पृथ्वीतलावर संगीत आवडत नाही, तसेच संगीताशी आपला काही एक संबंध नाही, असे म्हणणारा मनुष्य शोधून सुद्धा सापडणार नाही. तसं पाहिलं तर आपले आयुष्य संगीताच्या सप्तसुरांनी व्यापले आहे. वसुंधरेच्या प्रत्येक कणाकणात संगीत सामावले आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात नवचैतन्य संचारले आहे. संगीत नसेल तर माणसाचे जीवन क्षणभंगूर आहे. त्यामुळेच, की काय जागतिक पातळीवर 'संगीत दिन' मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जातो.
संगीताची आवड नसलेली क्वचितच कोणी असेल. संगीत ही अशी गोष्ट आहे जी लोकांच्या हृदयावर आणि मनावर खोलवर परिणाम करते. या कारणास्तव, संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल जगभरातील गायक आणि संगीतकारांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आज (21 जून) जगभरात 'जागतिक संगीत दिन' साजरा केला जातो. या दिवशी अनेक देशांमध्ये संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
जागतिक संगीत दिनाचे महत्त्व
या दिवसाचे आयोजन शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संगीताबद्दल लोकांची आवड वाढवण्यासाठी केले जाते, कारण संगीत जीवनात शांती आणि आनंद देते. या कारणास्तव बहुतेक लोकांना संगीत ऐकणे आवडते. काहींना दुःख कमी करण्यासाठी संगीत ऐकायला आवडते, तर काहीजण आनंदात संगीत ऐकण्याला महत्त्व देतात. इतकेच नाही तर अनेक प्रकारच्या समस्यांवर मात करण्यासाठी म्युझिक थेरपीही अनेक वेळा दिली जाते.
जागतिक संगीत दिन दरवर्षी 21जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना संगीताचे महत्त्व सांगणे हा आहे. अशा परिस्थितीत या दिवसाचा इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे आहे.या दिवशी संगीत क्षेत्राशी निगडित मोठ्या गायक आणि संगीतकारांच्या सन्मान केला जातो. जगभरात मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात.
'जागतिक संगीत दिन' जगातील 32 हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो. या दिवशी अनेक देशांमध्ये संगीताचे कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारे सादर केले जातात. भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, अमेरिका, जपान, चीन, ब्राझील आणि मेक्सिको या देशांतील संगीतकार या दिवशी त्यांच्या वादनाने सुंदर परफॉर्मन्स देतात. 'जागतिक संगीत दिन' साजरा करण्याची सुरुवात केव्हा आणि कुठे झाली हे जाणून घेणे देखील मनोरंजक असेल. या दिवसाचा इतिहास, महत्त्व, उद्देश जाणून घ्या.
जागतिक संगीत दिनाचा इतिहास
जागतिक संगीत दिन पहिल्यांदा फ्रान्समध्ये 21 जून 1982 रोजी साजरा करण्यात आला. फ्रान्सचे सांस्कृतिक मंत्री मॉरिस फ्ल्युरेट यांनी एक प्रस्ताव ठेवला होता, जो 1981 मध्ये स्वीकारण्यात आला होता. यानंतर, फ्रान्सचे पुढील सांस्कृतिक मंत्री, जॅक लँग यांनी 1982 मध्ये हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर 21 जून 1982 रोजी पहिल्यांदा 'जागतिक संगीत दिवस' साजरा करण्यात आला. या दिवसाला Fête de la Musique म्हणजेच संगीत महोत्सव असेही म्हणतात.
जागतिक पातळीवर संगीत दिन साजरा करण्याची परंपरा प्रथम फ्रान्समध्ये रुजली. फ्रान्समध्ये संगीत दिनाला 'फेटे डेला म्युसिक्यू' असे संबोधले जाते. वास्तविक, लेबोनिज लोकांच्या जीवनात संगीत महोत्सवाचा अनन्य साधारण महत्त्व आहे. संगीत जणू त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटकच बनलाय. फ्रान्समधील एक ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी त्यावेळेच्या तिथल्या सांस्कृतिक विभागासाठी या सोहळ्याची सुरुवात केली होती. आज, जगभर 21 जूनला संगीताचा महोत्सव साजरा होतो.
जन्मापासून ते मृत्युपर्यंत मानवासोबत संगीत आहे. किंबहूना संगीताविना मनुष्याचे जीवन अशक्य आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक हिंदोळ्यावर संगीत महत्त्वाची भूमिका बजावत असते. संगीत माणसाला रिझवण्याचे, बळकटी देण्याचे काम करते. एवढेच नव्हे तर दुर्धर आजारही म्युझिक थेरपीने बरे झाल्याची उदाहरणे आहेत.
ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोने राज्यात शालेय शिक्षणात संगीत आणि व्यायाम हे दोन विषय अनिवार्य केले होते. त्याचे महत्त्व त्यांनी अचूकपणे जाणले होते. संगीतामुळे माणूस संवेदनशील होतो. त्याला भाव-भावना समजायला लागतात. मन सशक्त होते. तर व्यायामामुळे शरीर बळकट होते. आणि राज्य टिकवण्यासाठी मन अर्थात मेंदू आणि बळकट शरीराची आवश्यकता असते.
शब्दाशिवाय भावना पोहोचविण्याचे सामर्थ्य संगीतामध्ये आहे
सर्व संगीत प्रेमींना
जागतिक संगीत दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा…!