चांगले व वाईट गुण हे एकाच वेळी एकाच व्यक्ती व परिस्थितीमध्ये अस्तित्वात असू शकते. एकाच नाण्याच्या या दोन बाजू. त्यासाठी मन:स्ताप करून घेण्याची गरज नाही, असे मानसशास्त्र सांगते.
गोष्टी असतात. प्रत्येक परिस्थितीत काही चांगली अंग असतात, काही सकारात्मक शक्यता व काही आपल्या फायद्याच्या गोष्टी असतात. काही त्रासदायक किंवा वाईट अंगही असतात. व्यक्तींचेही तसेच. प्रत्येक व्यक्तींमध्ये काही चांगले गुण असतात व त्याच वेळी काही वाईट गोष्टी, सवयी असू शकतात. मनाने चांगली, इतरांना मदत करणारी व्यक्ती ही काही कारणाने व्यसनी असू शकते. अत्यंत हुशार व होतकरू व्यक्ती ही काहीशी कुचकट वा स्वार्थी असू शकते. चांगले व वाईट हे एकाच वेळी एकाच व्यक्ती व परिस्थितीमध्ये अस्तित्वात असू शकते, हे आपल्या गुंतागुंतीच्या क्लिष्ट अशा जगाचे सत्य आहे. मात्र, ध्रुवीय विचारांमध्ये ते सत्य धूसर होते व सोप्या प्रकारचे, काळे किंवा पांढरे असे वर्गीकरण करणे हे आपल्याला मोह घालू शकते. छोट्या-मोठ्या प्रसंगांवरून वा अप्रिय अनुभवांवरून आपण अशा दोन टोकांचे विचार करण्यासाठी प्रवृत्त होऊ शकतो.
‘तू कधीच माझे ऐकत नाहीस. कधीच वेळेत अभ्यास पूर्ण करत नाहीस. तुला काहीच धड जमत नाही,’ अशा प्रकारची आई-वडिलांनी आपल्या मुलांना म्हटलेली वाक्ये हे ध्रुवीय विचारांचे उदाहरण. तसेच, ‘तू नेहमीच माझा वाढदिवस विसरतोस. तू कायम माझ्याशी भांडायची संधी शोधत असतेस. तू कधीच मला घरच्या कामात मदत करत नाहीस. तू नेहमी माझा अपमान करतोस. तू कधीच माझी बाजू घेत नाहीस,’ अशी नात्यांमध्ये वापरली जाणारी वाक्येही ध्रुवीय विचारांचीच परिणिती. मात्र, हे नेमके आपल्यासाठी व मानसिक स्वास्थ्यासाठी का हानिकारक ठरू शकते? कारण अशा प्रकारच्या दोन टोकांच्या विचारांमधून टोकाच्या भावनाही निर्माण होतात. वरील प्रकारच्या ध्रुवीय संवादांमधून समोरची व्यक्तीही दुखावते. तिला आपल्यावर आक्रमण झाल्याची भावना येते. त्यांच्या दृष्टीने त्यांनी काही वेळा तुमचा वाढदिवस लक्षात ठेवलेला असतो, तर तो काही वेळा विसरला असतो. समोरून तो कधीच लक्षात ठेवला जात नाही किंवा कायम विसरतो, असे एका प्रकारचे आरोप झाल्यामुळे ती व्यक्ती स्वतःचा बचाव करायला भाग पडते. त्यातून ती कधी चिडते, आरोप-प्रत्यरोप करते व भांडणांना सुरुवात होते. कधी शांततेत आपल्यापासून लांब लांब जात राहते. नात्यांमध्ये ताण किंवा दुरावा निर्माण होणे हा त्याचा परिणाम होतो. मनात टोकाच्या भावना निर्माण होतात. राग, चिडचिड, अपराधीपणाची वा अन्यायाची भावना, तर कधी असुरक्षितता अशा नकारात्मक भावना निर्माण होतात. मानसिक तणाव वाढतो. नैराश्य व ताण यांसारख्या मानसिक आजारांची शक्यता बळावते.
हीच ‘ब्लॅक अँड व्हाइट’ विचारसरणी माणूस स्वतःच्या बाबतीत वापरतो, तेव्हा तो आत्मविश्वास व आनंद दोन्ही गमावून बसतो. एखाद्या नोकरीसाठीच्या मुलाखतीमध्ये दहा-बारा प्रश्नांपैकी एखाद-दुसरा प्रश्न चुकला किंवा त्यांची उत्तरे व्यवस्थित देता आली नाही, तर ‘संपूर्ण मुलाखत वाइट गेली, मला कधीच नीट मुलाखत देता येत नाही,’ असा विचार करणे म्हणजे ध्रुवीय विचार करणे. अशा प्रकारच्या विचारांतून काय होईल? आपला आत्मविश्वास कमी होणे ही त्याची अगदी नैसर्गिक परिणिती. प्रत्यक्षात मुलाखत हा काही चांगल्या आणि काही वाईट अशा प्रश्नांचे मिश्रण होता. मात्र, टोकाचा विचार करण्याच्या या वैचारिक त्रुटींमुळे त्यातील नकारात्मक अनुभवांना सर्वाधिक महत्त्व देऊन तो पूर्ण अनुभव नकारात्मक आणि टोकाचा होता असे समजणे, हे किती तर्कशुद्ध वाटते?
म्हणूनच ही वैचारिक त्रुटी काढून त्या जागी विवेकी व वास्तववादी विचारसरणी अवलंबणे आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. त्या साठीची प्रथम पायरी म्हणजे आपल्याकडून अशी काही ध्रुवीय विचारांची त्रुटी संवादांत व विचारांत आढळते का ते शोधणे, त्यासाठी ‘कायम, कधीच, नेहमी’ अशा प्रकारचे शब्द आपण वापरत आहोत का, याचा शोध घेणे उपयुक्त ठरेल. आत्मनिरीक्षण करून पाहू, की असे ध्रुवीय विचार आपण करतो आहोत का? कुठल्या बाबतीत, कुणाबद्दल ते जास्त प्रमाणात होत आहेत, त्याचाही शोध घेऊ आणि त्यांच्यापासून आपल्या मनाला मुक्त कसे करता येईल ते पुढील भागांत अजून खोलात जाऊन पाहू.
तोवर याची आठवणही स्वतःला करून देऊ, की आपण सर्व जण आणि आपल्या आसपासची सर्व परिस्थिती या चांगले आणि वाईट यांचे एक प्रकारचे मिश्रण म्हणून बनलेल्या असतात. त्यापैकी कुणीच पूर्णपणे पांढरे किंवा पूर्णपणे काळे असू शकत नाही, तर त्या असतात ‘ग्रे’ रंगाच्या वेगवेगळ्या छटा. ध्रुवीय विचारांमध्ये मात्र या ‘ग्रे’च्या छटांचे वर्गीकरण हे फक्त दोनच गटांमध्ये केले जाते. एक तर पूर्णपणे काळे किंवा पूर्णपणे पांढरे. ते वास्तवाला धरून नसल्यामुळे आपल्याला या विचारसरणीतून लागणारा परिस्थितीचा व्यक्तींचा व त्यांच्या वर्तनाचा अर्थ हा त्रोटक ठरतो. तो सत्यापासून लांब बसू शकतो. याची आपणच आपल्या सतत करून दिलेली जाणीव, हे त्रुटी काढून टाकण्याच्या प्रवासातला मैलाचा दगड ठरेल.
प्रश्नाने तेव्हा अस्वस्थ केले होतेच; पण स्तनामधील गाठ लपवू बघणाऱ्या आटोसाबद्दल कुतूहलही निर्माण झाले होते. चाकरांच्या ताफ्यात काम करणाऱ्या एका गुलामकडून ती लालबुंद गाठ कापून घेताना तिला झालेल्या वेदना तिने कशा सहन केल्या असतील? तिला वाटणारी त्या गाठीबद्दलची शरम त्या वेदनेपेक्षा अधिक प्रखर असल्याचे जाणवले तेव्हा प्रश्न पडला, आजची आटोसा आणि इसवी सनापूर्वीची आटोसा या दोघींमध्ये नेमका फरक काय?
काळाची पाने उलटून किती तरी पुढे आलो आपण; पण स्तनात वाढणाऱ्या गाठीबद्दल वाटणारी शरम तशीच राहते, राहू शकते? गाठीबद्दल कुणाशी बोलावे याचे उत्तर मिळवता-मिळवता ती गाठ वाढत राहते आणि मग गोष्टी अधिकच गुंतागुंतीच्या होऊन बसतात! अशा स्त्रियांच्या गोष्टी शोधत असतानाच हाती लागली, ती मार्टिना नवरातिलोवा आणि ख्रिस एव्हर्ट या दोन मैत्रिणींची विलक्षण गोष्ट. एके काळी टेनिसच्या मैदानावरच्या त्या एकमेकींच्या कट्टर प्रतिस्पर्धी. एकमेकींविरुद्ध ८० मातब्बर दर्जाचे सामने खेळताना वरचढ ठरण्याची दोघींमधील जिद्द मैदानावर बघताना अनेकदा प्रेक्षकांचा श्वास थांबायचा! सामना संपल्यावर काही क्षणांची गळाभेट झाली, की पुन्हा नव्या उमेदीने जिंकण्याची लढाई सुरू! टेनिसला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा दिसलेले वास्तव मोठे अद्भुत होते. दोघींनी मिळवलेल्या मोठ्या विजयांची संख्या अगदी सारखी असल्याचे! निवृत्तीनंतर त्या एकमेकींच्या शेजारणी होत-होत मस्त मैत्रिणी झाल्या. गप्पा मारताना भूतकाळाबद्दल आठवावे आणि बोलावे असे खूप काही दोघींनी कमवले होतेच; शिवाय त्यातील स्पर्धेचा कडवेपणा संपल्यामुळे होत्या त्या निखळ आठवणी! मात्र, वयाच्या पासष्टीचा टप्पा गाठता गाठता दोघींनाही आणखी एका सामन्याला सामोरे जाण्याची वेळ आली, तो होता कॅन्सर नावाच्या खुनशी खेळाडूशी!
अवघड, अंतिम निर्णयाचा थांग नसलेला हा सामना. आठ-दहा महिन्यांच्या अंतराने दोघींच्याही आयुष्यात आलेल्या कॅन्सरने त्यांच्या नात्याला एक वेगळाच परस्पर आस्थेचा सहज वळसा मिळाला. उपचारांचे सगळे टप्पे पार केल्यावर त्या दोघी एका संध्याकाळी एकत्र भेटल्या. भूतकाळातील टेनिसमधील जय-पराजय त्यांच्यासाठी आता महत्त्वाचे नव्हते. दोघींनीही वर्तमानात मिळवलेला विजय साजरा करणे महत्त्वाचे होते. मैदानावरील गळाभेटीपेक्षा ही भेट किती सुकून देणारी आहे, आश्वासक आहे हे जाणवलेल्या त्या दोघी नक्कीच हातात हात घेऊन निःशब्द बसून राहिल्या असतील! आणि मग वाटायला लागले, बायकांना होणारे कॅन्सर हे काही वेगळेच प्रकरण असते का? क्लिनिकली तसे काही वेगळे नसेल, नसणारच; पण या आजाराने आयुष्यात होणारी उलथापालथ, ती बदलून टाकत असेल का बाईला? भूतकाळ मागे टाकून आरपार बदलून जाण्याची क्षमता प्रत्येक माणसांत असतेच असे नाही; पण जेव्हा कॅन्सरसारखे आव्हान समोर उभे राहते, तेव्हा आसपासच्या शहाण्या माणसांकडून जगण्याला उपयोगी पाडणारे शहाणपण शोषून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक सामान्य कुवतीची स्त्री करायला लागते. अशा वेळी तिच्या आसपास तिला शहाणे करणाऱ्या स्त्रिया असणे मात्र असणे फार गरजेचे असते.
मार्टिना- ख्रिसची गोष्ट हेलावून टाकते; पण तशी ती दूरचीच! कॅन्सरची जनुके वारसा हक्काने मिळाली आहेत हे समजल्यावर दोन्ही स्तन आणि गर्भाशय काढून टाकण्याचा निर्णय घेणारी अँजेलिना ज्योलीसारखी हॉलिवूड अभिनेत्री नमस्कार करण्याइतकी थोर! पण शेजारी-पाजारी राहणाऱ्या आणि एकाएकी कॅन्सर नावाचा धक्का सोसावा लागणाऱ्या स्त्रियांपुढे मात्र आदर्श असतो, तो मंगला नारळीकर यांचा. कॅन्सरबद्दल खुलेपणे बोलायला शिकवणारी, त्या काळातील अन्नाबद्दल, जीवनशैलीबद्दल बोलणारी आणि कॅन्सरबद्दल कृतज्ञ असलेली एक हक्काची मैत्रीण. त्यांना आधार देत असते. लढण्याचे बळ देत असते. अशी मैत्रीण गेल्याचे दुःख म्हणूनच फार जिव्हारी लागले आहे!