एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता नजीकच्या भविष्यात व्यापारक्षेत्राचे रुपच पालटून टाकेल, अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत.डाक आणि तार विभागाच्या कचेरीशी एक बोधवाक्य दिसायचे.-अहर्निशं सेवामहे. अजूनही दिसते; पण बदलत्या जमान्यात टपाल खात्याचे प्रयोजन कमी होत गेले, तसतसे हे बोधवाक्यही अनोळखी झाले. दिवसरात्र लोकांच्या सेवेत व्यग्र राहणारी ही यंत्रणा मागे पडली, त्याऐवजी दुसरी व्यवस्था उभी राहिली. डाक विभागाची जागा ईमेलने घेतली, मनीऑर्डरीचा जमाना गेला, आणि नेट बँकिंगसह डिजिटल पेमेंट सोयीस्कर वाटू लागले.
महिन्याचा किराणा सोडा, कोपऱ्यावरच्या दुकानातून अंडी आणि पाव आणण्यासाठीही जावे लागत नाही, कुठल्याशा डिलिवरी ॲपवर ऑर्डर नोंदवली की साधी कोंथिबिरीची जुडी दहा मिनिटात दाराशी येते! कपडे घेण्यासाठीही मोठाल्या शोरुमचे काचेचे दरवाजे ढकलायची गरज आता संपत चालली. ऑनलाइन कपडे मागवता येतात, आणि घरच्या आरशासमोर ‘ट्राय’ करुन नाकबिक मुरडून परतही करता येतात.चांगल्या पगारदार नोकरीसाठीच्या मुलाखतीही आताशा झूम कॉल किंवा तत्सम मार्गाने पार पडतात. ऑफर लेटरही इमेलवरच मिळते आणि कदाचित नोकरीचे स्वरुपही ‘वर्क फ्रॉम होम’ सारखे निघाले, तर धडपडत, डबाबिबा घेऊन ऑफिस गाठायचीही गरज नाही. व्यवहार, खरेदी-विक्री, सेवा-व्यवसाय यापैकी कुठल्याही गोष्टीसाठी भौगोलिक अंतरे मोजण्याची आता गरज उरलेली नाही. गेल्या दोन-अडीच दशकांमध्ये जग आक्रसले ते हे असे.माध्यमे, किंवा दूरसंपर्काच्या क्षेत्रातील बदलांमुळे काळ-काम-वेगाचे गणितच बदलले. आता हे सारेसुद्धा कालबाह्य ठरेल, अशी स्थिती पैदा होऊ लागली आहे. याला कारणीभूत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग. एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता नजीकच्या भविष्यात व्यापारक्षेत्राचे रुपच पालटून टाकेल, अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. मध्यंतरी चॅटजीपीटी नावाचा एक चमत्कारी चॅटबॉट अवतरला.
सेकंदभरात निरनिराळे मजकूर तयार करुन देणारे, उद्योग-व्यवहारात आवश्यक ठरणारे तक्ते, आकडेवारी क्षणार्धात मांडून देणारे, तुमच्या मनातले काहीअंशी ओळखून त्याबरहुकूम माहिती हुडकून हाजिर करणारे हे ‘गप्पायंत्र’ एक प्रकारचा यंत्रमानवच. अर्थात यंत्रमानव म्हटले की एआय- आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, ‘एक्स मशिना’ अशा नावाच्या हॉलिवुडी चित्रपटातले यांत्रिक अवतार आठवतात. पण चॅटबॉट हे विविध संगणकीय प्रणाली आणि अल्गोरिदमचे कडबोळे असते. महाप्रचंड माहितीच्या सप्तसागरातून हा चॅटबॉट सतत विकसित होत जातो, आणि अंतिमत: माणसाने फर्मावलेली कामे बिनबोभाट करुन देतो.थोडक्यात, एखाद्या प्रासंगिक कवितेपासून, नटीच्या अप्रासंगिक मुलाखतीपर्यंत वाट्टेल तो मजकूर देण्याची चॅटजीपीटीसारख्या गप्पायंत्राची क्षमता असते. चॅटजीपीटीचे तंत्रज्ञान अजून थोडे बाल्यावस्थेत असल्यामुळे नकळत विनोदनिर्मिती करण्याचीही ताकद ते राखून आहे. पण आणखी काही काळातच हे चॅटबॉट अत्यंत विकसित अवस्थेत ’इ-कॉमर्स’मध्ये क्रांती घडवतील, असे तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे आहे. ॲमेझॉन, नेटफ्लिक्स वगैरे कंपन्यांनी चॅटबॉटचे महत्त्व ओळखून त्यांना आपल्यात सामावून घेण्यास सुरवातदेखील केली आहे.एकूणच या क्षेत्रात आर्थिक उलाढाल प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता असून या बड्या कंपन्यांच्या मक्तेदारीचा नवा अध्याय कदाचित सुरू होईल. हे चॅटबॉट गरजू ग्राहकाने विचारल्यानंतर यथाशक्ती उत्तरे देतील, इथवर ठीक आहे; पण गरजूपर्यंत आपणच पोचण्यासाठी काय करायला हवे? असा उलटा विचार आता या कंपन्यांनी सुरु केला आहे. म्हणजे, तुम्ही न विचारताच तुमच्या मनातले ओळखून तुम्हाला हवे ते उत्पादन तुमच्यापर्यंत कसे पोचवता येईल, या प्रश्नाचे उत्तर ते शोधू लागले आहेत.व्यावसायिक पोर्टलवर नेहमीच उबग आणणाऱ्या जाहिराती, लिंक्स यांचा भडिमार असतो. तो टाळून थेट ग्राहकाची अचूक नड भागवण्याची या कंपन्यांची इच्छा आहे. चॅटजीपीटीच्या मदतीने ते होऊ शकेल. एखादी व्यक्ती मजकूर टाइप करताना कुठले शब्द वापरते? किती शब्द वापरते? त्याची मानसिकता कशी आहे, याचा अंदाज घेत घेत स्वत:च विकसित होणाऱ्या या चॅटबॉटमुळे येत्या काळात ई-व्यापारात आमूलाग्र बदल संभवतील. ‘कॉन्व्हर्सेशनल आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात संवादी कृत्रिम बुद्धिमत्ता पूर्णत: विकसित होऊ शकली, तर बव्हंशी कामे हे चॅटबॉटच करुन टाकतील.ग्राहकाशी संपर्क, त्याच्या शंकांचे निरसन, उत्पादनाची डिलिव्हरी, विक्रीचे व्यवहार, बँकेतील पैशाचे नियमन, करभरणा, हिशेबठिशेब, आदी कामे या यंत्रांवर सोपवून खरीखुरी प्रबुद्ध माणसे धोरणात्मक निर्णय घ्यायला आपला मेंदू मोकळा ठेवू शकतील. आजमितीस ई-कॉमर्सची बाजारपेठ सुमारे दोन ट्रिलियन डॉलर इतकी आहे. येत्या दोन वर्षात बाजारपेठेचा आकार चौपट होईल, तो केवळ चॅटजीपीटीसारखे चॅटबॉट कामाला लागल्यामुळे. त्यापुढला काळ तर हे चॅटबॉट अक्षरश: खाऊन टाकणार आहेत. प्रगत देशांमध्ये चॅटबॉटने इ-व्यापारात शिरकाव साधलाच आहे.हॉटेलांच्या खोल्यांचे, प्रवासाचे बुकिंग पटकन करुन देणाऱ्या एका जगविख्यात बुकिंग कंपनीने तर आपल्या संकेतस्थळावर प्रथमदर्शनीच एक मजकूर टाकला आहे : ‘‘वी लव्ह अवर बॉट…तो खूप मेहनती, मददगार आणि मायाळू आहे. चोवीस तास राबतो. आमच्या चिमुकल्या ‘कस्टमर केअर टीम’चा तो एक अविभाज्य घटक आहे…’’ हे आहे आजचे वर्तमान. उद्या हेच चॅटबॉट त्यांच्या विकसित अवतारात आपल्या सेवेत अहर्निश हजर होतील, तेव्हा जग पुन्हा बदललेले असेल.