, पहा, येथील एका प्रतिबृहस्पती म्हणविणाऱ्या एका विद्वानास केवळ आपल्या गोड बोलण्याचा लळा लावून त्यास आपला गुलाम करून टाकिलें आहे. हल्ली हिंदुस्तानात अमेरिकन आणि युरोपियन मिशनरींनी आपल्यातील कित्येक तरुणात ख्रिस्ती धर्मानुसारी केले आहेत; परंतु त्यानी त्यातून एकाहि तरुणाच्या पित्याचा वध केला नाही. हे मोठे आश्चर्य होय ।
घो०- नारसिंहाची अशी फजिती झाल्यावर विप्रानी प्रल्हादाचे राज्य घेण्याविषयी काही प्रयत्न केले किंवा नाही?
जो०- विप्रानी प्रल्हादाचे राज्य घ्यावे या इराद्याने अनेक तऱ्हेचे चोरून उपाय केले परंतु ते सर्व व्यर्थ गेले. कारण, प्रल्हादाचे पुढे डोळे उघडून त्याच्या मनात विप्राचे कपट दिसून आले. यावरून प्रल्हादाने विप्रांचा काडीमात्र विश्वास न धरता सर्वाशी वरकाती सेह ठेवून, आपल्या राज्याची नीट व्यवस्था करून मरण पावला. नंतर त्याचप्रमाणे प्रल्हादाचा पुत्र विरोचन याने आपले राज्य सभाळून त्यास बळकटी आणून मरण पावला. विरोचनाचा पुत्र बळी हा मोठा पराक्रमी निघाला. त्याने प्रथम आपल्या आश्रयाने रहाणाऱ्या लहान सहान क्षेत्रपतीस दुष्ट दंगेखोराच्या त्रासापासून सोडवून त्याजवर आपले वर्चस्व बसविले. नंतर त्याने आपले राज्य उत्तरोत्तर वाढविण्याचा क्रम चालविला. त्या वेळी विप्राचा मुख्य अधिकारी वामन होता, त्यास ते सहन होईना. सबब बळीचे राज्य एकदम लवून घ्यावे म्हणून चोरून मोठी फौज तयार करून एकाएकी बळीच्या सरहदीवर येऊन ठेपला. वामन अतिशय लोभी, धाडस आणि हेवेखोर होता.