युरोपात सध्या प्रखर राष्ट्रवादी राजकीय पक्ष व विचारसरणीचा उदय होत आहे व त्याला जनमताचा पाठिंबाही हळूहळू वाढत आहे. त्यातून हक्काची भावना निर्माण होऊन संघर्षांला सुरुवात झाली आहे...
संघटनेच्या आक्रमणानंतर निर्वासितांना आश्रय दिला. दुसऱ्या महायुद्धानंतर हिटलरच्या युद्धपिपासू वृत्तीची भरपाई म्हणून निर्वासितांबाबत जर्मनी कायमच कनवाळू राहिला. त्याच जर्मनीत आता ‘आल्टर्नेटिव्ह फ्युअर डॉइशलँड’ हा अतिउजवा पक्ष लोकप्रिय होत आहे. सर्वधर्मसमभाव आणि निर्वासितांविषयीची व्यापक भूमिका घेणाऱ्या जर्मनीच्या अभेद्य भिंतीला तडे जात आहेत. स्वीडन, फिनलंड, डेन्मार्क या देशांमध्ये वेगळी परिस्थिती नाही. अगदी २०१६ मध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडलेल्या ब्रिटनमध्येही हीच भावना घर करते आहे.
थोडक्यात, युरोपात प्रखर राष्ट्रवादी राजकीय पक्ष व विचारसरणीचा उदय होत आहे व त्याला जनमताचा पाठिंबाही हळुहळू वाढत आहे. एके काळी या देशांनी, इथल्या मानवतावादी संघटनांनी बहुसांस्कृतिकवाद, मानवतावाद यांचे दाखले देत इराक, सीरिया, अफगाणिस्तान, मोरोक्को, अल्जेरिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांतील निर्वासितांना आश्रय दिला. तेव्हा रस्त्यावर आलेला हा निर्वासित स्वस्तात, पडेल ते काम करायला तयार होता. जगण्याचा भीषण संघर्ष पाहिलेला, पोटात आगडोंब घेऊन आलेला निर्वासित जसा इथे रुळला तसा त्यांनी त्यांचा धर्म, परंपरा त्या त्या देशात रुजवायला सुरुवात केली. त्यातून पुढे हक्काची भावना निर्माण झाली आणि संघर्षाला सुरुवात झाली. २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीच्या सावटातून युरोपातील अनेक देश आजही पूर्ण बाहेर पडलेले नाहीत. आधी २००१ चा अमेरिकेवरचा अतिरेकी हल्ला, अल-कायदा, आयसिसचा उदय आणि २०१५ ला सीरियातून आलेल्या निर्वासितांच्या लोंढ्यांनी युरोपात राग खदखदू लागला. बाहेरचे आणि मूळचे हा संघर्ष वाढत गेला. मुळातच धर्मप्रसारावरून ख्रिश्चन आणि इस्लाम यांच्यात अनेक शतके युद्धे झाली आहेत. त्यात बाहेरचे येऊन आमच्या रोजगारावर, आमच्या साधनसंपत्तीवर दावा सांगतात, हे वाटून हा राग टोकाला जाऊ लागला आहे. आजही युरोपातील एका वर्गाची भूमिका बहुसांस्कृतिकवादाची आणि मानवतावादाची आहे. पण लोकभावना दुसरीकडे जात आहे, हे त्यांनाही कळते आहे.
त्यातच ब्रिटनने घेतलेली ब्रेक्झिटची भूमिका आणि २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होणे, यातून तर युरोप अधिक वेगाने अतिउजव्या विचारसरणीकडे झुकू लागला. आधी ट्रम्प येतील, हे आक्रित वाटावे, अशी परिस्थिती होती. ट्रम्प आले आणि गेले. पण आता बदलत्या परिस्थितीत एका सर्वेक्षणानुसार पाचपैकी दोन अमेरिकी उघडपणे सन १८६१ ते १८६५ च्या अमेरिकी यादवीचे समर्थन करतो. इतकेच नाही तर, अमेरिकेत एखादा हुकूमशहा आला आणि त्याने सगळ्या निर्वासितांना धडा शिकवला तरी चालेल, असे अनेकजण म्हणतात. त्यामुळे, युरोपात जी अतिउजवी विचारधारा मूळ धरू लागली आहे, ती अधिक घट्ट होत जाणार हे नक्की. ही घडामोड फक्त ही फक्त मुस्लिम निर्वासितांपुरच्या संदर्भात मर्यादित राहते की ही भावना गोऱ्या वर्णवर्चस्ववादाकडे सरकत जाते, हे आता पाहावे लागेल.