जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा इथं लाईन ऑफ कन्ट्रोलवर (LOC) भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये समोरासमोर जोदार धुमश्चक्री झाली. यामध्ये जवानांनी ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. ठार झालेले दहशतवादी हे जम्मू-काश्मीर गझनवी फोर्स (JKGF) या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात असताना ही चकमक झाली.
या दहशतवाद्यांनी अफगाण-पाक भागात लपून छपून कारवाया केल्या आहेत. गुरुवारी रात्री हे लोक कुपवाडा जिल्ह्यातील जुमागंड इथून भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत होते. हे दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती कुपवाडा पोलिसांना विशेष खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार लष्करानं त्यांना घेरण्यासाठी खास रणनीती तयार केली. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून मोठी चकमक झाली.
चकमक यशस्वीभारतीय जवानांकडून या चकमकीला यशस्वीरित्या हाताळले गेले कारण यात एकही जवान जखमी झालेला नाही, उलट त्यांनी या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. गुरुवारी रात्री ही मोहिम सुरु करण्यात आली होती जी शुक्रवारी सकाळी संपली, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हत्यारं जप्तचकमक झालेला भाग सॅनिटाईझ करण्याचं काम सुरु असून सर्व पाच ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून अनेक हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये पाच AK-47 रायफल्स, 15 मॅगझिन्स, अॅम्युनिशन, ग्रेनेड्स, नाईट व्हिजन डिव्हाईस आणि दुर्बिणी जप्त करण्यात आल्या आहेत.