सरकारी शाळाखाती. म्युनिसिपालिटी, दक्षणा प्राइज कमेटी व भट वर्तमानपत्रकत्यांची जूट आणि शूद्रादि अतिशूद्रांच्या मुलानी विद्या शिकू नये म्हणून भट लोकांचा कट इत्यादिकाविषयी..
धो०- सरकारी शाळाखात्यातील भटकामगार गुलाबी लबाड्या करतात त्या कोणत्या?
जो०- हल्ली ज्या पुस्तकाच्या पडोशावरून एकंदर सर्व भटांच्या ग्रंथातील लबाड्या उघडकीस येऊन त्यांच्या पूर्वजाची मोठी फजिती होणार, या भयास्तव त्यांनी आपल्या भोळ्या सरकारास, कधी कधी एकांती भेटून व कधी कधी वर्तमानपत्राद्वारे नाना तऱ्हेच्या गुलाबी मसलती देऊन त्याजकडून एकंदर सर्व सरकारी शाळाखात्यांतून ते पुस्तकच हद्दपार करविले. अरे, जर अशा सुधारल्या काळात त्यांचे शिष्य म्हणविणाऱ्या सरकाराने चार मतलबी सुधारल्या भटांच्या गुलाबी मसलती ऐकून एकदर सर्व सरकारी शाळाखात्यातून तसल्या ग्रंथास हद्दपार केले, तर पूर्वीच्या अज्ञानी अधिकाऱ्यांनी चार धर्मभ्रष्ट बोग्याच्या आग्रहामुळे त्या उपदेशाच्या मालकास सुळावर दिले म्हणून आम्हांस तरी का नवल वाटावे?
धो० तर यामध्ये सरकारचा दोष काय आहे?
जो०-सरकारचा जर यामध्ये दोष नाही म्हणावा तर, सरकाराने ज्या सुधारल्या भटाच्या मसलतीवरून तसल्या पवित्र पुस्तकास हद्दपार केले, तर त्या पुस्तकाच्या विरोधी लोकानी केलेली पुस्तके सरकारी शाळाखात्यांतून चालू करून त्या लोकासच शूद्रांचे शाळांत शिक्षक नेमावेत. काय? कारण याविषयी विचार करून पाहिले असता असे सिद्ध होते की, जो काळपावेतो ते पुस्तक ज्या प्रतिवाद्यानी सरकारी शाळाखात्यातून हद्दपार करविले, त्या सर्वांनी नवीन पुस्तके केलेली एकदर सर्व सरकारी शाळाखात्यातून हद्दपार न करविता, सरकार त्यास उलटे मोठमोठ्या बक्षीसा देऊन त्या लोकांसच सरकारी सर्व शाळांमध्ये शिक्षक नेमून त्यास त्या पवित्र पुस्तकाच्या विरुद्ध शूद्रांस तोंडाने उपदेश करण्याची सवड तरी का देते? यास्तव आमच्या भोळ्या सरकाराच्याने त्या पवित्र पुस्तकासारखे, एकदर सर्व सरकारी शाळाखात्यातून त्या प्रतिवाद्यास त्यांच्या पुस्तकासहीत हद्दपार करवत जर नाही तर आमच्या सरकाराने कृपा करून एकदम सर्व शाळाखाती बंद करून आपले घरी स्वस्थ बसल्यास आम्हा शूद्रावरचा काहीतरी कर कमी होईल. कारण विद्याखात्यातील एका मुख्य भटकामगाराच्या निदान दरमहा सहाशे सुती, म्हणजे दरवर्षी (७२००) सात हजार दोनशे रुपये, पदरी आवळावे लागतात. आता सुलतानीचा तर घोरच नाहीं; परंतु असमानी मेहर झाल्यास येव्हढी रक्कम तयार करण्याकरिता शूद्रांच्या किती कुटुंबास एक वर्षभर रात्रंदिवस शेती खपावे लागत असेल बरें! निदान एक हजार कुटुंबे तरी म्हटली पाहिजेत का नको? बरे, या ऐवजाच्या मानाप्रमाणे ह्या बहस्पतीपासून शूद्रास काहीतरी उपयोग होतो काया अरे, चार आणे दररोज मिळणाऱ्या शूद्रविगाऱ्यांस उन्हामध्ये सूर्य उगवल्यापासून तो तो मावळेपर्यंत सडकेवर मातीची टोपली वाहवी लागतात. त्याला बाहेर कोठें जाण्यास एक घटकेची सुद्धा फुरसत होत नाही. आणि वीस रुपये दररोज मिळणाऱ्या भटचाकरांस शाळेत हवाशीर जाग्यांत खुर्ची आसनावर बसून काम करीत असता त्यास म्युनिसिपालिटीचा वराती होऊन, दररोज सकाळी आणि संध्याकाळी थंडाई पडल्याबरोबर आपण सर्व लोकाच्या ओळखीस यावे म्हणून मोठ्या डौलाने घोड्याच्या गाडीत बसून शहरांतील रस्तोरस्ती लोकाच्या पढव्या, शेतखाने पाहून मिरवण्यापुरती फुरसत कोठून मिळते? अरे, त्याने शहरातील आळोआळीने विद्येपासून काय काय फायदे होतात, याविषयी अज्ञानी लोकांस उपदेश करण्याचे एकीकडेस ठेवून त्यास असें मिरवत फिरण्याचें भूषण वाटते, यावरून मिशनखात्यातील दहा रुपये दरमहाचा उपदेशक याच्यापेक्षा हजार वाट्याने बरा का नाहीं बरें! कारण ज्या शहरात तो उपदेशक राहतो त्या शहरातील सर्व अबालवृद्धांस तो उपदेशक आहे. म्हणून ठाऊक असतो; परंतु हा नवाब त्याच्या खालच्या मजल्यातील बिन्हाडकरूस. हा कोण गोमाजी म्हणून माहीत नसतो. अरे, हा आपल्या वरच्या युरोपियन कामगाराजवळ दररोज इकडच्या तिकडच्या चार गप्पा ठोकून मन मानेल तेव्हा तास दोन तास शाळेत शिकून वर्षातून त्यास दोन-चार लेखी रिपोर्ट करितो, म्हणजे ह्याचे काम झाले आणि यालाच चार आर्जवी लोक हमानी चाकर व देशाभिमानी म्हणतात. अरे, या इमानी भट चाकरांनी आजपावेतो शाळाखात्याकडील लाखो रुपये घडांत टाकिले तथापि यांच्या हातून अतिशुद्रांस विद्या देऊन त्यापैकी एकास म्युनिसिपालिटीत सभासद करवले नाही. यावस्त तूंच विचार करून पहा की, हे शाळाखात्याकडील एकंदर सर्व इमानी चाकर आपल्या देशातील अज्ञानी अतिशुद्रांचा किती कळवळा करितात इतकेच नव्हे, परंतु हे देशाभिमानी, म्युनिसिपालिटीत मुख्य अधिकारी असता, यांच्याने गेले सालाच्या पाण्याच्या खरपडात अतिशूद्रांस सरकारी हौदावर पिण्यापुरते पाणी भरू देण्याची मदत करवली नाही. यास्तव कमिटीत अतिशूद्रांपैकी सभासद घेण्याची किती जरुरी आहे!
धो०- तुमचें म्हणणे रास्त आहे; परंतु मी ऐकतो की, कमिटीत हल्ली शूद्रांपैकी कित्येक सभासद इतके विद्वान आहेत की, ते आपली मतें देतेवेळी, अरे गोविंदा म्हणणाऱ्या यंत्रासारखे आपल्या माना हालवून, होय किंवा नाही याचा प्रसाद देतात. कारण, ज्यास मुळींच आपल्या सह्या करण्याची मोठी मारामार, मग तेथे बाकी सर्व आवळ्यायेवढे पूज्य उरले असते, अशा शुद्रसभासदांसारखे कमिटीत खुर्ची असनावर बसून आपल्या माना हालवून सह्या करण्याजोगे काही अतिशूद्रात लोक सापडतील काय?
जो०- असा शूद्र सभासदापेक्षा हजार वाट्याने चांगले लिहिता व वाचिता येते असे पुष्कळ अतिशूद्र सापडतील. परंतु भटांच्या मतलब ग्रंथांच्या आधारावरून एकंदर सर्व अतिशूद्रांस स्पर्श करण्याची बंदी असल्यामुळे सहजच त्या बिचाऱ्यांस शूद्रसभासदासारिखें सर्व लोकात मिसळून श्रीमंत होण्याची सवड नसल्यामुळे त्यास अद्याप गाढवें हाकून आपली पोटे भरावी लागतात,
धो०- एकंदर सर्व जातींचे निरनिराळें संख्याप्रमाण पाहू जाता, कमिटीत विशेषेकरून कोणत्या जातीचे सभासदांचा भरणा सापडतो?
जो०- भट जातीचा
घो० म्हणूनच या कमिटीतील बिगारी आणि भंगीखेरीज करून भटकामगारांचा भरणा फार आढळतो. त्यापैकी पूर्वी नळवाले भट कामगार असल्यामुळे काळ्या उन्हाळ्यात एकंदर सर्व आपल्या जातीच्या भटांच्या वाड्यातील हौदास इतके पाणी मनमुराद सोडीत होते की, तेथील आसपासच्या सर्व भटशेजाऱ्याची धोत्रेपात्रे धुण्याची चंगळ होऊन फार पाणी व्यर्थ वाया जात असे; परंतु ज्या ज्या पेठेत गरीब शूद्रांची वस्ती आहे. त्या सर्व पेठातील हौदात दोन प्रहरानंतर वाटसरास तहान भागविण्यापुरते पाणी मिळत नसते. मग धुण्याधाण्याची रेलचेल कोठूना याखेरीज भटाच्या वस्तीत नवे हौद किती केले आहेत आणि जुनागंज पेठ वगैरे पेठेतील लोकांनी आज किती वर्षे हौद हौद करून कमिटीच्या नावाने हाका मारल्या. परंतु तेथे भटसभासदांचा फार भरणा असल्यामुळे त्या गरिबाची कित्येक वर्षे दादच लागली नाही. परंतु अखेरीस म्हणजे गतसाली जेव्हा पाण्याची फारच तूट पडली, तेव्हा मिठगजातील मागामहारानी काळ्या हौदास शिवून पाणी भरण्यास लागले, तेव्हा आताशी कमिटीने शुद्धीवर येऊन त्या लोकांची दाद घेतली. या कमिटीनें इतका बेलगामी खर्च त्या कामी केला की, तो तिच्यातील मुख्य सभानायकाच्या शहाणपणाला आणि वैभवाला शोभा देत नाही असो, कमिटीत इतकी अंदाधुंदी असता त्याविषयी मन्हाठी वर्तमानपत्रकर्ते कमिटीत गरीबाची दाद लागत नाही. म्हणोन लिहिल्यास पुढे एकंदर सर्व मराठी वर्तमानपत्रातील विषयाचे इंग्रजीत गोशवारे काढून सरकारास दाखविण्याचे काम कमिटीतीलच एका भटसभासदाकडे आहे, तर अशा रिपोर्टराच्याने कमिटीत आपल्या शेजारी माडीशी माडी देऊन बसणाऱ्या जातभावाची भीड न धरिता त्यांच्या (आपल्या) विरुद्ध मजकूर सरकारापुढे कसे ठेववतील?
धो० असा जर चहूकडे भटसभासदांचा भरणा असल्यामुळे बाकी सर्व जातीचे नुकसान होत आहे, तर तुम्ही याविषयी एक लहानशी चोपडी करून दक्षणाप्राईजकमिटीस आर्पण करा; म्हणजे तेणेकरून तरी सरकारचे डोळे उघडतील!
जो०- भटजीशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रांस कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निःपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्य मार्गावर आणितात, या सर्व गोष्टीविषयी म्यो एक लहानसे नाटक करून सन १८५५ सालात दक्षणा प्राईज कमिटीस अर्पण केले. परंतु तेथेही असल्या भिडस्थ भटसभासदाच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना, तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अरे, ही दक्षणाप्राईज कमिटी म्युनिसिपालिटीचीच धाकटी बहीण म्हणण्यास काही हरकत नाही; कारण तिने या कामी शूद्रांस उत्तेजन येण्याकरिता किती ठिकाणी शूद्रांत दिवा लावून उजेड पाहिला आहे तो दाखीव. अखेरीस मी ते पुस्तक एकीकडेस टाकून काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानसी ब्राह्मणांच्या कसवाविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वताच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली तेव्हा एका माझ्या पुणेकर स्रेहाने आग्रह करून त्या चोपडीच्या काही प्रती एकंदर सर्व शाळाखात्याकडील मुख्य अधिकाऱ्यानी विकत घ्याव्यात, म्हणून त्याने मजकडून त्या सर्व अधिकाऱ्यांस सूचनापत्रे पाठविली, परंतु त्यातून एकाही अधिकाऱ्यानें भटांच्या भयास्तव एकसुद्धा चोपडी खरेदी करून आपल्या नांवास बट्टा लावून घेतला नाही.
घो०- तात्यासाहेब, तुम्हाला सर्व लोकांच्या पुढे पुढे करता येत नाहीं, सबब तुमच्या चोपड्या खपत नाहीत.
जो०- अरे बाबा, चांगले काम शेवटास नेण्याकरिता वाईट उपाय योजू नयेत, नाही तर त्या कामाच्या चांगुलपणाळा बट्टा लागतो, त्यांनी एक माझी चोपडी विकत घेतली नाही, म्हणून माझे काही देवाजिने कमी पाहिले आहे काय? नाही. परंतु पुढे मी तसल्या लोकाचे अर्जव करण्याचे धिक्कारून आपल्या उत्पन्नकर्त्या पित्यावर कसा भार घालावा हे शिकलो, यास्तव मी त्याचा त्रिवार आभार मानितों.
घो० नंतर आपण जेव्हा भट वगैरे जातीच्या मुलीकरिता शाळा स्थापिल्या होत्या, तेव्हा सरकाराने मेहरबान होऊन आपल्यास मोठ्या सत्काराने एक शालजोडी बक्षीस दिली. नंतर त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या प्रथक अतिशुद्रांकिरता शाळा स्थापून त्यामध्ये अनेक भट मदतीला घेऊन, त्या सर्व एकंदर शाळामध्ये शिकविण्याचा भरभराट चालू करून आपण मधीच तें काम एकाएकी एकीकडेस टाकून बाजूला झाला. पुढे आपण काही वर्षे लोटल्यानंतर एकदर सर्व युरोपियन लोकाचे घरी जाणे बंद केले, याची कारणे काय असावीत?
जो०- भट वगैर जातीच्या मुलीच्या शाळा घातल्यामुळे सरकारास आनंद वाटून त्यांनी मला एक शालजोडी बक्षीस दिली खरी; परंतु जेव्हा मला अतिशुद्रांच्या मुलामुलींकरिता शाळा असण्याची फार जरूरी दिसल्यावरून, मी त्या कामी अनेक भटसभासद करून त्या सर्व शाळा त्यांच्या स्वाधीन करून, अतिशुद्राच्या मुलामुलीकरिता शाळा काढल्या, तेव्हा एकदर सर्व युरोपियन गृहस्थांनी मला फार द्रव्यद्वारे मदत केली. त्या उदार गृहस्थांपैकीं रेव्हिन्यु कमिशनर रीव्हज् साहेब यांनी जी मदत केली ती मी कधी विसरणार नाहीं त्या उदार गृहस्थांनी फक्त द्रव्यद्वारे मदत केली इतकेच नाहीं, परंतु त्यांनी त्या अतिशूद्रांच्या शाळांत आपला महत्वाचा धंदा संभाळून वरचेवर येऊन मुलांची गति।। विद्येमध्ये किती झाली, याविषयीची चौकशी वारंवार करीत असे व मुलांस विद्या शिकण्याविषयीं उत्तेजन यावे, म्हणून तो फार झटत असे. त्याचे उपकार अतिशूद्रांच्या मुलांच्या हाडामध्ये खिळले आहेत. त्याजबद्दल त्यांनी आपल्या शरीराचे चर्मी जोडे करून त्याच्या पायांत घातले, तथापि ते त्याचे उतराई होणार नाहीत. त्याचप्रमाणे दुसरे काही युरोपियन गृहस्थांनी मला या कामी फार मदत केली याजबद्दल मी त्यांचे फार आभार मानितों त्या वेळेस त्याही कामी मला भटसभासद घेण्याची जरूरी पडली. याची आतली कारणे पुढे एखादे प्रसंगी कळवीन; परंतु पुढें जेव्हा मी त्या शाळांत भटांच्या पूर्वजाच्या कृत्रिमी पुस्तकातील लबाड्या उघड्या करून मुलास दाखवू लागलो, तेव्हा त्यांचा माझा आतल्या आत बोलण्या-चालण्यामध्ये बेबनाव होऊ लागला. त्यांचे म्हणण्याचा कल असा दिसून आला की, या अतिशूद्राच्या मुलास विद्या मुळीच देऊ नये. जर कदाचित त्यास शिकविणेंच भाग पडले तर त्यांची साधारण अक्षरओळख मात्र करून द्यावी, माझें म्हणणें असें होतें कीं, त्यांना चांगले प्रतीची विद्या देऊन तिजपासून त्यास आपले बरेवाईट समजण्याची शक्ति यावी. आता त्यांचा अतिशूद्रास विद्या न द्यावी याचा हेतु, का, ते लोक विद्वान होऊन आपणास ज्या सरकारच्या योगाने विद्या मिळाली व तेणेकरून खरे कोणते व खोटे कोणते हे समजू लागले, त्या सरकारचे परमनिष्ठ सेवक होऊन आपले पूर्वजांनी त्यांच्यावर केलेल्या जुलूमांची आठवण होऊन आपला सर्वस्वी धिःकार करतील किंवा कसा, हे बरोबर सांगता येत नाही. असा जेव्हा माझे व त्यांचे मतामध्ये भेद पडू लागला, तेव्हा मी त्याचे सर्व कृत्रिम समजून त्या दोन्हीही खात्यातून एका बाजूला झालो. त्यास काही वर्षे लोटली इतक्यात भटपाड्यांचे बंड उपस्थित झाले, तेव्हापासून एकंदर सर्व युरोपियन सभ्य गृहस्थ माझ्याशी पहिल्यासारखे नीट मन उगाळून न बोलता ते मला पाहिल्याबरोबर आपल्या कपाळास आठ्या घालू लागले तेव्हा मी त्यांच्या घरी जाणेयेणे अगदी बंद केले.
धो०-भटपाड्यांच्या बदमस्तीमुळे त्यांनी आपला निरअपराध्याचा आव्हेर करून ते आपल्यास पाहिल्याबरोबर कपाळास अशा आठ्या घालू लागले, हे त्यांच्या शहाणपणाला शोभा देत नाही. आणि यावरून आपण भट विध्वा स्त्रियांनी गर्भपात वगैरे अघोर कर्मे करू नयेत, म्हणोन त्यांस गुप्तपणे बाळंत होण्याकरिता आपल्या घरी सोय केली आहे त्या कामी आपण आपल्या सरकाराजवळ कोणत्याही प्रकारची मदत न मागता व त्याचप्रमाणे त्या कामात नावाला सुद्धा भटसभासद न घेता, ते काम आपण आपल्या खचनि चालविलें आहे.
० आपले सरकार जर म्हणावें तर जिकडे घुगऱ्या तिकडे उदय उदय म्हणणारे आहे. कारण अतिशुद्रास स्पर्श करण्याची बंदी असल्यामुळे
त्यांस सहजच सर्व रोजगारधंद्याचे द्वार बंद झाले व त्याजमुळे त्याजवर पोटाच्या आगीमुळे चोऱ्यामाऱ्या करण्याचा प्रसंग गुजतो व त्यानी चोऱ्यामाऱ्या करू नये, म्हणोन आमच्या सरकाराने त्याच्या हजऱ्या घेण्याची वहिवाट घातली, हे बरें केले, परंतु भटांच्या निराश्रित अनाथ विधवा स्त्रियांस पाट लावण्याची बंदी असल्यामुळे त्या व्यभिचार करून गर्भपात व बाळहत्या करतात, हे आमचें न्यायी सरकार उघड डोळ्याने पहात असून त्याजवर मात्र मांगरामोशासारखी चौकशी ठेवीत नाही हे मोठे आश्चर्य होय; काय? आमच्या सरकारास गर्भपात व बाळहत्या करणाऱ्या चायापेक्षा दरोडेखोर मागमहार जास्ति दोषी आहेत असे वाटते काय? दुसरे असे की, भटाचे 'खाणे थोडे परंतु मचमच फार" अरे, ज्यांच्याने एकचित्त होऊन आपल्या बाळ बहिणीच्या हजामती करणाऱ्या नापिकाच्या हातून वस्तरा छिनाऊन घेववत जर नाही, तर तसल्या लोकांस अशा कामी सभासद करून काय फळ होणार आहे?
धो०-बरे असो, परंतु आपण पूर्वी म्हणालात की एकदर सर्व शाळाखात्यात ज्या काही अव्यवस्था झाल्या आहेत, त्या कोणत्या? जो०-त्या सर्व अव्यवस्था लिहू गेल्या असत त्याचा एक स्वतंत्र लहानसा ग्रंथच होईल, या भयास्तव त्यांपैकी एकदोन गोष्टी उदाहरणार्थ येथे। घेतों पहिली गोष्ट अशी की, शुद्र व अतिशूद्र यांच्या मुलांच्या शाळांकरिता शिक्षक तयार करण्याची अनवस्था
धो०- असे कसे म्हणता? सरकाराने सर्व जातींची मुले शिकण्याकरिता पंतोजी तयार करण्याकरिता एक स्वतंत्र निराळी शाळा केली आहे.
सरकारच्या मनात अवडनिवड नाहीं. जो०- तर मग आजपावेतो त्या तयार केलेल्या पतोजीनी अतिशुद्रांची मुले तयार किती केली, ती दाखीव आता खाली का पहातोस मला
उत्तर दे- धो०- एकंदर सर्व भटपंतोजी लोक असे म्हणतात की अतिशूद्रांची मुले शाळेत घेतल्याबरोबर हिंदुस्थानात मोठा धिंगाणा होईल, म्हणोन
सरकार भितें.
जो०-बरें, तर सरकार पलटणीत सर्व जातीचे लोक भरतात, म्हणोन हिंदुस्थानातील लोक का धिंगाणा करीत नाहीत? ही सर्व सरकारची हयगय कारण पलटणीची भरती करते वेळी आपण ते काम स्वतः करतात आणि पंतोजी तयार करण्याचे काम भलत्या एखाद्या शाल बिसनी गीत्यागोमाजीकडे नैमितात. त्याला काही या कामाची माहिती नसते त्याला जर या कामाची माहिती असती, तर त्याने प्रथम अतिशूद्रांची
मुलें पंतोजी तयार करण्याचे कामी हयगय न करता, त्या शाळेत फक्त भटांच्या मुलांची इतकी खोगीरभरती न करता..
धो० तर मग सरकाराने याला काय तोड करावी?
जो०-याला तोड इतकीच आहे की, सरकाराने कृपाळू होऊन हे काम एकंदर सर्व युरोपियन कलेक्टरांच्या हाती दिल्याशिवाय सिद्धीस जाणार नाही. कारण या लोकाचा शूद्र व अतिशूद्राशी निकट संबंध असल्यामुळे त्यांनी भटकामगारांवर भरवसा न ठेवित दर गावोगावी एक एक वेळी जाऊन, त्यांनी कुळकर्ण्याचा हुजूर न धरिता सर्व गावातील आबालवृद्धास विधेपासून काय काय लाभ होतात, हे सांगितल्याबरोबर ते आपली हुशार हुशार मुले निवडून कलेक्टरसाहेबांच्या स्वाधीन, पंतोजी करण्याकरिता, मोठ्या आनंदाने करतील. कारण जसे युरोपियन कलेक्टरांच्या बोलाने हे काम तडीस जाईल, तसे असल्या गैरमाहीत कामगाराच्याने तडीस गेले नाही, व पुढेही जाईल, किंवा न जाईल याचा संशय वाटतो. याविषयी एक म्हण अशी आहे की, 'जेनो काम तेनी थाय बिजा करे तो गोता खाय' यावरून तूंच विचार करून पहा की, शूद्र व अतिशूद्र जातीचे पतोजी तयार करण्याची किती जरूरी आहे! कारण जेव्हा त्या त्या जातीचे पतोजी तयार होतील; तेव्हा ते आपापल्या जातीचा अभिमान मनी धरून ते आपल्या जातीच्या मुलांस, हातात काठी घेऊन गुरांची वळती करू लागण्याच्या पूर्वी, इतकी शिकण्याची गोडी लावतील की, पुढे ती मुले मोठी झाल्याबरोबर, ती आपल्यातील एका मुलास बारीबारीने माळावर गुरांच्या वळत्या करावयास ठेवून, बाकी सर्व मुले अखरावर सुरपारव्या न खेळता गावात येऊन आपल्या पंतोजीजवळ शिकण्यास कधी कमी करणार नाहीत, परंतु अशा सुधारल्या काळात जगामध्ये अति सुधारलेल्या अमेरिकन लोकांपैकी अर्ध्या लोकानी आपल्या खासगत देशबांधवांबरोबर तीन वर्षे सतत जंग केल्याशिवाय आपल्या हातातून दासांस सोडले नाही, तर असल्या गावठी भटपतोजीच्याने शाळेमध्ये शूद्रादि अतिशूद्रास खरे ज्ञान शिकवून त्यास आपल्या दास्यत्वापासून मुक्त होऊ देण्याची बुद्धि कशी देववेल! अरे, ज्या एका भटप्रोफेसरच्या पगारात सहा शूद्र अथवा नऊ अतिशूद्र प्रोफेसर स्वस्ते मिळण्याची खात्री असता, आपले सरकार या कामी भटांच्या नादी लागून आपल्या अज्ञानी बांधवांच्या कमाईचे पैसे असे बेलगामी खर्चतात, तर आपण जर त्याविषयी आपल्या सरकारास जागे केले नाही, तर त्याचा दोष आपल्या माथ्यावर येणार आहे. त्याचप्रमाणे चौधऱ्याचे वाड्यांतील खाणावळीत अतिशूद्रांची मुले किती आहेत बरे?
घो०- आहो, जेथे शूद्रांच्या मुलाची निभावणी लागण्याची मारामार, तेथे अतिशूद्रांचे मुलाचे नाव कशाला काढता?
जो०- का बरें, तूच म्हणतोस ना सरकार आवडनिवड करीत नाही, तर मग याचे कारण काय?
धो०-याचे कारण तेथे सर्व भटकामगार असल्यामुळे असे घडून येते, म्हणून आपण मला एके दिवशी प्रत्यक्ष प्रमाण दाखविले होते. ते असे की, जो भट गृहस्थ पूर्वी जेव्हा आपल्याजवळ चाकरीस होता. तेव्हा तो दोन वेळा अतिशूद्रांच्या शाळेत येऊन काही विटाळाचा विधिनिषेध न पाळिता सर्व जातीच्या मुलास शिकवीत असे. आणि तोच भटजीबाबा जेव्हा खाणावळीत चाकर झाला, तेव्हा तो इतका सोवळा बनला की, त्याने एका गरीब सोनारास चाव्हडीवर ओढून आणले; कारण, त्याने उन्हाळ्यात त्या शाळेतील हौदाला शिऊन आपली तहान भागिवली.
जो०- अरे, ज्या भटशिरोमणीने केलेली गीते एकदर सर्व नवीन समाजामध्ये गाण्याचा कित्ता घेतला आहे, तथापि त्याने आपल्या मतलबी धर्माप्रमाणे दगडी पुजण्याचे न सोडिता, आपल्या वाड्यांतील भटाच्या हौदाला शुद्राने शिऊ नये, म्हणून पडदी घालून तो अखेरीस काशीस जाऊन काशीकर होण्याच्या बेतात आहे. तथापि आमच्या निःपक्षपाती, म्युनिसिपालिटीत भटसभासदांचा भरणा असल्यामुळे तिने ती पडदी तशीच कायम ठेऊन, शुक्रवारातील शिंप्याच्या हौदाची पडदी मात्र एकदम पाडिली; तथापि तेथील कित्येक भटजींनी फक्त आपल्या उपयोगाकरिता त्या हौदाच्या उसवासानजीक एक लहानसा चौर हौद बांधून त्यातील पाणी. आपले सोवळे चाव करून नाहाण्या धुण्यामध्ये बेलगामी नाशितात. आता ब्राह्मणजन्मास येऊन असे कसब लढविले नाही, तर तो जन्म कशाचा!
१. नंदी,