पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 पासून सातत्यानं 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या अंतिम रविवारी जनतेशी संवाद साधतात. आज मन की बात शंभरीत पदार्पण करीत आहे. त्यामुळे त्याची जय्यत तयारी सुरू आहे. देशवासियांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या कल्पना, समस्या आणि मतं ऐकणं या उद्देशानं मोदींनी `मन की बात` हा कार्यक्रम सुरु केला होता. आज या मन की बातची शंभरी पूर्ण होतेय. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरात या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मुंबईसह उपनगरातल्या 5 हजारांहून अधिक ठिकाणी 'मन की बात' कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आलीये.
लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर विशेष जबाबदारी
'मन की बात'चा 100 वा भाग संस्मरणीय करण्यासाठी भाजप आणि सरकारने रोडमॅप तयार केला आहे. तो यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या वतीने सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मन की बातचे प्रसारण ऐकण्यासाठी भाजपच्या सर्व खासदार आणि आमदारांनी विशेष व्यवस्था केली आहे. या अंतर्गत जास्तीत जास्त लोकांचा समावेश करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. सर्वसामान्यांपासून ते जाणकारांपर्यंत सर्वांची उपस्थिती असावी, अशी सूचना देण्यात आली आहे.
• भारतातील राजभवनांमध्ये होणार थेट प्रक्षेपण
पंतप्रधान मोदींच्या मन की बातच्या शंभराव्या भागाचं देशातील राजभवनांमध्येही थेट प्रक्षेपण होणार आहे. मुंबईत राजभवनात होणाऱ्या 100 व्या भागाच्या प्रक्षेपण कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि 'मन की बात' मध्ये उल्लेख झालेल्या व्यक्ती उपस्थित राहणार आहे. यामध्ये पद्म पुरस्कार विजेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योग समुदाय आणि चित्रपट उद्योगातील नामवंतांचा समावेश आहे. तर केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पीयूष गोयल मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणांहून 'मन की बात'चं थेट प्रक्षेपण पाहणार आहेत. 'मन की बात'च्या 100 व्या भागाचा सोहळा साजरा करण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया आणि देशभरातील विशेष महत्त्वाच्या 12 स्मारकस्थळांवर सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून मोठ्या पडद्यांवर प्रक्षेपण केलं जाणार आहे.
• शंभराव्या 'मन की बात'निमित्त मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन
गृहमंत्री अमित शहा रविवारी मुंबईतील विलेपार्ले येथे 'मन की बात' निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर पियुष गोयल कांदिवलीत होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. भारतीय जनता पक्ष (BJP) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या रेडिओ प्रसारणाचा शंभरावा भाग 'अभूतपूर्व' जनसंपर्क कार्यक्रम बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पीएम मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी त्यांच्या मासिक प्रसारणादरम्यान अनेक मुद्द्यांवर बोलतात. हा कार्यक्रम 2014 मध्ये सुरू झाला होता.