मानसिक आरोग्य म्हणजेच मनाचे आरोग्य. ह्या पदाच्या दोन संकल्पना प्रचलित आहेत: पहिली संकल्पना‘मानसिक विकारांचा अभाव’ अशी असून ती अभावार्थी व अपूर्ण आहे. आधुनिक संकल्पना भावार्थी असून ती अशी आहे :‘ज्या दीर्घकालीन मानसिक अवस्थेत व्यक्तीला एकंदर बरे वाटते (भाव सर्वसाधारणपणे सुखकारक असतात तसेच गैरभावनांचा अतिरेक नसतो), तिची विचारसरणी बुद्धिप्रणीत व वागणूक समाजमान्य असून जीवनातील विशिष्ट उद्दिष्टे गाठण्यासाठी ती झटत असते, तरीपण ते न साधल्यास असंतुष्ट होत नसते, तिला मानसिक आरोग्य असे संबोधतात.
’ ह्या संकल्पनेतील फक्त महत्त्वाचे गुणक वर दिले आहेत. याशिवाय इतर गुणक आहेत, ते असे :
(१) इतरांशी, विशेषतः निकटवर्तियांशी आधारदायी व स्थिर नाते जुळवण्यांची क्षमता.
(२) आत्मप्रतिमा उंचावलेली नसली, तरी डागळलेलीही असता कामा नये. स्वतःच्या उणिवा प्रथम मान्य करून मग त्या सुधारण्याची तसेच स्वतःच्या क्षमता वाढवून त्या पूर्णत्वाला न्यायची तयारी.
(३) आप्तेष्टांच्या व समाजाच्या कल्याणाशी बांधिलकी.
(४) समस्या, दडपणे व संकटे ह्यांना तोंड देण्याची तयारी.
(५) इतरांच्या व्यक्तिमत्त्वाला तसेच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य तो आदर दाखवण्याची व महत्त्व द्यायची तयारी.
(६) जीवनात वाटचाल करण्यासाठी लागणारी समर्पक वृत्ती व जोपासलेली जीवनमूल्ये.
अर्थात सर्वसाधारण व्यक्तीचे मानसिक आरोग्य आदर्श नसल्याकारणाने वरील गुण कमीअधिक प्रमाणात असणे मानसिक आरोग्याच्या संकल्पनेत अंतर्भूत आहे. तसेच वरील गुणांचे प्रमाण व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक क्षमतेवर तसेच सामाजिक व सांस्कृतिक स्तरावरही अवलंबून असते.
• मानसिक आरोग्याची दशा ठरविणारे कारक
मानसिक आरोग्याची दशा ठरविणारे कारक पुढीलप्रमाणे
आहेत :
जननिक घटक : काही मानसिक विकार (उदा., उद्दीपन-अवसाद-चित्तविकृती व छिन्नमानस) आनुवंशिक असल्यामुळे, मानसिक आरोग्य अबाधित राहण्यासाठी अशा आनुवंशिक रोगांच्या जननिक कारकांचा पूर्ण अभाव असणे जरूरीचे आहे.
व्यक्तिमत्त्वविकासकारी घटक : मुलांचा निरोगी व्यक्तिमत्त्वविकास त्यांच्या आईवडिलांशी असलेल्या घनिष्ठ नात्यावर तसेच घरातल्या आधारदायी वातावरणावर अवलंबून असतो.
सामाजिक घटक :व्यक्तीचे जीवन तिच्या सामाजिक व आर्थिक स्थितीवर तसेच सामाजिक घटनांवर व प्रचलित संस्कृतीवर अवलंबून असते. सामाजिक संघर्ष, समस्या व ताणांचा अनिष्ट परिणाम होऊन मानसिक अस्वास्थ्य उद्भवते. याउलट सामाजिक उन्नती तसेच परिस्थिती व संबंधापासून, विशेषतः सुख व समुद्धी देणाऱ्या वैवाहिक व कौटुंबिक जीवनापासून, आधार मिळाल्याने मानसिक आरोग्य अबाधित राहते.
शारीरिक घटक : निरोगी शरीरप्रकतीमुळे वाटणारा व्यक्तीचा आत्मविश्वास मानसिक आरोग्यास पोषक ठरतो. सर्वसाधारण व्यक्तींच्या मानसिक आरोग्यात काही उणिवा असतात; पण त्या मर्यादित असतात. विशेष प्रमाणातील उणिवांतून मात्र पुढे मानसिक विकार उद्भवू शकतात.
मानसिक आरोग्याचा अभाव म्हणजेच मानसिक अनारोग्य. ह्या सदरात मानसिक विकाराशिवाय, तीव्र व दीर्घ असंतुष्टता, सामाजिक विकृत वर्तन, अनिवार्य अशा वाईट सवयी– उदा., नखे खाणे, अतिरेकी व्यसने – ह्यांचाही समावेश केला जातो
• मानसिक विकारांचे दोन प्रकारे वर्गीकरण तीव्रतेच्या
दृष्टीकोनातून आणि
मानसचिकित्सेच्या दृष्टीकोनातून.
1. पहिले वर्गीकरण
(अ) सीमान्त (बॉर्डरलाइन) विकार. उदा., विक्षिप्त, लहरी, विकृत, श्रमवेडी अथवा एकान्तवासी व्यक्ती. (आ) व्यसने, वाईट सवयी व विकृत आवडी. (इ) उपप्रसंग (एपिसोड) व प्रतिक्रिया (रिॲक्शन्स). (ई) रोग (डिसीझ).
2. दुसरे वर्गीकरण
मानसचिकित्सेच्या दृष्टीकोनातून केलेले वर्गीकरण ‘मानसचिकित्सा’ ह्या नोंदीत तपशीलवार दिले आहे.
• इतिहास : भारतीय संकल्पना
अतिप्राचीन भारतातील चिकित्सकांना मानसिक विकारांची कल्पना नीट आलेली नव्हती. त्या काळात माणूस असंबद्ध बोलू अथवा वागू लागला की त्याला भुताने अथवा परकीय आत्म्याने झपाटले आहे किंवा कुणी दुष्ट हेतूने जादूटोणा केला आहे, असे समजले जात होते. अशा व्याधीवर अंगारे-धुपारे, मंत्रतंत्र इ. लोकभ्रमावर आधारित व गुह्य उपाय केले जायचे. देवाचे नाव घेऊन प्रचलित धार्मिक संकेत अथवा भाकिते सांगू लागल्यास, देव अंगात आले असे समजून त्या व्यक्तीला पूज्य मानीत असत. अशा कल्पना ग्रामीण समाजात अजूनही रूढ आहेत.
सुमारे २,५०० वर्षांपूर्वी मनाबद्दल शास्त्रोक्त कल्पना आयुर्वेदात मांडली गेली ती अशी : देह, इंद्रिये, मन व आत्मा मिळून शरीर बनते व या चारींच्या संयोगाला जीवित अथवा आयुष्य अशी संज्ञा आहे. मन हे स्वतंत्र अणुरूप द्रव्य असून त्याचे स्थान (चेतनास्थान) हृदयात आहे. म्हणून ते अंतरेंद्रिय. मनावरचे नियंत्रण वायू अथवा प्राण ह्यांच्यातर्फे होते व मन स्वतःचे व इंद्रियांचे नियंत्रण करते. तसेच ते ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिय या दोन्ही स्वरूपाचे (उभयात्मक) आहे. मनामुळे बाह्य विषयांचे ज्ञान एका वेळेस एका इंद्रियातर्फे होते. मनाचे कार्य संकल्पन स्वरूपात असते. इंद्रियांतर्फे झालेले बाह्य विषयाचे ज्ञान मुळात आलोचनात्मक व निर्विकल्पक असते. नंतर मन, अहंकार व बुद्धी ह्या तिहीने बनलेल्या अंतःकरणात पुढील क्रिया होतात :
मन बाह्य विषयाच्या घटकांचे पृथःकरण करते (म्हणजे अनावश्यकाचा त्याग व आवश्यक अंशाचे एकत्रीकरण) तसेच संकल्पित कल्पना निर्माण करते. त्यानंतर अहंकार हा आवड, इच्छा ठरवतो आणि त्यानुसार अभिमान बाळगतो. बुद्धी ही विषयपरीक्षण करून स्वतःच निर्णय घेते. या एकत्र अभिप्रायानुसार मन पुढील कार्यवाही कर्मेंद्रियातर्फे करते. मनाचे पोषण करणारे अंश अन्नात असतात असे मानणारा ‘आहार शुद्धी सत्त्वशुद्धिः’ नामक सिद्धांत आहे.
‘धी’,‘धृति’ व ‘स्मृति’ अशा तीन मानसशक्ती आहेत. धी म्हणजेच बुद्धी, धृती ही संयमशक्ती असून ती मनाचे नियमन करते व स्मृती योग्य तत्त्वाची आठवण देऊन मनाला सावध करते.
मनाचे विविध ‘गुणधर्म’ आहेत. पैकी सत्त्व हा गुण इष्ट समजला जातो. रज व तम हे दोष मानले जातात. ह्या गुणदोषांच्या निरनिराळ्या प्रमाणावर आधारित अशा मनाच्या तीन प्रवृत्ती (चित्तप्रकृती) वर्णिलेल्या आहेत : (१) सात्विक म्हणजे संयमी, विवेकी व जिज्ञासू. (२) राजस म्हणजे उत्कट, अतिसंवेदनाक्षम व प्रेरणाप्रधान. (३) तामस म्हणजे अज्ञानी, मोहवश व निष्क्रीय. काम, क्रोध, लोभ, मोह इ. मनोवृत्ती रज व तम या दोषांमुळे वृद्धिंगत होतात आणि मनाचे आवेग तयार होतात. मोहाचा अतिरेक हे चित्तविकल्पाचे लक्षण आहे.
रज व तमामुळे मानसशक्ती भ्रष्ट झाल्यास मानसिक कर्म बिघडते. भोगतृष्णा प्रबळ होते व आचरणात चुका होतात. ह्यालाच ‘प्रज्ञापराध’ म्हणतात. प्रज्ञापराधामुळे बुद्धिभ्रंश, स्मृतिभ्रंश आणि धृतिभ्रंश होतो. जी गोष्ट जशी समाजावयाला हवी तशी न समजता तिच्याविषयी ज्या विपरीत कल्पना असतील त्यांनुसार ग्रहण केली जाते व तसे वर्तन घडते. मानसविकार ह्याच्यातूनच उद्भवतात. ह्याशिवाय मानसविकारांची आधिभौतिक कारणेही आहेत : (१) अभिशप्तक (मोठ्यांचे शाप). (२) मंत्रप्रयोग (करणी, जादूटोणा). (३) उपसर्गकृत (भूतपिशाच).
तंद्रा व मूर्च्छा ह्या निद्रेच्या विकृत अवस्था आहेत. हवे ते मिळाले नाही आणि नको ते प्राप्त झाले म्हणजे चित्ताचा क्षोभ होऊन ज्या मद, मूर्च्छा, उन्मादादी व्याधी होतात, त्यांस मानसव्याधी म्हणतात.
• आयुर्वेदात सर्वच रोगांची तीन पूर्वरूपे
आयुर्वेदात सर्वच रोगांची तीन पूर्वरूपे सांगितली आहेत:
(१) किंचित शारीरिक, (२) किंचित मानसिक आणि (३) किंचित शारीर-मानसिक. हा सिद्धांत आधुनिक मनोशारीरिक ऐक्याच्या संकल्पनेशी बराच जुळतो. आयुर्वेदात रोगांचेही तीन प्रकार वर्णिलेले आहेत ‘त्रयोरोगाः निजागन्तुमानसाः’ (१) उपजत, (२) आगन्तु (परिसरापासून जडलेले) व (३) मानसिक.
आयुर्वेदात मानसलक्षणसमूहाला प्राधान्य दिले आहे. परंतु मानसरोगांचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. उन्माद व अपस्मार ह्या दोनच व्याधींचे वर्णन स्वतंत्र विकार म्हणून नव्हे, तर इतर रोगांतील लक्षणसमूह म्हणून केलेले आहे.
उन्मादाचे सहा प्रकार व अपस्माराचे चार प्रकार वर्णिलेले आहेत. उन्मादात ज्ञान (इंद्रियजन्य), विज्ञान (बुद्धी), वाणी, चेष्टा (हावभाव), शक्ती व वीर्य (विशेष शक्ती)‘अमानुष’ स्वरूपात दिसतात असे वर्णिलेले आहे. अपस्माराचा एक पोटप्रकार म्हणजेच ‘योषापस्मार’ (स्त्रियांतील अपस्मार). त्याला आधुनिक वैद्यकशास्त्रात उन्माद वा तांत्रिकोन्माद (हिस्टेरिया) म्हणतात.
भूतबाधा हा स्वतंत्र विकार नसून एक कारक आहे; ज्यापासून अनेक शारीरिक व मानसिक व्याधी होऊ शकतात, त्याचे देव, दानव, पिशाच इ. अठरा प्रकार नमूद केलेले आहेत.
आयुर्वेदात विकारांच्या प्रत्यक्ष उपचारांपेक्षा मानसिक आरोग्य तसेच नीतिमत्ता समृद्ध करण्यासाठी प्रतिबंधक उपाय जास्त सांगितलेले आहेत.
आयुर्वेदात सर्वच रोगांवरील उपचारांचे प्रकार
मुख्यत्वे अशा उपचारांचे तीन प्रकार आहेत :
देवव्यपाश्रय (डिव्हाइन थेरपी),
युक्तिव्यपाश्रय (फिजिकल थेरपी) आणि
सत्त्वावजय (मनाचे नियंत्रण).
देवव्यपाश्रयाचे प्रकार
(१) मंत्र, (२) औषधी व अंगावर वापरण्यासाठी मणी, (३) मंगळ, (४) बळी (अग्नीतील उपहार), (५) उपहार (अर्पण करणे), (६) होमहवन, (७) नियम, (८) प्रायश्चित्त, (९) उपवास, (१०) स्वस्तपयन (मंगल विधी), (११) प्रणिधान, (१२) तीर्थाटन आणि (१३) अभिमर्शन (स्पर्श व मंत्रोच्चार).
∆ युक्तिव्यपाश्रयाचे प्रकार
सात्त्विक आहार : उदा., गाईचे दूध, रक्तशाली (तांबडे भात), तुपासारखे स्निग्ध पदार्थ.
औषधे : आयुर्वेदीय औषधांचे चार वर्ग आहेत :(अ) मेध्य : बुद्धिवर्धक व कार्य सुरळित करणारी. उदा., शंख-पुष्पी व ज्योतिष्मती. (आ) संज्ञास्थापक : ज्ञान (शुद्ध जाणीव) पूर्वस्थितीत आणणारी (पुनरुज्जीवी). उदा., हिंग, महानिंब, जटामांशी, ब्राह्मी, नस्य व अंजने, सर्पगंधा व अश्वगंधा. (इ) निद्राजनक मदकारी (मादक) : अहिफेत-भंगा व विजया. (ई) निद्रानाशक उपाय (उद्दीपनी द्रव्ये): लंघन व रक्तमोक्ष. याशिवाय सुवर्ण, रौप्य वगैरे धातूंची औषधे, वेखंड, स्निग्ध पदार्थ वगैरे कुठल्याही खास वर्गात न बसणारी अशी औषधेही मानसिक विकारांवर सांगितलेली आहेत.
सत्त्वावजय
विरक्ती, शुद्ध रहाणी, मनोवेगावरोधन (इंपल्स कंट्रोल) व मनोवृत्तींचा (काम, क्रोध व मोह) निरोध. तसेच भोगातृष्णेवर नियंत्रण ठेवून दुःखमुक्ती हे आयुर्वेदीय मानसचिकित्सेचे धोरण आहे.
याशिवाय त्रासनचिकित्सा व मंत्रचिकित्सा ह्या मानसिक व्याधींवरील उपचारांचाही वापर बराच होतो.
∆ त्रासनचिकित्सा
शरीरास होणाऱ्या दुःखाच्या भीतीपेक्षा प्राणाची भीती अधिक ह्या तत्त्वावर ही चिकित्सा आधारलेली आहे. त्यामुळे चहुकडे फाकलेले मन स्थिर होते व रुग्ण विकारमुक्त होतो. ह्यांतील ‘मानसआघात उपचारां’त रुग्णाला दात काढलेल्या सापांच्या माणसाळलेल्या सिंह व हत्तींच्या तसेच दरोडेखोरांच्या सान्निध्यात काही काळ बंदिस्त ठेवतात. ‘विरुद्ध मनोवृत्ति’ ह्या उपचारांत अतिरेकी भावनेच्या विरुद्ध स्वरूपाची भावना जागृत करणे. उदा., भीतीविरुद्ध क्रोध, दुःखाच्या विरुद्ध कामप्रेरणा व क्रोधाविरुद्ध हर्ष. ह्या उपचारपद्धतीत आणि आधुनिक अध्ययनोपचाराच्या तत्त्वावर आधारलेल्या ‘इमोटिव्ह इमेजरी’ ह्या उपचारात बरेच साम्य आहे.
∆ मंत्रचिकित्सा
श्रद्धोपचाराच्या तत्त्वांचा उपयोग प्रामुख्याने ह्या चिकित्सेत केला जातो. याशिवाय आश्वासन व प्रशमन (सांत्वन) ह्या मनाला आधार देणाऱ्या उपचारांचाही अवलंब केला जातो. आधुनिक आधारदायी मानसोपचाराची उद्दिष्टेही अशीच आहेत.
∆ योगातील विचार
आयुर्वेदाशिवाय प्राचीन काळापासून भारतात हठयोग व राजयोग या काळाने मान्य केलेल्या पद्धतीनुसारही मनःशांती मिळवली जाते. तसेच विशेष प्रयत्नांनी मोक्ष अथवा जीवनमुक्तीही (उपनिषदांत उल्लेखिलेली) या जन्मी ब्रह्म व जीवात्मा यांचे ज्ञानद्वारा ऐक्य व बौद्ध धर्माप्रमाणे निर्वाण या प्रकारे मिळवता येते. हठयोगातील निरनिराळ्या आसनांनी शारीरिक व्याधी तसेच मानसिक विकार यांच्यावर मात करता येते. विशेषतः निद्रानाश, चिंतावस्था, भयगंड या विकारांतून शवासनाने मुक्त होता येते. मानसिक विकारांवर नियमित योगासने ही उपचारापेक्षा प्रतिबंधक उपाय म्हणून जास्त प्रभावी ठरतात. योगविद्येने विशेषतः प्राणायाममार्गे, कुंभकाचा (श्वासावरोधाचा) काळ क्रमाक्रमाने वाढवून प्रत्याहार (२५ पळे), धारणा (५ घटका), ध्यान (६० घटका) व शेवटी समाधी (१२ दिवस) साधता येते. कुंभकाने कुंडलिनी (सुप्तावस्थेत असलेली अंतःशक्ती) जागृत करता येते. त्यामुळे सर्व रोगांपासून मुक्ती मिळून योगी अमर (दीर्घायू) होतो असा समज आहे.
• पाश्चिमात्य देशांतील मानसिक आरोग्याचा इतिहास
पाश्चात्त्य देशातंही अतिप्राचीन काळी, भारताप्रमाणे मानसिक विकारांबद्दल पूर्ण अज्ञान होते व असाधारण किंवा विचित्र वर्तन, विचार वा भावना ह्या भूतबाधा, जादूचा अंमल अथवा अंगात येण्यामुळे उद्भवतात अशी समजूत होती. इ. स. पू. ४६० ते ३५७ ह्या काळात विख्यात ग्रीक वैद्य हिपॉक्राटीझ याने अशा विकारांची कारणे नैसर्गिक असून भूतपिशाच नव्हे, ह्या आधुनिक मतप्रणालीचे प्रतिपादन केले. तसेच त्याने मानसिक विकारांचे निदानीय दृष्ट्या तीन वर्ग केले आहेत, ते असे : (१) मनोव्यापारांचा अतियोग (मॅनिया), (२) खिन्नता (मेलँकोलिया) व (३) बुद्धिभ्रंश (फ्रेनायटिस). यांचे निदानीय वर्णन करून त्यांवरील‘मानसोपचार’ ही त्याने सांगितले. प्लेटो (इ. स. पू. ४२९–३४७) ह्या सुप्रसिद्ध ग्रीक तत्त्ववेत्त्यानेही, मानसिक विकारांच्या कारणांबद्दल तुलनात्मक दृष्ट्या आधुनिक असे सिद्धांत सादर केले. त्याने केलेले आत्म्याचे तीन भाग आणि फ्रॉइड यांनी ‘सायके’ चे (मानस) केलेले तीन विभाग यांत बरेच साम्य आहे. प्लेटोने ‘मानसिक आरोग्य’ ह्या संकल्पनेला पूरक कल्पना मांडली होती, ती अशी :‘शरीर व मन यांचा समन्वय म्हणजेच आरोग्य’.ॲरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४–३२२) ह्या प्रख्यात ग्रीक तत्त्ववेत्त्याने प्रथमच, मानसिक विकारांवरील उपचार म्हणून भावविरेचनाचा अवलंब करावा असे सांगितले. इ. स. १२४ मध्ये ॲस्किलपायडीझ व इ. स. १६० मध्ये गेलेननेमानसिक अनारोग्याच्या स्वरूपाबद्दल व कारणांबद्दल बरीच मीमांसा केली आणि मनोव्याधींचे शारीरिक कारणमूलक आणि मानसिक कारणमूलक असे दोन निरनिराळे वर्ग केले.
पुढे तिसऱ्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंतच्या काळात धार्मिक उपचार, श्रद्धोपचार (विशेषतः हस्तस्पर्शाने), आधिभौतिक उपचारांच्या नावाखाली मानसिक रुग्णांना क्रूर वागणूक तसेच पिशाच परिहार वगैरे उपचार प्रचलित होते. १८४५ मध्ये ग्रायसिंजर यांनी मानसिक विकार मेंदूच्या रोगामुळे होतात, असे ठामपणे सांगितले तसेच ह्या विषयावरील पहिले पाठ्यपुस्तकही लिहिले. १८८९ मध्ये एमील क्रेअपेलीन यांनी मानसिक विकारांचे वर्गीकरण शास्त्रोक्त पद्धतीने केले आणि छिन्नमानस ह्या विकारावर सुप्रसिद्ध प्रबंध लिहिला. तो आजही अधिकृत संदर्भग्रंथ म्हणून वापरात आहे. ⇨ झां मार्तँ शार्को व बर्नहाइम यांनी संमोहनाचा शास्त्रोक्त उपयोग, उन्माद वगैरे विकारांच्या वैद्यकीय उपचारासाठी केला. तथापि त्यांनी शारीरिक म्हणजे मेंदूच्या विकृतिजनक कारकांवर अधिक भर दिला. फ्रान्ट्स मेस्मर ह्या लोकप्रिय संमोहनविद्यातज्ञाने, आपल्या यशस्वी उपचाराने मानसिक कारकांकडे लक्ष वेधले. [→ वैद्यकीय संमोहन]. पुढे शार्को व बर्नहाइम यांनी उन्मादावर संमोहनीय उपचार प्रचलित केला. शार्कोचे विद्यार्थी ⇨ प्येअर झाने, योझेक ब्रॉइअर व सिग्मंड फ्रॉइड यांनी याच उपचाराच्या साहाय्याने उन्माद व इतर मज्जाविकृतींच्या मानसिक कारणांचा सखोल अभ्यास केला. [→ संमोहनविद्या]. त्यातूनच पुढे ब्रॉइअर व फ्रॉइड यांनी ‘ॲना ओ –‘ या उन्मादी रुग्णाचा उपचार करीत असताना, अबोध मनाचा शोध लावला. फ्रॉइडने पुढे स्वतंत्रपणे, मुक्त साहचर्य ह्या तंत्राने रुग्णांच्या अबोध मनाचा व त्यातील मनोगतिकीय यंत्रणेचा सखोल अभ्यास करून १८९७ मध्ये मनोविश्लेषण ही युगप्रवर्तक प्रणाली संस्थापित केली. म्हणूनच त्यांना ‘मानसचिकित्साशास्त्राचे जनक’ असे मानाने संबोधले जाते. काही वर्षानंतर कार्ल युंग वॲल्फ्रेड ॲड्लर ह्याफ्रॉइडच्या शिष्यांचा, फ्रॉइडशी अर्भकीय लैंगिकतेच्या सिद्धांतावर तीव्र मतभेद झाल्यामुळे त्या दोघांनी स्वतंत्र संशोधन सुरू केले. युंग यांनी⇨ विश्लेषणात्मक (ॲनॅलेटिकल) मानसशास्त्र व ॲड्लर यांनी वैयक्तिक वा ⇨ व्यक्तिमानसशास्त्र (इंडिव्हिज्युअल) अशा नवीन मनोविश्लेषणात्मक प्रणाली स्थापित केल्या.
‘अबोध मनातून उगम पावून व्यक्त होऊ पाहणारी चिंता हेच मनोविकाराचे कारण’ ह्या फ्रॉइड यांच्या मूळ सिद्धांतावर आधारलेल्या निरनिराळ्या स्वतंत्र नव-मनोविश्लेषणात्मक (नियोफ्रॉइडीयन) प्रणाली पुढे अस्तित्वात आल्या.
• निरनिराळ्या स्वतंत्र नव-मनोविश्लेषणात्मक (नियोफ्रॉइडीयन) प्रणालीतील मुख्य तत्त्वे
त्यातील मुख्य तत्त्वे अशी आहेत :
1. रांक-जन्माच्या ‘जखमेमुळे’ चिंता निर्माण होते (१९२३).
2. क्लाइन-लहान मुलांचेसुद्धा मनोविश्लेषण करता येते; कारण वयाच्या पहिल्या वर्षीच असणाऱ्या आक्रमक कल्पनाजालामुळे (ॲग्रेसिव्ह फँटसी) ⇨पराहम् (सुपर एगो) निर्माण होतो (१९३२).
3. होर्नाय यांनी ⇨ अहम् चीनवीन संकल्पना ‘स्व’ अशी मांडली व लैंगिकतेपेक्षा सांस्कृतिक संस्कार, सामाजिक घटना तसेच व्यक्तिव्यक्तीतील संबंधांच्या विकृतिकारक परिणामांवर भर दिला (१९३७).
4. फ्रॉम यांनी मनोविश्लेषणात जीवशास्त्रीय प्रेरणेपेक्षा सामाजिक वर्चस्वामुळे निर्माण झालेल्या दुय्यम गरजांना जास्त महत्त्व दिले (१९४७).
5. सलिव्हन यांनी आपल्या गतिकीय सांस्कृतिक प्रणालीनुसार अहम्च्या ऐवजी ‘स्व–रचना’ ही संकल्पना मांडली. ह्या रचनेमुळे व्यक्ती समाजातील (कुटुंबातील) महत्त्वाच्या व्यक्तींनी मान्य केलेल्या वर्तणुकींची एक दृढ रचना आत्मसात करते (१९४७).
6. रॅडो यांच्या ‘समायोजनी’ मनोगतिकी (ॲडॅप्टेशनल सायकोडायनॅमिक्स) प्रणालीप्रमाणे व्यक्तीच्या मनोगतिकी समाकलनात (इंटिग्रेशन) बिघाड होतो. त्यामुळे तिला सामाजिक वातावरणाशी जुळवाजुळव किंवा समायोजन करणे कठीण जाते आणि विकृती निर्माण होते. (१९५६).