गोविंद गणपतराव काळे प्र० श्राद्ध म्हणजे काय?
जोतीराव गोविंदराव फुले उ०- मृत पितरांचे उद्देशाने पुत्रादिकांनी करायाचीं ब्राह्मणभोजने पिडदानें एतद् प्रधान कर्मे आहेत ती.
गोविंद प्र०- यावरून शुद्रादी अतिशूद्रांच्या पुत्रादिकानी आपल्या मृत माता पित्यांच्या उद्देशाने आर्यभट ब्राह्मणांस भोजन द्यावें, असें ठरते.
जोतीराव उ०- शुद्रादी अतिशूद्रांच्या घरी आर्य ब्राह्मणांनी अन्नग्रहण करू नये, म्हणून मनुस्मृति वगैरे ग्रंथात सांगितले आहे; ते असे की, "राजाचे अन्न गृहण केल्यानें तेजाचा नाश होतो, शूद्रान्न ग्रहणाने आयुष्याचा नाश होतो, सोनाराच्या अन्न गृहणाने आयुष्याचा नाश होतो. आणि चर्मकाराच्या (चांभाराच्या) अन्न गृहणानें किर्तीचा नाश होतो," याप्रमाणे आहे. आणि "शुद्र याजक (शुद्राचा उपाध्याय) तो जितक्या ब्राह्मणांस आपल्या अंगाने स्पर्श करील, त्या तितक्या ब्राह्मणांस दान दिले असता, दान देणाऱ्या पुरुषांस त्या दानापासून फल प्राप्त होत नाही" तसेच मनुस्मृतीत सांगितलें आहे, ते असे की, ब्राह्मणांकडील अन्न हे अमृताप्रमाणे जाणावें आणि शूद्रान्न रक्ताप्रमाणे आहे. यास्तव शूद्रांकडील अन्न वर्णपरत्वेकरून कनिष्ट आहे" तर येथे कोणी शंका घेतील. ती अशी की, आम्ही शूद्राकडील अन्न घेत नाही. आमान्न घेतो. असे असल्याकारणाने आमान्नास (सिध्यास) दोष नाही असे म्हणतील, तर त्या आमान्नविषयी प्रमाण ऐका. ते असे की, "शूद्रांकडील जे आमान्न (सिधा) त्यास शूद्रान्न असे म्हणावें आणि पक्व झालेले जे अन्न असेल तें उच्चिष्ट (उष्टे), असे जाणावें तस्मात् शूद्रांकडील या दोन्हीं प्रकारच्या अन्नाचा त्याग करावा, कारण या दोन्ही अन्नाच्या योगाने ब्राह्मण दोषी होतो. "
गोविंद प्र०- यावरून गरुडपुराणांत मृत पितरांच्या नांवानें दान करणे याविषयी जे प्रतिपादन केले आहे, तें सर्व कल्पित आहे, असे तुमच्या बोलण्यावरून सिद्ध होते का नाही?
जोतीराव उ०-कच्छ, मच्छ वगैरे पुराणासारखे, धूर्त आर्यभट रिकामटेकड्या ब्राह्मणांनी आपली पोटे जाळण्याकरिताः गरुडपुराणाचे थोताड आपल्या कल्पनेनें रचिलें आहे, याविषयी बृहस्पती या नावाच्या महासत्पुरुषाचे ग्रंथांतील आधार देतो, तो असा की, ततश्च जीवनोपायो ब्राह्मणैर्विदितस्त्विह
मृताना प्रेतकार्याणि न त्वन्य विद्यते क्वचित् ।। गोविंदराव प्र० या महाविद्वान बृहस्पतिच्या आधारावरून शुद्रादी अतिशूद्रांच्या कन्या-पुत्रांनी आपल्या मृत माता-पित्यांच्या नावाने धूर्त आर्य ब्राह्मणीस सुवर्णदान, शय्यादान, छत्रीदान गोप्रदान आणि जोडे वगैरे दान करू नये, असे सिद्ध होते.
जोतीराव उ०- अरे बाळा यांत काय संशय?
कारण शुद्रादी अतिशूद्राचे माता-पिता जिवंत असता त्यांनी त्यांस अन्नान्न करायास लावून ते मरण पावल्यानंतर त्याच्या नावानें आर्य ब्राह्मणास सुवर्णदान दिल्याने त्याबद्दल त्यांच्या मृत पावलेल्या पितरास कोणत्या ठिकाणी आणि केव्हा लाभ होणार आहे? तसें त्यांनी आपल्या माता पित्याला वस्त्र वस्त्र करायास लावून ते मरण पावल्यानंतर त्यांच्या नावाने धूर्त आर्य ब्राह्मणीस शय्यादान देऊन त्याँस नरम बिछान्यावर लोळायास लावल्याबद्दल त्यांच्या मृत झालेल्या पितरांस कोणत्या ठिकाणी आणि केव्हा आराम सुख होणार आहे. तसेच त्यांनी आपल्या माता-पित्याला उन्हात तळतळायास लावून ते मरण पावल्यानंतर त्यांच्या नावाने धूर्त आर्य ब्राह्मणास छत्रीदान दिल्याने त्याबद्दल त्यांच्या मृत पावलेल्या पितरांच्या अंगावर छत्रच्छाया कोणत्या ठिकाणी आणि केव्हा पडणार? आणि तसेच त्यांनी आपल्या माता-पित्याला भर उन्हात अनवाणी तळतळायास लावून ते मरण पावल्यानंतर त्यांच्या नावाने धूर्त आर्य ब्राह्मणास जोडेदान दिल्याने त्याबद्दल त्याच्या मृत झालेल्या पितरांना पादुकासुख कोणत्या ठिकाणी आणि केव्हा होणार? या सर्वाविषयी सिद्ध करता येत नाही. यावरून धूर्त आर्यभटाविषयीं बृहस्पतीचे म्हणणे सर्व खरे आहे किंवा खोटें आहे, याविषयी तुझा तूंच विचार कर, म्हणजे झाले.
गोविंदराव प्र० यावरून शूद्रादि अतिशूद्रांनी आपल्या माता-पित्यांच्या नावाने आर्य ब्राह्मणांस दान जर केले नाही, तर त्यांची गति कशी लावावी?
जोतीराव उ० वा! खासा प्रश्न- धूर्त आर्यभट ब्राह्मणांच्या मृत मातापित्यांची गति लावण्याकरिता ते पुन्हा शूद्रादि अतिशूद्रास काही दान करितात काय?
गोविंदराव उ०- आर्यभट ब्राह्मणांच्या मातापित्यांची गति लावण्याकरिता शूद्रादि अतिशूद्रांस काहीच दान करीत नाहीत.
जोतीराव प्र० यावरून धूर्त आर्यभट ब्राह्मणांच्या मृत मातापित्यांची गति कशी लागत असेल, याविषयीं तुला कसें वाटते?
गोविंदराव 30- शूद्रादि अतिशूद्रांच्या मृत मातापित्यांची गति लावण्याकरिता धूर्त आर्यभट्ट ब्राह्मण आपल्या पायाचे तीर्थ पाजून त्याजपासून जर दान घेतात, तर आर्यभट ब्राह्मण आपल्या मृत मातापित्यांची गति लावण्याकरिता शूद्रादि अतिशूद्रांच्या पायाचे तीर्थ न पिता त्यांजला काहीच दान करीत नाहीत. यामुळे आर्यभटांचे मृत पूर्वज आधी मधीच लोंबत असतील असे मला वाटते. परंतु शूद्रादि अतिशूद्रांनी आपल्या मृत मातापित्यांचे उतराई होण्याकरिता त्यानी काय करावे?
जोतीराव उ०- शूद्रादि अतिशूद्राचे माता-पिता मृत होताच त्याचे भाऊबंद सोयरे- धायरे आणि इष्टमित्र त्यांचे घरी येऊन त्यांच्या प्रेतांची गति लावण्याकरिता त्यास सर्व प्रकारची मदत करितात, याबद्दल त्याचे उतराई होण्याकरिता मृत माता-पित्यांचे तेरावे दिवशी आपल्या शक्त्यनुसार त्या सर्वांस भोजन देऊन त्या सर्वांच्या गळ्यांत पुष्पाच्या माळा घालाव्यात. आणि आपल्या शक्त्यनुसार काही द्रव्य देऊन त्यांच्या शाळेत जाणाऱ्या मुलीमुलास मोठ्या उल्हासाने गाया बक्षीस कराव्यात व दर वर्षी आपल्या माता-पित्यांची आठवण राहाण्याकरिता आपल्या सामर्थ्याप्रमाणे वर्षश्राद्ध करून काही भाऊबंदास सोयऱ्या धायऱ्यास इष्टमित्रांस भोजन देऊन कोणाची आवडनिवड न करता आपल्या सर्वाच्या निर्मिकाच्या नावाने शाळेत जाणाऱ्या निराश्रित मुली मुलास थोडीबहुत मदत केली, म्हणजे जन्मास आल्याचे सार्थक झाले.