ऑक्टोबर १९१८च्या सुरुवातीला बडोद्याहून निरोप आला की विनोबांची आई हिवतापाने आजारी आहे. गांधींना ही बातमी समजताच त्यांनी विनोबाला त्वरीत बडोद्यास जाऊन आईची सेवा करण्यास सांगितले. विनोबा लगेच बडोद्याला गेले काही दिवस त्यांनी आईची सेवा केली. विनोबाला पाहून आईला समाधान वाटले. परंतु २४ ऑक्टोबर १९१८ रोजी विनोबांच्या आई रुक्मिणीदेवी देवाघरी गेल्या. पारंपारिक पद्धतीने आईची अंतिम क्रिया ब्राह्मणांच्या हातून करायची नाही, हा विनोबांचा हट्ट कुटुंबियांना मान्य नव्हता. त्यावर बरीच वादावादी झाली. शेवटी विनोबांनी अंतिम क्रियेसाठी स्मशानात न जाता घरी बसूनच गीता पाठ केला. 'आई मला श्रुतीमाऊलीच्या ओटीत टाकून गेली.' या भावनेने वेदपाठ सुरू केले. तत्त्वासाठी आईच्या अंतिमक्रियेसाठी स्मशानात न जाणारा कठोर वेदांती सत्याग्रह आश्रमात परतताना आईच्या दोन वस्तू घेऊन परतला. एक आईचे लुगडे आणि दुसरी अन्नपूर्णादेवीची पितळी मूर्ति, या मूर्तीची पूजा आई दररोज करीत असे. आईचे लुगडे विनोबा अनेक दिवस उशाखाली घेऊन झोपत. परंतु जेव्हा आश्रमात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खादीचा विकास होऊ लागला तेव्हा त्यांनी आईचे कापड गिरणीतले लुगडे चूपचाप साबरमतीला अर्पण केले, आणि अन्नपूर्णेची मूर्ती विनोबांनी प्रयुदासा गांधीची आई काशीबा यांनी दिली आणि सांगितले, या मूर्तिची दररोज सूर्यप्रकाशात पूजा केली पाहिजे. प्रथदासांनी विनोबाचे शिष्यत्व मान्य केले असल्यामुळे विनोबाची अट मान्य करीत मूर्ति स्वीकारली. शेवटपर्यंत काशीबांनी ती मूर्ति सांभाळली. आजही ती मुर्ती प्रयुदास गांधींकडेच आहे.
१९२०च्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात जमनालाल बजाज बापूंच्या संपर्कात आले. जमनालाल साबरमतीला अधूनमधून भेटी देत. बापूंनी त्यांना आपला पाचवा मुलगा म्हणून मानले होते. जमनालाल यांची इच्छा होती की साबरमती आश्रमासारखा आश्रम वर्धा येथेही असावा, आणि बापूंनी तेथे आपल्या सर्व सहकाऱ्यांसमवेश वास्तव्य करावे. गांधींनी जमनालालजींना अडचण सांगितली, 'मी गुजराथी असून गुजराथेतच अधिक सेवा कार्य करू शकतो. तरीपण जमनालालजींनी आग्रह कायम ठेवला. शेवटी गांधीजींनी सत्याग्रह आश्रम- साबरमतीचे ज्येष्ठ आश्रमवासी रमणीकलाल मोदी यांना वर्धा येथे आश्रमाची शाखा सुरू करण्यासाठी पाठवले. त्यांना वर्धा येथील पाणी, हवामान मानवले नाही. तेव्हा विनोबांनी वर्धा येथे जाऊन आश्रमाची शाखा सुरू करावी असा आग्रह जमनालालनी धरला. पण मगनलाल विनोबांना सोडण्यास तयार नव्हते. त्यापेक्षा वर्धा आश्रम बंद करावा असे मगनलाल गांधींनी सुचविले. पण एकदा एखादी सुरू केलेली संस्था सहसा बंद करू नये' असे गांधीनी सुचवले आणि जमनालाल यांची बापूंनी मागणी मान्य केली. विनोबांनीही आपल्या सहकाऱ्यासोबत वर्धा येथे जाण्यास मान्यता दिली.
६ एप्रिल १९२१ रोजी विनोबा आपले सहकारी रघुनाथ श्रीधर धोत्रे, द्वारकानाथ हरकारे, आणि वल्लभस्वामी त्यांचे बंधू भास्कर केशो गांधी, कृष्णदास गांधी इत्यादी निवडक विद्यार्थ्यासह साबरमती आश्रमातून वर्ध्याला रवाना झाले व ८ एप्रिल १९२१ रोजी वर्ध्याला पोहोचले. विनोबासह सर्वांनी वर्ध्यात जमनालालजींच्या बागेत मगनवाडी येथे कामाला सुरुवात केली. या बागेत गावातील लोक प्रातर्विधी आणि स्नानासाठी येत म्हणून जागा बदलण्याची सूचना विनोबांनी जमनालालजी यांना सुचवले. जमनालालजी यांनी लगेचच आपला बंगला आणि त्या भोवतालची आठ एकर जागा आश्रमासाठी दिली. ही बजाजवाडीची जागाही शहरालगतच होती. शेवटी जुलै १९२१ मध्ये विनोबांनी या आश्रमाचे स्थलांतर गावापासून दूर एकांतात घासवंगला येथे केले. कालांतराने बाबा मोघे, गोपाळराव काळे, वाळुजकर वर्धा येथे हजर झाले. विनोबांचे बंधू बाळोबांनी अध्ययनाच्या निमीत्याने वर्ध्याला हजर झाले. तेथे साफ आणि विंचवाची भीती होती. विनोबांनी विद्यार्थ्यांना साप विंचू पकडणे शिकवले आणि सुचवले की यांना मारून टाकण्याऐवजी लांब नेऊन सोडावे.
जमनालालजींना घास बंगला आश्रमासाठी योग्य वाटला नाही. म्हणून त्यांनी घास बंगल्यापासून एक मैलाचा अंतरावर दुसऱ्या जागेत नवीइमारत बांधून तेथे आश्रमाची व्यवस्था करण्याचे ठरवले. बांधकामाची जबाबदारी द्वारकानाथ हरकारे आणि गोपाळराव काळे यांचेकडे सोपवण्यात आली. १९२४ साली वर्धा आश्रम नव्या जागेत सुरू झाला. १९३२च्या शेवटी विनोबा कैदेतून सुटल्यानंतर वर्ध्यास कॉटन मार्केटजवळ व नंतर नागपूर रोडवरील तनालवाडी या ठिकाणी राहू लागले. नालवाडी ही अधिकांश दलित वस्ती होती.. वर्धा आश्रम कार्यपद्धती विनोबांनी वर्धा आश्रमाची कार्यपद्धती साबरमती आश्रमाच्या धर्तीवरच केली. त्याचबरोबर विनोबांनी आपल्या काही विचाराची भर घालून वर्धा आश्रमात नवनवे प्रयोग सुरू केले. वर्धा आश्रमातील जिवनपद्धती साबरमती आश्रमातील जीवनपद्धतीपेक्षा अधिक कठोर आणि अनुशासनबद्ध केले. आश्रमातील जीवन अधिकाधिक स्वावलंबी बनविण्याकडे विनोबांचा कल होता. त्यासाठी त्यांनी नियम केला. प्रत्येक आश्रमवासी जितके शारीरिक श्रमाची कमाई करील त्यातच त्याने आपला उदरनिर्वाह करावा. अनेक 'वर्ष रात्रीचे जेवण दुपारच्या कामाच्या हिशोबानंतरच तयार केले जाई. जितका कामाचा मोबदला तेवढेच जेवण तयार केले जाई. आठ तास सूत कताईची मजुरी तीन आणे, विणकामाचा दीड रुपया, शेतकामाचे आठ आणे अशाप्रकारे कामाचे दर ठरवलेले होते, मजुरीचे दर कमी अधिक असले तरी जेवण मात्र सर्वांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे मिळे. कामाचे उत्पन्न आणि जेवणाचा खर्च यांचा मेळ घातला जाई. कमी काम झाले की अर्धपोटी राहावे लागे. विनोबा आश्रमातील जेवणाच्या वेळी स्वतः वाढण्याचे काम करीत. वल्लभस्वामीचा धाकटा भाऊ भास्कर कधीकधी तक्रार करी इतरापेक्षा माझ्या कामाचे मूल्य कितीतरी अधिक असताना मात्र पोटभर जेवण मिळत नाही, तेव्हा सौम्यस्वरात विनोबा समजावत, " आश्रमातील आपले जीवन सहयोगी जीवन असून प्रत्येकाने आपली पात्रता आणि शक्तीनुसार काम करावे आणि सर्वांचे मिळून आपल्या वाट्याला येईल त्यातच समाधान मानावे हीच आश्रम जीवनाची पद्धती असते. "
साबरमती आश्रमाप्रमाणेच वर्धा येथे विनोबा संस्कृत शिक्षणासाठी संस्था पद्धतीचा अवलंब करीत. वर्गात दोन तीन विद्यार्थी असले तरी विनोबा मोठ्या आवाजाने शिकवीत. त्यांच्या मोठ्या बोलण्याने कधी कधी विद्यार्थी घाबरून जात, पण विनोबांच्या आंतरीक प्रेमामुळे विद्यार्थी पुन्हा त्यांच्याजवळ येत. विद्यार्थी शिक्षकांचा संबंध हा अध्यात्मिक संबंध असतो. वल्लभ हा त्यांचाच शिष्य जो पुढे वल्लभस्वामी बनला. कृष्णदास गांधी, सुतकताई आदी क्षेत्रातील नामवंत गणले जातात तर राधाकृष्ण बजाज हेही विनोबाचे शिष्य, ज्यांनी गोसेवा, खादी इत्यादी क्षेत्रात आपले जीवन घालवले. दुसरे शिष्य मनोहर दिवाण यांनी धोका पत्करून आयुष्यभर कुष्टरोग्यांची सेवा केली. अशी अनेक नावे देता येतील ज्यांनी वर्धा आश्रमाचे नाव अजरामर केले.
महाराष्ट्र धर्म: १९२१ ते १९२४ दरम्यान आश्रमाच्या दैनंदिन कामकाजाबरोबरच विनोबांनी एक नवा उपक्रम सुरू केला. जाने. १९२३ साली 'महाराष्ट्र धर्म' मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. या मासिकातील बहुतेक लिखाण विनोबांचेच असे. दर महिन्याला वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून विनोबा लोक प्रबोधनाचे काम करीत. ईश्वर निष्ठा, राजकारण आणि सर्व सावध वृत्ती ही महाराष्ट्र धर्माची व्याप्ती आणि धोरण असेल असे विनोबांनी जाहीर केले होते. या मासिकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात सत्याग्रह आश्रम वर्षाची नियमावली देण्यात येई. हा आश्रम म्हणजे साबरमती आश्रमाची स्वतंत्र शाखा असून दोन्ही आश्रमाची कार्यपद्धतीही समान आहे असे सतत सांगितले जाई. चार अंकानंतर 'महाराष्ट्र धर्म' हे मासिक बंद पडले. कारण एप्रिल १९२३ मध्ये राष्ट्रीय ध्वजाच्या सन्मानासाठी नागपूरात झालेला झेंडा सत्याग्रह होय. सुरुवातीला विनोबांनी यात भाग घेतला नाही, परंतु घटना अशा घडत गेल्या की आपल्या सहकऱ्यासहीत त्यांना यात सहभागी व्हावे लागले. मुख्य म्हणजे झेंडा सत्याग्रहाचे संचलन विनोबांनी करावे असा सर्वांचाच आग्रह होता.
१३ एप्रिल १९२३ रोजी नागपूरला राष्ट्रीय झेंडा घेऊन एक मोठी मिरवणुक निघाली होती. पोलिसांनी ती अडवली आणि काही कार्यकर्त्यांना अटक केली. हा पहिला अखिल भारतीय स्वरूपाचा सत्याग्रह होता. विनोबांना या झेंडा सत्याग्रहात अटक होऊन एक वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. १३ एप्रिल १९२३ रोजी विनोबांना झालेली शिक्षा ही पहिली शिक्षा व पहिला तुरुंगवास होय.
गांधीजींचे सचीव महादेव देसाई यांनी १९ जुलै१९२३ च्या 'यंग इंडिया' च्या अंकात विनोबावर एक लेख लिहीला होता. ते म्हणतात, "विनोबा सत्याग्रह आश्रमात आले त्यावेळी आश्रम नुकताच सुरू झाला होता आणि झेंडा सत्याग्रहाच्या समयी ते वर्धा आश्रमाचे संचालक होते. आश्रमातील शारीरिक मेहनतीच्या कामाने आपल्या बौद्धिक शक्तीवर गंज चढेल असे त्यांना कधीही वाटले नाही. त्यांचे अनुशासन कठोर होते. त्यांना जेव्हा वसतिगृहाचा गृहपती नेमले गेले त्यावेळी सर्वांना धास्ती वाटत होती पण त्यांनी जेव्हा आश्रम सोडायचे ठरवले. तेव्हा विद्यार्थी त्यांच्या होणाऱ्या वियोगामुळे इतके रडले की त्यांचे सांत्वन करणे अवघड गेले....
महादेवभाई पुढे लिहितात, विनोबांचा आत्मसंयम अद्भुत असून ब्रह्मचर्य, स्वाध्याय त्याचे संकल्प आहेत. धर्म आणि अध्यात्माबाबत सर्व वाङ्मयाचा त्यांनी अभ्यास केला आहे.
पुढे विनोबांच्या विषयी लिहिताना महादेवभाईने लिहिले की, "विनोबा उत्तम वक्ता, अप्रतिम लेखक, चांगले स्वयंपाकी, खेळाडू असलेले प्रसिद्धी आणि तथाकथित सामाजिक जीवनापासून ते अलिप्त आहेत...' १८ जून १९२४ पासून 'महाराष्ट्र धर्म' मासिकाचे रुपांतर साप्ताहिकात करण्यात आले. मासिकाचे रुपांतर साप्ताहिकात झाले तरी त्यातील बहुतांशी लिखाण विनोबांचेच असे. उपनिषदासारख्या गंभीर विषयावर अत्यंत सोप्या भाषेत मांडणी असे. संतवाणीतून विविध संतांनी सांगितलेली वचने कुणी ही समजेल अशा भाषेत मांडली जात. 'उपनिषदाचा अभ्यास' हे पुस्तक आणि 'संताचा प्रसाद' हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्र धर्म या साप्ताहिकातून विनोबांनी केलेले लिखाण होय. महाराष्ट्र धर्म साप्ताहिकातील ठळक लेखाचा संग्रह मधुकर या नावाने प्रसिद्ध करण्यात आला. १९२४ ते १९२७ या काळातील विनोबाच्या लेखांचा हा संग्रह "मधुकरचा उलगडा या पुस्तकाच्या प्रस्तावनेत विनोबा लिहितात, 'महाराष्ट्र धर्म शब्दांचे संक्षिप्त रूप 'म. घ.' त्याला पणितीप्रमाणे 'उ' अनुवेध जोडून 'मधु' हा सांकेतिक शब्द साधला आहे. मधु म्हणजे महाराष्ट्र धर्मातून निवडलेले लिखाण...'
१९२७ साली शंकरराव देव आणि इतर मान्यवरांच्या कल्पनेवरून शि. म. परांजपे यांनी चालविलेल्या स्वराज्य पत्रात पुण्याची गांधी शिक्षणमाला आणि महाराष्ट्र धर्म हे साप्ताहिक समाविष्ट करण्याचे ठरवण्यात आले अशा रितीने 'महाराष्ट्र धर्म' हे साप्ताहिक ११ एप्रिल १९२७ ला बंद करण्यात आले..
वर्धा येथे जमनालाल बजाज यांचे लक्ष्मीनारायणाचे मंदिर होते. १९७-१९२८ रोजी एका विशेष समारंभानंतर हे मंदिर विनोबांचे हस्ते दलितासाठी खुले करण्यात आले. देशातील कदाचित हे पहिले मंदिर असावे जेथे सर्वप्रथम दलितांना प्रवेश मिळाला. विनोबांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन व आपल्या कार्यकर्त्यांशी परिचय व्हावा म्हणून वर्षातून एक महिना बापू वर्धा येथे येऊन राहात. विनोबाही वारंवार आपल्या कार्याची माहिती गांधींना देत. गांधीजीही त्यांना सतत प्रोत्साहन देत. एकदा एका पत्रात गांधींनी विनोबांना लिहिले, 'तुझ्या पेक्षा मोठा महान आत्मा मला कधीच आढळला नाही,' हे पत्र विनोबांनी वाचून त्वरीत फाडून टाकले. जमनलाल बजाज यांनी पत्राचे ते तुकडे एकत्र करून वाचले आणि विनोबांना प्रश्न केला, 'इतके अमुल्य पत्र आपण का फाडले?' तेव्हा विनोबांनी प्रश्न केला, 'मला महान आत्मा संबोधून गांधींनी चूक केली असे नाही वाटत? अशा पत्रामुळे मी अहंकारी बनेन हे म्हणून हे पत्र फाडून टाकले.'
वायकोम सत्याग्रहः त्रावणकोर संस्थानात वायकोम दलितांच्या मंदिर प्रवेशावरून सुरू झालेल्या वादाबाबत म. गांधींनी विनोबांना १९२४ मध्ये वायकोम गावी सत्याग्रहींना मार्गदर्शन करण्यासाठी पाठविले. वायकोम येथेच विनोबांनी नंबुदी ब्राह्मणांशी शास्त्रार्थ केला. अस्पृशाची सावली पडली तरी विटाळ होतो अशा केरळी ब्राह्मणांना अस्पृश्यता शास्त्राविरुद्ध आहे हे पटवून दिले. कालांतराने म. गांधीही वायकोम गावी पोहोचले. म. गांधी आणि विनोबांच्या नेतृत्वाखाली एक वर्ष चार महिने हा सत्याग्रह चालू होता. शेवटी त्रावणकोर राज्याच्या अधिकाऱ्यांनी आपली हार कबूल केल्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्न सामोपचाराने सुटला. येथूनच म. गांधींचे सहकारी म्हणून विनोबांची संपूर्ण देशाला ओळख झाली.
नवा उत्साह आणि नव्या प्रेरणेसह विनोबा वर्धा आश्रमात परतले. यावेळी संपूर्ण आश्रमाच्या सफाईचे काम विनोबांनी स्वतःकडे घेतले. या दरम्यान १९४६ मध्ये विनोबा आजारी पडले. तेव्हा १९-२-१९२७ च्या पत्रात विनोबांना कळवले, 'जर आपल्यासारखा आजन्म ब्रह्मचारी आजारी होऊ शकतो, तेव्हा माझ्यासारख्याचा आजारी पडण्याचा हक्क अधिक वाढतो. आम्ही दोघांना विनोबा आणि गांधी- आजारी पडण्याचा हक्क सोडायचा आहे. खरा ब्रह्मचारी तो ज्याचे शरीर वज्रासारखे कठीण असते. आजारपण हे असंयमाचे चिन्ह नाही का?"
आश्रम जीवनात आश्रमवासियाचा परस्परावर विश्वास, प्रेम, आदर असावा, यावर विनोबांचा कटाक्ष असे. यासाठी विनोबा बुद्ध वंदनेतील त्रिसरणाचा सतत उल्लेख करीत.
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि
हा काळ विनोबांच्या तीव्र कर्मयोगाचा होता, १२ ते १४ तास विनोबा सतत कार्यमग्न असत. श्रमाधिष्ठित जीवनाचा प्रयोग याच काळात विनोबांनी केला. त्याचप्रमाणे सत्य, अहिंसा, असत्येय इत्यादी 'एकादश व्रतावर', 'एकादश व्रतमाला'. 'विचार पोथी' इत्यादी ग्रंथही याच काळात आकारास आले.