वेग आणि संतुलनात कोणता घटक अधिक महत्त्वाचा, असा प्रश्न कुणालाही विचारला तर संतुलनाचे पारडे जड ठरेल. अती वेग नेहमीच हानीकारक ठरतो. त्यातून संतुलन ढासळते. वेग वाढविताना संतुलनाकडे दुर्लक्ष झाले तर कसे अघटित घडते, याची अनुभूती महाराष्ट्राने शुक्रवारी उत्तररात्रीच्या अपघातातून घेतली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर बुलढाण्यानजीक भयंकर दुर्घटना झाली. अवघी बस पेटली. २५ प्रवाशांचा अक्षरश: कोळसा झाला. या होरपळ आणि हुंदक्यांसाठी कारणीभूत ठरलेल्या घटकांचा आता शोध घेतला जाईल.
समृद्धी महामार्गाचा शुभारंभ होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. वेगाची कास धरून निर्मिलेल्या या मार्गाला अपघातांनी ग्रासले आहे. छोट्या-मोठ्या साडेचारशेंवर अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही शंभरीच्या आसपास पोहचली आहे. जखमींची संख्या त्याहून अधिक आहे. परवाच्या दुर्घटनेने भीषणतेचा कळस गाठला. एखादी खासगी बस दाराच्या बाजूने उलटते आणि ज्वाळांनी वेढलेल्या प्रवाशांची होरपळून राख होते हे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. चालकाला डुलकी लागल्याने ही दुर्घटना घडली, की अन्य कारणाने बसवरील नियंत्रण गमावल्याने हा प्रकार घडला हे चौकशीअंती कळेल.
खासगी बसच्या रचनेपासून महामार्गांवरील सुविधांपर्यतचा आढावा घेण्याची गरज या अपघाताने अधोरेखित केली. विकसित देशांमध्ये ट्रॅकरद्वारे बसयंत्रणेवर लक्ष ठेवले जाते. चालकाच्या मन:स्थितीचीही काळजी घेतली जाते. समृद्धी महामार्गावर वाहनांच्या टायरची तपासणी होते असा दावा भलेही केला जातो, मात्र त्यात तितकेसे तथ्य नाही. चालकांचे समुदेशन करण्यापासून वाहनांच्या गतीवर नियंत्रणासाठी उपाय योजनांच्याही घोषणा यापूर्वी झाल्या. त्यातून अपघात घटले नाहीत. आयटीएमएस म्हणजेच ‘इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’द्वारे वाहनांचा वेग, लेनची शिस्त यासारख्या गोष्टींवर लक्ष ठेवले जाईल अशी घोषणा शुभारंभाच्यावेळी झाली होती. वाहनांवर लक्ष ठेवणे म्हणजे दंड आकारणे नव्हे! खासगी बसेसच्या वाहतुकीसंदर्भात राज्यात सावळा गोंधळ आहे. नियमावलींचे सक्तीने पालन होत नाही. खासगी बस थांब्यांपासून प्रवाशांच्या मर्यादेपर्यंत मुळीच समन्वय नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहतुकीवर विपरीत परिणाम होत असतानाही खासगी बसेसची आकस्मिक तपासणी वा कारवाई होताना दिसत नाही. अनेक बसमध्ये अतिशय अरुंद जागेत जीव मुठीत घेऊन लोकांना प्रवास करावा लागतो. प्रवासी अक्षरश: कोंबले असतात. अपघाताची वेळ सांगून येत नाही, मात्र अपघातानंतरचा कालावधी महत्त्वाचा असतो. या ‘गोल्डन अवर्स’मध्ये मदतकार्यासाठी धावून जाणारे हात अनेक जीव वाचवू शकतात. समृद्धी महामार्गावर अशी सक्षम यंत्रणा नाही. ज्या महामार्गावर पेट्रोलपंपच तुरळक आहेत, तिथे अन्य सुविधांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणे क्रमप्राप्तच ठरते. या महामार्गाच्या उद्घाटनाची घाई झाली, हे तथ्य आतातरी सरकारी यंत्रणेने स्वीकारायला हवे. चुकांमधून बोध घेण्याची ही वेळ आहे. तातडीने उपाययोजना करायला हव्यात. अपघातमुक्त मार्गांसाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करायला हवी. बळी गेलेल्यांना लाखांच्या मदतीच्या घोषणेत आणि राजकीय भेटींमध्ये जी तत्परता दाखविली जाते, ती चपळाई अपघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जाणवत नाही.
समृद्धी महामार्ग निर्माण करण्याची आवश्यकता नव्हती असा याचा अर्थ मुळीच नाही. शेतकऱ्यांचा, लघु उद्योजकांचा कच्चा माल महानगरापर्यंत पोहचवून विकासाचे विकेंद्रीकरण साधण्याचे उद्दिष्ट त्यामागे होते. एकूण ५५ हजार कोटींचा हा भव्य प्रकल्प आहे. पाच मोठ्या तर २७४ छोट्या पुले या मार्गात येतात. अनेक अंडरपासची निर्मिती झाली असून प्राण्यांच्या वाहतुकीची काळजी घेण्यात आली आहे. वाढते अपघात लक्षात घेता माणसांच्या जीवाची काळजी पुरेशा प्रमाणात घेतली गेली की नाही असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. रस्ता ओलांडणारे वन्यप्राणी अजूनही ‘समृद्धी’वर आढळतात. त्यातून वेगवान वाहने दुर्घटनाग्रस्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. रोज ३५ हजार वाहनांची वाहतूक या महामार्गावरून होणे अपेक्षित आहे. सध्याचा सहा पदरी महामार्ग भविष्यात आठ पदरी केला जाण्याचीही शक्यता आहे. या हायस्पीड कॅरिडॉरने नागपूर ते मुंबई प्रवासाची वेळ आठ तासांनी कमी केली असली तरी चिंता मात्र बरीच वाढविली आहे. सुविधांमुळे जगणे सुलभ व्हायला हवे. जीवाला घोर लावणाऱ्या यंत्रणेला गती म्हणायचे की अधोगती याबाबत तटस्थ मंथन व्हायला हवे. ‘थांबला तो संपला’ हे सुभाषित मैलाच्या दगडांवर हमखास आढळते. मोकळ्या रस्त्यांवर सातत्याने गाडी पळविणारा चालक गतीमुळे संमोहित होतो. अशावेळी थोडे थांबलेले बरे असते. सुरक्षित प्रवास हे उद्दिष्ट हवे. राज्याला जीवघेणी गती नव्हे, तर सर्वंकष प्रगती हवी आहे. समृद्धी महामार्गावरील आकांत अलक्षित राहू नये. नियमांचे संतुलन साधले नाही, तर अपघातसत्र सरणार नाही.