दुष्काळ हा आता स्थानिक प्रश्न राहणार नाही. याचे कारण पाण्याचा तुटवडा आणि त्यापाठोपाठ येणारा दुष्काळ हा प्रश्न यापुढे जगातील अनेक देशांना सतावणार आहे. एखाद्या रोगाची साथ एके ठिकाणी सुरू व्हावी आणि तिने जगच व्यापून टाकावे, तसाच प्रकार आता पाणीप्रश्नाबाबत होणार आहे, असे मत अभ्यासकांनी मांडले आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने २०१२ पासूनच आपल्या ‘धोके’ सांगणाऱ्या वार्षिक अहवालात पाणीप्रश्न हा जागतिक अर्थव्यवस्थेतील पहिल्या पाच धोक्यांपैकी एक असल्याचे नमूद करण्यास सुरुवात केली आहे. याचे कारण जगातील ४०० कोटी लोक पाण्याची कायमच टंचाई असलेल्या भागात राहातात, तर उरलेल्या लोकांना वर्षातला किमान एक महिना पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागते!
पृथ्वीवरील उपलब्ध पाण्याचे साठे झपाट्याने कमी होत आहेत. इराणच्या वायव्य भागातील उर्मिया तलावातील पाणी गेल्या ३० वर्षांत ८० टक्क्यांनी कमी झाले आहे. चीनमधल्या यलो नदीपासून ते अमेरिकेतल्या कोलोरॅडो नदीपर्यंत अनेक नद्यांचे पाणी सागराला मिळतच नाही. अनेक नद्यांची नैसर्गिक पात्रे बदलली आहेत. नद्यांना कालवे काढून ते पाणी शेतीसाठी, कारखान्यांसाठी आणि घरगुती वापरासाठी वापरले जात आहे. एखाद्या सागरासारखे स्वरूप असलेला मध्य आशियातील अरल ‘गायब’च झाला आहे. अमेरिकेपासून ते भारत आणि पाकिस्तानपर्यंतच्या अनेक प्रदेशांतील भूमिगत जलसाठे, त्यांचे पूर्ण पुनर्भरण होऊ नये, इतक्या वेगाने कमी होत आहेत. इतर जलसाठे सांडपाणी, रासायनिक खते यांनी प्रदूषित आहेत.
चेन्नई, इस्तंबूल, जकार्ता, मेलबर्न, केपटाऊन, मॉस्को, लॉस एंजेलिस किंवा कॅलिफोर्नियामध्ये आज पाणीटंचाई आहे. पण मुळातच बेताचे पाणी असणाऱ्या सिंगापूर आणि इस्राएल या देशांत आज पाण्याची वानवा नाहीय. त्यांच्याकडून आपण शिकण्यासारखे आहे. संयुक्त राष्ट्रांचे एक अधिकारी मिझुटोरी यांनी केलेले भाष्य डोळे उघडणारे आहे. ते म्हणतात, ‘एखाद्या रोगाची साथ पसरावी, तशी दुष्काळाची साथ जगभर ‘पसरण्या’चे दिवस फार लांब नाहीत आणि या साथीला रोखण्यासाठी कोणतीही ‘लस’ उपलब्ध नाही!’