परशुराम, मातृवध, एकवीस स्वाऱ्या, दैत्य, खंडेरावाने रावणाचा आश्रय केला. नऊखंडाची जाणाई, सात आसरा, महारांच्या गळ्यातील काळा दोरा, अतिशूद्र अत्येज, मांग, चांडाळ, महारास जिवंतच पायामध्ये दडपणे, बाह्मणात पाट लावण्याची बंदी, क्षत्रिय अर्भकाचा वध. परभु, रामोशी, जिनगर वगैरे लोक, परशुरामाचा पराभव झाल्यामुळे त्याने आपला जीव दिला, आणि चिरंजीव परशुराम यास आमंत्रण, इत्यादिकाविषयी.
धो०- प्रजापति मेल्यावर ब्राम्हणाचा अधिकारी कोण झाला?
जो०- परशुराम
धो०- परशुराम स्वभावाने कसा होता?
जो०- परशुराम स्वभावाने पुड, साहसी, नष्ट, निर्दय, मूर्ख आणि अधम होता तो आपल्या जन्म देणाऱ्या रेणुकेचे शीर उडविण्यास काडीमात्र भ्याला नाहीं तो शरिराने फार बळकट असून मोठा तिरंदाज असे.
धो०- त्याच्या अमलात काय झाले?
जो० प्रजापति मरताच बाकीच्या उरलेल्या महाअरींनी ब्राह्मणांच्या हाती सापडलेल्या आपल्या बांधवास ब्राह्मणांच्या दास्यत्वापासून सोडविण्यासाठी परशुरामांशी एकवीस वेळा इतके निकराने लढाया केल्या की, त्याचे अखेरीस द्वैती म्हणून नांव पडले व त्या शब्दाचा पुढे अपभ्रंश दैत्य' झाला. जेव्हा परशुरामाने एकंदर सर्व महा अरीचा मोड केला, तेव्हा त्यातून कित्येक महाविरानी निराश होऊन, आपल्या ह्याच्या मुलुखात जाऊन आपले शेवटचे दिवस काढिले म्हणजे जेजुरीच्या खंडेरावाने जसा रावणाचा आश्रय केला, त्याचप्रमाणे नऊ खंडाचे न्यायी व सात आश्रय या सर्वांनी तळकोकणात जाऊन तेथे छपून आपले शेवटचे दिवस काढिले त्यावरून ब्राम्हणांनी केवळ धिक्काराने नऊ खंडाचा जो न्यायी त्याचे स्त्रीवाचक निद्य नांव नऊ खणची जाणाई व सात आश्रयांचे नाव सातीअसरा पाडिले बाकी जेवढे महाअरी परशुरामानें रणांगणी कैदी केले तेवढ्यापासून परशुरामानें, त्यांनी कधी पुनः ब्राह्मणांवर कंबरा बांधू नयेत म्हणून क्रियाभाक घेऊन, एकदर सर्वांच्या गळ्यांत एक एक काळ्या सुताचे दोऱ्याचे चिन्हर घालून, त्यांचा, त्यांचे शूद्र बांधवांनीसुद्धा त्यांना स्पर्श करू नये म्हणून प्रतिबंध केला. नंतर परशुरामानें त्या महाअरी क्षत्रियास, अतिशूद्र, महार, अत्येज, माग आणि चांडाळ म्हणण्याचा प्रचार घालून, त्यांस इतकी पीडा देण्याची वहिवाट घातली की, तिला या जगात दुसरी तोडच सापडणे नाही. उदाहरण:- या निर्दयाने महार, मांग लोकांचा सूड उगविण्याच्या हेतूने आपल्या लोकाचे मोठमोठे इमारतींच्या पायामध्ये कित्येक मागास त्याचे स्त्रियांसह उभे करून, त्याचे केविलवाणी ओरडण्याची कोणास दया येईल याजकरिता त्यांचे तोंडात तेल व शेंदूर ओतून त्यांस जिवंतच त्या पायामध्ये दडपण्याची वहिवाट घातली व ती अति क्रूर चाल मुसलमानाचें जसजसें प्राबल्य होत चालले तसतशी आपोआप बंद झाली. परंतु इकडे महाअरीशी लढता लढता परशुरामाचे इतके लोक मारले गेले की, ब्राम्हणांपेक्षा ब्राम्हण विधवांचा भरणा अधिक वाढला. व त्याची नीट रीतीने कशी व्यवस्था ठेवावी याची मोठी पंचाईत येऊन पडली. शेवटी ब्राम्हण स्त्रियांचा पुनर्विवाह अगदीच बंद केला, तेव्हा थोडेसे लागी लागल्यासारखे झाले. परशुराम आपले ब्राम्हण लोकाचे वामुळे इतका पिसाळला की, त्यानें बाणासुराच्या एकंदर सर्व राज्यातील क्षत्रियांच्या बीजाचा समूळच नाश करावा, ह्मणून शेवटी त्या महाअरी क्षत्रियांच्या निराश्रित गरोदर विधवा स्त्रिया, ज्या इतर अनेक भूमीच्या ठायी आपले जीव घेऊन लपून राहिल्या होत्या, त्यांच्या पोटी पुढे जन्मणाऱ्या अर्भकांचा जन्म झाल्याबरोबर वध करावा म्हणून परशुरामाने त्यांस पकडून आणण्याचा झपाटा चालविला. त्या झपाट्यातून मोठ्या दैवयोगाने वाचलेल्या अर्भकापासून उत्पन्न झालेली काही कुळे हल्ली परभू लोकांचे समाजात सापडतात. त्याचप्रमाणे परशुरामाच्या घुमाळीत रामोशी, जिनगर, तुंबडीवाले व कुंभार वगैरे जातीचे लोक असावेत. कारण कित्येक रीतीभातीमध्ये त्यांचा शूद्रांशी मेळ मिळतो. सारांश, हिरण्याक्षापासून बळी राजाच्या पुत्राचार निर्वेश होईतोपर्यंत एकदर सर्व त्या कुळाचा नीर काढून त्याच्या लोकांची अशी राखरांगोळी करून त्यास धुळीस मिळविले. यावरून ब्राह्मण लोक जादू विर्देत मोठे प्रवीण आहेत ह्मणून बाकी सर्व अज्ञानी क्षेत्रपतींच्या मनावर वजन बसून, ते ब्राह्मणांच्या मंत्रास अतिशय भिऊ लागले खरे; परंतु इकडे परशुरामाच्या मूर्खपणामुळे त्याच्या धुमाळीत ब्राम्हणाचा फार क्षय झाला. यामुळे एकंदर सर्व ब्राम्हणलोक त्याच्या नावाने हाकल्या मारावयास कोठे लागले, कोठे नाहीं तो इतक्यांत येथील एका क्षेत्रपतीच्या रामचंद्र या नावाच्या मुलानें परशुरामाचें धनुष्य जनक राजाचे घरी भरसभेत भंग केल्यामुळे परशुरामाने ती चुरस मनात धरून, रामचंद्र
आपल्या घरी जानकीस घेऊन जात आहे अशी संधी साधून रामचंद्रास रस्त्यात गाठून त्याजबरोबर युद्ध केले. त्यामध्ये परशुरामाचा मोड़ झाल्यामुळे तो इतका खजील झाला की, त्याने आपल्या सर्व राज्याचा त्याग करून आपल्या कुटुंबासहवर्तमान थोडेसे लोक बरोबर घेऊन तळकोकणात जाऊन राहिला. तेथे अखेरीस त्यास त्याच्या पूर्वी केलेल्या एकंदर सर्व दुष्ट कर्माचा पश्चात्ताप झाल्यामुळे त्याने आपला जीव कोठे व कधी व कसा दिला, याचा कोणास शोध लागू दिला नाही.
धो०- परशुराम हा आदिनारायणाचा अवतार आहे, तो चिरजीव आहे, त्याला मरणच नाही, असे सर्व ब्राम्हण आपल्या ग्रंथाच्या आधारावरून बोलतात आणि आपण तर म्हणती परशुरामानें जीव दिला, हे कसें?
जो०- दोन वर्षापूर्वी मी शिवाजीच्या पवाड्यात पहिल्या अभंगात "सर्व ब्राम्हणांनी आपल्या परशुरामास पाचारून आणून त्याच्या साक्षीनिशी माझ्यासमक्ष हल्लींच्या मागमहाराचे पूर्वज परशुरामाशी एकवीस वेळा लढणारे महाअरी क्षत्रिय होते किंवा नाही, म्हणून पदरात माप घ्यावे", याविषयींची ब्राम्हणास सूचना दिली; आता त्यानी परशुरामास पाचारून आणिलें नाहीं, यावरून परशुराम हा खरोखर आदिनारायणाचा अवतार असून चिरजीव असता तर ब्राम्हणांनी कधीच त्यास घुडून आणून माझी तर काय, पण एकंदर सर्व जगातील ख्रिस्ति व महमदी लोकाचीही खात्री करून त्यांचे समजुतीप्रमाणे सर्व म्लेछ लोकाचे बंड आपल्या मंत्रविद्येच्या सामर्थ्याने मोडण्यास कधी मागे पुढे पाहिलें नसतें.
धो०-माझ्या मते आपण स्वतः पुनः एकदा परशुरामास बोलावून पहा. तो खरोखरी जिवंत असल्यास तुमच्या बोलावण्याने खचित येईल.
कारण हल्लीचे ब्राह्मण जरी आपल्यास कितीही 'विविधज्ञानी झालो आहोत असे म्हणवीत, तथापि ते परशुरामाच्या मते भ्रष्टच म्हटले पाहिजेत. याजविषयी प्रमाण आताशा कित्येकानी शास्त्रविधिपूर्वक कारली खाण्याचा धिक्कार करून शास्त्रनिषिद्ध माळ्यांची गाजरे,
खाण्याचा झपाटा चोरून चालविला आहे.
जो०- बरे, तसे का होईना..
चिरजीव परशुराम उर्फ आदिनारायणाचा अवतार यास
मुक्काम सर्वत्र ठायी,
अरे दादा परशुरामा, तू ब्राह्मणांच्या ग्रंथावरून चिरंजीव आहेस. तू कडू का होईना, परंतु विधिपूर्वक कारली खाण्याचा धिक्कार केला नाहीस... तुला पहिल्यासारिखे कोळ्याच्या मढ्यापासून दुसरे नवीन ब्राम्हण उत्पन्न करावे लागणार नाहीत. कारण, हल्ली येथे तू जे मध्यापासून उत्पन्न केलेले ब्राम्हण त्यापैकी कित्येक ब्राम्हण 'विविधज्ञानी' बनून बसले आहेत, त्यांना काही अधिक ज्ञानसुद्धा देण्याची तुला जरूरी पडणार नाही. फक्त तू येथे ये, आणि त्यांनी शूद्रांची गाजरे खाल्ल्याबद्दल त्यास चौद्रायण प्रायश्चित देऊन त्यांच्याकडून तुझ्या वेदमंत्रजादूच्या सामर्थ्यानि पहिल्यासारिखे काही चमत्कार इंग्लिश, फ्रेंच वगैरे लोकास करून दाखीव म्हणजे झाले. तू असा तोड़ चुकवून पळत फिरू नको. तू या नोटीशीच्या तारखेपासून सहा महिन्यांचे आत येऊन हजर झाल्यास, मी तर काय, पण एकंदर सर्व जगातील लोक तुला तू सर्वसाक्ष आदिनारायणाचा अवतार खास आहेस म्हणून मान देतील व तू तसे न केल्यास येथील महारमांग आमच्या म्हसोबाच्या पाठीस लपून बसलेल्या तुझ्या विविधज्ञानी म्हणविणाऱ्या ब्राह्मण बच्चास ओढून आणून त्यांची फटफजीती करण्यास कधी कमी करणार नाहीत. आणि तेणेकरून त्यांच्या तुणतुण्याची तार तुटून त्याच्या झोळीत दगड पडल्याने त्यास विश्वामित्रासारिखे उपाशी मरू लागल्यामुळे कुत्र्याचे फ२४) खाण्याचा प्रसंग आणू नको.
तारीख १ ली. माहे आगस्ट
सन १८७२ इसवी पुणे,
जुना गंज घर नं. ५२७.
आपला खरेपणा पहाणारा,
जोतीराव गोविंदराव फुले.
५. त्याचप्रमाणे भराड्याचे पुंगीस व वाघ्याचे भंडारीस काळा दोरा आहे तो पहा.
२. बाणासुराची कन्या उषा ही कृष्णाच्या प्रद्युम्न नावाच्या मुलास दिली होती.
३. अभंग अति महारथी क्षत्रियाचा बाळ ।। यवनाचा काळ त्रेतायुगी ।। १ ।। स्वभावें तो शूर रणी भिडणार ।। लढे अनिवार देशासाठी ।। २ ।। परशुरामाशी झोंबे महाबळी | एकवीस वेळी लागोपाठ ।। ३ ।। अशा महावीरा म्हणे महाअरी ।। धाके थरथरी द्विजसुत ।। ४ ।। बोची शिऊ नका मोड झाल्यावर ।। म्हणा महाआर मांग त्यास ।। ५ ।। भित्रा सूड घेई जिकिल्या शत्रूचा ।। पूत कृतघ्नाचा सर्प जैसा ।। ६ ।। चिरंजीव आहे आण पाचारूनि । पहा तपासूनी जोतीपुढे ।। ७ ।।
४. अथवा पानशेंगा,