भारत शंभर टक्के करोनामुक्त झाला नसला आणि आजही करोनाचे अगदी किरकोळ प्रमाणात रुग्ण सापडत असले तरी करोनाची नांगी आता जहरी राहिलेली नाही.
सारे जग जवळपास अडीच-तीन वर्षे उलटेपालटे करून टाकणारा आणि पुढील अनेक वर्षे आपली अदृश्य मुद्रा जगाच्या वाटचालीवर उमटविणारा करोना नावाचा विषाणू आता अखेर भारतात पुरता निष्प्रभ झालेला दिसतो. भारत शंभर टक्के करोनामुक्त झाला नसला आणि आजही करोनाचे अगदी किरकोळ प्रमाणात रुग्ण सापडत असले तरी करोनाची नांगी आता जहरी राहिलेली नाही. मुख्य म्हणजे, करोनाच्या रुग्णांचे प्रमाण यापुढे आणखी घटत जाईल आणि जवळपास प्रत्येक रुग्णाला होणारी करोनाबाधा बरी होणार आहे. २० जून, २०२३ रोजी संपूर्ण देशात केवळ ३६ करोना रुग्णांची नोंद झाली. भारताचा एकूण आकार आणि लोकसंख्या पाहता हा आकडा काहीच नाही. मार्च, २०२० पासूनचा काळ पाहिला तर हा रुग्णसंख्येचा नीचांक आहे. आणि तो आणखी खाली जाईल. वैज्ञानिक आणि डॉक्टरांपुढचे येत्या काळातले आव्हान म्हणजे, आजवर भारतात सापडलेल्या करोना विषाणूच्या प्रत्येक प्रकाराची नोंद ठेवणे आणि त्या प्रत्येकाची जनुकीय सूत्रावली म्हणजे जिनोम सिक्वेन्सिंग निश्चित करणे. सध्या भारतीय वैज्ञानिक २२४ प्रकारांची अशी जनुकीय सूत्रावली करण्यात गुंतले आहेत. हे काम भविष्याच्या दृष्टीने मोलाचे आहे. आता या नोंदविल्या गेलेल्या प्रकारांपेक्षाही नवाच प्रकार भारतात सापडला तर मात्र त्या रुग्णाचे पुन्हा विलगीकरण करावे लागेल आणि सध्या दिल्या जाणाऱ्या लशी त्या प्रकाराचा बंदोबस्त करण्यास समर्थ आहेत का, हेही काळजीपूर्वक जोखावे लागेल.
करोना हे भारतापुढचे अनेक अंगांनी उभे ठाकलेले आव्हान होते. त्यातून भविष्यासाठी अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. भारतीय हे कोणतेही आव्हान उभे राहिले की पूर्ण ताकदीने प्रतिसाद देतात. अभूतपूर्व वेगाने कामे करतात. मात्र, सारे काही सुरळीत झाले की, भारतीय समाज पुन्हा ढिला पडतो. सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याची किंवा कचरा न करण्याची सवय करोना काळात बहुतेकांनी लावून घेतली होती. तिचे आता पुन्हा विस्मरण झाले आहे. बुधवारी देशात ३२७ जणांचे लसीकरण झालेले राष्ट्रीय पोर्टलवर दिसते आहे. मात्र, साऱ्या देशाचे दुहेरी लसीकरण अद्यापही झालेले नाही. ‘बूस्टर’ गृहित धरला तर लोकसंख्येच्या तिप्पट म्हणजे चारशे कोटींच्या पुढे लसी दिल्या जायला हव्यात. मात्र, लसींचा सध्याचा एकूण आकडा २२० कोटी ६७ लाख ३४ हजार ९६७ दिसतो आहे. याचा अर्थ, लसीकरणाचे अजून बरेच काम बाकी आहे. ते वेगाने चालवून पुरे करणे आवश्यक आहे. साथ संपली असली आणि समाजात सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली असली तरी लसीकरणाचे उद्दिष्ट आपण अजून गाठलेले नाही, हे विसरता कामा नये. साऱ्या जगातील करोनाबळींवर नजर टाकली तर भारतात एकूण साडेचार कोटी रुग्ण नोंदले गेले आणि त्यातील पाच लाख ३२ हजार दगावले. मात्र, करोना झालेला प्रत्येक रुग्ण नोंदला गेला का आणि या काळात मृत्यू झालेल्या प्रत्येक नागरिकाच्या मृत्यूचे नेमके कारण नंतर नोंदविले गेले आहे का, हे प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत.
करोनासारखी आपदा शतकात एखाद्यावेळीच येते. इतकी प्रचंड वैज्ञानिक आणि तंत्रवैज्ञानिक प्रगती होऊनही, करोनाने साऱ्या विश्वाचे आर्थिक, मानसिक, सामाजिक, आरोग्यविषयक स्थैर्य हिरावून घेतले होते. जगातील कोट्यवधी कुटुंबांना करोनाने पुन्हा गरिबीच्या खाईत लोटून दिले. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मोडकळीस आल्या. असंख्यांचे प्राण तर हरलेच; पण बरे झालेल्यापैकी अनेकांना कायमचे दुबळे केले. माणूसजात म्हणून साऱ्या जगाने एकत्रित काही धडे एव्हाना शिकायला हवे होते. तसा कृतिशील निर्धार दिसायला हवा होता. तसा तो दिसत नाही. आता सारे काही ठीक झाले, असे समजून जग पुन्हा पहिल्यासारखेच वागू लागले आहे. ‘सामाजिक अंतर’ ही नवी संकल्पना आपण करोना काळात शिकलो. मात्र, ती अमलात आणायची तर नगररचनेपासून नवी विकासकेंद्रे तयार करण्यापर्यंत अनेक सुधारणा कराव्या लागतील. देशातील सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक वेगवान आणि उत्तरदायी कशी करायची, याचे मार्ग चोखाळावे लागतील. करोना दुर्बलांना अधिक छळत होता, हे लक्षात ठेवून समाजाचे सरासरी आरोग्य उत्तम ठेवण्याचे आव्हानही पेलायला हवे. बुधवारीच ‘जागतिक योग दिन’ झाला. करोना काळात ज्यांची प्रतिकार शक्ती उत्तम होती, त्यांना कमीत कमी त्रास झाला. अशी प्रतिकार शक्ती वाढविण्याचे मार्ग म्हणजे नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी आहार. भारताची अर्थव्यवस्था जशी आता रुळांवर आली आहे; तसेच, भारतीयांना करोनोत्तर नवे आरोग्यभानही यायला हवे. मात्र, या आघाडीवर समाजात आणि दोन्ही सरकारांमध्ये म्हणावी तशी जागृती दिसत नाही. समाजाने जीवनशैली आणि सरकारने वर्तनशैली बदलली नाही; तर करोनाने शिकविलेले सगळे धडे वाया जाण्याची भीती आहे. करोनाला घालविले असले तरी विसरायला मात्र नको.