रोजच्या जगण्यासाठी पावलोपावली ऊर्जेची प्रचंड आवश्यकता असते. गेली कित्येक वर्ष जीवाश्म इंधनापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर केला जात होता. परंतु आता त्याचे विघातक परिणाम जागतिक तापमान वाढीच्या स्वरूपात दिसून येत आहेत.
रोजच्या जगण्यासाठी पावलोपावली ऊर्जेची प्रचंड आवश्यकता असते. गेली कित्येक वर्ष जीवाश्म इंधनापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर केला जात होता. परंतु आता त्याचे विघातक परिणाम जागतिक तापमान वाढीच्या स्वरूपात दिसून येत आहेत. शिवाय जीवाश्म इंधनाचे सीमित असणारे साठे लवकरच संपुष्टात येतील. आणि मागणी तर तुफान वेगाने वाढतेय. अशा वेळेला अक्षय ऊर्जेची निर्मिती आणि तिचा वापर या दोन्ही गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत.
सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जैवइंधन (बायोफ्युएल), लाटांपासून ऊर्जा निर्मिती आणि भूऔष्णिक ऊर्जा अशा निरनिराळ्या प्रकारच्या अक्षय ऊर्जेचा सद्यस्थितीत विचार करणे फार आवश्यक आहे. काही प्रमाणात जलविद्युतनिर्मिती आपण करत असतो. पण त्यामुळे उद्ध्वस्थ होणारी जंगले आणि विस्थापित होणारी माणसे या बाबीकडे कानाडोळा करून चालणार नाही. अशी ऊर्जा म्हणूनच शाश्वत नाही. अक्षय ऊर्जा मात्र हरित ऊर्जा असून ती प्रदूषणकारी नसते. त्याच्या वापराने पर्यावरणाची हानी होत नाही आणि ही पुनर्नवकरणीय असते. त्यामुळे आता आपल्याला अशाच ऊर्जेचा वापर करणे आवश्यक आहे.
भारत हा जगातला एकमेव देश आहे जिथे अक्षय ऊर्जेच्या बाबतीत काम करण्यासाठी वेगळे मंत्रालय आहे. 'मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी'. गेल्या पाच वर्षांतील अहवाल बघितल्यास काही बाबी अभिमानपूर्वक नमूद कराव्याशा वाटतात. जागतिक पातळीवर सर्वांत मोठा अक्षय ऊर्जा विस्तार करण्याचा कार्यक्रम २०२२ पर्यंत आपल्या देशात घेतला जात आहे. २०२२ पर्यंत १७५ गिगावॉट ऊर्जा निर्मिती करण्याचे आपले लक्ष्य आहे आणि हीच क्षमता २०३० पर्यंत ४५० गिगावॉटपर्यत नेण्याचे आपले शासकीय धोरण आहे.
भारतात सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांच्या निर्मितीत तामिळनाडू, गुजरात, राजस्थान ही राज्ये आघाडीवर आहेत. पवन ऊर्जेच्या बाबतीत कर्नाटक व महाराष्ट्र अधिकाधिक सक्षम होत आहेत. अलीकडच्या काळात लडाखमध्ये जागतिक पातळीवरचे सर्वात मोठे सोलर फार्म तयार होत आहे. सौर ऊर्जा निर्मितीसाठी लागणारे सिलिकॉन सेल्स आणि इतर साधने आता बऱ्यापैकी कमी किंमतीत उपलब्ध होऊ लागली आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत अक्षय ऊर्जा क्षमता २२६ टक्क्यांनी वाढली आहे. भारतात २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत ३६७ गिगा वॉट अक्षय ऊर्जा निर्माण करण्यात आली आहे. एकूण ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या २३.३९ टक्के इतका हा वाटा आहे.
.सौरऊर्जेची निर्मिती गेल्या साडे पाच वर्षांत २.६ गिगा वॉटवरून ३४ गिगावॉटवर सरकली आहे. यावरून आपण अक्षय ऊर्जेच्या बाबतीत दिवसेंदिवस सक्षम होत आहोत हे कळून येते. आपला देश आता 'आंतरराष्ट्रीय सोलार अलायन्स' मध्येही महत्वाची भूमिका बजावत आहे. पर्यावरणाच्या समृद्धीसाठी योग्य प्रकारच्या अक्षय ऊर्जेची निर्मिती आणि वापर करून आपण हवामानबदलाचे संकट देखील टाळू शकतो, हाच २० ऑगस्ट रोजी भारतात साजरा होणाऱ्या अक्षय ऊर्जा दिनाचा सारांश आहे.